Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५१५
श्री.
१७२२ पौष वद्य १०
विद्यार्थी गोपाळभट दामले कृतानेक सां नमस्कार विनंति विज्ञापना ता पौष वद्य १० पो यथास्थित असो. विशेष. कृपा करून रा. अंताजीपंताबराबर रु। ५० पन्नास पाठविले ते पावले. आपण जिनस दिला तो गाडलीवर घालून शनवारीं संध्याकाळ पो येऊन पोहचेल. गावड्याचें वर्तमान ऐकिल्यांस आलें कीं, जिवाजी यशवंत याणीं गावडा लुटून घेतला. तेथून मुजरत जलकेकर पाटील आला. त्यानें वर्तमान सांगितलें, तेव्हां खरेंच आहे. पंचवीस स्वारांनशी पळून गेला. वरकड सर्व सलतनत लुटून घेतली. राजश्री दवलतराव शिंदे याचा मुहूर्त माघ शुा ५ चा आहे. तेथून वेदशास्त्रसंपन्न परशरामभट टोंके आले. त्यांनीं वर्तमान सांगितलें, सध्या नगरास गेले, तेथून चांभारगोंद्यास जाणार, तेथून आलियावर जामगांवींहून कूच करून याप्रांतास येणार. कळावें. परंतु सडी फौजेनशीं टोंक्यास व परशरामभट टोंके यांचे घरीं येणार, हें खाचत वर्तमान आहे. वरकड सारी फऊज तोफखाना वगैरे बाभुळगांवचे मागें जाणार. याप्रों वर्तमान आहे. बयाजी निरमब्याचे गाडीवर खोलगट तवा पाठविला. त्याचे पावलीयाचे उत्तर आलें नाहीं. ते ल्याहावें. बहुत काय लिहिणे ? हे विज्ञापना. सेवक अंताजी धोंडदेव सां नमरकार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५१४
पो पौष शुद्ध १४ सोमवार जाबसूद.
श्री.
१७२२ पौष शुद्ध १४
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामींचे सेवेशी:-
विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंती विज्ञापना. येथील क्षेम ता पौष शुद्ध १४ पावेतों आपले कृपेंकरून सर्व यथास्थित असों. विशेष. आपण मसाल्याकरितां जिनस आणविली. त्यास, एथें काहाराकडून + ++ सोय पडेना, ह्मणोन दोन रुपयांची विकत वजन १८ आठरा शेर घेऊन पाठविले आहेत. पावतील. सरकारचे हुजरे व पत्रें गावडे यांणीं तिरस्तळीपासून खंड घेतला तो माघारे देण्याविपई आले होते. तों मा पेशजीं पत्रीं आपणास लिहिलाच होता, त्यावर टोंकेवर व प्रवरासंगमकर यांणीं विचार केला कीं, पांच पांच ब्राह्मण पाठवावे. ह्यावरून जयरामवंत वगैरे टोंकेकर ४ व प्रवरासंगमकर नत्थोबा चांडाळ वगैरे ६ व आपले येथून चिरंजीव गणोबा व मल्हारपंत कुळकर्णी पाटविले होते. त्यास गोंधवणी मुक्कामीं गावडे याचीं भेट जाली. तिहीं क्षेत्राचे यादी लिहून घेतल्या. उपरांत ब्राहाणास मनस्वी शिव्या देऊन उत्तर केलें कीं, तुह्मी देवाचे डागिने कां मोडले, त्यास ते डागिने द्या, तेव्हा तुमची सुटका होईल. हुजरे मुडदार ! यांच्यानें कांहीं एक जरबेची गोष्ट बोलवेना ! असो ! मग जैरामपंतांनीं करार केला कीं, इतकी पट्टी केली तैसी आतांही गांवांत जाऊन पट्टी करून देवाचे डागिने करून देऊ. गावडे यांचें ह्मणणें कीं, श्रीमंतास लिहून पाठवा कीं, आह्मी दागिने करून देतों, याप्रमाणें लिहून द्या. मग जैरामपंतांनीं करार केला कीं, येथें लिहिलें कशास पाहिजे, आह्मी टोकियाहूनच लिहून पाठऊं. ऐसें करार केला. तेव्हां सुटका झाली. मग रुपयाचा जाबसाल कळतच