Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

येणेप्रमाणें महाल आठ लक्ष रुपयांचे व शिवाय रोख आठ लक्ष रुपये खंडणी देणें ठरविली. पैकी पांच लक्ष देऊन बाकी तीन लक्ष रुपयांस तारण किल्ला बंकापूर ठेवून पेशवे यांस सहा महिन्यांचे मुदतीत रुपये देऊं असा करार केला, परंतु रुपये आले नाहीत. किल्ला खंडणीऐवजी सरकारांतच राहिला. याशिवाय किल्ले घेतले ते :- १ किल्ले रायद हुबळी, २ किल्ले केरूर देखील परगणा, ३ कसबे बेळगांव देखील किल्ला, याप्रमाणे पेशवे यांजकडे येऊन तह छ ५ साबान रोजी (५ एप्रिल १७५६) जाला. नवाब सावनूरकर यांजकडे निम्मे आठ लक्षांचे महाल राहिले :- १ परगणे कारडगी, २ समत निरवंगी, ३ परगणे हनगळ, ४ मासूर, ५ समत केरूर, ६ समत तिळवली, ७ राणेबिन्नूर, ८ कागनेळी, ९ अडाव, १० परगणे गुंतळ, ११ परगणे शिगांव, १२ परगणे हवेर, १३ बंकापूर, १४ उळपेनूर, १५ परगणे वेटहळळी, १६ परगणे वेठबाव, १७ साबणी, १८ परगणें अहीरणी, १९ कसबे हनेगिरी, २० मौजे नसवी परगणे वावेली, २१ मौजे गंगोळी, २२ किल्ला परसगड देखील गांव, २३ गुडनूर परगणे भीडशिंगी, २४ परगणे मारब वगैरे गांव, २५ गोपनकोंग, परगणे रायर हुबळी, २६ कसबे इंगळहल्ली, २७ नागापूर, २८ मौजे हेचीजबाळ, २९ दोडवड, ३० मौजे केळनूर सोंधें. येणेंप्रमाणें नवाब यांचे वाटणीस महाल गेले. याशिवाय नवाबाकडील जहागीरदारांकडे परगणे पेटहळळी व मोहोरबाळ, शिरकोळ व गुळागळे व शिरूर व किल्ला बंकापूर जहागीरदार अकरा हजारांचे नवाबाचेतर्फे आहेत, ते नवाबाचे वांटणीस आले. येणेंप्रमाणें सावनूरचे स्वारीचा शेवट होऊन स्वारी छ २० सवाल सबा खमसैनांत (१९ जुलै १७५६) परत आली. ज्या मनुष्याचे निमित्तें ही स्वारी जाली तो मनुष्यही नवाब सावनूरकर यांणी दूर केला. तो सलाबतजंगाकडे चाकरीस राहिला होता. त्या मुजफरखानानें पेशवे यांसी कबूल केले की, इत:पर कृत्रिम न करितां इमानें चाकरी करीन. असें कबूल जाल्यावर पेशवे याणीं त्यास चाकरीस ठेविला. कोंकणप्रांती आंग्रे यांजकडील किल्ले व मुलूख घेण्याविषयीं इंग्रेजांचें साहाय्य मागून खमसखमसैनांत सुवर्णदुर्ग घेऊन इंग्रेजांनी पेशवे यांस दिल्हा. पुढें काम तसेंच राहिलें. या साली परजन्य लागल्यावर इंग्रेजांनी विलायतेहून मोठमोठीं जहाजे आणिली, व विजयदुर्ग घ्यावयास निघाले. मराठी फौज दुसरे कित्येक किल्ले घेऊन इंग्रेजांची वाट पहात बसली. इतक्यांत तुळाजी आंग्रे याणें बोलणें लाविलें की, किल्ल्यांत द्रव्य आहे, ते सर्व आपणास मिळेल, इंग्रेजांस युक्तीने परत लावावें. हे वर्तमान इंग्रज सरदारास कळतांच त्यानें लढाई आरंभिली. पेशवे यांचे फौजेचे व किल्लेकरी यांचे दरम्यान छावणी केली. किल्ल्यास वेढा घातला. रामाजी महादेव यांणी किल्ल्यावर जाण्याची बहुत मेहनत केली; परंतु सिध्दीस न जातां इंग्रजांचे हाती किल्ला गेला.                     

