Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ इसन्ने खमसैन मया व अलफ, सन ११६१ फसली,
अवलसाल छ १० रज्जब, २५ मे १७५१,
ज्येष्ठ शु॥ ११ शके १६७३ प्रजापति संवत्सरे.
पेशवे गाजुदिनाचे कामाकरितां मोंगलाकडेस स्वारीस पुण्याहून छ २४ जिलकाद रोजी (४ अक्टोबर १७५१) निघून, छ २६ पर्यंत भांबर्डे येथे मुक्काम करून, पुढें छ १ जिल्हेज (१० अक्टोबर १७५१) वडगावास जाऊन, पुढे घोडनदीकडे चालते झाले. पेशवे आपल्यावर येतात बातमी सलाबतजंग यास कळल्यावर त्यानेंही फरासिसांची पलटणें साह्यास घेऊन एकदम कोरेगांवावर आला. पेशवे फौजेसुध्दां त्याचे पाठी लागले. छ १९ मोहरम रोजी (२७ नोव्हेंबर १७५१) घोडनदीवर लढाई झाली. छ १ सफर रोजी (९ डिसेंबर १७५१) तुळापुरास येऊन पुन: माघारे उलटून मांडवगण वगैरे ठिकाणी लढाया झाल्या त्यांत कोन्हेर त्रिंबक एकबोटे यानें मोठा पराक्रम केला. मराठे जय पावले. याच लढाईत बाबूराव फडणीसास तोफेचा गोळा लागला होता. छ २४ मोहरम रोजी (२ डिसेंबर १७५१) त्र्यंबक किल्ला सर झाल्याची खबर आली. छ ३० सफर रोजी (७ जानेवारी १७५२) उभयपक्षी सल्ला होऊन सलाबतजंग याजकडील नानरोटी व दिवाण रामदासपंत याजकडील तुळशी ठेवून सिंगवे परगणें राहुरी मुक्कामी सल्ला होऊन लढाई तहकूब झाली. रामदासपंत यास किताब राजा रघुनाथ ह्मणून होता. नबाबाचे लष्करांत कांही तंटा उत्पन्न झाला यांत तारीख ७ एप्रिल सन १७५२ रोजीं मारला गेला. त्याची दिवाणगिरी शहानवाजखान ऊर्फ सरलष्कर खान यास दिली होती. याचा पुत्र समशुदौला यास मुसाभुशी यांणी मारल्यावर विठ्ठल सुंदर दिवाण झाले. रामचंद्र मल्हार याणी लोकांवर कर्जपट्टी घातली होती. त्याणी थोडे दिवस तीन वर्षेपर्यंत कारभार करून पुण्यांत गणपतीच्या मागें त्यांचा वाडा होता तेथें मयत झाले. सदाशिव रामचंद्र पुत्र यास नवी सरदारी दिली, छ १२ जिल्हेज (२० आक्टोबर १७५२). खंडेराव व सयाजी गायकवाड यास कैदेतून सोडून बहुमानाची वस्त्रें दिली. दमाजी लोहोगडावर व जयसिंग यास कोरीगडावर कैदेंत ठेविलें होतें, व उमाबाई दाभाडी सिंहगडास ठेविली होती. पुढें तिजला सोडिलें. ती चरवलीस श्रीमंतांस भेटली. जयसिंग गायकवाड यास विठ्ठल शिवदेव याजबरोबर गुजराथची ठाणी खाली करून घ्यावयाविषयीं पाठविण्याचा विचार होता. परंतु जो जयसिंग कोरीगडावर कैदेतच मयत झाला. यशवंतराव दाभाडे यास पुण्यास कैदेत ठेविले होते. पुढे शरण आल्यावरून त्यास सोडून तळेगावास पाठविले होते. परंतु तो फार बेहोश. गुजराथचा अम्मल उठवावा ह्मणून दादासाहेब यांस चंद्र १० ते १३ जिल्हेज रोजी (२२ आक्टोबर १७५१) स्वारीस पाठविले. सोनगड वगैरे प्रांती स्वारी झाली. छ १६ रबिलाखर (२१ फेब्रुवारी १७५२) पारनेरा किल्ला घेतल्याची खबर आली. पुढें दमाजीनें एकनिष्ठपणें वागावें असें कबूल करून घेऊन त्यास मोकळा करून छ २० रबिलाखर रोजी (२५ फेब्रुवारी १७५२) गुजराथेंत दादासाहेब यांजकडे पाठविलें. छ ४ जमादिलाखर रोजी (८ एप्रिल १७५२) आहद सोनगड तहद सिंधुसागर गुजराथप्रांत देखील जकात निम्मे अम्मल पेशवे निम्मे दाभाडयाबद्दल गायकवाड याजकडे, याप्रमाणें वांटण्या झाल्या. छ १० रबिलाखर (१५ फेब्रुवारी १७५२) श्रीमंत माधवराव बल्लाळ यांची मुंज पुण्यास त्र्यंबकराव मामा यांनी लाविली. छ १२ जमादिलावल (१८ मार्च १७५२) भीमाशंकर व त्र्यंबकेश्वर यांजला करून श्रीमंत पुण्यास आले. याच दिवशीं दिल्लीबादशहाकडून फरमान आले होते, चैत्र शु॥ १५ (१८ मार्च १७५२). महादाजी अंबाजी घरी बसून होते, त्यांस सरदारी दिली व पुत्र नीळकंठराव पुरंदरे यास पुणे सुभा सांगितला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
धोडप किल्ल्यानजीक युध्द होऊन त्यांची फौज मागें सरली. दादासाहेब व रावसाहेब पुण्यास आले. त्याजवर दुसरे वर्षी रावसाहेब कर्नाटकांत स्वारी करून संस्थानिकांपासून खंडण्या घेतल्या व निजगळचा किल्ला मोर्चे देऊन हल्ला करून घेतला. त्या वर्षी त्रिंबकराव मामा यांजबराबर फौज व तोफखाना देऊन छावणीस ठेऊन खासा मजल दरमजल पुण्यास आले. त्रिंबकराव मामा दोन छावण्या राहिले. हैदरखानाशी लढाई करून त्यास मोडून लुटून फस्त केला. जातीनें पायउतारा पळोन श्रीरंगपट्टणास गेला. त्रिंबकराव मामांनी पैका मेळवून तिसरे वर्षी पुण्यास आले, व रामचंद्र गणेश व विसाजी कृष्णा यांजबरोबर हुजरातची फौज देंऊन हिंदुस्थानांत रवाना केले, व तुकोजी होळकर व महादजी शिंदे यांचीही रवानगी केली. हिंदुस्थानात गेल्यावर दाब बसवीत चालिले. त्यास रामचंद्र गणेश यांचे व विसाजी कृष्ण यांचे मनसुब्याचे रीतीस वाकडे पडों लागले. तेव्हां रामचंद्र गणेश यास हुजूर आणून विसाजीपंत व होळकर व शिंदे एक विचारें मनसबा करून बंदोबस्त करीत चालिले. त्यांस, हिंदुस्थानांत नजीबखान रोहिला मातबर. त्याजवर जरब बसली नव्हती. त्याचा लेक जाबतेखान तोही त्याचप्रमाणें पराक्रमें करून होता. त्याजवर जावयाचा मनसबा करून दरमजल भागीरथीतीरास गेले. पथ्थरगड पार होता. त्या किल्ल्यास जाऊन पारपत्य करावें, हा सिध्दांत केला. त्यास गंगेस पाणी फार होतें. तेव्हां श्रीस प्रार्थना केली. ते समयीं श्री भागीरथीनें उतार दिला. तेव्हां गंगा उतरून पार जाऊन पथ्थरगडावर हल्ला केला. जावतेखान लढाईस नमूद होऊन युध्द जाहले. पथ्थरगड फत्ते झाला. खजिना वगैरे कुल सरकारांत आणून तेथून कूच करून दरमजल देशी आले. हिंदुस्थानांत व कर्नाटकांत नानासाहेबाचे कारकीर्दीस गड, किल्ले, स्थळें आलीं नव्हती, ते रावसाहेबांचे कारकीर्दीस किल्ले, गड घेतले व शत्रू पादाक्रांत केले. बारा वर्षे रावसाहेबांनी राज्यरक्षण करून अधिक पराक्रम केला. त्याजवर त्यास वेथा होऊन दोन तीन वर्षे हैराणच होते. त्यास सन सल्लाम सबैनांत कार्तिकमासीं थेऊरचे मुक्कामी कैलासवास केला. सौ मातुश्री रमाबाईंनी सहगमन केले.
