Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
त्याणें पिलाजी गाइकवाड सुरतेजवळ होता, त्याशी सख्य करून निश्चय केला की, आपण उभयता मिळून अंमदखानास मारूं. त्यावेळेस पिलाजीस निजामुन्मुलूकाचें सांगणें, माझे पुतण्याचें साहाय्य करावें, असे आलें. त्यावरून पिलाजी गाइकवाड यानें विचार केला कीं, जो पक्ष सबळ, त्याचें साहाय्य करूं. मग प्रथम सुरवात झाल्याबरोबर निघून माही नदीपलीकडे आरासा गांवीं पोहोंचला. तेथें अंमदखानाचे लष्कराची गांठ पडली. सुरतवाल्याजवळ तोफा फार होत्या. यामुळे अमेदखानाचा पराभव होऊं लागला. तेव्हां पिलाजीनें सुरतवाल्यास सांगितलें की, तुह्मी पाठीस लागा, मी तोफा सांभाळितों. त्याप्रमाणें तो पाठीस लागला. तेव्हां पिलाजी गाइकवाड याणीं तोफांची तोंडे उलटी फिरवून अंमदखानाचा पक्ष धरल्यामुळे सुरतवाल्यावर दोन्हीं लष्करें पडली. त्याचे लोक फार मेले. बाकी राहिले लोकांसुध्दा पळण्यास अवसर सांपडेना, असे पाहून तो फौजदार आपले हातें आपल्यास तोडून घेऊन मरण पावला. नंतर कंठाजी कदम, पिलाजी गायकवाड दोघे मिळून गुजराथची चौथाई घेऊ लागले. परंतु दोघांत मुख्यत्व कोणी करावें याविषयी तंटा उत्पन्न होऊन दोघे लढू लागले. तेव्हां अंमदखान यानें दोघांचीही समजूत काढून माही नदीचे आग्नेय दिशेकडील मुलखांत चौथाई पिलाजीनें घ्यावी व वायव्य दिशेस कंठाजीनें घेत जावी, असें ठरविलें. त्याप्रमाणें पिलाजी सुरतेकडे गेला व कंठाजी खानदेशांत आपले जहागिरीचे जागी आला. असे अमेदखानाचें प्राबल्य झालेलें पाहून दिल्लीचे बादशहानें तें बंड मोडण्याकरितां सरबुलंदखानाबरोबर लष्कर देऊन पाठविलें. तेव्हां अमेदखानानें आपले कुमकेस मराठे सरदार बोलाविले.१९ १९+ते येण्यास कांही अवकाश लागल्यामुळें अमेदखानानें अहमदाबादेस कांही फौज ठेवून मागें हटला. इतक्यांत मराठी फौज येऊन पोहोंचली. नंतर माघारा उलटून मराठे सरदारासहीत सरबुलंदखानाचे बिनीवाल्यावर जाऊन पराभव केला. त्यांत मराठे लोक बहुत मेले. यामुळे मराठे लोक पुन्हां त्यास अनुकूल होईनातसे झाले. मग अंमदखान पेंढारी लोकांप्रें॥ वागूं लागला. त्याबरोबर मराठे सरदार कंठाजी कदम व पिलाजी गाइकवाडही पर्जन्यकालपर्यंत लुटीत होते. यांप्रें॥ गुजराथचें वर्तमान असतां, व मोंगल लोकांत कलह लागला, ही संधी बाजीराव पेशवे यांनी पाहून दोनवेळ माळव्यांत स्वा-या करून द्रव्य बहुत नेलें. या स्वारीबरोबर अंबाजीपंत व अंताजीपंत भानू व अन्याबा ह्मणजे नारो गंगाधर मुजुदार व आवजी चिटणीस होते, व बापूजी भीमसेन पारसनवीस वगैरे फौजेसुध्दां गेले होते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
उपसंहर.
काल, स्थल, व्यक्ति व सामान्य सिद्धान्त ह्यासंबंधी बखरींची परीक्षा मागील पांच शंकास्थानात झाली. परीक्षेकरितां घेतलेल्या बखरींपैकी (१) सभासदी बखर, (२) सप्तप्रकरणात्मक चरित्र व (३) शिवदिग्विजय ह्या तीन बखरींना विशेष प्राधान्य दिलें होतें. यद्यपि सभासदी बखर समकालीन लेखकानें लिहिलेली आहे तत्रापि तींतील शके १५८१ पर्यंतची हकीकत धरसोडीची, त्रोटक, तुटक व कालविपर्यस्त अशी असून, पुढील हकीकत यद्यपि कोठेंकोंठे जास्त विस्तृत आहे तत्रापि रसभरित नसून प्रायः कोरडी अशी आहे. माफक व त्रोटक उत्तर देणा-या साक्षीदारापासून खटल्यांतील उपांगाची जशी माहिती होणें अशक्य असतें तद्वतच सभासदी बखरीची गोष्ट आहे. सप्तप्रकरणात्मकचरित्र व शिवदिग्विजय या दोन बखरींचा प्रकार सभासदी बखरीहून निराळा आहे. साक्ष देतांना अवांतरहि मागली पुढली माहिती वावदूकपणें सांगण्याची खोड ह्या दोन बखरकारांना कमजास्त प्रमाणानें आहे. शिवाय साक्ष देतांना, एखाद्या जुनाट गृहस्थाप्रमाणें, ह्या दोन्ही बखरींना जुने दाखले देण्याची हौस आहे. ही हौस सप्तप्रकरणात्मक चरित्राच्या कर्त्यापेक्षां शिवदिग्विजयाच्या कर्त्याला विशेष जडलेली आहे. शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें (१) युगसंख्येची याद, (२) हस्तनापूरच्या राजांची याद, (३) हेमाडपंथी बखर, (४) विष्णुपुराण, (५) संगीत शास्त्र, (६) मुसलमानांच्या तवारिखा, (७) हंसगीता, (८) दासबोध, (९) रामदासाची बखर, (१०) शिवाजीचीं पत्रें, (११) सुभाषित श्लोक, (१२) वृद्धांच्या तोडची परंपरागत माहिती, (१३) कहाण्या, (१४) शिवाजीच्या वेळचीं जुनीं टिपणें, इतक्या निरनिराळ्या उगमांपासून आपली माहिती जुळविलेली आहे व ती प्रायः वाटेल तितकी, जशाच्या तशीच दिली आहे! ह्याच कारणाकरितां शिवदिग्विजयांतील मजूकर सर्वांत जुना आहे असें मागें मीं म्हटलें आहे. सप्तप्रकरणात्मकचरित्रांतहि शिवदिग्विजयांतल्याप्रमाणें जुन्या माहितीचा उपयोग केल्याचीं बरींच चिन्हें आहेत, परंतु विशेष प्रौढपणें लिहिण्याचा मल्हाररामरावाचा मनोदय असल्यामुळें, शिवदिग्विजयाच्या इतका वावदूकपणा त्याला करतां आला नाहीं. कृष्णाजी अनंत सभासद, मल्हाररामराव, शिवदिग्विजयाचा कर्ता हे तिन्ही गृहस्थ महाराष्ट्रांतील प्रख्यात अशा चांद्रसेनीय प्रभुज्ञातींतील आहेत. ह्या गृहस्थांच्या पूर्वजांनीं व स्वजातीयांनीं स्वराज्य स्थापण्याच्या कामीं शिवछत्रपतीची सेवा करून