तो तुरूकस्वार उठले तों याणीं काढावा काढिला. हे मागे ते पुढें असें करितां जेथें तें पायदळ बसविलें होतें तों पर्यंत काढावा काढीत गेले. तेथून पुढें गेले तो पायदळ याची फेर झडली आणि पुढून ते उलटले. ऐशी खराबी इंग्रजाची भारी जाहाली. पाचशे घोडे त्याणीं नेले आणि कांहीं बैलहि नेले. व दीडशे दोनशे गोरे मेले व पठाण हि गारद जाहाले. इंग्रज निघोन घाटापलीकडे आउंदचा यमाईचे डोंगरावर चढले. हे भवताले सारे उतरले आहेत. ऐसें हि बोलतात. कोणी म्हणतें कीं चार अ॥ मोठे जखमी जाहाले आहेत. असें हि बोलतात. कोणी बोलतात कीं श्रीमंत पंतप्रतिनिधीयांचे लष्करांत इंग्रज चाकरीस म्हणून गेले आणि गर्दी केली. असेंहि बोलतात. आणि एक बातमी आली कीं सुवर्णदुर्गचा किल्ला फिरंगी याणें दशमीचे दिवशीं घेतला. असें हि बोलत. कोणी म्हणतें कीं अंजनवेल घेतली. असें हि बोलतात. असें वर्तमान मार्गशीर्ष शु॥ प्रतिपदा मंगळवार परियंत जाहाले. शु॥ २ बुधवारीं वर्तमान उठलें कीं स्वारी श्री पंढरीहून फिरोन अकळोजेचें मुक्कामास आली. स्वारी अलीकडे पंधरा कोश बापू गोखले आहेत. त्या अलीकडे बारा कोश फिरंगी बहादूर आहेत. त्या अलीकडे तीन कोश सरकारची फौज, अबा पुरंधरे व नारो विष्णू, विंचुळकर वगैरे सुमारी १५००० आहेत. फिरंग्याकडून बाळाजीपंत नातू बलावयास बापू गोखले याजकडे गेले कीं तुमचा आमचा तह असावा, पुढें आह्मी तुम्हापाशीं कांहीं बोलत नाहीं, जो मुलूख दिला तितका पुरे, आम्ही शिरस्ते प्रमाणें एक पलटण घेऊन बेटावर असूं. तुम्ही आपला जो कारभार करणें तो करावा. तेव्हां गोखले याणीं उत्तर दिलें की X X X राज्य तुम्हास दिल्हें, आतां तह कसला ? ईश्वरें दिल्हें तरी आम्ही घेऊं, नाहीं तरी तुम्हास दिल्हेंच आहे, तुम्हीं करीतच आहा. बरें, असें ह्मणून नातू आपले लष्करांत आले. गोखले याणीं मनसबा असा केला आहे जें होणें तें हो, परंतु एकदा तोफांची मारगिरी करून शिताफी संग्राम करावा. तोफा सुमारी २० जमा केल्या आहेत. कांहीं किल्यावरून उतरल्या, कांहीं निपाणकर यांच्या, कांहीं बरोबरच्या, अशा मिळून वीस जमा केल्या आहेत. ऐशी वदंता बुधवारी सायंकाळ परियंत जाहाली. आणि एक वर्तमान कीं गारपिरावरील साहेब याणें रसद रु॥ ५००००० व कांहीं कणकेचे पाव, छकडे, सुमारी १२।१३, भरून गेले. बरोबर पलटणी लोक सुमारी ४०० व स्वारी सुमारी १०० असे गेले. मातक्यान् लोक बोलूं लागले कीं दिव्याचे घाटातून माघारे आले. कोणी ह्मणत पुढें गेले. असें बुधवारची प्रहर रात्र जाहाली. शिरस्तेप्रमाणें तोफा सुमारी ६ जाहाल्या, पांच चांदरात्र पैकीं व रोजची एक, एकूण सहा जाहाल्या. रात्र गेली. शु॥ ३ गुरुवारचें वर्तमान असें शहरांत आलें कीं श्रीमंतांची स्वारी पंढरपूराहून निघोन भीमा उतरली आणि दोन मजला पलीकडे गेली. कोणी म्हणतें करकमभोशास गेली. कोणी म्हणत टेंभुर्णीस गेले. कोणी म्हणत नरसिंहपुरास गेले. कोणी म्हणत परंडयास गेले. हिंदुस्थानांत जाणार असेंहि लोक बोलतात. दुसरी खबर आणिली कीं सल्ला जाहाला. परंतु कसा हें कोणास ठाऊक नाहीं. हिंदुस्थानची बातमी उठली आहे कीं एक लढाई शिंदे व इंग्रज यांची जाहाली. शिंदे यांची फौज सुमारी ६०,००० व पलटण शिंगरूप व जान बत्तीस मिळून बत्तीस, शिवाय होळकर याची फौज आहे. इंग्रज याची पलटणें ३५ व दहा हजार तुरुकस्वार आहेत. पुढें शिंदे याणीं तह अठरा वर्षांचा करावा ह्मणून बोलणें फिरंगी लाट साहेब याशीं घातले. तेव्हां त्याचें बोलणें पडलें कीं कांहीं मुलूख आम्हास द्यावा. ते शिंदे याणीं चार किल्ले दिल्हे. ते वेळेस येथील पहिले लढाईचें पत्र जाऊन पोचलें. बरें, ह्मणून शिंदे पुढें इंग्रज याचे येथें मेजवानीस गेला. तेथें नी + + + + + + + मूळ संस्थान आहे तु * * * * * आहे. तेथें बोलण्यांत जाबसाल आले. पुढें पंधरा दिवशीं इंग्रज यास मेजवानीचा बेत केला. ते दिवशीं इंग्रज याजकडील पत्र जाऊन पोचलें कीं फिरंगी यानीं पुणें घेतलें आणि थोरले वाडयात निशाण लाविलें. फिरंगी याची डाक चालत नव्हती. सबब त्याचें वर्तमान गेलें नाहीं. यांचें आधीं गेलें. ते कागद दाबून ठेविले आणि त्यास मेजवानी केली. त्यावर बैठक जाहाली. तेथें शिंदे यांणीं विचारलें कीं आतां तुमचा आमचा तह कसला ? आमचें मूळ संस्थान तुम्ही घेतलें आणि निशाण वाडयावर लाविलें. आतां तुम्हास तटून टाकितों. नाहीं (तर) याचा जाबसाल बोला. तेव्हां त्यास कैद करून बेडया घातल्या आणि त्यास सांगतात कीं दक्षणेतून किती दिवसांत निघोन येता ?