आहे ! उगेच कांहीं विशेष राहिले होते, ते आणीकही दाहा बारा रु। खर्च जाला आणि खराब जाले. याप्रमाणें जालें. मल्हारपंतास हिशेब घेऊन पौष वद्य १ प्रतिपदेस पाठऊन देतों. बहुत काय लिहिणें ? हे विनंती. आज्ञा येईल तर एक दिवस आह्मीही येऊ. देव दर्शनही होईल व आपलीही भेट होईल व एक दिवस राहून मागती येऊं. हे विनंती. शेवेसी विनंती सेवक मल्हार रामचंद्र कुळकर्णी सां नमस्कार. हिशेब घेऊन प्रतिपदेस येतो. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५१३
श्री
पो पोप शुद्ध ६
१७२२ पौष शुद्ध ३
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामीचे सेवेसीः-
विद्यार्थी पराशरभट धर्माधिकारी कृतानेक सां नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। पैष शुद्ध ३ पावेतों यथास्थित असें. विशेष, श्रीमंताचें व काशीराव होळकराचें पत्र घेऊन हजरे आले होते. ते गावड्याचे लष्करांत जाऊन त्याची भेट घेतली. त्यांनी बोलणें केलें. त्यानें उत्तर केलें कीं, राऊत पाठऊन तिरस्थळींचे ब्राह्मणांस आणून त्यांची खातरजमा करून तुह्मांस पावती देतों. तेव्हां हुजरे यांनी उत्तर गावड्याशीं केलें कीं, तुह्मी राऊत पाठऊन आणविणार तेव्हां ब्राह्मण भडकतील, येणार नाहीं, आह्मींच जाऊन आणितों. त्यावरून हुजरे येथें आले आहेत. तिरस्थळीचे ब्राह्मणांस चला ह्मणतात.
त्याजवरून आह्मीं काल तीर्थस्वरूप श्रीमंत रा। तात्याकडे गेलों. त्यांजला हें वर्तमान विदित केलें. त्यांनीं एकच उत्तर केलें कीं, आह्मांस या कामांत कांहींच समजत नाहीं, तुह्मांस जसें सुचेल तैसें करावें. त्याजवरून आपणास विनंतीपत्र लिहिलें जातें कीं, येविशींचें उत्तर काय तें ल्याहावें. त्याप्रों वर्तणूक केली जाईल. दुसरें तीर्थस्वरूपजीचें व नकारपूर्वकाचें आज दोन दिवस खलबत होत आहे. खळ्याची चौकशी नकारपूर्वका......कुल समजाविली. मग मल्हारपंत कुळकर्णी यांजला बोलाऊन विध्यारलें कीं, खळ्याचा हिशेब समजावणें. त्याजवरून मल्लू आह्मांपाशीं आला. आह्मीं त्याजला सांगितलें कीं, तुह्मीं जाऊन सांगा कीं, पत्रकें श्रीमंत नानासाहेबापाशीं आहेत. याप्रों मल्लूस सांगितलें. त्यानें जाऊन याप्रों विनति केली. परंतु रावजीपंतांनीं कच्चे खडें समजाविले, ह्मणून मल्लूनें सांगितलें. त्यानें नकारपूर्वक व कुळकर्णीमडळी कुल तीर्थस्वरूप यांचे ममतेनें आहेत. सर्व भट का.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३४ १६२६ श्रावण वद्य १३
श्रीसके १६२६ तारण नांव संवछरे श्रावण वदि त्रयोदसी वार सुक्रवार ते दिवसी राजश्री बाबूराऊ व अंबाजीपंत यांसि माणको अंबाजी कागद लेहोन दिधला ऐसा जे सालमजकूरीची जे आपली बापरोई वतनाची होती ते कुल आपणा दिधली ते आपणास दामदाम पावली यासी दुकोळ पडला रुपयास दीड पाइली जाली तमाम सालगिरानी पडिली दुकोळ पडला आपणास खावयासी नाही अंनावीण कठिण जाले लाएलाज जाणौन आपण परागंदा होऊन जावे आण एखादे ठाई वतन विकून आपण जगावे ह्मणौन तुह्मी आपले आहा तर आपली वतने तक्षीम निमे पैकी चौथी आहे हे तुह्मासी विकत दिधले असे इ. इ. इ.