आपला क्षात्रधर्म जसा खरा करून दाखविला, त्याप्रमाणेंच ह्या तिन्हीं गृहस्थानीं व त्यांच्या इतर स्वजातीयांनीं शिवछत्रपतीची, त्यांच्या वंशजांची व त्यांच्या देशबांधवांचीं चरित्रें लिहून आपला कायस्थ धर्महि कायम ठेविला. लेखणी व तरवार ह्या तीक्ष्ण प्रकृतीच्या जोडीला सारख्याच सामर्थ्यानें वागविणा-या ह्या राजकार्यकुशल ज्ञातीचें महाराष्ट्र बरेच ऋणी आहे. ह्या प्रभूलेखकांनी शिवाजीचे इतिहास कसे कां असेनात, लिहून ठेविले नसते तर आज मित्तीला महाराष्ट्रराज्याच्या संस्थापकाची माहिती आपल्याजवळ फार कोती राहिली असती; ह्या तीन बखरकारांखेरीज गोविंद खंडेराव चिटणीस ह्यानेंहि एक शिवाजीची बखर लिहिलेली आहे व तिचा उल्लेख ह्या प्रस्तावनेच्या आरंभीं मी केला आहे. ही बखर साता-यांतील एका गृहस्थाकडून मला कांहीं वेळ वाचावयास मिळाली होती. परंतु पुढे काय कारण झालें असेल तें असो, सदर बखर हरवली असें तिच्या मालकाकडून मला उत्तर मिळालें वर दिलेल्या तिन्हीं बखरींपेक्षां ह्या बखरींतील मजकूर ब-याच ठिकाणीं जास्त व निराळा असून शिवदिग्विजयाहून ती मोठी आहे. प्रस्तावनेला प्रारंभ करतांना ही बखर मजजवळ होती व हिचीहि परीक्षा करावी ह्या हेतूनें प्रस्तुत प्रस्तावनेच्या प्रारंभीं मीं तिचा नामनिर्देश केला होता. परंतु पुढें ऐन प्रसंगीं ही बखर हातांतून गेल्यामुळें पहिल्या नामनिर्देशापलीकडे तिच्या संबंधीं मला कांही एक जास्तकमी लिहितां येईना. असो. सवाई माधवरावांकरितां लिहिलेल्या बखरीच्या अनुषंगानें शिवकालीन बखरींची परीक्षा करण्याचा प्रसंग आला व त्या परीक्षेंत बखरीच्या प्रामाण्याची इयत्ता ठरविण्याचा थोडाबहुत प्रयत्न केला. हा प्रयत्न जितक्या प्रमाणावर व्हावा, तितक्या प्रमाणावर विस्तारभयास्तव करतां आला नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
शिवाजीनें खून केला ही गोष्ट कबूल करून तिचें मुख्य कारण मराठ्यांची त्या वेळची नीतिमत्ता होय असा राष्ट्रापमानकारक व व्यतिगुणापकर्षक पुरावा रा. चिपळोणकर यांनी दिला आहे व ग्रांट डफनें केलेली शिवाजीची व भूत व वर्तमान मराठ्यांची निंदा कांहीं कारण नसतां, कबूल केली आहे; परंतु असला अयोग्य प्रकार करण्याचें कांहीएक कारण नव्हतें. अफजलखानाला मारण्यापेक्षां अफजलखानास कैद करणें शिवाजीच्या जास्त हिताचें होतें ही गोष्ट लक्षांत घेतली असतां, वध करण्यास अफजलखानानें शिवाजीला भाग पाडलें हीच हकीकत विश्वसनीय दिसतें. त्या काळच्या चालीप्रमाणें दोघेहि हत्यारबंद होते. अफजलखानानें प्रथम शस्त्र चालविल्यावर शिवाजीनें गप्प कां बसावें तें सांगणे कठीण आहे. कुत्ता ह्या शब्दाचीहि फोड रामदासांनी मोठी नामी केली आहे. “धर्मद्वष्टे तेवढे कुत्ते” म्हणून ते दासबोधांत लिहितात. असो. बखरकारांचा व तवारिखकारांचा आशय नीट समजून न घेतल्यामुळें इग्रंज ग्रंथकारांच्या हातून ज्या अनेक चुका व जे अनेक गैरसमज झाले आहेत त्यांपैकीं कांहींचें दिग्दर्शन वर केलें आहे. शिवाजीचें स्वभाववर्णन बखरकारांनीं व रामदासांनीं कसें केलें आहे तें दाखवून देतांना हा उपवाद मध्येंच उपस्थित झाला. मराठा वीरपुरुषांवर परकीय लेखकांनी लादलेले दोष अलीकडील दहावीस वर्षांत महाराष्ट्रांत कोणी खरें मानतो म्हणून हा वाद उपस्थित केला अशांतला भाग नव्हे. ज्या अर्थी परकीय लेखकांनीं मराठ्यांवर नसते दोष लादण्याचे श्रम घेतले आहेत त्या अर्थी त्यांचें निरसन करण्याची मेहनत कोणी तरी करणें अवश्यच झालें होतें म्हणुन ही लहानशी झटापट सहजासहजीं आटपून घेतली आहे. शिवाजीचें गुणवर्णन करण्यांत कालस्थलादि निर्बंधांनीं बखरकार विशेष बांधले गेले नसल्यामुळे, त्यांच्या हातून हें काम बरेंच चांगलें साधलें गेलें आहे. आंता तें त्यांच्या हातून सशास्त्र साधलें गेलें नाहीं हें तर उघडच आहे. परंतु शिवाजीच्या आयुष्यांतील प्रसंगांच्या वर्णनापेक्षां त्यांच्या गुणांचें वर्णन ह्या बखरकारांनीं जास्त विस्तृत केलें आहे, त्यामुळें इतिहासजिज्ञासूंचें समाधान सापेक्ष दृष्टीनें अर्थात् जास्त होतें. बाकी हाहि भाग शंकांनीं बहुत ठिकाणीं ग्रस्त झालेला आहे. शिवाजींच्या शीलासंबंधी, दानतेसंबंधी, स्वभावासंबंधीं व कर्तृत्वासंबंधीं जी कांहीं थोडीफार माहिती ह्या बखरकारांनीं दिली आहे त्यापेक्षां आणखी माहिती मिळाल्याशिवाय इतिहासजिज्ञासूंची भूक तृप्त होणार नाहीं. ही माहिती ह्यापुढें बखरींतून मिळणें अशक्य आहे. शिवकालीन पत्रव्यवहार मुबलक सांपडल्याखेरीज माहितीची उपलब्धि व्हावी तशी, किंवा थोडी देखील, होणें असंभाव्य आहे. ह्या कालांतील पत्रव्यवहार जो थोडा मला मिळाला आहे त्यावरून असें अनुमान करतां येतें कीं, कालांतरानें व प्रयत्नानें शिवाजी महाराजांचा इतिहास मुद्देसूद, तारीखवार व सविस्तर जुळवितां येईल. मात्र अठराव्या शतकांतील पत्रव्यवहार मिळण्यास जितकें सोपें जात आहे तितकेंच सतराव्या शतकांतील पत्रव्यवहार मिळण्यास कठीण जाणार आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु ॥ खमस अशरीन मया व अलफ, सन ११३४ फसली,
अवल साल छ ११ रमजान, २४ मे १७२४,
जेष्ठ शुध्द ९ शके १६४६.