त्याजवर श्रीमंत नारायणरावसाहेब सातारियास श्रीमंत महाराज राजारामराजे यांच्या दर्शनास गेले. महाराजांनी कृपा करून प्रधानपणाचीं वस्त्रें बहुमान संप्रदाययुक्त हत्ती, घोडा व जवाहीर, समशेर, शिकेकटार देऊन निरोप दिला. पुण्यास आल्यावर नऊ महिने पद चालविले. त्याजवर भाद्रपद शुध्द त्रयोदशीस सन अर्बात गाडद्यांनी वाडयावर चालून घेऊन वाडयांत शिरोन रावसाहेबांस दगा केला. दादासाहेब वाडयांत होते. ते बाहेर निघोन फौज जमा करून नबाब निजामअल्लीखान याजवर चढाईचा कस्त करून मजल दरमजल चालिले. निजामअल्लीखान हैदराबादाहून कूच करून बेदरास आले. यांची त्यांची गांठ पडोन बेदरास वेढा घातला. ते वेळेस नवाबांनी वीस लक्षांची जागीर द्यावयाचा करार कृष्णराव बल्लाळ यांचे विद्यमानें करार करून दुसरें दिवशी भेटीचा समारंभ जाला. नवाब व रुकनुदौला दोघे मात्र दादासाहेबाचे डेऱ्यास आले. ते वेळेस नवाबांनी कितेक स्नेह घरोबा चालवावयाचा मजकूर बोलिले. ते समयीं स्नेहावर दृष्टी देऊन, जागीर माफ करून, तेथून कूच करून पंचमहालांत जाऊन, स्वराज्याचे अमलाचा बंदोबस्त करून भीमेकृष्णेचा कोडलूरसंगम उतरून कर्नाटकास चालिले. मुरारराव हिंदुराव घोरपडे, ममलकतदार सेनापती, भेटीस बोलाविले. नवाब बसालतजंग यांसही भेटीस बोलाविले. त्यांणी येऊन आदवाणी तालुक्याची खंडणी चुकविली. तेथून कूच करून तुंगभद्रेवर जाऊन दरमजल बलारी पावेतों गेले. महमदअलीखान याजकडून आरकटप्रांताच्या स्वराज्याचे अमलाचे खंडणीचा मजकूर वकील बोलू लागले व हैदरखान यांजकडून करनाटकप्रांतींच्या खंडणीचा करारमदार करावयास वकील लागले. त्यास राजश्री नाना फडणीस व सखारामपंत व मोरोबादादा व बाबूजी नाईक व कृष्णराव बल्लाळ यांही दादासाहेबाचे मर्जीचा भाव पाहून, शरीरप्रकृतीची वगैरे निमित्ये करून, निरोप घेऊन पुणियास आले. व सर्वांनी विचार करून सो मातुश्रीबाई काकूबाई यांस किल्ले पुरंदरास नेऊन ठेऊन राज्याचा बंदोबस्त करूं लागले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
नासिरजंग कर्नाटकांत गेला. तेव्हां बरोबर सलाबतजंग व निजामअल्ली व बसालतजंग व मोगलअल्ली असे पुलचेरीवर असतां, हिदायत मोहिदीनखान नवसा ह्मणजे मुलीचा मुलगा लढत असतां त्या लढाईत महंमदखान कडण्याचा नवाब यानें गोळी घालवून नासिरजंगास मारिलें, व हिदायत मोहिदीनखानही ठार झाला. त्या लढाईत मग निजाम पदवी सलाबतजंग यास मिळून तो हैदराबादेकडे जात असतां ताराबाईनीं त्याशी राज्यकारण करून त्यास साता-यास आणणार होती. ही खबर पेशवे नानासाहेब यास कळतांच छ ६ जिल्हेज रोजी (२६ अक्टोबर १७५०) त्यावर स्वारीस निघाले. त्यांनी सलाबतजंग यास कृष्णेच्या काठी गांठून लढाई केली. पुढें तह असावा असें बोलण्यांत सलाबतजंग याजकडून छ ३ जमादिलावर रोजी (२० मार्च १७५१) श्रीमंताकडे आले होतें. इतक्यांत साता-याकडे ताराबाईचेकडून दमाजी बडोद्याहून येऊन नाना पुरंदरे यांशी लढत आहे अशी खबर श्रीमंतांस कळताच रामदासपंताचे विद्यमाने सल्ला करून खंडणी सतरा लक्ष रुपये घेऊन एकदम तेरा दिवसांत साता-यास आले. याच स्वारीत छ २८ रबिलाखर रोजी (१६ मार्च १७५१) श्रीमंतांनी मुगणहळळी पेठ व गोपाळपेठची खंडणी घेतली. बरोबर रघोजी भोसले व फत्तेसिंग भोसले असे होते. साता-यास स्वारीस येण्याचे अगोदर दमाजीचा मोड नाना पुरंदरे यांनी केला होता. पेशवे फौजेनिशी नजीक आले. प्रतिनिधीनेंही बोलल्याप्रमाणें साहाय्य केलें नाहीं, याजकरितां दमाजी पेशवे याजबरोबर तहाचें बोलणे लाविलें. तें पेशवे यांनी मान्य केल्यासारखा आकार दाखवून तह करण्यास आह्मांजवळ यावें असें सांगून, जवळ आणिला. तेव्हां आपले हाती पुरता सांपडला असे समजून त्यासही गुजराथसंबंधें कांही पैसा येणें होता तो मागूं लागले. नंतर त्यानें उत्तर केलें की, या गोष्टीस मी एकटाच मालक नाही. तेव्हा छ १८ जमादिलाखर रोजी (४ मे १७५१) दाभाडे याजकडील गुजराथ खातेंबाकी उत्पन्नाची पेशवे यांनी जप्ती केली व पुढे छ १० रज्जब अखेर साल (२५ मे १७५१) यशवंतराव दाभाडे व दोघी बाया कैद करून पुण्यास पाठविल्या. त्या होळकर याच्या वाड्यांत ठेविल्या होत्या, व त्याच दिवशी इंदूरीचें ठाणेंही जप्त केलें. गुजराथचा निमेभाग पेशवे यांस महाराजांनी दिला असतां दाभाडे यांनी हवाला केला नाही, त्याजबद्दल दाभाडे यांजकडे पंचवीस लक्ष रुपये येणें, त्या ऐवजी दाभाडे याचा निम्मे हिस्सा जप्त करून पेशवे यानी घेतला. त्याजबद्दल छ २१ जमादिलाखरची (७ मे १७५१) सनद दाभाडे यांचे नावें झाली आहे की, स्वामीनीं गुजराथप्रांत सालमजकुरी