सु॥ १११४ माहे रबिलाखर सन ४८ जुलूसवाला
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५१२
श्रीमार्तंडप्रसन्न.
१७२२ मार्गशीर्ष वद्य १४
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामीचे सेवेसी:-
विद्यार्थी परसरामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विज्ञापना ता। मार्गशीर्ष वद्य १४ पर्यंत आपले आसीर्वादें करून यथास्थित असे. विशेष. आपण आज्ञापत्र पाठविलें, त्याप्रमाणें जागलीचा बंदोबस्त केला. दोन मुसलमान चाकरीस ठेविलें. त्यांचा दरमहा दोघां मिळून ५॥ केला आहे. काल पुण्याहून राजश्री बाळशास्त्रीनी हुजरे २ व पत्रें सरकारचे व काशीराव होळकर यांचे मोत्याजी काळगावडे यास पाठविली कीं, तिरस्थळीचे ब्राह्मणापासून बेआब करून रुपये घेतले तें माघारीं हुजरे यांचे गुजारतीनें देऊन क्षेत्रीचे ब्राह्मणाची पावती हुजूर पाठऊन देणें. म्हणून बहुत पर्यायें करून लिहिलें, ते हुजरे 'काल सायंकाळी टोक्यास आले. आज टोकेकरानीं समस्त ब्राह्मण देवळांत मेळऊन प्रवरासंगमकरांस व आपले गांवास पत्र आपले नांवें पाठविलें. त्यावरून आह्मी येथून मल्हारपंतास पाठविलें होतें. तेथें समस्ताचे विचारें नि:श्चय ठरला कीं, तुर्त हुजरेच गावडे याकडे पाठवावें. आपले गांवचे माणूस एक एक द्यावें. तेथें हुजरे पत्र देऊन, त्याचीं प्रत्योत्तरें हुजरे यांसी कसी होतात, त्याप्रमाणें आपले माणसांनीं येऊन सांगावें. त्यांत हुजरे यांचे विचारें च्यार च्यार ब्राह्मणच जावेसें ठरलें. तर त्याप्रमाणें तिरस्तळीचे ब्राह्मण पाठवावे. तूर्त यास शास्त्रीवावांनी लिहिल्या अन्वयें रोजमुरा द्यावा. त्यांस, एक माही रोजमरा रु। १४ द्याव व आपले माणसें जातील त्याबराबर हुजरे यांस व माणसास पोट खर्चास रु। १६ एकूण तीस, टोंके १• प्रवरासंगम १० आपलें गांब १० याप्रमाणें निश्चय ठरला. उदईक आमवस्या. परवां प्रतीपदेस रवाना होतील. पत्राच्या नकला करून व शास्त्रीबावाचें पत्र ऐसें पाठविले आहेत. कागदी मजकूर बराच आहे. आपली आज्ञा येईल त्याप्रों करू, आज पुण्याहून राजश्री राघोपंत गडबोले व आणीकही पन्नास स्वा-या श्रीकाशीचे यात्रेस जावयास आपले येथें मकामांस आले. राघोपंत तात्याचे वाक्यांत उतरले आहेत. त्यांचें झणणें कीं, श्रीमंत कैलासवासी आनंदीबाईच्या आस्ती आहेत. त्या आम्हांबराबर देण्याविषयीं श्रीमंत बाजीराव साहेबांचे खासदस्तुरपत्र आपणास आहे. त्यास, भेट जाली पाहिजे, हा मजकूर सविस्तर बाळाजी नाईकानीं लिहिला आहे. त्यावरून ध्यानास येईल. अलीकडे आपण गेल्या तागाईत कांहीं एक उपसर्ग नाहीं. चोराच्या हिला-या वरचे. वर तिरस्थळीवर होतात. परवांचे दिवशी टोकेयास माणसें आलीं होतीं. त्यांनी टोक्यांतून वाटसारूचा घोडा तेथें उतरला होता तो नेला. वाटसराचें ह्मणणें कीं, घोडा बनाजीशेट सोनईकर याचा आहे. ऐसें बोलून तो उठून सोनईस गेला. मग तो काय करतो न कळे ! काल यज्ञेश्वर वडेकर खंडऋषीचा नातु पुण्याहून आला. त्याने वर्तमान सांगितलें. दौलतराव शिंदे कूच्य करून आधेलीस आले. एक कंपू अद्यापि पुण्यासच आहे. गोपाळराव जामगांवींच आहेत. याप्रमाणे आजपर्यंत वर्तमान आहे. पुढे होईल त्याप्रमाणे लिहून पाठऊं. आपलेकडील आनंदाचे वर्तमान लिहावयास आज्ञा करावी. बहुत काय लिहिणे ? हे विज्ञापना.