निजामुन्मुलूक बाहेर गेल्यामुळें दिल्लीचे बादशाहास व त्याचे दरबाराचे लोकांस घातशंका उत्पन्न होऊन हैदराबादचा सुभेदार कंबरजखान यास लिहिलें की, तुह्मी फौज घेऊन निजामुन्मुलूख यास त्याचे स्थानी जाऊ देऊ नये. हें काम तुह्मी केल्यास साहा सुभा दक्षिणचा अधिकार मिळेल. असे पत्र लिहून व त्या अधिकाराची सनदही त्या पत्राबरोबर पाठविली. नंतर कंबरीजखानानें फौज तयार केली. तेव्हां निजामुन्मुलुकानें त्याशी तह करावयाची खटपट बहुतप्रकारें केली. परंतु शेवटास गेली नाहीं. लढाईच व्हावी असें ठरल्यावर निजामुन्मुलूक याणी पेशवे याशी साहाय्य करण्याकरितां बोलाविल्यावरून त्याचे कुमकेस पेशवे यांची स्वारी फौजेसुध्दा जाऊन मोहरम महिन्यांत छ २३ रोजी (२ अक्टोबर १७२४) साकरखेडले येथे मोठा युध्दप्रसंग होऊन कंबरजखान व त्याचे दोघे पुत्र ठार झाले. अमानतखान दिल्लीहून सुभा आला होता तो व त्याजकडील सरदार इभ्राइमखान व अबदुलखान व खाजे अमानतखान वगैरे मयत झाले. १७ हत्ती अमानतखानाकडील पाडाव झाले. निजामुन्मुलूखानें कंबरजखान याचें शीर कापून दिल्लीस पाठवून बादशहास पत्र लिहिलें की, स्वामीच्या दैवयोगानें आह्मी हा बंडवाला मारला. नंतर निजामुन्मुलूक हैदराबादेस गेला. तेथें कंबरीजखानाचा एक मुलगा ख्वाजा आदब किंवा आदप ह्मणून होता, त्याशीं सल्ला करून गोवळकोंडा व इतर किल्ले घेतले. हे वर्तान ऐकून दिल्लीचे बादशहानें निजामुन्मुलूक याजकडील प्रांत गुजराथ व माळव्याचा अधिकार दूर करून माळव्याचे अधिकारावर राजा गिरिधर यास नेमिलें. त्यानें येथील अंमल, फौज त्या ठिकाणी नव्हती, ह्मणून बसविला. परंतु गुजराथचे अधिकारावर सरबुलंदखान यास नेमिले. परंतु पूर्वी निजामुन्मुलूक याचा पुतण्या अंमदखान त्या ठिकाणी अधिकारावर होता. त्यानें शाहूकडील सरदार कंठाजी कदम बांडे त्या प्रांती होता, त्यास अंमदखानाने गुजराथचा चौथ कबूल करून आपले कुमकेस घेऊन अहमदाबादेजवळ सरबुलंदखान याचे लष्कराबरोबर लढून त्याचा पराजय केला. अहमदाबादेंत सरबुलंदखानानें आदम सजायतखान यास ठेविला होता, त्यासही ठार मारिले. सजायतखानाचा भाऊ सुरतेस फौजदार होता.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
सतराव्या शतकांत मुसलमान लोक मराठ्यांना चोर, दरोडेखोर हे अपशब्द द्वेषानें चरफडून लावीत असत. हा असला पोरकट व भागूबाईपणाचा प्रकार युरोपांतील इतिहासांतहि कित्येक ठिकाणीं झालेला दृष्टीस येतो. स्पेनच्या दुस-या फिलिपाच्या विरुद्ध डच लोकांनी बंड केलें व त्यांत ते विजयी झाले. बंड होत असतांना डच लोकांना स्पॅनिश लोकांनीं thieves, robbers, चोर, दरोडेखोर हे अपशब्द लाविले. तोच प्रकार महाराष्ट्रांत झाला. डच robbers नीं स्पॅनिश लोकांची जशी खोड मोडली त्याप्रमाणेंच महाराष्ट्रांतील दराडेखोरांनीं मुसलमानांचीं नाकें कापून त्यांच्या हातांत दिलीं. ह्या अपमानानें चिरडीस जाऊन मुसलमान लोक मराठ्यांना व शिवाजीला दरोडेखोर म्हणत तें योग्यच होतें. परंतु इंग्रज लोकांनीं मुसलमान लोकांच्या लिहिण्याचा वाच्यार्थच तेवढा घेऊन कां मानावें तें समजत नाहीं. सदर लेखकांनी समर्थांचा दासबोध पाहिला असतां तर खरें दरोडेखोर व बंडवाले कोण होते तें त्यांना कळून चुकलें असतें. शिवाजीराजाला नीतीचा उपदेश करतांना समर्थ म्हणतात “प्रस्तुत यवनांचें बंड” झालेलें आहे. तसेंच यवनांच्या शिव-या स्वभावाला अनुलक्षून समर्थ लिहितात, “दुष्ट भाषणें करिती नाना परी जाचती, रघुपतीसी नावडती, म्हणूनी (तुमची) योजना केली.” असो. दरोडेखोर या शब्दाची ही अशी मीमांसा आहे. लूट व वध या शब्दांचीहि मीमांसा याहून निराळी नाहीं. “मोठ्या प्रमाणावर मालमत्ता फरारी करणें” असा, लुटणें ह्या शब्दाचा अर्थ ग्रांट डफादि मंडळी करतात. परंतु सतराव्या व आठराव्या शतकांतील बखरकारांच्या ग्रंथांत, लुटणें ह्या शब्दाचा अर्थ फारच निराळा आहे “लढाई देऊन शत्रूची मालमत्ता राजरोस रीतीनें व हक्कानें नेणें,” असा लुटणें ह्या शब्दाचा अर्थ बखरकार समजतात. प्रस्तुत ग्रंथांत