आह्माकडे देवविला ते तुह्मी गरगशा खाली घालून हवाली केला नाहीं, याजबद्दल पंचवीस लक्ष रुपये तुह्माकडे येणें, त्याजबद्दल तुमचा निम्मे हिस्सा तुह्मी लावून दिला, तो आह्मी कबूल केला, तो पंचवीस लक्ष रुपये फिटले ह्मणजे परत देऊं असा मजकूर आहे. मग दमाजीस कैद करून, त्याचे लष्करावर छापा घालून, दमाजीस पुण्यास कैद करून, आवजी कवडे यांचे वाड्यात ठेविलें, छ २५ जमादिलाखर (११ मे १७५१) या साली दुसऱ्या गोष्टी मनांत ठेवण्यासारख्या घडून आल्या, त्या येणेंप्रमाणे. हरी फडके या साली उमेदवार कारकून होते. छ २६ जिलकाद लागू छ ६ जिल्हेज (१७ आक्टोबर - २६ आक्टोबर १७५०) श्रीमंत राव बापूजी पुणे सुभा याशी शाहूचे नांवचे मुतालिकी शिक्के होते ते मोडून रामराजाच्या नावें करून दिले. खरगोणे प्रांत माळवा नवा मुलूख या सालीं सरकारांत आला. छ २६ रबिलाखर (१४ मार्च १७५१) पासून त्रिंबकराव मामा पेठे पुण्याचे कामकाज पाहूं लागले. जमादिलावल (एप्रिल १७५१) महिन्यांत नानासाहेब यांस मुलगा झाला होता. भागानगरची स्वारी करून पंढरपुरास माघारे येऊन तेथील बंदोबस्त करून छ ७ रज्जब (२२ मे १७५१) १६ घटिका दिवसास पुण्यास दाखल झाले. शिंदखेड व खांडवे व भालागड व पिंपळदेहे, हांडे, यमाखळ, रघोजी भोसले यांजकडून मोबदल्यांत घेतले. पर्वतीस देकार द्यावयास जागा करून सोपे बांधावयास काम लाविले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
उभयपक्षाकडील मुलखाची खराबी परस्परें केली. नवाब आगोटीस औरंगाबादेस चालिले. श्रीमंत भागानगराकडून गंगातीरास आले. राक्षसभुवनाजवळ नवाब गंगा उतरोन पलीकडे गेले. विठ्ठल सुंदर दिवाण फौजसुध्दा दक्षिणतीरी होते. श्रीमंतांनी जानोजी व गोपाळराव यांसी फोडोन आणिले आणि विठ्ठल सुंदर याजवर चालोन गेले. लढाई सफेजंगीची होऊन विठ्ठल सुंदर पडले. फौज लुटली. नवाब निघोन अवरंगाबादेस गेले. श्रीमंत गंगा उतरोन जाऊन अवरंगाबादेस शह दिला. मग कांही जहागीर घेऊन माघारे फिरोन पुणियासी आले. लोकांनी घरें व वाडे बांधिले. दुसरे वर्षी रावसाहेब कर्नाटकांत गेले. दादासाहेब आनंदवल्लीस गंगातीरास गेले. रावसाहेब यांनी कर्नाटकांत गेल्यावर हैदरखान याशी लढाई करून त्यास मोडिले. तेव्हां त्यांनी रान धरिलें. आगोट जालियावर दाणावैरण याची सोय पाहून रावसाहेब यांणी नर्मदेवर छावणी केली. हैदरखान नेडेबावटीस जाऊन राहिला. दरम्यान वाकनदी होती. त्यास नर्मदेवर चतुर्थीचा उछाव केला. मुरारराव घोरपडे ममलकतदार व शहानुरे नबाब अबदुल्लाखान कुमकेस आले. तेही छावणीस राहिले. मुरारराव यांणी विनंति केली की सेनापती पूर्वी संताजी घोरपडे यांसी होती त्याजकरितां आमची आह्मास द्यावी. त्याजवरून मानिलेल्या निष्ठेवर कृपा करून सेनापतीचे पद, साडेचार लक्षांचा सरंजाम नूतन दिला. उछाह चतुर्थीचा करून, धारवाडास जाऊन, किल्ल्यास मोर्चे देऊन बसले व देशीहून फौजही आली. सुरुंग सलाबत कुचे खाणून, धमधमे बांधून, त्याजवर तोफा ठेवून मारगिरी केली. किल्ला जेर झाला. तेव्हां किल्लेदारांनी कौल घेऊन, किल्ला देऊन, हैदरखानाकडे गेला. धारवाडाहून रावसाहेबीं कूच करून हैदरखानाकडे चालिले. त्यांणी बिदनूरचें रान धरून झाडींत शिरले. बाऱ्यास प्यादे ठेविले. बतेऱ्या बांधिल्या असतां मूरगुडचें ठाणें वगैरे ठाणीं घेतली. दादासाहेबास आणावयास चिंतो अनंत पाठविले. त्याजवरून दादासाहेबी आनंदवल्लीहून कूच करून दरमजल कर्नाटकास आले व रावसाहेब माघारे फिरोन सामोरे गेले. भेटी होऊन, बेदरचे झाडीत शिरोन, अनंतपूरचे किल्ल्यास मोर्चे देऊन जेर केला. हैदरखान बेदरच्या आश्रयास गेले. फौज, प्यादे व गाडदी पळोन गेले. दोन अडीच हजार फौज व आठदहा हजार गाडदी प्यादे राहिले. दोन बाऱ्या टाकून गेले, तसे आणखी एक बारी गेल्यानें हैदरखानाचें पारिपत्य व्हावें, असा समय असतां हैदरखानांनीं दादासाहेबांकडे दोघां चौघांचे हातें राजकारण करून तह करार केला. तो रावसाहेबाचे मर्जीप्रमाणे न झाला. बेमर्जी झाली. तथापि दादासाहेबांनी तह केला. उपाय नाहीं. त्या स्वारीहून पुण्यास आल्यावर दसरा करून दादासाहेब हिंदुस्थानच्या स्वारीस गेले. रावसाहेब कर्नाटकच्या स्वारीस गेले. शिऱ्यापावेतो जाऊन, शिऱ्याचे किल्ल्यास मोर्चे देऊन शिऱ्याचा किल्ला घेऊन पुढें मदगिरीस गेले. मदगिरी व चेनरायेदुर्ग दोन्ही किल्ले पाहाडी मोर्चे देऊन घेतले. होसकोटें व चिकबाळापूर, थोरलें बाळापूर वगैरे थोरलीं ठाणीं घेऊन आरकाटावर सलाबत बसोन वकील महमदअल्लीखान याजकडील खंडणीचा मार बोलू लागले, व कर्नाटक प्रांतीचे जमीदार व पाळेगार तमाम आर्जवांत येऊन खंडण्या येऊ लागल्या. त्यास, दादासाहेब दरमजल हिंदुस्थानांतून देशीं येऊ लागले. त्यांचे मर्जीचा भाव बातमीत येऊं लागला. त्याजमुळें करनाटकच्या मसलतीचा विचार आटोपून दरमजल देशी येऊन परभारा पैठणास गेले. दादासाहेब कासारबारीचे घाटानें आनंदवल्लीस गेले. रावसाहेब दरमजल पुण्यास आले. त्या वर्षी पुष्यास राहिले. दादासाहेबांचा व रावसाहेबांचा पेंच वाढला. त्यांही फौज जमा केली व रावसाहेबीं फौज जमा करून गंगातीरास गेले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
