Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २५८ ]
श्री शके १६७४ भाद्रपद शुद्ध १४
राजश्री दामोधर माहादेव गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
मल्हारजी होळकर दंडवत विनंति सु॥ सलास खमसैन मया अलफ. मुरादाबादकर गृहस्थ वगैरे दक्षणी यांजला असामीमुळें विद्यमान राजश्री नरसिंगराव हरकारें यास रुपये ७५० साडेसातसें देविले असेत. तुह्मांकडील अंतरवेदच्या महाल ऐवजी देऊन कबज घेणें. छ. १३ जिलकाद. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.
मोर्तब
सुद
श्रीह्माळसाकांत
चरणींतप्तर खंडोजी
सुत मल्हारजी
होळकर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २५७ ]
श्रीमार्तंड शके १६७४ भाद्रपद शुद्ध ९.
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री सुभानबा यासीः-
सटवोजी जाधवराऊ आशीर्वद येथील क्षेम ता। छ. ८ जिल्काद सोमवार मुकाम जेजोरी यथास्थित असे. यानंतर ;--- आजि सोमवारी दीडप्रहरां आईसाहेब उपरांतिक पेशव्यांच्या हवेलींत आली. तेथेंच तक्ता मांडून आराश केली होती. घरांत घेऊन बैसली. श्रीमंत उभयतां बंधू सरदार लोकांनशीं वाडियांत मुजरे करून बैसले. मातुश्रीचा निश्चय होती की, एकटे नानाशी मात्र जें बोलणें तें बोलोन. त्यावरून उभयतांचे मात्र साहा घटका खलबत बोलणें जाहालें. राजाजवळी राजश्री बाबाजी जाधव याजकडील लोक चौकीस होते ते उठून यांणीं चौकी आपली ठेविली; बाबाजी जाधव यासी निरोप दिल्हा. त्यांणी कूच करून आईसाहेबांस मजुरा करून गेले. हा राजा सत्य नाहीं, ये गोष्टीची मर्हाटियाजवळी उदईक शफतपूर्वक सांगितलें, राजश्री संभाजी महाराज आणून तक्तावरी बसवावें; दुसरें, राजाचें नसल नाहीं ह्मणोन आईसाहेबांनी साफच सांगितले. याउपरि, गुंता राहिला नाहीं. शंभुमहाराजहि पालीस आले ह्मणून बातमी आली. तेहि लौकरच येतील. उद्याच्या दिवशीं आईसाहेब श्रीचें देवदर्शन करून पुण्यास जावयाचा विचार होईल. आईसाहेबांचे मनांतील किलाफ दूर होवून यांचे मनोदयानरूप राज्यभार करावासा जाहाला. उभयपक्षीं विकल्प उठोन निःशैल्य जाहालें. याउपरि जे मनसबे होणें ते करवीरनिवासी आल्याउपरि, पुण्यांत होतील. मर्हाटे याजपासी शफतपूर्वक, हे राजा नसल नव्हे, ह्मणून सांगितलें. याप्रमाणें तह जाला आहे. * हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २५६ ]
श्री शक १६७४ ज्येष्ठ वद्य १४.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंदराव गोसावी यांसीः--
स्नो। बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. चिरंजीव नानाचे पत्रीं विस्तारें लिहिलें आहे. सारांश ज्याकाळीं जो प्रसंग प्राप्त होईल, तो त्या त्या प्रकारें निभावावा. एतद्विषयीं प्राचीन चमत्कारिक कार्यकर्ते यांच्या प्रासंगिक युक्ति, मोंगलाईतील व दक्षणेंतील, व शास्त्रांतील तुह्मांस स्फुरद्रुप आहेत; व मनन केलिया तुह्मांसच सुचतील, हा भरवसा पूर्ण मजला आहे. हरप्रकारें आहे. साहेबासीं राजकारण करून, त्यांचे संशय दूर करून, स्वस्थ रीतीनें जसें प्रशस्त वाटे, तैसें राज्य करीत. दुर्लौकिक दिल्लीपावेतों विरुद्ध न होय, ऐसे हरएक तजविजनें करणें. आमचा अर्थ तरी : जें खावंदानें दिल्हें तें खाऊन, चाकरीस हाजर राहून, जें काम सांगतील व आपल्याच्यानें होईल, तें करूं. आईसाहेबांनी सुखरूप आपले खातरेस येईल, तसे कार्यभाग करावें. या विचारें बोलून वसवास दूर होय, ऐसें करणें. नच होय, तर आह्मीं व आमच्या पक्षीचे जे मनापासून असतील ते उदास रीतीनें हरामखोरी न करितां, आपलें संभाळून आह्मांसहवर्तमान राहातील. ज्याची जे क्रिया असेल, तसें फल होईल. त्या अन्वयें बोलून लौकिक विरुद्ध करणें. आमचा अर्थ तर, दोन वर्षे कर्जदार जाहालों. आतां अह्मांस दरबारचे तेलमिठाचा कारभाराचा उत्साह नाहीं. विशेष काय लिहिणें ? हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २५५ ]
श्री शके १६७४ ज्येष्ठ वद्य १४.