छापलेल्या “पेशवाईच्या अखेरच्या अखबारींत” लुटणें हा शब्द इंग्रजांच्या संबंधानें वारंवार योजिलेला आहे. तेथें जो लुटणें ह्या शब्दाचा अर्थ करणें जरूर आहे तोच अर्थ शिवाजीच्या बखरींतील लुटणें ह्या शब्दाचा केला पाहिजे. दुसरा अर्थ करणें अशास्त्र आहे. शिवाजीनें सुरत लुटली म्हणजे शिवाजीनें शत्रूच्या प्रांतांवर स्वारी करून त्याची मालमत्ता लढाईच्या हक्कानें नेली, असा अर्थ करावा लागतो. शिवाजीनें सुरत लुटली म्हणजे शिवाजीनें सुरतेवर दरवडा घातला असा अर्थ मराठी भाषा ज्यांस समजत नाहीं त्यांखेरीज इतर कोणी करणार नाहीं. लूट ह्या शब्दाप्रमाणेंच वध या शब्दाचाहि अर्थ ह्या लेखकांस नीट समजला नाहीं. आपल्या इतिहासाच्या नवव्या भागाच्या शेवटीं शिवाजीच्या कृत्यांची व स्वभावाची मीमांसा करतांना Afzool Khan was murdered असा वाक्यांश लिहून ग्रांट डफनें शिवाजीवर खुनाचा चोरून प्रहार केला आहे. लक्ष्मणराव चिपळोणकर ह्यांनीं आपल्या इतिहासांत ग्रांट डफच्या इतर आक्षेपांना मुद्देसूद उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अफजलखानाची प्रकरणाची मुख्य हकीकत देण्यांत डफप्रमाणें चिपळोणकरहि चुकले असल्यामुळें त्यांच्या उत्तरांत जितका जोर यावा तितका आला नाहीं. तशांत त्यांच्या लक्षांतून वर नमूद केलेला वाक्यांशा चुकून राहिल्यामुळें ग्रांट डफ त्यांच्या कैचींतून अजिबात सुटून गेला आहे. “अफजलखान शिवाजीला मोकळ्या मनानें शिष्टाचाराप्रमाणें जों भेट देतो तों शिवाजीनें त्याच्या पोटांत वाघनख खुपसलें” असें वर्णन डफनें आपल्या इतिहासाच्या चवथ्या भागांत केलें आहे. “इतुकया उपरि अबदुल मनीं खवळला पुरा । कव मारिली अबदुल्यानें । सरजा गवसून धरला सारा । चालविली कट्यार” ही हकीकत अगीनदासानें पोंवाड्यांत दिली आहे. अफजलखानाचा पोवाडा बहुतेक पूर्णपणें विश्वसनीय असल्यामुळें त्यांत दिलेली हकीकत खरी मानणें प्राप्त आहे. अफजलखानानें प्रथम कट्यार चालविली, तेव्हां शिवाजीनें स्वसंरक्षणार्थ खानाच्या पोटात बिचवा खुपसला, अशी खरी कार्यपरंपरा आहे ह्या स्वसंरक्षणाच्या कृत्याला बखरकार वध ही संज्ञा देतात. ग्रांट डफनें योजिलेला murder हा शब्द वध ह्या शब्दाहून अर्थानें निराळा आहे. वध म्हणजे righteous killing व murder म्हणजे unrighteous killing. अफजलखान प्रकरणाची खरी हकीकत माहीत नसल्यामुळें, बखरकारांनीं अफजलखानाच्या वधासंबंधानें शिवाजीची जी तारीफ केली आहे तिचाहि ग्रांट डफनें विपरीतच अर्थ केला आहे. “राजकीय कारणाकरितां खून करणें न्याय्य आहे असे मराठे लोक समजतात.” म्हणून डफने मराठ्यांची विनाकारण निंदा केलेली आहे. ती किती अवास्तव व कोत्या बुद्धीची किंवा कुबुद्धीची दर्शक आहे हें वरील उदघाटन वाचून सहज ध्यानांत येण्यासारखें आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
शिवाजी ही विभूति महाराष्ट्रांत कोणतें कार्य साधण्याकरितां अवतीर्ण झाली? लोकांच्या स्वातंत्र्याचा अपहार करून दिग्विजय करण्याकरितां शिवाजी उत्पन्न झाला? किंवा स्वराज्य व स्वधर्म ह्यांचे सरंक्षण करण्याकरितां त्याचा अवतार होता? स्वराज्य व स्वधर्म ह्यांचें सरंक्षण करण्याचा उच्च, उदात्त व पवित्र हेतु मनांत धरून शिवाजीचें प्रयत्न चालले होते हें सर्वत्र मान्य आहे. तेव्हां परकीय लोकांचें स्वातंत्र्य हरण करणा-या, अर्थात् एका नीच, दुष्ट व अपवित्र हेतूनें प्रोत्साहित झालेल्या अलेक्झांडर, सीझर किंवा नेपोलियन ह्या दिग्विजयी पुरुषांशी शिवाजीची तुलना करणें अयोग्य आहें. धैय, शौर्य, पराक्रम, कर्तृत्वशक्ति, इत्यादि गुणांसंबंधानें शिवाजीशीं ह्या पुरुषांची तुलना केली असतां चालेल. परंतु हेतूच्या पवित्रतेसंबंधीं जेथें विचार करावयाचा असेल, तेथें ह्या दिग्विजयी व दुष्ट पुरुषांची डाळ शिजणार कशी? अशा ठिकाणीं स्वातंत्र्यार्थ खटपट करणा-या पवित्र महापुरुषांचाच तेवढा प्रवेश होणें योग्य आहे. हालंडचा वुइल्यम दि सायलेंट किंवा युनायटेड स्टेटसचा वाशिंग्टन ह्या पुरुषांची तुलना