पत्रांक ५१०
श्रीम्हाळसाकांत.
१७२२ मार्गशीर्ष वद्य २
राजश्री मोत्याजी कालगावडे गोसावी यांसी:-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो काशीराव होळकर राम राम विनंति उपरी. क्षेत्र टोंकें आदीकरून तिरस्थळी येथें मनस्वी उपद्रव देऊन ब्राह्मणांची बेअब्रू करून ऐवज घेतला, म्हणोन बोभाट आला. ऐशीयासी, क्षेत्राची जागा, आजपावेतों परराष्ट्रें आलीं, त्यांनीं देखील तेथें उपसर्ग न देतां ब्राह्मणांचा बहुमानच केला. असें असोन, तुह्मीं स्वदेशी असतां यांतील विचार कांहीं न पाहतां, ब्राह्मणास मारहाण केली, ऐवज घेतला, हें चांगलें की काय ? यास्तव, हें पत्र लिहिलें असे. तर इत:पर तिरस्थळीस कोणेविसीं उपसर्ग न करितां, ऐवज घेतला असेल तो माघारा देऊन, ब्राह्मणांचे समाधान करून, चीजवस्त ऐवज पावल्याची त्यांची पत्रें घेऊन सरकारांत पाठवणें. हें न घडल्यास येथें श्रीमंतांचीं मर्जी नीट न राहतां अवघड पडेल, या कामास सरकारांतून खिजमतगार आा २ रवाना केले आहेत. यांचे गुजारतीनें लि। प्रमाणें जाबसाल उरकून, तेथील ब्राह्मणांची कबज पाठविणें, रा छ १५ रजब, सुा इहिदे मयतैन व अल्लफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंति, मोर्तब सूद, शिक्का.