[ २५१ ]
श्री शके १६७४ वैशाख शुद्ध १०.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री देवराऊ महादेव गोसांवी यांसिः--
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. गुजरात प्रांतींच्या माहालचे मामलतीचा मजकूर तपसीलें लिहिला तो सविस्तर विदित जाहला. येविशीचा जाब लिहिणें तो अगोधर लेहून पाठविलाच आहे. व चिरंजीव राजश्री दादा यांस लेहून पाठविलें आहे. तेही लौकरच येणार. ते आलियावरी जे सांगणे तें तुह्मांस सांगितलें जाईल. जाणिजे. छ. ८ जमादिलाखर, सु॥ इसन्ने खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ?
लेखनसीमा.