शिवाजीशी केली तर एकवार चालण्यासारखें आहे. आतां पाश्चात्य महापुरुषांशी तुलना केल्यानेंच म्हणजे शिवाजीच्या महत्त्वाची इयत्ता ठरणार आहे असा प्रकार बिलकूल नाहीं. शिवाजीची योग्यता स्वयंसिद्ध आहे. अलेक्झांडरप्रमाणें शिवाजीनें आपल्या स्नेह्यासोबत्यांस ठार मारिलें नाहीं; सीझराप्रमाणें आपल्या बायकोस सोडून दिलेलें नाहीं; बोनापार्टनें डफ डांगियाचा जसा अन्यायानें वध केला तसा शिवाजीनें कोणाचा केला नाहीं; क्रामवेलनें ऐरिश लोकांस सरसहा ठार मारिले, त्याप्रमाणे शिवाजीनें कोण्या प्रांतांतील लोकांची कत्तल उडविली नाही; फ्रेडरिक दि ग्रेटप्रमाणें शिवाजीच्या आंगीं नीच दुर्गुण नव्हते. शिवाजीचें वर्तन न्यायाचें, नीतीचें, पराक्रमाचें, स्वधर्मपरायणतेचें व परधर्मसहिष्णुतेचें होते. दोन चारशें लढाया मारून त्यांत विजयी होणें; तीन चारशे किल्ले मैदानांत, डोंगरावर व समुद्रतीरावर बांधणे; नवीन सैन्य तयार करणें; नवीन आरमार निर्मिणें; नवे कायदे करणें; स्वभाषेला उत्तेजन देणें; स्वतः पद्यरचना करणें; कवींना आश्रय देणें; नवीं शहरें वसविणें; स्वधर्माचें सरंक्षण करणें; गोब्राह्मणांचा प्रतिपाल करणें, सारांश, स्वदेशाला स्वतंत्र व सुखी करणे; ह्या लोकोत्तर कृत्यानीं जर कोण्या पुरुषानें ह्या भूमंडळाला अक्षय ऋणी करून ठेविलें असेल तर तें शिवाजीनेंच होय. शिवाजीची खाजगी वर्तणूक व सार्वजनिक पराक्रम इतके लोकोत्तर होते कीं, त्याच्याशीं तुलना करावयास जी जी म्हणून व्यक्ती घ्यावी ती ती, ह्या नाही त्या गुणानें शिवाजीहून कमतरच दिसेल. ह्या अवतारी पुरुषासंबंधीं लिहिता लिहितां समर्थ म्हणतात “तयाचे गुणमहत्त्वासी तुलना कैची? यशवंत, कीर्तिवंत, व सामर्थ्यवंत, नीतिवंत, जाणता, आचारशील, विचारशील, दानशील, कर्मशील, सर्वज्ञ, सुशील, धर्ममूर्ति, निश्चयाचा महामेरु, अखंड निर्धीरी, राजयोगी,” नानापरीचीं विशेषणें शिवाजीला रामदासांनीं लाविलीं आहेत. निस्पृही व स्पष्टवक्त्या अशा समकालीन ग्रंथकारानें हे गुणवर्णन केलेलें आहे हें लक्षात घेतलें असतां शिवाजीच्या अंगी असलेल्या जाज्वल्य गुणांच्या इयत्तेचा अंदाज सहजासहजीं करतां येतो व कित्येक इंग्रज व मुसलमान बखरकारांनीं ह्या महापुरुषाची निंदा केलेली पाहून त्यांच्या परगुणासहिष्णुतेबद्दल तिरस्कार उत्पन्न होतो व त्यांच्या हृदयांतील कुत्सितपणाचा ठाव घेण्यास संधी मिळते. कुत्ता, मूसक, सैतान, गनीम वगैरे अपशब्द योजिणा-या मुसलमान तवारिखकारांचे लेख प्रस्तुत कोणी फारसे वाचीत नाहीं, तेव्हां त्यांच्याबद्दल येथें कांहीं लिहिलें नाहीं तरी चालण्यासारखें आहे. इंग्रज लेखकांसंबंधीं मात्र इतकें औदासीन्य दाखवितां येत नाहीं. शिवाजी अक्षरशून्य होता येथपासून सुरुवात करून, (२) त्यानें दरोडे, (३) लुटारूपणा, (४) खून वगैरे अनुचित पापें केलीं असे सांगण्याचा इंग्रज लेखकांचा मुख्य रोख आहे. पैकीं पहिला आरोप निराधार आहे हे मागें दाखवून दिलें आहे. बाकीचे तीन आरोपहि अज्ञानानें व कुत्सित बुद्धींनें केलेले आहेत हेंहि साधार सिद्ध करतां येतें. शके १५६० पासून शके १५६८ पर्यंत कोकणांत कांहीं ठिकाणीं यवनांच्या विरुद्ध लहानसान बंडें झालीं व यवनांच्या बाजूच्या लोकांचीं घरेदारें लुटली गेलीं. ह्या लहानसान बंडांना मुसलमान तवारिखदार दरोडे म्हणून संज्ञा देतात. दरोडे हा शब्द मूळ कोणत्या अर्थी योजिलेला आहे, हे इंग्रज लेखकांना न कळल्यामुळें, या शब्दाचा वाच्यार्थ खरा धरून हे लोक समाधान मानितात. ग्रांट डफनें आपल्या पुस्तकाच्या अकराव्या भागांत कृष्णराव खटावकरांचें एक पत्र टिपेंत दिलें आहे. त्यांत दहा हजार स्वारांच्या सेनापतींना चोर, लुटारू, दरोडेखोर, वगैरे अपशब्द लाविले आहेत. ते ज्याप्रमाणें अज्ञानमूलक आहेत त्याप्रमाणेंच शिवाजीला दरोडेखोर हा अपशब्द लाविणें अज्ञानव्यंजक होय.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु ॥ अर्बा अशरीन मयाव अलफ, सन ११३३ फसली,
अवलसाल छ १ रमजान, २५ मे १७२३,
ज्येष्ठ शुध्द २ शके १६४५.
