पत्रांक ५१२
श्रीमार्तंडप्रसन्न.
१७२२ मार्गशीर्ष वद्य १४
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामीचे सेवेसी:-
विद्यार्थी परसरामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विज्ञापना ता। मार्गशीर्ष वद्य १४ पर्यंत आपले आसीर्वादें करून यथास्थित असे. विशेष. आपण आज्ञापत्र पाठविलें, त्याप्रमाणें जागलीचा बंदोबस्त केला. दोन मुसलमान चाकरीस ठेविलें. त्यांचा दरमहा दोघां मिळून ५॥ केला आहे. काल पुण्याहून राजश्री बाळशास्त्रीनी हुजरे २ व पत्रें सरकारचे व काशीराव होळकर यांचे मोत्याजी काळगावडे यास पाठविली कीं, तिरस्थळीचे ब्राह्मणापासून बेआब करून रुपये घेतले तें माघारीं हुजरे यांचे गुजारतीनें देऊन क्षेत्रीचे ब्राह्मणाची पावती हुजूर पाठऊन देणें. म्हणून बहुत पर्यायें करून लिहिलें, ते हुजरे 'काल सायंकाळी टोक्यास आले. आज टोकेकरानीं समस्त ब्राह्मण देवळांत मेळऊन प्रवरासंगमकरांस व आपले गांवास पत्र आपले नांवें पाठविलें. त्यावरून आह्मी येथून मल्हारपंतास पाठविलें होतें. तेथें समस्ताचे विचारें नि:श्चय ठरला कीं, तुर्त हुजरेच गावडे याकडे पाठवावें. आपले गांवचे माणूस एक एक द्यावें. तेथें हुजरे पत्र देऊन, त्याचीं प्रत्योत्तरें हुजरे यांसी कसी होतात, त्याप्रमाणें आपले माणसांनीं येऊन सांगावें. त्यांत हुजरे यांचे विचारें च्यार च्यार ब्राह्मणच जावेसें ठरलें. तर त्याप्रमाणें तिरस्तळीचे ब्राह्मण पाठवावे. तूर्त यास शास्त्रीवावांनी लिहिल्या अन्वयें रोजमुरा द्यावा. त्यांस, एक माही रोजमरा रु। १४ द्याव व आपले माणसें जातील त्याबराबर हुजरे यांस व माणसास पोट खर्चास रु। १६ एकूण तीस, टोंके १• प्रवरासंगम १० आपलें गांब १० याप्रमाणें निश्चय ठरला. उदईक आमवस्या. परवां प्रतीपदेस रवाना होतील. पत्राच्या नकला करून व शास्त्रीबावाचें पत्र ऐसें पाठविले आहेत. कागदी मजकूर बराच आहे. आपली आज्ञा येईल त्याप्रों करू, आज पुण्याहून राजश्री राघोपंत गडबोले व आणीकही पन्नास स्वा-या श्रीकाशीचे यात्रेस जावयास आपले येथें मकामांस आले. राघोपंत तात्याचे वाक्यांत उतरले आहेत. त्यांचें झणणें कीं, श्रीमंत कैलासवासी आनंदीबाईच्या आस्ती आहेत. त्या आम्हांबराबर देण्याविषयीं श्रीमंत बाजीराव साहेबांचे खासदस्तुरपत्र आपणास आहे. त्यास, भेट जाली पाहिजे, हा मजकूर सविस्तर बाळाजी नाईकानीं लिहिला आहे. त्यावरून ध्यानास येईल. अलीकडे आपण गेल्या तागाईत कांहीं एक उपसर्ग नाहीं. चोराच्या हिला-या वरचे. वर तिरस्थळीवर होतात. परवांचे दिवशी टोकेयास माणसें आलीं होतीं. त्यांनी टोक्यांतून वाटसारूचा घोडा तेथें उतरला होता तो नेला. वाटसराचें ह्मणणें कीं, घोडा बनाजीशेट सोनईकर याचा आहे. ऐसें बोलून तो उठून सोनईस गेला. मग तो काय करतो न कळे ! काल यज्ञेश्वर वडेकर खंडऋषीचा नातु पुण्याहून आला. त्याने वर्तमान सांगितलें. दौलतराव शिंदे कूच्य करून आधेलीस आले. एक कंपू अद्यापि पुण्यासच आहे. गोपाळराव जामगांवींच आहेत. याप्रमाणे आजपर्यंत वर्तमान आहे. पुढे होईल त्याप्रमाणे लिहून पाठऊं. आपलेकडील आनंदाचे वर्तमान लिहावयास आज्ञा करावी. बहुत काय लिहिणे ? हे विज्ञापना.
स्वामीचे सेवेसी मल्हार रामचंद्र कुळकर्णी चरणावर मस्तक ठेऊन सीरसाष्टांग नमस्कार. लिखितार्थ परिसोन लोभाची वृद्धि असावी. हे विज्ञप्ती.