साता-यास ताराबाई पुण्याहून गेल्यावर सर्व कारभार प्रधान पंत यांचे आज्ञेप्रमाणें गोविंदराव चिटणीस व यशवंतराव खासनीस व देवराव लपाटे करू लागले. आपलें कांही चालत नाहीं असे तिचें मनांत येऊन, दोन्ही राण्या आपल्याबरोबर घेऊन, रुसून किल्ल्यावर जाऊन राहून, किल्ला बळकाविला. तिजला समजावून आणावयाकरितां स्वत: रामराजे बापूजी खंडेराव यांचे कांही लोक बरोबर घेऊन मार्गशीर्ष शु॥ ५ रोजी (२३ नोव्हेंबर १७५०) किल्ल्यावर गेले. तेव्हां ताराबाईनीं त्यांस स्वतंत्र वागण्याविषयीं बहुत उपदेश केला. परंतु तें सांगणें महाराजांनी मान्य केले नाहीं. तसे परत साता-यास आले. नंतर दुसरे दिवशी चंपाषष्ठीचे (२४ नोव्हेंबर १७५०) निमित्तानें ताराबाईनें किल्ल्यावर भोजनास बोलाविले. तेव्हां महाराज किल्ल्यावर जातांच तेथें कैद केले व किल्ल्याचे कामगार हवालदार वगैरे यांस आज्ञा केली कीं, बरोबर आलेल्या लोकांस बंदुकांचा मार करून घालवून द्या. पुढें ताराबाईनीं दमाजी गायकवाड यास पत्र पाठविलें कीं, मराठयांचे राज्य ब्राह्मणांचे हातीं लागलें तें सोडण्याविषयीं तुह्मीं यावें. त्याप्रमाणें त्यांनी मान्य करून येण्याची तयारी केली. सातारे शहरांत कोकणस्थ ब्राह्मणांचे पक्षपाती जे लोक असतील त्यांचे घरावर तोफांचा मारा चालेल असें करून ठेवावें, अशी किल्ल्याचे कामगार यास आज्ञा दिली. ही गोष्ट नाना पुरंदरे वगैरे पेशवे यांजकडील अधिकारी यांस कळली; परंतु ते समजले कीं ही ह्मातारी वेडी आहे. ह्मणून उगीच बसले. ताराबाईनीं किल्ला बळकावून महाराजांस कैद केल्याची व गायकवाड येण्याची खबर पेशवे यांस पुण्यास लागली. तेव्हा यानीं त्र्यंबकराव सदाशिव पुरंदरे यास किल्ल्यासभोवतीं चौक्या बसवून, किल्ल्यावर धान्य वगैरे सामान न जाईल असा बंदोबस्त करण्याविषयी आज्ञा देऊन, दमाजी गायकवाड येत आहे त्याचे बंदोबस्ताकरितां बळवंत गणपत मेहेंदळे व बापूजी बाजीराव रेटरेकर यांस नेमून, पांच हजार फौज त्यांजबरोबर ठेविली. पुरंदरे यांची फौज किल्ल्यासभोवतीं मोर्चेबंदी करून मार्गशीर्ष तागायत फाल्गुनमासापर्यंत होती. व॥ ६ पर्यंत याप्रमाणें बंदोबस्त ठेविला होता. दमाजी गायकवाड यानें खानदेशांत दंगा मांडला होता. त्याजवर वर लिहिलेले दोन सरदार फौजेनिशी रवाना केले. त्याशीं लढाई झाली. पेशवे यांजकडील फौजेचा मोड झाला. जेजुरी मोरगांवपर्यंत आला. दरम्यान पुण्यावर येणार होता. लोक गलबलून पळू लागले. तेसमयीं बाबा फडणीस व महादाजी अंबाजी पुरंदरे यांनी त्यास चिठी पाठविली त्यावरून पुण्यावर न येतां परभारा गेला. दमाजी गायकवाड यानें पेशवे यांजकडील फौजेचा मोड केल्याची खबर साता-यास नाना पुरंदरे यास कळतांच त्यानें सर्व फौज घेऊन नाझ-यास जेजुरीनजीक मेहेंदळे रेटरेकर यास येऊन मिळाले. त्यास दिल देऊन सर्व लोकांचे समाधान करून सर्व फौज एके ठिकाणी जमवून गायकवाडाचे पाठीमागें लागले. त्या वेळेस गायकवाड साता-यानजीक वेण्येचे काठी व-यावर उतरला होता. पुरंदरे यानी फौज घेऊन एकंदर वडूथावरून गायकवाड याजवर गेले. लढाई झाली. गायकवाड याचा मोड होऊन गेंड्याचे माळावरून सातारा शहरांत घालविला. लष्कराचे डेरे दांडे सर्व लुटून आणिले. निशाणें व नौबत बापू व बळवंतराव यांची गायकवाड यांनी नेली होती ती माघारी आणिली. गायकवाड लुटून फस्त केला. हें वर्तमान छ माहे जमादिलावर रोजी झालें. हिकडे श्रीमंत पुण्यास असतां निजामउन्मुलूख याचा दुसरा पुत्र नासरजंग यानें राज्याचा अधिकार चालविला होता. तो कर्नाटकांत फौजेसहित गेला होता. गाजुद्दीन, निजामाचा वडील पुत्र, यानें मल्हारराव होळकर यांचे विद्यमानें पेशवे यास बोलणे लाविलें कीं, निजामपदवी आपल्यास मिळावी, या गोष्टीस आपण साह्य व्हावें. ही गोष्ट पेशवे यांनी मान्य करून दिल्लीस पत्र पाठवून औरंगाबादेकडे जाण्याची तयारी केली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