तुकाराम बोवा देहूकर याचे पुत्र नारायण गोसावी श्रावण शु ॥ ४ स (२६ जुलै १७२३) समाप्त झाले. छ २० सफर (९ नोव्हेंबर १७२३) श्रीमंत साता-याहून निघून वाई, धोम, महाबळेशर, प्रतापगड वगैरे करून पुन्हां छ ८ र॥ वल रोजी (२५ नोव्हेंबर १७२३) साता-यास आले. अंबाजीपंत तात्या स्वारीस निघाले. छ १८ र॥ वल (५ डिसेंबर १७२३) स्वारी हिंदुस्थानांत चालती झाली, तों माळव्यांत गेले. सैद बहादरशा बादशाहाकडील सुभा चालून आला. त्याशीं लढाई देऊन त्याचा मोड करून उज्जनीस गेले. तेथें ठाणीं बसवून अंमल सर केला. तमाम राजेरजवाडे बुंदेलखंडसुध्दां खंडणी घेतली. बुंदेल्याशीं स्नेह करून कांही दिवस छावणी केली. खानदेशांत मोकास अंमलाचा वसूल करू लागले. या लढाईत शिंदे, होळकर व पवार यांणीं बहुत शौर्य केले होतें. मल्हारजी होळकर या वेळी शिलेदारी करीत होता. तो जातीचा धनगर होता. नीरा नदीकाठी होळ ह्मणून गाव आहे. तेथील चौगला आहे. दुसरा राणोजी शिंदा याचे पूर्वज साता-याजवळ कन्हेरखेड येथें राहात असत. तो शिंदा पूर्वी मोगलाईत चाकरी करीत असतां, मोठे पदवीस चढला असतां, दरिद्रावस्थेत येऊन बाळाजी विश्वनाथ यांजवळ बारगिरीवर होता. पुढें बाजीराव याजपाशी जोडे उचलावयाची चाकरी करून हुज-यांत राहिला होता. पुढें योग्यतेस चढत आला. त्याच सुमारास धारेचा पवार योग्यतेस चढला. त्याचा मूळपुरुष उदाजी पवार विश्वासराव याचा बाप रामचंद्रपंत अमात्य यांणीं योग्यतेस चढविला होता. बावडेकराकडून आंग्रे यांणी सुवर्णदुर्ग तालुका घेतला. माळव्यांत बंदोबस्त राहण्याकरितां नेहमी वीस हजार फौज असावी असे करून राणोजी शिंदे व मल्हारजी होळकर यांस पाठविलें. शिंद्याकडे उज्जन व होळकराकडे इंदूर व पवार यास माळवें प्रांती जो अंमल साधेल तो साधावा असें ठरवून पेशवे परत आले. हिंदुस्थानात राजे रजवाडे यांस सोन्याच्या काठया व चौ-या सोन्याच्या दांड्याच्या असतात त्याप्रे॥ पेशवे यासही बहुमान दिल्हा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
शंकास्थान पाचवें.
शिवाजीखेरीज इतर कोणत्याहि व्यक्तीचे स्वभाववर्णन बखरकारांनी केलेले आढळत नाहीं. व्यवस्थित विभाग व योग्य वर्गीकरण करून लिहिण्याचें वळण बखरकारांस नसल्यामुळें त्यांच्या ग्रंथांत असल्या स्वतंत्र सदराची अपेक्षा करणें अप्रस्तुत आहे. आतां यद्यपि शिवाजीच्या स्वभाववर्णनांचें स्वतंत्र सदर ह्या बखरकारांनीं दिलेलें नाहीं, तत्रापि त्यांच्या ग्रंथांतून शिवाजीच्या स्वभाव वर्णनाचे व कर्तृत्चवर्णनाचे चुटके वेळोवेळी आढळून येण्यासारखे आहेत. हे सर्व चुटके एकत्र केले असतां शिवाजीचा स्वभाव व त्याचें कर्तृत्व ह्यांची इयत्ता थोडीबहुत ठरवितां येण्याजोगी आहे. बखरकार, पोवाडे रचणारे शाहीर व इतर ग्रंथकार ह्या सर्वांचे लेख व उल्लेख लक्षांत घेतले तर ह्या महात्म्याच्या स्वभावाची व कर्तृत्वाचीं निरनिराळीं अंगें नानाप्रकारांनी दृष्टोत्पत्तीस येतात. (१) बालपण, (२) तारुण्य, (३) प्रौढपण, (४) अंतकाळ, (१) मित्रवात्सल्य, (६) मातृप्रेम, (७) पितृप्रेम, (८) बंधुप्रेम, (९) स्त्रीप्रेम, (१०) पुत्रप्रेम, (११) देशप्रीति, (१२) धर्मश्रद्धा, (१३) गुरुभक्ति, (१४) धर्मसंस्थापनार्थ उद्योग, (१५) महाराष्ट्रधर्मपालना, (१६) विद्याव्यासंग, (१७) कवित्वशक्ति, (१८) शूरसंभावना, (१९) विद्वत्संभावना, (२०) सभ्यता, (२१) वीरश्री, (२२) साहस, (२३) श्रमसहिष्णुता, (२४) कार्यबाहुल्य, (२५) शिष्टाई, (२६) राजकारणधुरंधरता, (२७) कानूनसाक्षी, (२८) नीति, (२९) औदार्य, (३०) गुणग्रहिता, (३१) समयसूचकता, (३२) नम्रता, (३३) औद्धत्य, (३४) ऐश्वर्य, (३५) सेनानीत्व, वगैरे शिवाजीच्या शेंकडों गुणांचे दाखले थोडेफार बखरींतून व इतरत्र सांपडतात. ह्या दाखल्यांवरून शिवाजीच्या आंगीं असलेल्या गुणगणांचा अंदाज अंशतः होण्यासारखा आहे. (१) रामदासासारख्यांशीं नम्रत्व, (२) अवरंगझेबासारख्यांशीं औद्धत्य, (३) तानाजी मालुस-यांसारख्यांशीं स्नेह, (४) श्रीशैलमल्लिकार्जुनाच्या देवालयांत दाखविलेलें साहस, (५) वर्षोनवर्षें चारी ऋतूंत सारखें सुरू असलेलें उद्योगपरायणत्व, वगैरे गुणांचें सोदाहरण निरूपण करण्याचें हें स्थल नसल्यामुळें केवळ दिग्दर्शनावरच येथें समाधान मानून राहिलें पाहिजे. बैठ्या खेळांपैकीं सोंगट्यांचा गडबड्या, धांदल्या, व ठोकाठोकीचा खेळ शिवाजी कधीं कधीं खेळत असे. (तानाजी मालुस-याचा पोवाडा), पंताजी काका, तानाजी मालुसरे, वगैरे घरोब्यांतील मंडळींशीं थट्टामस्करी शिवाजी कधीं कधीं करीत असे (तानाजीचा पोवाडा); अफजलखानाला बत्तीस दातांचा बोकड, व अवरंगझेबाला सैतान व शिखानष्ट, अशीं उपपदें द्वेषजन्य थट्टेनें व तिरस्कारानें नवीन बनविण्याची कला शिवाजीला माहीत होती; राजाराम पालथा जन्मला असतां तो अपशकुन शुभशकुन आहे असें ठरविण्याची समयसूचकता शिवाजीच्या आंगीं होती, वगैरे नाजूक व मासलेवाईक चुटके बखरकारांनीं अधूनमधून दिले आहेत. ह्या सर्वांचा संग्रह भावी इतिहासकाराला बखरकारांच्या लेखांतून आयता तयार असलेला मिळणार आहे. आतां ह्या लहानसहान गोष्टी बखरकार मोठ्या महत्त्वाच्या मानीत नाहींत हें खरें व वाजवी आहे. बखरकारांचा मुख्य कटाक्ष शिवाजी शंकराचा अवतार