स्वामीचे सेवेसी मल्हार रामचंद्र कुळकर्णी चरणावर मस्तक ठेऊन सीरसाष्टांग नमस्कार. लिखितार्थ परिसोन लोभाची वृद्धि असावी. हे विज्ञप्ती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५११
श्री.
१७२२ मार्गशीर्ष वद्य ७
श्रीमंत महाराज राजश्री नानाजी स्वामींचे सेवेसीः-
विद्यार्थी परसरामभट धर्माधिकारी व मल्हार रामचंद्र कुळकर्णी सां। नमस्कार विनंती विज्ञापना ता। मार्गश्वर वद्य ७ पावेतों यथास्थित असों. विशेष. अलीकडे गांवचें वर्तमान यथास्थित आहे. काल रा. आपाभट गोखले पुण्याहून आले. त्यांनी वर्तमान सांगितले. श्रीमंत पुण्याहून निघून सासवडचे मुकामीं गेले. तेथून यशोदाबाई व नानाफडणीसाची बायको व उभयतांचीं कुटुंबे व प्रतिनिधी यास पुरंदरी ठेऊन, श्रीमंत मागती सासवडचे मुकामीं आले. तेथें सखाराम घाडगे यांणीं कही खेड्यावर पाठविली. तेथें गरीवगुर. बांचे पांघुरणे वगैरे भांडे नेली. तें वर्तमान श्रीमंतास कळलें. त्यावरून घाडगे यांस बोलाऊन आणलें. सांगितलें की, हें काय ? घाडगे याचें म्हणणें कीं, मला पुसून गेली नाहीं. मग श्रीमंताचे ह्मणणें पडलें कीं, हा कांहीं पुण्याचा मुकाम नाहीं, सासवडची मुकाम आहे. अशा लबाड्या कराल तर कामास येणार नाहीं. तुझें समागमें यावयाचें काम नाहीं. तेच क्षणीं घाडगे मार यास पुण्याकडे काहाडून दिल्हें. होळकराचा मूल घाडगे याचे स्वाधीन करावा, म्हणोन घाडग्यास समागमें नेलें होतें. शेवटी मूलहि न देतां, यारीतीनें काहाडून दिल्हा. पुण्यांतील लोक तमाम बाहेर जात होते, हें वर्तमान श्रीमंतास कळलें. त्यावरून बाळोजी कुंजर याकडे पुण्याबाहेर चवकीचें काम सांगितलें. त्यावरून भोंवत्या चवक्या बसल्या आहेत. पुण्यांतून माणूस चवकशीवेगळे बाहेर निघूं देत नाहीं. तमाम भाडेकरी यांच्या घरीं चवक्या बसविल्या आहेत. याप्रों वर्तमान आहे. मोत्याजी गावडे यांणी तिरस्तलीपासून ब्राह्मणांची बेआब करून पैका घेतला, हें वर्तमान शास्त्रीबावानीं श्रीमंतास समजावलें. त्यावरून श्रीमंताचे झणणें कीं, काय करूं, माझा कांहीं उपाय चालत नाही. ज्या उद्देशं बाहेर निघालों, तें कार्य झाल्यास सर्व दुष्टांचे पार. पत्य होईल. प्रतिनिधीचे मुलकावर घाडगे यांची जप्ती होती. तेव्हां श्रीमंतांनी प्रतिनिधीस आज्ञा केली कीं, त्याची जप्ती उठऊन तुह्मी आपला अमल बसवा. ते जबरीस आले, तेव्हां प्रतिनिधीकडील जोर पोंहोचला. प्रतिनिधीचे शिबंदीने घाडगे यांचे शेंदोनसें दोन लोक धरून, नाक कान घेऊन पुण्याकडे रवाना केले. बाळशास्त्रीचे कुटुंब व खेडरुषांचे कुटुंब पुरंदरास गेलें. काशीराव होळकरास तीन लक्ष रुपये देऊन आज्ञा केली कीं, फौज ठेऊन सत्वर सासवडचे मुकामीं बोलाविलें आहे. शिंद्याचें कुटुंब जामगांवास आलें. गोपाळरायाचा मुकाम पंधरा दिवस जामगांवींच आहे. गावड्याचें लष्कर निबरीपाचेगांवकडे गेलें. आपण गेलेत ते दिवशीं बरेंच निभाऊन गेलेत. दुसरे दिवशीं भेडाळ्याकडून तेरा स्वार आलें. त्यांनी दौलताबादकर वाणी इकडे