हे वर्तमान अबदालीस कळतांच चालोन घेतले. तेव्हां फौज पळों लागली. मल्हारजी होळकर वगैरे सरदार निघाले. ते समयीं भाऊसाहेबांवर लगट केला. लोक पडले व जखमी झाले. भाऊसाहेब व जनकोजी शिंदे व यशवंतराव पवार वगैरे यांचे ठिकाण लागले नाहीं. तिकडील गर्दी जाल्यावर नानासाहेब खेचीवाडयापावेतों गेले होते, तेथून फिरोन पुण्यास माघारे आले. समाधान वाटेनासें झालें. इहिदेसितैनांत ज्येष्ठमासीं कैलासवास केला. ऐशियास, बाळाजीपंत नानांनी साहसकर्म करून महाराजांची कृपा संपादिली. त्याजवर रावसाहेब व आपासाहेब यांहीं सरदार व मुत्सद्दी वगैरे लहान मोठे याजवर ममता वाढवून, ज्याची जशी योग्यता पाहून, त्याचें स्वरूप वाढवून बहुमान करून, परमसदयत्वें कृपा दर्शवीत होते. त्यांचे मागें नानासाहेबही पूर्वान्वय दृढोत्तर चित्तांत धरून सर्वांचे मनोधारण करून गांव, मोकासे व हत्ती, घोडे, पालख्या, अबदागिरे, इनाम, बक्षिसें व अलंकार देऊन मनुष्य पाहून उमेदवार केलें व सेवक लोकांनी धन्याची कृपा नि:सीम सर्वांनी पाहून कायावाचामनें करून एकनिष्ठ सेवा करून, महत्पदास योग्य होऊन स्वामिसेवा केली. सरदार व लोक साहसकर्ते, मर्द आणि नानासाहेब अजातशत्रू, तेणेंकरून शत्रू पराभवातें पाववून, महाराजांच्या राज्याची वृध्दी करून कीर्ती भूमंडळी मेळविली. नानासाहेब अति पुण्यवान, त्यांच्या तपोबलेंकरून शत्रू विनयभावें शरणांगत होऊन, करभार देऊन, हात जोडून चाकरीस तत्पर राहिले. पूर्वी पांडवांना, श्रीकृष्ण परमात्मा प्रत्यक्ष सानकूल, तेणें दैत्यदानव पृथ्वीचे विलयास नेऊन दानधर्म अगाध केला. त्याअलीकडे नर्मदेपासून पलीकडे उत्तरेस विक्रमराजा व अलीकडे शालीवाहन शककर्ते जाले. त्या अलीकडे नानासाहेबीं रामेश्वरापासून इंद्रप्रस्थपावेतों शत्रू पादाक्रांत करून देव, ब्राह्मण, प्रजापालन व दानधर्माची कीर्ती कलियुगीं विख्यात केली.
त्यांचा अवतार पूर्ण जालियावर श्रीमंत माधवरावसाहेब व दादासाहेब सातारियास गेले. राजारामसाहेबीं कृपाकरून रावसाहेब यांस प्रधानपणाची वस्त्रें बहुमान संप्रदाययुक्त हत्ति, घोडा, जवाहीर, तरवार, शिक्केकटार देऊन निरोप दिल्हा. दादासाहेबांसही बहुमान, घोडा व जवाहीर व वस्त्रे दिल्ही. पुण्यास आल्यावर निजामअल्लीखान बिघाड करून भागानगराहून पुढें आले. श्रीमंतही कूच करून दरमजल गंगातीरास गेले. श्रीमंतांनी लोकांचे मनोधारण करून फौज जमा केली. नवाब गंगातीरास आले. मजरथास गांठ पडोन लढाई करीत करीत नवाब घाट चढोन आले. ते समयी हरोळीस मीरमोंगल नवाबाचे भाऊ व रामचंद्र जाधवराव होते. त्यांशी राजकारण करून फोडोन आणिलें. मोगल हलका पडला. तथापि तसाच पाटसापावेतों आला. त्याचे लष्कराभोवती गांवखेडी जाळून, दाणा वैरण जाळून त्यांस महागाईचा पेंच पाडला. त्यामुळें आयास आला. तेव्हां निरोप घेऊन भागानगरास गेला. उभयतां श्रीमंत पुण्यास आले. दुसरे वर्षीं दादासाहेब पुण्यास राहिले. रावसाहेबाबरोबर त्रिंबकरावमामा देऊन कर्नाटकास रवाना केले. मजलदरमजल शिऱ्यापावेतो जाऊन खंडण्या संस्थानिकांपासून घेऊन आगोटीस स्वारी पुण्यास येऊन दाखल जाले. त्या वर्षी रावसाहेबांचा व दादासाहेबांचा पेंच वाढला. तेव्हा दादासाहेब गंगातीरास गेले. फौज जमा करून लढाईस आले. रावसाहेबीं फौज जमा करून पुढे गेले. भीमेवर लढाई होऊन उभयतांच्या भेटी जाल्या. गोपाळराव गोविंद मिरजेस जाऊन पलीकडे गेले. नवाब निजामअल्लीखान बालेघाटी होते. ते भेटीस पेडगांवचे मुक्कामी येऊन भेटी फारच निखालसतेच्या जाल्या. विठ्ठल सुंदर दिवाण याच्या डेऱ्यास श्रीमंतास भोजनास नेले. नवाब नावेंत बसोन पहावयास आले. निखालसतेचें बोलणे होऊन नवाब बालेघाटावर निघोन गेले. जानोजी भोसले यांस श्रीमंतांनी कुमकेस बोलाविलें असतां न आले. नवाबाचे भेटी जाल्यावर भोसले येत होते, त्यांस सखारामपंत कांही अधिक आगळे बोलिले. तें वकिलांनी लेहून पाठविले. त्याजवरून वाईट मानून नवाबाकडे राजकारण करून बिघाडाचा डौल धरिला. श्रीमंत उभयतां मिरजेस जाऊन किल्ला घेतला. गोपाळराव मोगलाकडे गेले. श्रीमंतांनी कर्नाटकास जावें असा मनसबा होता. त्यास नवाब व भोसले पुणियाचे रोखें आले. श्रीमंत उभयता व मल्हारजी होळकर भागानगरास गेले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