पु॥ राजश्री गोविंदराव गोसावी यासी :-
आशीर्वाद उपरि. गु॥ आह्मीं नेहमी पंधरा वीस हजार फौजेनसीं सातारां बसलों होतों; त्या वजनामुळें कर्नाटकांत गेले होते. ते अबरू मात्र राखून आले. नफा किमपि न जाहाला. नवाब वगैरे ते प्रांतीचे सर्व संस्थानिक निरंतर चाहातात की, आमचा जबरदस्त पाय कर्णाटकांत न पडावा. सर्व याप्रकारें इच्छित असतां, थोडे फौजेनें पैका कसा उगवतो ? फार फौज पाठवितां, दरबारचे पेच. मिळकत नाही. तेव्हां खावें काय ? याचा विचार तुमचे विचारें नीट उगवून, उत्तम असेल तो लिहिणें. यंदा उडती वार्ता आयकतों कीं, करवीर वेसीपासी मुरारराव सावनुरकर राजकारणें करतात कीं, प्रधानाचें येणें इकडे न होय. राजश्रीपाशीं आमची नालिश करून बहु त्रास द्यावें. जिजाबाईनीं हा अर्थ मनांत धरिला आहे. गु॥ अर्जोजी यादव पेश होते. यंदा कोण आहेत? कोणाचे मारफातीने बोलावें चालावें ? कसें करावे ? मंत्र गुप्त कसा राहील ? याचा विचार कसा करावा ? तो सविस्तर सर्व अर्थ आपले राज्यांतील, मोंगलाईतील, घरांतील ध्यानांत आणून पष्ट विचार लिहिणें. मळमळीत, आमची मर्जी पाहत पाहत बोलतां, तसें न लिहिणें. तुह्मीं रुबरु यावें, भेट व्हावी, कितेक ऐसे अर्थ बोलावे, असे होते; परंतु तुह्मीं तूर्त येत नाही. यासाठी लिहिलें असे. तर उगऊन पष्ट लिहिणें. छ. २७ रजब. हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २५४ ]
श्री शके १६७४ ज्येष्ठ वद्य १३.
पौ। छ. २७ रजब, सु॥
सलास खमसैन.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री त्रिंबक सदाशिव स्वामी गोसावी यासः--
पोष्य विश्वासराव बल्लाळ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. राजश्री भिकाजी साबाजी यांणीं जमादिलाखर महिन्याचा हिसेब पाठविला. त्यास, शिलक नाहीं, खर्चास पाहिजे, ह्मणोन लिहिलें. त्याजवरून, राजश्री दिनकर महादेव यांजकडून खर्चास रुपये ५,००० पांच हजार पेशजी देविले ते पावलेच असतील. व हालीं तुह्मीं पत्र पाठविलें कीं, इमारतीचे वगैरे खर्चास पाहिजे; व आह्मांजळ शागीर्दपेशा आहे, त्यास रोजमुरियास ऐवज पाहिजे. तर सातारियाचे ऐवजी हजार रुपये आह्मांकडे पाठवून द्यावे; ह्मणोन लिहिलेत. त्याजवरून सातारियास भिकाजी साबाजी याजकडे रुपये ४,००० दिनकर माहादेव याजकडून देविले आहेत, ते पावतील. व तुह्मांजवळ शागीर्दपेशा आहे, त्यास रोजमुरियाबा। वगैरे रुपये एक हजार पाठविले आहेत, घेऊन पावलियाचा जाब पाठवून देणें. एकूण ऐवज दरमाहेकडे १०,००० चा भरणा जाला असे. रा। छ. २६ रजबु, सु॥ सलास खमसैन मया व अलफ * बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २५३ ]
श्री
१६७४ वैशाख वद्य ८.