परंतु पुढे सावनूरचे स्वारीत त्याणीं मोठा पराक्रम केला, सबब बारा लक्ष रुपये बुंधेले यांजकडून विठ्ठल शिवदेव यांस देवविले. महादाजी शितोळे यांनी मोठा पराक्रम केला. त्यांस मिरज प्रांती मौजे मांजरी प्रांत कागल हा गांव इनाम दिला. अप्पाजी मुळे यांसही गांव इनाम दिला. पागा सांगून पागेची सरदारी दिली. विठ्ठल शिवदेव हे दिल्लीस आल्याबरोबर हिंदुस्थानांत जनकोजी शिंदे व माळव्याचे बंदोबस्तास मल्हारजी होळकर व दत्ताजी शिंदे यांस फौजेनिशी ठेवून, आपण व विठ्ठल शिवदेव व सखाराम भगवंतसुध्दां परत पुण्यास १ जिल्काद श्रावण शुध्द ३ (१० आगस्ट १७५५) रोजीं दाखल झाले. चिंतो विठ्ठल बराबर होते. छ १३ माहे मोहरम सत्रा दिवस (२० आक्टोबर १७५५) भाऊसाहेब व नानासाहेब व विश्वासराव याप्रमाणें तिघे खासे सावनूरचे स्वारीस निघाले. बराबर विठ्ठल शिवदेव व नारो शंकर राजेबहाद्दर व भोसले, होळकर व नबाब यांजकडीलही फौज घेतली. मोठे जमावानिशीं निघाले. ही स्वारी करण्याचें कारण:- फ्रेंच लोकांचा सरदार बूसी याचे फौजेंत मुजफरखान नामें सरदार होता. तो सन १७५० चे सुमारे पेशवे सरकारांत चाकरीस राहून कांही पलटणें कवायती तयार करी. पुढें यास कर्नाटकांत महादाजी अंबाजी पुरंदरे याजबरोबर पाठविला होता. त्यावेळेस कांही तंटा होऊन तो रुसून श्रीरंगपट्टणास गेला. तेथें कांही रोजगार मिळाला नाहीं. मग सावनूरकर यांचे पदरी नोकरीस राहून कवाईत फौज तयार करून तोफा वगैरे सामान करू लागला. हे वर्तामान पेशवे यांस कळतांच त्यांनी त्या नबाबापासून त्यास आपलेकडे परत मागत असतां त्याणें त्यास परत दिल्हे नाहीं. मसलतीस घोरपडे गुत्तीकरही अनुकूल होतें. स्वारी सावनुरास दाखल होऊन वेढा दिला. फौज पाठवून खाली लिहिल्याप्रमाणें पेशवे यांणी आपली ठाणीं बसविली. छ २८ रबिलावल रोजी (१ जानेवारी १७५६) शहापूर व बेळगांव विठ्ठल विश्राम याणी फत्ते केल्याची खबर आली. याच महिन्यांत बागलकोटवर लढाई होऊन फत्ते झाली. महाल सरकारांत घेतला. छ २९ जमादिलावल रोजी (१ मार्च १७५६) परगणें मिश्रीकोट घेतला. येणेंप्रमाणें महाल घेऊन, सावनुरावर लढाई होऊन, सावनूरचा तट पाडून, किल्ल्यांत फौज शिरून, सावनूर किल्ला सर केला. त्यांत विठ्ठल शिवदेव यांनी बहुत पराक्रम केला. सबब त्यांस चौघडा व जरीपटका व साहेबनौबत व जरीलगी अशी राजभूषणें देऊन, पोषाख व जवाहीर वगैरे दिले. या लढाईत विठ्ठलराव यांस तरवारीची जखम खवाट्यावर लागली होती. पुढें नवाब सावनूरकर शरण येऊन सल्ल्याचे बोलणें लाविल्यावरून एकंदर त्याचे मुलुखापैकी निम्मे मुलूख त्याजकडे कायम ठेवून निम्मे पेशवे यांनी खाली लिहिल्याप्रमाणें महाल घेतले ते येणेंप्रमाणे :- १ परगणे कुंदगोळ, २ परगणे रायर हुबळी, ३ पेठ मजीदपूर, ४ परगणे