संतमार्गानें मराठ्यांच्या आंगीं राजकीय जोम येणें अशक्य होतें हें अन्य त-हेनेंहि सांगतां येण्यासारखें आहे. तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत संताळ्याच्या ऐन उमेदींत महाराष्ट्रांत गाई होत्या, ब्राह्मण होते, सनातनधर्म होता, वर्णाश्रम होते, सर्व कांहीं होतें. एकच गोष्ट मात्र नव्हती. ह्या वस्तूंविषयी आस्था, उत्कट अभिमान नव्हता. सहिष्णुता हें संतांचें व्रत पडलें. तेव्हां गाईचा वध झाला, ब्राह्मणांचा छळ झाला, धर्माचा उच्छेद झाला, तरी संतांची सहिष्णुता कांही चळली नाहीं. सर्वस्वाचा नाश झाला तरी आपलें कांहींही गेलें नाहीं ही संतांची बालंबाल खात्री. अशांच्या हातून राष्ट्राची राजकीय उन्नति व्हावी कशी? तोच समर्थांचा उदय होण्याच्या सुमारास काय प्रकार झाला तो पहा. आपल्याला कांहीं मिळवावयाचें आहे, गोब्राह्मणाचें प्रतिपालन करावयाचें आहे, सनातनधर्म स्थापावयाचा आहे, स्वराज्याची प्राणप्रतिष्ठा करावयाची आहे, असे प्रवृत्तिपर विचार लोकांचे मनांत उत्कटत्वेंकरून बाणूं लागले व राजकीय उन्नति होण्यास प्रारंभ झाला. ह्या राज्यक्रांतीला समर्थांनी उपदेशिलेला महाराष्ट्रधर्म कारण झाला, संतांचा निवृत्तिमार्ग कारण झाला नाहीं.
न्यायमूर्ती रानडयांनीं व प्रो. भागवतांनीं बखरींचें नीट परीक्षण केलें असतें तर महाराष्ट्र धर्म Religion वाचक शब्द नसून Duty, Patriotism वाचक शब्द आहे हें त्यांच्या लक्षांत आलें असतें. “राज्य साधून, म्लेंछाचें पारिपत्य करून महाराष्ट्रधर्म रक्षणें तेव्हां ज्यास जसें आपलें होतील तसें करणें, विपरीत दिसल्यास पारिपत्य करणें,” हें वाक्य मल्हार रामरावाच्या सप्तप्रकरणात्मक चरित्राच्या ३२ व्या पृष्ठावर आहे (प्रथमावृत्ति). ह्या वाक्यांत (१) स्वराज्य साधणें, (२) यवनांचें पारिपत्य करणें, (३) मराठ्यांची एकी करणें, व (४) विरुद्ध दिसतील त्यांचे पारिपत्य करणें, ही महाराष्ट्रधर्माची चार अंगे सांगितलीं आहेत. एवढ्यानेंच महाराष्ट्रधर्माची व्याप्ति झाली असें नाहीं. “(शत्रु) हत म्हणजे नष्ट न झाला तरी वृकयुद्ध किंवा चित्याचें युद्ध, महाराष्ट्रधर्मी युक्त योजना केली,” हें वाक्य शिवदिग्विजयाच्या १८२ व्या पृष्ठावर आहे. ह्या वाक्यांत शत्रू नष्ट झाला तर लांडग्यासारखें किंवा चित्यासारखें युद्ध करावें अशी महाराष्ट्रधर्माची अनुज्ञा आहे असें सांगितलें आहे. युद्ध कसें करावें ह्याचाहि निर्देश महाराष्ट्रधर्मात होतो हें ह्या वाक्यावरून अनुमानितां येतें. “रायबागींन सरकारकाम नेकीनें बजावून राहिली, तिची सेवा कराल तरी महाराष्ट्रधर्म तुमचा, नाहीं तर ठीक नाहीं”, हें वाक्य शिवदिग्विजयाच्या २१४ व्या