पंत प्रतिनिधी यांनी दरमहाचा ऐवज व सचिव यांनी पीलखान्याचा ऐवज व भोसले सेनासाहेब सुभा यांजकडून व मानाजी व तुळाजी आंग्रे यांजकडील व मंत्री व केसरकर यांजकडील सरदेशमुखीबद्दल व कुसाजी भोसले शिरोळ वगैरेबद्दल ऐवज व शहर सातारा वगैरे पेठ मंगळवारसुध्दां मक्त्याचा ऐवज, प्रांत वाई व प्रांत कऱ्हाड, हुजूर मामला व जावली व प्रतापगड निसवत महादाजीपंत पिंगळे यांजकडील प्रांत, मिरज निसबत शिवाजी डुबल फत्तेसिंग बावाकडील व कजबे रहिमतपूर व संस्थान सोंधे व सुभा व्याघ्रगड व वासोटा निसबत रत्नाकर विठ्ठल व महाल विठोबा वाकडे, व पो इंदापूर नागोराव मेघ:शाम, व कार्यात तासगांव निसबत खंडो नागनाथ व किल्ले संतगड व पांडवगड, संस्थान लखमेश्वर, व गदग येथील खंडणी व प्रांत गुजराथ प्रो हुजूरचे महाल १ भडोच, १ देहेजबरें खंबायत, १ अंकलेश्वर, १ नवसरी, १ घोगराज पिंपळ, १ मांडवी शहर, घोडेबंदर येथील ऐवज, याशिवाय खंडणी, कामरज प्रांत द्वारका, काठणहळी इनवा सरकार सोरट व कच्छभूज व किरकोळ बागा सरै वगैरे येत तो ऐवज सालाबाद येत असावा. असा बंदोबस्त आश्विनमासीं एकंदर केला. राणोजी शिंदा मयत झाला होता, त्याचा अधिकार वडील पुत्रास दिला. माळव्याची एकंदर जमा दीड कोट, पैकी होळकर यास ७४,००,००० लक्ष, व शिंद्यास ६५, ५०,००० साडेपासष्ट लक्ष, व बाकी साडे दहा लक्ष इतर सरदारांस वाटून दिले. त्यांत मुख्य आनंदराव पवार. रामराजे सदाशिवराव भाऊसाहेब यांजबरोबर सांगोल्यास होते. तेव्हां पेशवे यास सनद दिली होती की, साताऱ्यानजीक कांही मुलूख देऊन बाकी सर्व राज्यकारभार पेशवे यांनीं चालवावा. याप्रमाणें सनद झाली. परंतु याप्रमाणें मुलूख कांही न देतां रोख पैसाच देत आले. याप्रमाणें बंदोबस्त राजाचे नांवें झाला; परंतु लोकांत प्रसिध्दी पेशवे यांनी केल्याची झाली. याप्रमाणें एकंदर बंदोबस्त करून कार्तिकमासी (नोव्हेंबर १७५०) भाऊसाहेब महाराजांसुध्दां पुण्यास आले. मग ताराबाई यांचा व रामराजे यांचा आदर करून बंदोबस्तास बरोबर त्र्यंबकराव सदाशिव ऊर्फ नाना पुरंदरे यास फौजेनिशी देऊन साता-यास रवानगी केली. त्यासमयीं ताराबाईचे प्रसन्नतेकरितां सातारा किल्ल्यावर पेशवे यांनी आपले लोक ठेविले होते, ते परत आणून, पूर्वीचे गडकरी वगैरे अधिकारी होते, त्यांस गडावर पाठवून, ताराबाईचे आज्ञेंत वागत जाण्याविषयी पेशवे यांनी आज्ञा दिली. यावेळेस रामराजे यांस पासष्ट लक्ष रुपये खर्चास देऊन समारंभाने साताऱ्यास ठेविले होतें. सांगोल्याचे स्वारीहून भाऊसाहेब परत आल्यावर बाबा ह्मणजे महादाजी अंबाजी पुरंदरे याचे मनांत भाऊसाहेब यांनी संभाजीकडील मनसब करून तेथील आधिपत्य मिळवावें असें होते. सांगोलें वगैरे ठाणी, गोपाळ महादेव, प्रतिनिधि भवानराव यास कारभारी नेमून दिला, याचे हवाली करावीं असें होतें; परंतु भाऊसाहेबांनी मान्य केलें नाहीं. मोहिमेस पैसा रामचंद्रबावा देईनात. मग नाना व भाऊ एक होऊन च-होलीस भेटले. बाबाची मसलत वाईट यामुळे पुढें बाबाशी विटले. बाबा पुण्यास आल्यावर चोरचौकी बसली. बाबाचें कृत्य नानास कळलें. पुरंदरास पाठविलें. फार संशय वाटून मनस्वी विटलें. पुढे नानाबरोबर बाबा उगीच सिंहस्थसाली हिंडत होते. नंतर स्वारीस निराळे पाठविले; परंतु विश्वास मध्यमच होता.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
तिकडे भाऊसाहेब जाऊं लागले. तेव्हां महादाजी अंबाजी यांनी विनंति केली कीं, आह्मी चाकर व भाऊसाहेब आपले बंधु, त्यांचे न ऐकिल्यास दौलत फाटेल, यास्तव कारभार त्यांस सांगावा, मी घरी बसतों. असें सांगून गेल्यावर श्रीमंतांनीं भाऊसाहेब यांची समजूत करून त्यांस कारभार सांगितला. नंतर रामचंद्रबाबा व भाऊसाहेब कारभार करूं लागले. रामचंद्रबाबा सावंतवाडी प्रांतांतील आरवली गांवचा कुलकरणी. तो कांही कामांत अंतर पडलें ह्मणून पळून साता-यास आला. प्रथम कचेशरबावा राजगुरूपाशीं चाकरीस राहिला. तो कारकुनी व शिपाईगिरीचे कामांत हुशारसा पाहून पेशवे यांनी आपलेजवळ ठेविला होता. पुढें राणोजी शिंद्याची दिवाणगिरी दिली होती. पुढें राणोजी मेल्यावर जयाप्पा शिंद्याचें व त्याचें जमेना. सबब तेथून निघाला तो भाऊसाहेब यांजपाशीं आश्रयानें राहिला होता. छ १४ सवाल रोजी (५ सप्टेंबर १७५०) चिमणाजी नारायण पंतसचिव व पुत्र चिटकोपंतसुध्दा पेशवे यांनी भोरास पाठविले. सत्तर हजार रुपये मशारनिल्हेस द्यावयाचा करार. छ १ रमजान (२४ जुलै १७५०) तुंग, तिकोना किल्ले माघारे दिले. शिरवळ येथील खालसा अम्मल व पवन मावळ दिले. छ १ रमजान (२४ जुलै १७५०) भोरप व उतरोली व खानापूर दिले. छ ९ सवाल रोजीं (३१ आगष्ट १७५०) निघून स्वराज्य अम्मल पूर्वी होता त्याशिवाय मोंगलाई सरदेशमुखी दिली. छ १२ सवाल (३ सप्टंबर १७५०) भाऊसाहेब व छ २१ सवाल रोजी (१२ सप्टंबर १७५०) रामराजे यांस स्वारीस जाण्याविषयीं जोशी यांनी मुहूर्त दिल्याप्रमाणें भाऊसाहेब साताऱ्यास महाराज यांस बरोबर