होता; व धर्मसंस्थापना हें शिवाजीचें मुख्य कार्य होतें, वगैरे महत्त्वाचे मुद्दे सांगण्याकडे विशेष आहे व तो यथायोग्य आहे. शिवाजी ईश्वरांश होता ह्या मुद्यावर विशेष कटाक्ष असल्यामुळें, शिवाजीची तुलना बखरकार समकालीन किंवा दोनचारशें वर्षांअलीकडच्या सामान्य राजांशी करीत नाहींत. रघू, दिलीप, धर्म, शिबी, श्रियाळ, विक्रम, शालिवाहन, भोज, नैषध, कर्ण, अर्जुन वगैरे असामान्य पौराणिक राजांचीं नांवें शिवाजींच्या बरोबर घ्यावीं असा बखरकारांचा रोख आहे. हा किती वास्तव आहे, ह्याचें प्रत्यंतर आधुनिक लेखकांच्या लिहिण्यांत अत्युत्कृष्ट रीतीनें भासमान होतें. बखरकार ज्याप्रमाणें शिवाजीची तुलना लोकोत्तर अशा पौराणिक राजांशीं करतात, त्याप्रमाणेंच आधुनिक महाराष्ट्रलेखक त्याची तुलना युरोपांतील प्राचीन व अर्वाचीन अशा लोकोत्तर वीरांशीं करतात. अलेक्झांडर, सीझर, नोपोलियन, शार्लमान्य, क्रामवेल, वाशिंग्टन, इत्यादि पाश्चात्य महापुरुषांचीं नांवे शिवाजीच्या संबंधानें सुचविलेलीं वारंवार वाचण्यांत येतात. शिवाजींचें कर्तृत्व व महत्त्व लक्षांत घेतलें असतां ह्या पाश्चात्य पुरुषांना शिवाजीच्या बरोबरीने गणणें सामान्य धरसोडीच्या लेखांत अश्लाघ्य होईल असें नाहीं. परंतु परीक्षात्मक ऐतिहासिक लेखांत साधार अशा पायावरच तुलना झाली असतां खपली जाते. सबब प्रस्तुत प्रसंगाच्या संबंधानें ह्या विधानाची सत्यता सिद्ध करण्याकरितां, शिवाजीच्या स्वभावाचे व कर्तृत्वाचें मोजमाप घेणें जरूर आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु ॥ सलास अशरीन मया व अलफ, सन ११३२
फसली अवलसाल छ १९ साबान, २४ मे
१७२२, ज्येष्ठ वद्य ५ शके १६४४.
छ १९ साबान (२४ मे १७२२) अवल साल रोजी कुरकुंबाहून सुप्यास गेले. नंतर छ ६ सबाल (९ जुलै १७२२) रोजी साता-यास गेले. रमजान (जून) महिन्यांत श्रीमंतास सुपें मुक्कामी पुत्र जाला. रविलावल (डिसेंबर १७२२) महिन्यांत जावळ काढिलें. छ १२ मोहरम (१२ आक्टोबर १७२२) रोजी साता-याहून निघाले ते सासवडास जाऊन सुप्यास गेले. नंतर अवरंगाबादेस गेले. छ ७ र॥ वल रोजी (५ डिसेंबर १७२२) नबाब ऐवजखानाची भेट झाली. छ २३ रबिलाखर (२० जानेवारी १७२३) रोजी ब-हाणपुरास गेले. छ २६ रविलाखर (२३ जानेवारी १७२३) मुक्काम पिंपळोद त ॥ साजणी सरकार हांडे येथे अनुपसिंग याची भेट झाली. निजामउन्मुलूख आपले जाहागिरीचा बंदोबस्त करून दिल्लीस (जानेवारी १७२२) वजीरीचे अधिकारावर गेला. याशीं व बादशहाशी बनेना, ह्मणून बादशहानें अहमदाबाद सुभ्यावर कुलीखान अधिकारी होता, याणें कांही चूक केली सबब त्याचे पारपत्यास निजामास पाठविले. तेव्हां निजामानें कुलीखानाकडील फौज बहुतेक वश केल्यामुळें कुलीखान वडाराचें सोंग घेऊन दिल्लीस पळून गेला. हें वर्तमान निजामउन्मुलूख याशी कळतांच तो उज्जनीस राहून त्या गुजराथ प्रांतापैकी १ ढवळक्या, १ भडोच, १ जंबुसर, १ मखबुदाबाद, १ बलसाड हे पांच महाल आपले जहागिरीस ठेऊन अहमदाबादचे अधिकारावर आपल्या पुतण्यास ठेऊन आपण सन १७२२ सालीं दिल्लीस आला. नंतर तेथें पातशाहाचें व त्याचे स्वभावास जमेना. तेव्हां वजीरीचें काम टाकून वकीलमुतलक असा दुसरा अधिकार पतकरून राहिला. तत्राप तेंही त्यास आवडेना. सबब एके दिवशी शिकारीचे निमित्तें बाहेर पडून आपले मुलखीं दक्षिणेंत आला. पुन्हा दिल्लीस गेला नाहीं. तेसमयी नर्मदेच्या उत्तरेकडील मुलूख जितका मोंगलांनी घेतला होता, तो सर्व निजामाचे हाती लागला. श्रीमंतांची स्वारी हिंदुस्थानांत असतां छ २४ ज ॥ वल रोजी (१९ फेब्रुवारी १७२३) मु ॥ बदक्शा प्रांत झाबाब येथें नबाब निजामउन्मुलूक याची भेट घेऊन दक्षिणेस परत निघाले. छ ७ ज॥ खर (५ मार्च १७२३) मु॥ बोरगांव प्र॥ अशर छ मजकुरी नबाब याचा निरोप घेऊन बागेलखंडाकडे स्वारी केली. गोदू याचें पारपत्य केलें. रघोजी भोसल्यास देऊरगांव इनाम दिलें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
संतमार्गानें मराठ्यांच्या आंगीं राजकीय जोम येणें अशक्य होतें हें अन्य त-हेनेंहि सांगतां येण्यासारखें आहे. तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत संताळ्याच्या ऐन उमेदींत महाराष्ट्रांत गाई होत्या, ब्राह्मण होते, सनातनधर्म होता, वर्णाश्रम होते, सर्व कांहीं होतें. एकच गोष्ट मात्र नव्हती. ह्या वस्तूंविषयी आस्था, उत्कट अभिमान नव्हता. सहिष्णुता हें संतांचें व्रत पडलें. तेव्हां गाईचा वध झाला, ब्राह्मणांचा छळ झाला, धर्माचा उच्छेद झाला, तरी संतांची सहिष्णुता कांही चळली नाहीं. सर्वस्वाचा नाश झाला तरी आपलें कांहींही गेलें नाहीं ही संतांची बालंबाल खात्री. अशांच्या हातून राष्ट्राची राजकीय उन्नति व्हावी कशी? तोच समर्थांचा उदय होण्याच्या सुमारास काय प्रकार झाला तो पहा. आपल्याला कांहीं मिळवावयाचें आहे, गोब्राह्मणाचें प्रतिपालन करावयाचें आहे, सनातनधर्म स्थापावयाचा आहे, स्वराज्याची प्राणप्रतिष्ठा करावयाची आहे, असे प्रवृत्तिपर विचार लोकांचे मनांत उत्कटत्वेंकरून बाणूं लागले व राजकीय उन्नति होण्यास प्रारंभ झाला. ह्या राज्यक्रांतीला समर्थांनी उपदेशिलेला महाराष्ट्रधर्म कारण झाला, संतांचा निवृत्तिमार्ग कारण झाला नाहीं.