पृष्ठावर आहे. ह्यांत, सशास्त्र स्त्रीची युद्धसेवा करणें महाराष्ट्रधर्माला वंद्य आहे, म्हणून स्पष्ट म्हटलें आहे. ह्या तीन उता-यांवरून महाराष्ट्रधर्म म्हणजे संताळ्याचा भक्तिमार्ग नव्हें हें उघड आहे. “स्वामित्च करण्याचे धर्म म्हणजे अधिकारी, इमानदार, जमीनदार, रयत जेथें असेल तेथून त्यास आणून, ज्याची वृत्ति जी असेल ती त्याजला सोपून, आपण स्वामित्च ठेवून वर्तवावें (शिवदिग्विजय, पृ. २१३),” ह्या वाक्यावरून सेव्यसेवकमधर्माचाहि महाराष्ट्रधर्मांत अंतर्भाव होतो असें दिसतें. दासबोधांत तर महाराष्ट्रधर्माच्या निरूपणार्थ चार सहा अध्याय समर्थांनीं लिहिले आहेत. क्षात्रधर्म, सेवाधर्म, युद्धधर्म, राजधर्म वगैरे धर्मांवर व्याख्यानें देऊन समर्थांनीं महाराष्ट्रधर्मांचें स्वरूप स्पष्ट उलगडवून दाखविलें आहे. महाराष्ट्रधर्म म्हणजे संताळ्याचा भक्तिमार्ग नव्हे हें सिद्ध करण्यास आणीक एक पुरावा आहे. रामदासाच्या आधीं झालेल्या संतांच्या ग्रंथांत व मागून झालेल्या संतांच्या ग्रंथांत महाराष्ट्रधर्म हा शब्द बिलकूल सांपडत नाहीं. समर्थांच्या आधीं तर ह्या शब्दाची कल्पनाच ह्यांच्या डोक्यांत नव्हती; परंतु समर्थांनी उचस्वरानें ह्या शब्दाचा घोष सारखा चाळीस वर्षे केला असतांहि ही कल्पना संताळ्याच्या मस्तकांत शिरली नाहीं. सारांश, संताळ्यांची व महाराष्ट्रधर्मांची जी सांगड न्यायमूर्तीनीं जोडून दिली आहे ती निराधार व अवास्तव आहे, व महाराष्ट्राच्या पुनरुज्जीवनासंबंधानें संतांचे जे गोडवे न्यायमूर्तीनी गायिले आहे ते पायाशुद्ध नाहींत.
येथपर्यंत महाराष्ट्रधर्माच्या अर्थासंबंधीं विचार झाला. आतां महाराष्ट्रधर्माची मांडणी बखरकारांनीं कशी केली आहे तें सांगावयाचे आहे. महाराष्ट्रधर्मावर स्वतंत्र व्याख्यान असें बखरकारांनीं कोठेंच दिलें नाहीं. त्यांच्या ग्रंथांत हा शब्द इतर गोष्टींचें कथन करतांना सहजासहजीं येऊन गेलेला आहे. ह्या सहज उल्लेखांवरून व दासबोधावरून महाराष्ट्रधर्माचा होईल तितका स्पष्ट अर्थ करण्याचा मी प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहिलें असतां महाराष्ट्रधर्माच्या अर्थाची व्याप्ती किती आहे ह्याचा अंदाज बखरकारांच्या उल्लेखावरून व रामदासाच्या लिहिण्यावरून व्हावा तितका होत नाहीं. शंकेला जागा पुष्कळच राहतें. तात्पर्य, बखरकारांचें सर्व लिहिणें अपुर्ते व संशयग्रस्त असतें, ह्या पलीकडे त्यांच्या सामान्य सिद्धान्त निरूपण करण्याच्या ऐपतीसंबंधी विशेष कांहीं एक सांगण्यासारखें नाहीं. पुढील शंकास्थानांत मोठमोठ्या व्यक्तींच्या स्वभाववर्णनाची व्यवस्था बखरकारांनीं कशीं केली आहे त्यांचें संक्षेपानें निरूपण करतों.