घेऊन गेले. सांगोलें याचें ठाणें व मंगळवेढें येथील ठाणी होतीं त्यांचे बंदोबस्ताकरितां यमाजी शिवदेव यास पाठविलें होतें. शिंदे, होळकर यांजकडील व नाना पुरंदरे स्वत: फौजेनिशी अशी एकंदर साठ हजार फौज जमा करून आश्विनमासीं सातारकर राजे याचे मुलखातील व राज्याचा बंदोबस्त रामचंद्र मल्हार यांचे विद्यमानें खाली लिहिल्याप्रमाणें केला. छ ४ जिलकाद रोजीं (२५ सप्टंबर १७५०) दादोबा प्रतिनिधि पुरंदर किल्ल्यावर कैदेंत होते त्यांस स्वामींनीं हुजूर बोलावल्यावरून स्वारींत भाऊसाहेब यांजकडे पाठविलें. तयांस पुन: पद दिले. सांगोलें याचें ठाणें लढून घेतलें तें हुजूर येऊन राणोजी मोहिते यास दिलें. व मंगळवेढ्याचे ठाणे पंतप्रधान यांजकडे दिले. दाभाडे बेहोष, त्यांचा अम्मल गुजराथेंत बरोबर चालत नाहीं, करितां हुजूर खासगीचा अम्मल आह्माकडे सांगावा अशी विनंति करून निम्मे अम्मल आपल्याकडे घेऊन सनदा घेतल्या व निम्मे दाभाडे याजकडे ठेविले. कर्नाटक सुभा बाबूजी नाईक याजकडे होता. तो जास्ती रसीद कबूल करून आपल्याकडे घेतला. गोविंदराव चिटणीस यांनी महाराजांपाशी पंतप्रधान यांचे अनुमतें कारभार करावा. बापूजी खंडेराव यांनीं हुजूर असावें. चार लक्षांचा सरंजाम व दातेगड प्रतिनिधीकडील उभयतांच्या नावें दिला. खानदेश व गंगातीरीं पन्नास हजारांचे मोकासे दिले. यशवंतराव पोतनीस याने खानगी कारभार करावा व पोतनिशी करार केली. चाळीस हजारांचा सरंजाम दिला. यशवंत लपाटे यांनी हुजूर खानगीचा कारभार करावा. त्याजकडे तालुके वगैरे करार केले. पंतप्रधान वगैरेकडील तालुके सरंजाम ज्याचे त्याजकडे करून नेमणुकी ऐवज सालाबादप्रमाणें द्यावा. हुजूर खानगी सदरेस हुजूर मामला व खाजगीचे दरोबस्त महाल व प्रधान पंताकडील दरमहाचा ऐवज व हिंदुस्थान व कर्नाटक व कोंकणप्रांताचा ठरावाप्रमाणें ऐवज व दाभाडे यांजकडील निम्मे गुजराथचे ठरावाचा ऐवज व प्रतिनिधीकडील व सरलष्कर यांजकडील नेणुकी दरमहाचा ऐवज हुजूर पावता करून द्यावा. व हुजूरचे किल्ले रायगड व प्रतापगड नेणूक वगैरे आहे तसें चालवावें. पंतप्रधान यांजकडील दरमहा हुजूर खानगीकडे ऐवज पेशजीप्रमाणें व कर्नाटक व निम्मे गुजराथचा ऐवज देत जावा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ इहिदे खमसैन मया व अल्लफ, सन ११६० फसली,
अव्वल साल छ २९ जमादिलाखर, २५ मे १७५०,
ज्येष्ठ शुध्द १ शके १६७२.
ताराबाई सत्तर वर्षांची ह्मातारी झाली असतां आपण स्वतंत्रपणे धनीपणा करावा ह्या खटपटींत सचिव यास अनुकूल करून घेऊन वरकांती सिंहगडास तिचा नवरा राजाराम याचें थडगें आहे तेथे दर्शनास जात असे. असें मिष करून साताऱ्याहून पुण्यानजीक शिवापुरास रामराजासुध्दां आली. रज्जब महिन्यांत (जून १७५०) आली. पंतसचिव ताराबाईस अनुकूल झाले. ही खबर ताराबाईकडे येण्याचे अगोदर दोन तीन महिने पेशवे यांस कळताच सचिव पंत यांच्या तुंग, तिकोना वगैरे किल्ल्यांची व मुलुखाची जप्ती करून चिमणाजी नारायण पंतसचिव व मुलगा चिटकोपंत असे पुण्यास आणून कैदेंत सिधा सरंजाम खासगीकडून पावत होता. छ २० रज्जव (१४ जून १७५०) अव्वलसाल श्रीमंतांची स्वारी मल्हारजी होळकर यांजकडे श्रीगोंद्यास गेली होती. छ २५ माहे मजकुरी (१९ जून १७५०) परत आली. पुण्यानजीक सिंहगड किल्ला पंतसचिवाचा आहे, तो आपल्यास मिळावा असें महाराज यांस श्रीमंतानें विचारलें. नंतर किल्ला दिल्याविषयीं आज्ञापत्रें झाली; परंतु किल्ल्यावर पंतसचिवाचे लोक होते, ते किल्ला खाली करून देईनात. लढूं लागले. तेव्हां किल्ला आपल्यास घेणें अवश्य, सबब त्याचे मोबदला पेटा सिरवळ परगणें खालसा अम्मल व परगणे जाफराबाद येथील बाबती अम्मल आणखीं कांही महाल वगैरे देण्याचें ठरवून जिवाजी गणेश खासगीवाले यास किल्ला घेण्यास पेशवे यांनी पाठविलें. त्यांनी किल्ला सर करून छ १२ साबान रोजी (६ जुलै १७५०) निशाण चढविलें. किल्ला व किल्ल्याखालील कर्यात मावळ वगैरे गांव सरकारांत घेतले. त्याची कमावीस जिवाजी गणेश याजकडेस पेशवे यांनी सांगितली होती. साबान महिन्यांत (जुलै १७५०) शिंदे होळकर यांस हिंदुस्थानांत पाठविलें. छ १७ रमजान (९ आगस्ट १७५०) रघोजी भोसले साता-यास श्रीमंतांनी ठेवून आपण सालगु॥ पुण्यास आले होते. आज्ञेप्रमाणें भोसले या तारिखेस श्रीमंतांकडे आले. छ १७ सवाल महिन्यांत (८ सप्टंबर १७५०) निरोप ठिकाणी जाण्याविषयीं होऊन वस्त्रें झाली. वऱ्हाड व गोंडवण आणि बंगाल यांच्या सनदा व शिवाय वऱ्हाडनजीक प्रतिनिधीकडील कांही मुलूख होता तोही त्यास दिला. छ १९ रमजान (११ आगष्ट १७५०) हडसर किल्ला जुनरानजीक आहे तो सर झाल्याची खबर आली. खासा स्वारी महादजी अंबाजीसुध्दा श्रावणमासी (आगष्ट १७५०) डे-यास च-होलीस तळावर गेली होती. तेथे भाऊसाहेबांनी रामचंद्र मल्हार यास भेटविले. रामचंद्रबाबाचे संकेतानुरूप श्रीमंतांशी भाऊसाहेब यानी बोलणें लाविलें की, कारभार आह्मी करूं. तेव्हां तें बोलणें श्रीमंतांनीं मान्य केले नाहीं. कारण पुरंदरे हल्ली कारभार करितात त्याचे उपकार आपल्यावर बहुत झाले आहेत, ह्मणून तें बोलणें मान्य केलें नाहीं. आपल्यास कारभार मिळत नाहीं असे भाऊसाहेब समजले. इतक्यांत कोल्हापूरकर संभाजी महाराज यांसकडून भाऊसाहेब यांस आज्ञापत्र झालें की शाहूचे राज्यांत पेशवे आहेत, आह्मांस पेशवे माहीत, आह्मी आपले राज्याची पेशवाई तुह्मांस देतो. त्या पत्रांतच तीन किल्ले ह्मणजे भीमगड व पारगड व वल्लभगड व पांच हजारांचा मुलूख देऊं असें लिहिले होतें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
ते तेथें जाऊन रामराजास घेऊन छ २६ मोहरम रोजी (२६ डिसेंबर १७४९) वडूथाजवळ कृष्णेचे ठिकाणी आले. इतक्यात महाराज वारल्याची बातमी पुण्यास गेल्यावर भाऊसाहेबही छ २० मोहरम रोजी (२० डिसेंबर १७४९) पुण्याहून निघाले. महाराज वारल्याची खबर लागतांच वडुथावर राहिले होते, त्यांची भेंट तिसरे प्रहरी दिवसास झाली, व पुढें छ ६ सफर रोजीं (४ जानेवारी १७५०) साता-यास येण्यास मुहूर्त होता त्या दिवशीं मुहूर्तानें शहरांत दाखल झाले. तेव्हां श्रीमंतांनी ८८९ रुपयांचा पोषाख महाराजांस केला. त्याच दिवशी ह्मणजे पौष शु॥ ८ (४ जानेवारी १७५०) सहा घटिका दिवसास राज्याभिषेक झाला. पुढे रबिलावल महिन्यांत लग्न झालें, मोहित्यांची कन्या. सर्व मराठेमंडळ शिरके, मोहिते, महाडिक, पालकर वगैरे साता-यास जमले होते. त्यांत कल्पना निघाली की, सर्वांनी एका ताटांत आईसाहेबसुध्दां जेवावें ह्मणजे रामराजे खरे, असें समजूं. अशी कल्पना निघाल्यावर संभुसिंग जाधवराव, चंद्रसेन यांचे बंधू, महाराजांचे पक्षातील होते. हे सर्व आईसाहेब यांस बोलले कीं, आपण आधी ग्रास घ्यावा. त्यावरून आमचे नातू खरे ह्मणून प्रथम ग्रास आईसाहेबांनी घेतला. नंतर सर्वांनी भोजन केलें. रघोजी भोसले बरोबर फौज घेऊन आले ते दाखल झाले. शिंदे, होळकर व सोमवंशी सरलष्कर व पिलाजी जाधवराव अशी फौज पेशवे यांची २५००० पंचवीस हजार जमली. एकंदर मराठ्यांकडील फौज ६००० हजार होती. सर्वांचा बंदोबस्त करून देण्याकरितां स्वारीस निघाले. तेथें ठेवून श्रीमंत पुण्यास निघाले ते छ २४ रबिलाखर रोजी (२२ मार्च १७५०) भाऊसाहेब यांची बायको उमाबाई पुण्यास वारली. सबब तूर्त स्वारीचा बेत रहित करून रघोजी भोसले तेथें ठेवून श्रीमंत पुण्यास निघाले ते छ २४ जमादिलावल रोजी (२१ एप्रिल १७५०) वानवडीस मूक्कामास येऊन छ २५ रोजी (२२ एप्रिल १७५०) पुण्यास दाखल झाले. याप्रमाणें साता-याकडील राज्याचे व्यवस्थेचें वर्तमान झालें. हिकडे दुसरी कित्येक नवलविशेष झालेली कार्ये झाली. त्यांची हकीकत खाली लिहिली आहे. सवाल महिन्यांत जनार्दन बाजीराव सातारे मुक्कामी वारले, भाद्रपद व॥ ७ रोजीं (२१ सप्टेंबर १७४९). छ २० मोहरम (२० डिसेंबर १७४९) चावड जीवधन किल्ला फत्ते झाल्याचें वर्तमान आलें. छ १८ जिल्हेज (१८ नोव्हेंबर १७४९) किल्ला पेटाव रामाजी महादेव यांनी सर केल्याचें वर्तमान आले. छ १ रबिलावल रोजी (२९ जानेवारी १७५०) वासोटा किल्ला रामाजी महादेव बिवलकर यांनी सर केल्याचें वर्तमान उमाजी निकम घेऊन आला. छ १५ रबिलावल (१२ फेब्रुवारी १७५०) माणिकगड घेतल्याची खबर आली. छ १७ रबिलावल (१४ फेब्रुवारी १७५०) त॥ छ २७ जमादिलाखर (२४ फेब्रुवारी १७५०) गंभीरगड किल्ला व त्याखालील महालसुध्दां रामदेव राणा रामगीरकर काळी यांजकडील राघोबा नारायण यांनी सर केल्याची खबर आली. छ ४ रबिलाखर (२ मार्च १७५०) किल्ले तुंग व तिना घेतल्याची खबर आली. छ २९ जमादिलावल (२६ एप्रिल १७५०) भाऊसाहेबांचें दुसरें लग्न झालें, हरि चिंतामण दीक्षित यांची कन्या. बनेश्वराचें देवालय बांधण्यास आरंभ झाला. नानासाहेब व भाऊसाहेब यांस पुत्र झाले होते. छ १२ सवाल (१५ सप्टेंबर १७४९) या साली कपिलाषष्ठी आली होती. रामचंद्रबाबा शिंद्यास कारभारी दिले होते. त्यांचे व सरदारांचे जमेना. सबब मल्हारजी होळकर याचे विचारें त्यानें कारभार करूं नये. सन १७४९ इसवींत ढोकलसिंग मारवाडाचा राजा मेला. त्याजा मुलगा रामसिंग याचे दुर्वर्तनामुळें चुलता बळवंतसिंग गादीवर बसला. दोघा भावांचे भांडणामुळे तंजावर राजानें देवीकोटचा किल्ला इंग्रज यांस दिला.