येत होता, त्यांस भेडाळे याचे+++जवळ वाणी यांस लुटलें. त्याजपाशीं दोनशें रुपये रोख होते व पांघुरणे व आणिकही लोकांची पांघुरणें घेऊन नीट कळंबीनें अंमळनेराकडे गेले. शिवाजी पा याचे मळ्यापासून मागती आपले गांवाकडे आले. ते सरकारचे मळ्याखालून गगेंत उतरले. गंगेत घोडयास पाणी पाजून आस्तान पाणोथावर चहडले, तो मारवाडी बोंबलीत आला. त्यावरून आह्मी पांच पन्नास माणसें घेऊन मागें गेलों. तों ते निघून गेले. पुढें प्रवरासंगमापुढें चिंचा आहेत. तिकडून आपाभट गोखले व टोंकेकर दोघे ब्राह्मण येत होते. त्यांसहि लुटलें. टोंकेकराचे दोंचारशांचें वित्त गेलें. आपाभटाचे पन्नासा रुपयांचें वित्त गेलें. मग ते स्वार गोधेगावावरून सायंकाळीं जामगांवीं आले. तेथें वाटसोर लुटलें. त्यांजपाशीं दोहजाराचें वित्त होतें, त्या प्रमाणें त्या तेरा स्वारांनीं गर्दी केली. प्रस्तुत आंधारी रात्र आली आहे. भोंवतालचे खेडे उज्याड आहेत. महारामांगाच्या हाट्या जमल्या आहेत. त्यास, गांवांत गस्त फिरली पाहिजे. तरुत महिना पंधरा दिवस दोघे मुसलमान प्यादे ठेवावें. दिवसा वेशीजवळ राहून रात्रीं गस्त देत जातील. आपली आज्ञा होईल, त्याप्रमाणें करूं, राजश्री बाळाजी यशवंत काल गांडापुरास गेले. तूर्त लोकास कऊल देतात. मग पुढें मागती प्रथम दिवस आहेच. पेंढारी यांची आवई उठली होती. परंतु ते गलत वर्तमान. ते तूर्त लांब आहे. लखामापूरची यात्रा तूर्त राहिली. श्रीनिवास गोसावी वारले. त्यांची स्त्री सती गेली. वरकड वर्तमान सर्व यथास्थित असे. आपलेकडील सविस्तर वर्तमान लिहावयास आज्ञा जाहली पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५१०
श्रीम्हाळसाकांत.
१७२२ मार्गशीर्ष वद्य २
राजश्री मोत्याजी कालगावडे गोसावी यांसी:-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो काशीराव होळकर राम राम विनंति उपरी. क्षेत्र टोंकें आदीकरून तिरस्थळी येथें मनस्वी उपद्रव देऊन ब्राह्मणांची बेअब्रू करून ऐवज घेतला, म्हणोन बोभाट आला. ऐशीयासी, क्षेत्राची जागा, आजपावेतों परराष्ट्रें आलीं, त्यांनीं देखील तेथें उपसर्ग न देतां ब्राह्मणांचा बहुमानच केला. असें असोन, तुह्मीं स्वदेशी असतां यांतील विचार कांहीं न पाहतां, ब्राह्मणास मारहाण केली, ऐवज घेतला, हें चांगलें की काय ? यास्तव, हें पत्र लिहिलें असे. तर इत:पर तिरस्थळीस कोणेविसीं उपसर्ग न करितां, ऐवज घेतला असेल तो माघारा देऊन, ब्राह्मणांचे समाधान करून, चीजवस्त ऐवज पावल्याची त्यांची पत्रें घेऊन सरकारांत पाठवणें. हें न घडल्यास येथें श्रीमंतांचीं मर्जी नीट न राहतां अवघड पडेल, या कामास सरकारांतून खिजमतगार आा २ रवाना केले आहेत. यांचे गुजारतीनें लि। प्रमाणें जाबसाल उरकून, तेथील ब्राह्मणांची कबज पाठविणें, रा छ १५ रजब, सुा इहिदे मयतैन व अल्लफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंति, मोर्तब सूद, शिक्का.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५०९
श्री.