राजश्री मानाजी अंगरे वजारतमाहा गोसावी यांसीः-
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ गोविंद खंडेराव चिटनिवास रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. लेखनार्थ सविस्तर कळला. कैलासवासी आपांचा व तीर्थरूपांचा अक्रुत्रिम स्नेह. तदनुरूप दिवसेंदिवस स्नेहभावाची अभिवृद्धि होत आली. यावरून राजश्री स्वामींचीहि कृपा दृढतेस येत गेली. वतनें जोडून दिल्हीं आहेत. त्यांपैकी अलीकडे पाली, व मिरगड, राजश्री पंतप्रधान यांजकडे गेल्यापासोन वीस गांव घेरा पाली – सरसगड व सात गांव घेरा मिरगड येथील सरदेशमुखीचा अंमलबंद व परगणे चाकण येथील देशमुखीचे वतनास कदम कडू, खोटे, असोन मोगलाचे आश्रयानें खलेल करीत आहेत. व राजपुरी प्रांत स्वराज्यांत आला असोन सरदेशमुखीचे अंमलाची पैरवी होत नाहीं. येविशींचा बंदोबस्त जाला पाहिजे ह्मणोन. राजश्री पंतप्रधान सातारेयाचे मुक्कामी होते तेसमयीं आह्मीहि सातारां आलों होतों त्याप्रसंगी सदरहू सनदांची व सरपाटिगीचीं वतनपत्रें संपूर्ण समागमें होती, ती आपणांस दाखविलीच होती. तदोत्तर राजश्री पंतप्रधान यांस निवेदन करून, राजश्री स्वामींसहि आपण विनंति केली आणि ताकीदपत्रे देविली हे आपणांस सर्व अवगत आहेच. सांप्रत जंजिरे कुलाब्यावरी अग्नीनें कृपा केली. यामुळें सर्व दग्ध जालें. त्यांत वतनपत्रेंहि जळाली. सनदापत्रांचा आश्रय कांहींच राहिला नाहीं. असो ! घडोन आलें तें उत्तम ह्मणावे ! कैलासवासी थोरले नाना व आप्पा यांनी वतनें जोडून दिल्हीं. त्यांच्यामागे कैलासवासी रावप्रधान व जिउबा दाजी यांनी वतनांचे संरक्षण केले. त्याच रीतीने नानापंडित प्रधान व आपण साहित्य करून रक्षीतच आहेत. तथापि दग्ध झाल्याप्रमाणें वतनपत्रें नूतन जालीं पाहिजेत. याची तरतूद करावी ह्मणोन विस्तारें लिहिलें तें कळलें. येशास, आपण--राजश्री स्वामीसंन्निध आले असतां, तेसमयीं वतनी सनदा व पत्रें संपूर्ण दाखविलीं होती. तीं अक्षरशा पाहण्यांत आली होती. त्याप्रमाणें नवीन करून घ्यावयाचें अगाध काय आहे ? श्रीमत्तर मातुश्री आईसाहेब यांचा व राजश्री स्वामींचा एकरूपभाव जाल्यावरी, राजश्री पंतप्रधान यांस विनंति करून पूर्वील वतनी पत्रांप्रमाणे देशमुखी चाकण व कालोसगांव व साबीला, व मुकदमी सरदेशमुखी पंचमहाल व पाली व प्रांत राजपुरी, व सरपाटिलगी कल्याण व भिवंडी सुभा व सुभाचे कुलमुकदमीचे महाल व सुभा दाभोळ व इनामगांव, येणेंप्रमाणें सार्या वतनांची याददास्त आपण पाठविली आहे, त्याबरहुकूम वतनपत्रे सनदा करून घेतल्या जातील. आपले कार्यास अंतर पडणार नाहीं. वतनाचा उपभोग आपण करीतच आहेत. भोगवटियास पत्रेंहि आपले चित्तानुरूप होऊन येतील. रा। छ. २१ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे हे. विनंति.
लेखनसीमा.