मिश्रीकोट, ५ समत तडस, ६ अडती सामापूर, ७ शेरवड सरदेशगत, ८ परगणे हुबळी, ९ समत कालघडगी, १० बेमीनीये देखील नेळीहरदी, ११ परगणे गदग, १२ सरदेसगत धारवाड, १३ परगणे लखमेश्वर, १४ परगणे मुलगुंड, १५ कसबे बेहट्टी, १६ कर्यात देवरहुबळी, १७ परगणे बागलकोट देखील ब्रीलदी, १८ उदीज बेटिगिरी, १९ कतीकटे देखील कटकीर, २० कसबे अमीनबाब, तळवई वगैरे, २१ तपे तडकोट, २२ कर्यात नरेंद्र, २३ तपे शिराळें, २४ तपे नवलगुंड २५ छत्तीगीर मुरगोड, २६ कोयळी असोडी देखील करीकळे, २७ लुमेडी, २८ किल्लेहुळी, २९ तपे दोवळी, ३० कोळवड, ३१ परगणे अमजनगर, ३२ परगणे अजमनगर, ३३ परगणे पाछापूर, ३४ परगणे पाछापूर, ३५ परगणे संपगांव.

शनवारीं त्रयोदशीस सारे कापडकरी मिळून साहेबाकडे गेले. तेव्हां त्याणें सांगितलें कीं तुम्हीं आपलीं माणसें शिपाई ठेवून आपला बंदोबस्त करावा, आम्हीही करीत आहों. तेव्हां कापडकरी व सावकार गुजराथी याणीं शिबंदी ठेवीत ठेवीत चालले. ते दिवशीं रास्ते यांचें वाडयांत येथें दास्तर साहेब होता तो गेला आणि सांगितले आह्मास रहावयास वाडा द्यावा. तेव्हां तेथें कारकून होते त्याणीं सांगितलें कीं आमचे धन्याचा हुकूम आह्मास नाहीं; तुम्ही पाहिजे तरी जबरदस्तीनें येऊन रहा; नाहीं तरी बाहेर कोठी आहे तेथें जें ठेवणें तें ठेवावें असें सांगितलें. तो बरें म्हणून उठून गेला. पुणेंयांत वर्तमान लोकांनीं उठविलें कीं पाट साहेब मेला. कोणी ह्मणत कीं लढाई समाप्त झाल्यावर अल्पिष्टीन साहेब याजकडे आला आणि ह्मणूं लागला कीं मला कारभार शहराचा सांगावा. तेव्हां अल्पिष्टीन याणें उत्तर केलें कीं तू निमकहराम आहेस; तूं आमचे जाती वेगळा रहा, आणि तरवारही धरूं नको, जे दिवशीं कुंपणी तरवार देईल ते दिवशीं धरावी. त्याचें पलटण आपलेकडे लावून घेऊन त्याचा दरमहा रु॥. ६००० होता तो बाद करून अडीच देऊं लागला कीं तूं निमकहरामी केली, परंतु कुंपणीचे उपयोगी पडलास, सबब हा दरमहा तुला आम्ही देतों, तू शहरांत पाऊल घालूं नये. अशी बातमी (लोक बोलत). अल्पिष्टीन साहेब गारपिरावर राहून शहरचा कारभार करी. X X X X X आहेच आहे. हें वर्तमान जाहालें. न्यायपंचाईत थोरले वाडयांत नित्य होत आहेत. सारा कारभार एक ठिकाणीं करीत आहे. ते दिवशीं रात्रीं रामोशी अ॥ ५०० येऊन गारपिरास सारा फिरंगी येऊन उतरला आहे. त्याजवर नित्य दगड टाकीत आहेत. रात्रभर आपले गोटांत तयार असतो. ते रात्रीं आपण येथें जो कारभार करतो तो साहेब गस्तीस निघाला होता. सारी गस्त करून उजाडतां आला. तों भांबवडें येथें त्याचें घर होतें तें रामोशी याणीं लुटलें. अशी वदंता ऐकतों. शहर पन्ह्याला बंदी, पहारा, गस्त, उतारीसुध्दा फिरत आहे. असें वर्तमान अमावास्येपरियंत जाहालें. आतां स्वारीतील वदंता नित्यानिशी