१७२२ मार्गशीर्ष वद्य २
श्रीवेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री लक्ष्मीनारायण दीक्षित यांप्रति:-
बाळशास्त्री अनेक नमस्कार, विशेष. तुमचें पत्र सोनईचा मुकामींहून मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीचें पाठविलें तें पावलें. त्यांतील मजकूर सविस्तर विदित जाला. हेंच वर्तमान श्रीमंतास विदित जालें, त्याजवरून राजश्री मोत्याजी काळगावडे यास सरकारचें ताकीदपत्रासह खिजमतदार असामी दोन पाठविले आहेत. ते आपल्याकडे येतील. आपण तिरस्थळीचे पांच पांच ब्राह्मण पुढें करून, हुजरे बराबर देऊन, काळगावडे यांजकडे पाठवावे. या दों असाम्यांची नांवें, बयाजी डोके व दारूकजी घुले, यांचा रोजमुरा रुपय्ये मार्गशीर्ष वद्य प्रतीपदेस रवाणा जाले, कामगिरीस आहेत, तोंपर्यंत रोजमुरा क्षेत्रावर वरगणी घालून देणें. येक रोजमुरा रुपय्ये १४ देऊन रवाणा करणें. पुढें कामकाज चांगलें जाहलियावर यास खुशाल करून वाटेस लावणें, हे अनेक नमस्कार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५०८
श्री.
१७२२ मार्गशीर्ष वद्य १
मा अनाम बिनससिंग मंडलोई, पोर धरणगांव, यांसी येशवंतराव होळकर, सुा इहिदे मयातैन व अल्लफ, राजश्री आपाजी मुधाजी यांजकडे पो मजकूरची मामलत पेशजींपासून असतां, तुह्मीं कामकाजाविषईं दिक्कत करितां, म्हणोन हुजूर विदित जाहलें. त्याजवरून हें पत्र सादर केलें असे. तरी पतमारानिले यांसीं कोणेविषी दिक्कत न करितां, काम काज मागाहून करीत आले त्यांत वेध पडूं न देणें. येविषीं पुन्हां बोभाटा न ये ते कर्णे. जाणिजे छ १४ रजब, मोर्तबसूद. ( शिक्का असे ).
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५०७
श्री
१७२२ मार्गशीर्ष शुद्ध १५सिद्धेश्वर
राजश्री मोत्याजी कालगावडे गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो बाजीराव रघुनाथ प्रधान आसीर्वाद सु। इहिदे मयातैन व अलफ. क्षेत्र टोंकें प्रवरासंगम कायेगांव या क्षेत्रीं तुझीं ब्राह्मणास उपद्रव देऊन बेअब्रू करून खंडणीचा ठराव केला. त्यांत ब्राहाणापासून ऐवज घेऊन बाकीचे ऐवजास श्री देवाचे डागिने घेतले आहेत म्हणोन हुजूर विदित जालं. त्याजवरून सरकारांतून खिजमतगार आ २ पाटऊन हें पत्र सादर केलें असे. तर टोंके वगैरे येथील क्षेत्राचे ब्राह्मणापासून ऐवज व देवाचे डागिने घेतले असतील ते खिजमतगार यांचे गुजारतीनें माघारी देऊन पुढें तीही क्षेत्रींचे ब्राह्मणास व रयतीस उपद्रव न करणें. येविपई फिरोन बोभाट येऊं न देणें, जाणिजें, छ, १३ रजब. अशा प्रमाण, मोर्तब शिका.