न्यायमूर्ती रानडयांनीं व प्रो. भागवतांनीं बखरींचें नीट परीक्षण केलें असतें तर महाराष्ट्र धर्म Religion वाचक शब्द नसून Duty, Patriotism वाचक शब्द आहे हें त्यांच्या लक्षांत आलें असतें. “राज्य साधून, म्लेंछाचें पारिपत्य करून महाराष्ट्रधर्म रक्षणें तेव्हां ज्यास जसें आपलें होतील तसें करणें, विपरीत दिसल्यास पारिपत्य करणें,” हें वाक्य मल्हार रामरावाच्या सप्तप्रकरणात्मक चरित्राच्या ३२ व्या पृष्ठावर आहे (प्रथमावृत्ति). ह्या वाक्यांत (१) स्वराज्य साधणें, (२) यवनांचें पारिपत्य करणें, (३) मराठ्यांची एकी करणें, व (४) विरुद्ध दिसतील त्यांचे पारिपत्य करणें, ही महाराष्ट्रधर्माची चार अंगे सांगितलीं आहेत. एवढ्यानेंच महाराष्ट्रधर्माची व्याप्ति झाली असें नाहीं. “(शत्रु) हत म्हणजे नष्ट न झाला तरी वृकयुद्ध किंवा चित्याचें युद्ध, महाराष्ट्रधर्मी युक्त योजना केली,” हें वाक्य शिवदिग्विजयाच्या १८२ व्या पृष्ठावर आहे. ह्या वाक्यांत शत्रू नष्ट झाला तर लांडग्यासारखें किंवा चित्यासारखें युद्ध करावें अशी महाराष्ट्रधर्माची अनुज्ञा आहे असें सांगितलें आहे. युद्ध कसें करावें ह्याचाहि निर्देश महाराष्ट्रधर्मात होतो हें ह्या वाक्यावरून अनुमानितां येतें. “रायबागींन सरकारकाम नेकीनें बजावून राहिली, तिची सेवा कराल तरी महाराष्ट्रधर्म तुमचा, नाहीं तर ठीक नाहीं”, हें वाक्य शिवदिग्विजयाच्या २१४ व्या पृष्ठावर आहे. ह्यांत, सशास्त्र स्त्रीची युद्धसेवा करणें महाराष्ट्रधर्माला वंद्य आहे, म्हणून स्पष्ट म्हटलें आहे. ह्या तीन उता-यांवरून महाराष्ट्रधर्म म्हणजे संताळ्याचा भक्तिमार्ग नव्हें हें उघड आहे. “स्वामित्च करण्याचे धर्म म्हणजे अधिकारी, इमानदार, जमीनदार, रयत जेथें असेल तेथून त्यास आणून, ज्याची वृत्ति जी असेल ती त्याजला सोपून, आपण स्वामित्च ठेवून वर्तवावें (शिवदिग्विजय, पृ. २१३),” ह्या वाक्यावरून सेव्यसेवकमधर्माचाहि महाराष्ट्रधर्मांत अंतर्भाव होतो असें दिसतें. दासबोधांत तर महाराष्ट्रधर्माच्या निरूपणार्थ चार सहा अध्याय समर्थांनीं लिहिले आहेत. क्षात्रधर्म, सेवाधर्म, युद्धधर्म, राजधर्म वगैरे धर्मांवर व्याख्यानें देऊन समर्थांनीं महाराष्ट्रधर्मांचें स्वरूप स्पष्ट उलगडवून दाखविलें आहे. महाराष्ट्रधर्म म्हणजे संताळ्याचा भक्तिमार्ग नव्हे हें सिद्ध करण्यास आणीक एक पुरावा आहे. रामदासाच्या आधीं झालेल्या संतांच्या ग्रंथांत व मागून झालेल्या संतांच्या ग्रंथांत महाराष्ट्रधर्म हा शब्द बिलकूल सांपडत नाहीं. समर्थांच्या आधीं तर ह्या शब्दाची कल्पनाच ह्यांच्या डोक्यांत नव्हती; परंतु समर्थांनी उचस्वरानें ह्या शब्दाचा घोष सारखा चाळीस वर्षे केला असतांहि ही कल्पना संताळ्याच्या मस्तकांत शिरली नाहीं. सारांश, संताळ्यांची व महाराष्ट्रधर्मांची जी सांगड न्यायमूर्तीनीं जोडून दिली आहे ती निराधार व अवास्तव आहे, व महाराष्ट्राच्या पुनरुज्जीवनासंबंधानें संतांचे जे गोडवे न्यायमूर्तीनी गायिले आहे ते पायाशुद्ध नाहींत.
येथपर्यंत महाराष्ट्रधर्माच्या अर्थासंबंधीं विचार झाला. आतां महाराष्ट्रधर्माची मांडणी बखरकारांनीं कशी केली आहे तें सांगावयाचे आहे. महाराष्ट्रधर्मावर स्वतंत्र व्याख्यान असें बखरकारांनीं कोठेंच दिलें नाहीं. त्यांच्या ग्रंथांत हा शब्द इतर गोष्टींचें कथन करतांना सहजासहजीं येऊन गेलेला आहे. ह्या सहज उल्लेखांवरून व दासबोधावरून महाराष्ट्रधर्माचा होईल तितका स्पष्ट अर्थ करण्याचा मी प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहिलें असतां महाराष्ट्रधर्माच्या अर्थाची व्याप्ती किती आहे ह्याचा अंदाज बखरकारांच्या उल्लेखावरून व रामदासाच्या लिहिण्यावरून व्हावा तितका होत नाहीं. शंकेला जागा पुष्कळच राहतें. तात्पर्य, बखरकारांचें सर्व लिहिणें अपुर्ते व संशयग्रस्त असतें, ह्या पलीकडे त्यांच्या सामान्य सिद्धान्त निरूपण करण्याच्या ऐपतीसंबंधी विशेष कांहीं एक सांगण्यासारखें नाहीं. पुढील शंकास्थानांत मोठमोठ्या व्यक्तींच्या स्वभाववर्णनाची व्यवस्था बखरकारांनीं कशीं केली आहे त्यांचें संक्षेपानें निरूपण करतों.