नव्या येतात. त्या जितक्या सुचतील तितक्या लिहितों. कार्तिक वद्य ३ तृतीयेस अशी वदंता आली कीं स्वारींत दहा पांच नजरबंद केले. चतुर्थीस अशी वदंता आली की खासा स्वारी वीरवाल्ह्याकडून कोणीकडे गेली नकळे, पंचमीस वदंता आली कीं सारी फौज एके ठिकाणीं जमा पाडळीस जाहली आहे. स्वार पायदळ यांचा शेरा मनस्वी चढला आहे. फौज वगैरे ठेवीत आहेत. काटकी कर्नाटकांतून आले. रामदुर्गकर यांजकडीलही काटक आले. निपाणीकर कोरेगांवचे मुक्कामी भेटला. जे स्वारींत नजरबंद केले अशी वदंता उठली होती ती कांहीं नाहीं. सारे खुशाल आहेत. दम फौजेचा भारी आहे. षष्ठीचे दिवशीं वदंता आली कीं इंग्रज सालप्याचे घाटाअलीकडे तांबेगांव आहे तेथे राहिला. तेथें श्रीमंताकडील फौज येऊन लढाई मोठी जाहाली. घोरपडे वगैरे धरून नेले. सप्तमीस वदंता आली कीं तें कांहीं नाहीं, इंग्रज घाट चढून पुढें गेला, पेशवे यांजकडील फौजा मागे हटल्या, तो जोरानें चालिला आहे, पुढें कसें होतें ते बघावें. नवमीस वदंता आली कीं श्रीमंत एकादशीस माहुलीस जाणार. दशमीस लोक लढाईचें वर्तमान बोलत, दुसरें कांहीं नाहीं. एकादशीस ऐशी वदंता आली कीं फिरंगी याणें बोलावणें घातलें आहे. (ऐसें लोक) बोलूं लागले. पुणेयांतील फिरंगी बहाद्दर याणीं (पन्नास) शंभर लोक बंदोबस्तास पाठविले. द्वादशीस फिरंगी घाट चढून पुढें गेला. मागें कांहीं बुणगें मराठी फौजेतील लुटले, असेंही बोलूं लागले. त्रयोदशीस वदंता आली कीं श्रीमंत पाडळीहून निघून पुढें गेले. माहुलीस एकादशीस जाऊन द्वादशीचे दिवशीं तेथें तुळशीचें लग्न करून निघाले ते आपले लष्करांत आले, आणि कुच करून गेले. असेंही लोक बोलूं लागले. कोणी ह्मणत जोर फिरंगी याचा भारी, कोणी ह्मणत कीं जोर मराठी फौजेचा भारी, तथ्य आंत एकही नाहीं. असें वर्तमान नित्य नवें येतें तो लोक भारी हवालदील होतात. परंतु उपाय नाहीं. आणीक वदंता उठविली कीं साऱ्या मराठी फौजेचा तळ पाडळीहून निघोन नाहावीचा घाट चढून पुढें सावळीस गेला. फिरंगी बहादूर ते तळावर जाऊन उतरला. स्वारी पंढरपूरचे रोखानें गेली. कोणी ऐसें ह्मणतात कीं एकादशीस श्रीस पोचले. असेंही बोलूं लागले. कोणी असें बोलतात कीं दशमीस इंग्रज न्हावीचा घाट चढूं लागले तो तेथें लढाई मातबार जाहाली. तिची वदंता बोलूं लागलें कीं गोखले याणीं फौजेचा छाट करून सडे जरारे होऊन निघाले तों घाटांत येऊन गाठिलें. आणि घाटापासून वोहोळ कोश अर्धा होता तेथें पांच सात हजार पायदळ बसवून ठेविलें आणि आपण येऊन पलटणावर पडलें. इंग्रजांकडील पठाण आ दोनशे जिवें मारिलें आणि गोरे तुरुकस्वार आ ++++ थे, असा कटा जाहाला कीं पठाण पळाले. तीन आ माघारे आले.

सु॥ सीत खमसैन मया व अलफ,
सन ११६५ फसली, ५ जून १७५५, अधिक
ज्येष्ठ वद्य ११ शके १६७७.