० श्री ॅ
जीवाजी प्रभु पुत्र-
स्य रामरावस्याधि-
मताः मुद्रा सर्व गुणोपे-
ता राजसम्राज
वर्धिनि.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६९
श्री १५६७ ज्येष्ठ वद्य २
(सिका) (नकल)
॥ मा॥ अनाम दादाजी नरस प्रभु देशकुलकर्णी व गाउ-कुलकर्णी ता। (सिका) रोहिडखोरे व वेलवंडखोरे यासि किले रोहिडा सु॥ सीत अर्बैन अलफ साल गु॥ छ ११ सफर खुदावत शाह गाजी हुकमतपन्हा याचे हुकूमाने मेहेरबा वजिराचा हाकाम तुमचे नावे आला त्यात मजमून अज रख्तखाने मेहरबा सीवाजीराजे यासि पुडावास तुह्मी मिळताव होऊन रोहिरेश्वरचे पाहाडी तुमचे खोरीत हाजार बारासे जमाव तुह्मी लोकी केला ये बाब रो मा।रनिल्हे याणी तुह्मास खत पा। त्यात इमानभाक जाल्याचा फिसाती मतलब छ २९ सफर कलमी केला आहे हे खबर बादल देशमुख व खोपडे व जेधे देशमुखी ठाणे सिरवली जाहीर केली हे कळून फरारी जालास हरदु सेरीची विलायत वैराण जाली मोकदमे हाली हुजूरचे मेहरबानगी वरून कौलनामा फरमाविला अहसे तरी तुह्मी रयान व पटवारी व बाजे वतनदार याजला कचेबचेनसी आपले मकानी हरदु तपियात येऊन हजर होणे आणि दो हि खोरीची विलायतची सचणी आबादानी करून दिवाण देणे व तुमची जमिदारी हककानु इनामति इसाफतिसी हक बमोजीब घेणे दरबाब हरएक मतलब तकसीर केली ती तुह्मास मुबाहक याचे हुकुमावरून जाली असे दर बाब हरगीर दिवाणातून इजा होणार नाही छ १५ रबिलाखर मोर्तब पारसी (चिरंजीव रावजीस आशिर्वाद विशेष सदरहू कागद असल सिक्यानसी घरी आहे तो तुह्मास माहीत आहे तरी पाठवावा याप्रमाणे मा।र त्या पत्रात आहे ते च पत्र पाहिजे हे आसिर्वाद)*
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २५२ ]
श्री शके १६७४ वैशाख वद्य १.
राजश्री दामोदर महादेव व राजश्री पुरुषोत्तम महादेव गोसांवी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो
मलारजी होळकर व जयाजी शिंदे दंडवत विनंति. सुहूर संन इसन्ने समसैन मया व अलफ. सेख सलातुळा फामी हे सरकार कामाचें जाणून तुह्माकडील महालाच्या तैनातीस करून दिल्हे असेत. याजबराबर रिसाला लोक त्यांचा करार मख्ता सालिना रुपये
१२०० खासा व पुत्र बमय पालखीसुधां
१७५० स्वार आ। १० दरस्वारास सालीना १७५.
१०८० प्यादे आ। ३० दरमहा नफरी रु॥ ३ प्रों।.
एकून दरमहा रुपये ९० दरमाही रु॥.
-----------
४०३०
च्यार हजार तीस करार करून देविले असेत. याजपासून कामकाज घेऊन सदरहू चार हजार तीस रुपये मा।रनिलेस दरमाहा बसेल तेणेंप्रमाणें पाऊन बारा महिन्यांत झाडा करून देत जाणें. महालानिहाय रुपयेऐवजीं मजरा पडतील. ई॥ छ. १४ जमादिलाखरपासून देत जाणें. छ. मजकूर, सु॥ इसन्ने खमसैन पवा अलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २५१ ]
श्री शके १६७४ वैशाख शुद्ध १०.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री देवराऊ महादेव गोसांवी यांसिः--
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. गुजरात प्रांतींच्या माहालचे मामलतीचा मजकूर तपसीलें लिहिला तो सविस्तर विदित जाहला. येविशीचा जाब लिहिणें तो अगोधर लेहून पाठविलाच आहे. व चिरंजीव राजश्री दादा यांस लेहून पाठविलें आहे. तेही लौकरच येणार. ते आलियावरी जे सांगणे तें तुह्मांस सांगितलें जाईल. जाणिजे. छ. ८ जमादिलाखर, सु॥ इसन्ने खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ?
लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २५० ]
श्री शके १६७४ वैशाख शुद्ध ८.
पु॥ राजश्री दामोदर महादेव गोसावी यांसि :-
उपरि. दक्षिणची सुबादारी फैरोजंगास जाली. रुखसतीही होऊन चुकली. प्रस्थानास येणार. आठ दहा हजारपर्यंत फौज जमा जाली. स्वामीचा यांचा स्नेह; आपले भरवशावर येतात. सरदारांस फौजेविसीं लिहिलें. त्यास पठाणाचे लढाईचा खुलासा + + + + + करितां फौज + + + + + नाहीं. आह्मी तिघांतून एक जण याजबा। येऊन, ह्मणोन लिहिलें ते कळलें. ऐशास , हिंदायेख मोही. दीखान होते, तेव्हां नवाब फैरोजंगबहादर येत होते, ते उचित. प्रस्तुत तर, त्यांचेच बंधु नवाब सलाबतजंग मसनदनिसीन जाले आहेत; आणि त्यांणी यावयाची कस्त धरिला. उत्तम. परंतु परस्पर ऐक्यता असिल्यांतच उभयतांचे कल्याण आहे. अन्यथा दौलतेची खराबी. यांत ते येणें, तो विचारच करून येतील. जाणिजे. छ. ६ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें ?
( लेखनसीमा. )