विठ्ठल शिवदेव श्रीमंत दादासाहेब यांजबरोबर कुंभेरीचे किल्ल्याचे हल्ल्यासमयीं अर्बा खमसैनांत होते. पुढें कांही दिवसांनी त्यांची बायको वारली. सबब दुसरे लग्न करण्याकरितां कालपीस वधू पाहून ठेविली होती. तेथें आज्ञा घेऊन सर्व स्वारीनिशी गेले. लग्न करून परत दिल्लीस जाताना वाटेंत ग्वालेर येथे मुक्काम पडला. ते समयीं बरोबरचे स्वार वगैरे लोक कही ह्मणजे दाणावैरण वगैरे जमविण्याकरितां बाहेर हिंडत असतां जाटांची गांठ पडली. त्यांनी ते लोक कैद करून ठेविले. हें वर्तमान विठ्ठलराव यांस कळतांच त्यांनी आपला वकील जाट राजाकडे लोक सोडविण्याकरितां पाठविला. तेव्हां जाटांचे कारभारी यांनी त्याचा असा उपमर्द केला कीं, एक वेळ तुह्मांस कुंभेरीस जय मिळाला यामुळें फारच चढला, आणि आह्मांसारख्या शूर जाटांच्या राज्यांत शिरून हें वर्तन करता, तें तुमच्या नाशास कारण आहे. तुह्मीं ब्राह्मण, शूरत्वाचा विषय तुमचा नव्हे, आह्मी तुह्मांस व तुमच्या मालकास ओळखतों, तुह्मीं परवानगीवांचून आमचे राज्यांत मुक्काम केला, सबब माफी मागाल तर आमचे राजे तुह्मांस ब्राह्मण ह्मणून माफी देतील. असे भाषण ऐकून वकील परत आला. नंतर लढाईची सिध्दता करून दिल्लीहून आपली फौज व तोफखाना वगैरे सरंजाम आणून व कांही नवीन फौजही ठेवून लढाईस आरंभ झाला. लढाई होतां होतां अखेर निकराचे युध्द होऊन, महादजी शितोळे, यमाजी रहाळकर, मोतीराम वाणी, ब्राह्मण व आणखी दुसरे मानकरी जाट राजाचे घोड्यापर्यंत जाऊन पोहोंचले. तेव्हां महादजी शितोळे याणें जाट राजास घोडयावरून खाली पाडलें. त्याच संधीत विठ्ठलराव शिवदेव यांणी त्याचे छातीवर पाय देऊन त्याचा शिरच्छेद केला. मग किल्ला सर करून त्याजवर पेशवे सरकारचें निशाण चढविलें. किल्ला घेऊन बंदोबस्त केल्यावर जाट राजाचा पुत्र, राजा गीरधर, कारभारीसुध्दां, विठ्ठल शिवदेव यांजकडे शरण आला. तेव्हां ज्या कारभा-यानें पूर्वी दुर्भाषणें केलीं होतीं त्यास बोलावून विचारलें कीं, आता शूरत्व हा विषय ब्राह्मणांचा आहे की कसें ? असें बोलिता कुंठित होऊन उगीच बसला. मग किल्ले ग्वालेर व त्याजखालील मुलूख पेशवे सरकारांत येऊन गोहद संस्थान त्या राजपुत्रास देण्याचें ठरलें. किल्ला व किल्ल्याखालील महालाची मामलत गोविंद शामराव शिरवळकर यांजकडे सांगून परत दिल्लीस दादासाहेब यांच्या स्वारीत गेले. हा किल्ला विठ्ठलराव शिवदेव याणीं सर केल्याविषयीं छ ७ जिल्काद (१६ आगष्ट १७५५) पेशवे यांस खबर कळली. किल्ला घेण्याविषयीं पेशवे यांची परवानगी न मागता सर केला. त्यास बारा लक्ष रुपये खर्च झाला होता. तो तुह्मास * मिळणार नाहीं असें श्रीमंतांचे बोलणें झालें. 

दमाजी गायकवाड याजकडे सालबंदी ऐवज करार केला बु॥ हु॥ गु॥ ६२५००० नजर सु॥. व भीवराव यास दूर केले सबब एक लाख. व गणेश यादव बर्वे पोतदार व कृष्णाजी नाईक कोल्हटकर एकंदर असामींच॥ ४ हजार व सांदड, विहीर, उजई, अंतापूर, मक्ता १० हजार एकूण ७५४००० करार केले. पर्वतीवर नवें घर बांधिलें त्याची वास्तू साबान महिन्यांत (जून १७५५) केली. त्र्यंबकेश्वरचें काम पुरें जालें. १९ मार्च १७५५ इंग्रजांशी तह झाला. तो आंग्रे यांजकडील मुलूख घेऊन बाणकोट देण्याब॥ असावा. नदेशांतील अहिवंतगड किल्ला खोजे दायम याजकडून घेऊन परगणे अठेरपाळेपैकीं कळवण हा गांव दिल्हा. तुळाजी आंग्रे यास कैद केलें. हिंदुस्थान प्रकरणी वर्तान :- गेले सालीं कुंभेरीवरील लढाईत दत्ताजी शिंदे व त्याचा भाऊ जयाप्पा शिंदे दादासाहेब यांजबरोबर होते. येथील कार्यभाग आटोपल्यावर दादासाहेब यांनी जयाप्पा यास मारवाडांत पाठविलें. रामसिंग व बजेसिंग या उभयतांचे तक्तासंबंधी भांडण लागलें होतें. त्यास रामसिंगाचे मदतीकरितां पाठविलें. तेथे बजेसिंगाशी युध्द होतां होतां बजेसिंग पळून गोरात गेला. येथें जयप्पानीं मोर्चे लावून युध्द होत असतां तो जेर जाला. तेव्हां बजेसिंगानें मारेकरी घालून जयाप्पास मारिले. जयाप्पाचा मुलगा जनकोजी. त्यास जयाप्पानें रामसिंगाबरोबर मेडतें येथें रवाना केले होतें. तो जयाप्पा मेला त्या दिवशीच मेडतें सर करून तिसरे दिवशी नागोरास आला. जयाप्पाची क्रिया त्यानें केली. जयाप्पा व संताजी शिंदे वेढ्यांत मरण पावले. त्यांच्या छत्र्या पुष्कराजवळ आहेत. पुढें दतबा व जनकोजी आणखी नागोरास आले. बजेसिंग जेर होऊन कोट रुपये खंडणी व अजमीर, मेडतें व बिकानीर त्याजपासून घेतले. शिंदे उज्जनीस गेले. अजमीर घेतल्याचें वर्तान छ १९ रजब, वैशाख वद्य ७ शुक्रवारी (२ मे १७५५) पेशवे यांस कळलें. दादासाहेब हिंदुस्थानांत आहेत. छ १५ रबिलावलापासून (३० डिसेंबर १७५४) मु॥ गणमुक्तेशर. छ ४ रबिलाखर (जानेवारी १७५५) पुष्पावतीवर. साबान अवलसाल (५ जून १७५५) मथुरा. छ ११ जमादिलावल (२३ फेब्रुवारी १७५५) पुष्कर. छ २७ रबिलाखर यमुनातीर छ १२ जमादिलावल अजमीर. याप्रमाणें या सालीं हिंदुस्थानांतच राहिले. 

तेव्हां त्याणें लिहून दिल्हें. मग ते स्वार आणिले. त्यांस पुसलें. त्यांचे याचें लिहिलेले मिळालें. बम्हन सच्चा आहे. त्या ब्राह्मणाचें गेलें होतें तें त्यांस दिल्हें आणि ते दोन स्वार फाशीं दिल्हे आणि एक शेणवी फाशीं दिल्हा. ऐसें (जालें). दोन घटका दिवस संध्याकाळचा राहिला तों दवंडीं आलीं कीं खुशींनें सव ? नाहीं, बेटक ? नाहीं, पट्टी नाहीं, ऐशी चिट्टी बुधवारचे झेंडयास आणून बांधली व कोतवाल चावडीचे झेंडयास हि चिट्टी बांधली. ऐसें बुधवारचें सायंकाळ परियंत वर्तमान जाहालें. पुढें शिरस्तेप्रमाणें तोफ जाहाली. गुरुवारचे दिवशीं प्रात:काळ इंग्रज बहाद्दर याणीं तयारी करून तीन प्रहर दिवसास कुच करून गेला, तो सिंहगडास गेला. तेथील वर्तमान राजश्री अण्णा नगरकर व धोंडोपंत जोशी वानवळे व अमरचंद, पिदडी आणि गरीबगुरीब पळून पहिली लढाई जाहाल्यावर गेले. तेथें किल्ल्यावर जाऊन कोठें काठें राहिलें. बाकी (गरीब लोक माचीस) राहिले होते. पुढें ही लढाई जाहाली तेव्हां साऱ्यांनी विचार करून कोकणांत जावें असें ठेरवून नगरकर वगैरे मंडळी ऐवजसुध्दा किल्यावरून उतरोन डोंणज्यास राहिले होते. दुसरे दिवशी निघोन जावें तों रात्रीं प्रहर जाहाला तो इंग्रज बहाद्दर जाऊन पोचले आणि तोफा डागल्या. कोणी जेवीत बसले, कोणी कांहीं आपले गुप्तांत, तों गोळे आले. असें जाहाल्यार लेकांस आई ठाऊक नाहीं, बायकोस दादल्याचें ठिकाण नाहीं, भावास बहिणीचे ठिकाण नाहीं, अशी अवस्था जाहाली. इंग्रज बहाद्दर याणीं लूट केली. किती लूट जाहाली ही पुण्यांत वदंता कीं पंचवीस लक्षांची जाहाली. त्यांत नगरकर व जोशी, वानवळे व अमरचंद व पिदडी यांचा फार खराबा जाहाला. वरकड गरीबगुरीब फार नागवले. ऐशी रात्र जाहाल्यावर भृगुवारी प्रात:काळीं सिंहगडकरी यांणीं तोफांची मारागिरी केली. तेथें इंग्रज याचें माणूस दोन तीनशें पडलें. बहुत खराबी सरंजामाची जाहाली आणि लूट घेऊन माघारे उलटले. पुणेयांसी तिसरा प्रहरीं आले. सायंकाळ जाहाला. शिरस्तेप्रमाणें तोफ जाहाली. मंदवारीं प्रात:काळीं अल्पिष्टीण बहाद्दर याजकडे सारे सावकार मिळून हरेश्वरभाईस पुढें करून गेले. कोणी साखर, कोणी बदाम अशी नजर घेऊन गेले. सर्वांस सांगितलें कीं खुशी करून रहावें, तुमचे धनी लवकर येतील, आम्ही तुमचे धन्यास आणावयास जातों. तेवेळेस कांहीं शालजोडया व जवाहीर (चोरीस गेलें.) हरेश्वरभाईस सांगितलें कीं तुम्हीं शहरचें (कारस्थान जाणतां, बंदोबस्त) करावे. तेव्हां नातू व भाई मिळून लोक ठेवीत चालले. हातांत काठया घेऊन बसवावे तों शहरांत चोरीचा उपद्रव जाहला. तेव्हां ताकीद जाहली कीं हत्यारें घेऊन बसावें. असा शहरचा बंदोबस्त केला. शिपायास शेरा दर ६ प्रमाणें केला. असें वर्तमान जाहालें. रविवारीं प्रात:काळीं कुच करून खासा साहेब चार पलटणें व पाचशे स्वार व बैल सुमारा वदंता ३६००० घेऊन मुक्काम लोणीचा केला. दुसरे दिवशीं निघोन जेजुरीस गेला. चवथे दिवशीं यांची व त्यांची कांहीं चकमक जाहाली. ऐशी वदंता पुण्यांत आली. पुणेयाचे आसमंतात पाच पाच कोश लुटीस ठिकाण राहिला नाहीं. एक मनुष्य गेलें तरी लुटल्या शिवाय माघारें येऊं नये. अशी व्यवस्था जाहाली. शहरांतील माणसास एक जीव जातो व एक येतो असें जाहालें. कोणी कोणाचे घरी जाईना येईना. शहरांत एक मशाल नाहीं व घोडेंही नाहीं. मग मेणा, पालखी कोठून असावयाची ? परंतु तीन पालख्या मात्र फिरत. अप्पाजी लक्षुमण याची व चिटणीस यांची व त्याजकडील मोलवी याची, ऐशा तीन फिरत. कार्तिक वद्य १ साहेब सारे वाडे मोठे मोठे घरीं फिरला. पुरंधरे व गोखले व रास्ते ह्या वाडयांपासून हत्यारें घेऊन गेला. सोमवारीं रात्रौ वेताळपेठेंत दरवडा आला. तो मारवाडी यांचीं दुकानें पाच फोडिली. तेथें दहावीस हजारांचा माल घेऊन गेले. रामोशी आ दोनशे आले होते. कोणास मारिलें नाहीं. कोणास दुखविलें नाहीं. ऐसें जाहालें. साहेब याजकडे सांगावयास गेले. तेव्हां त्याणें उत्तर केलें, उसकूल्याव, हाम फाशी देयेंगा. साहेब, वो कसे सापडेगे ? तो हम क्या करे, चोर उपर हाम जाते नहीं. असें ऐकून रडत माघारे आले. असें वर्तमान जाहालें. सायंकाळीं दवंडी आली कीं जो चोर धरून देईल त्यास तीस रु॥ बक्षीस देऊं. याजला दोन चार दिवस जाहाले तों शहरांत बाबाजी प्रल्हाद याचे वाडयापाशी दरवडा आला. तेथें चार घरें फोडून अवाई अशी आली कीं दहापंधरा हजार रुपयांचा ऐवज गेला. नक्की किती गेला कोणास ठाऊक? ते दिवशीं दवंडी आली कीं ज्यास आळंदीस जाणें त्याणें सडें जावें. कांहीं खटलें नेऊं नये. असें कानीं ऐकून कोणी जाणार ते गेले. ते दिवशीं रात्रीस दरवडा बुधवारांत कापडआळींत आला. तेथें तीन दुकानें फोडिली. लकडे, व माहाजन व दानवे ऐशीं तीन दुकानें कापडकरी यांची फोडिली. तेथें घाई जाहाली. आदितवारकर पहारेकरी याणीं बार सोडिले आणि गलबल भारी जाहाली; तेव्हां निघोन गेले. वद्य १२ भृगुवारीं हें वर्तमान जाहलें.

सु॥ खमस खमसैन मया व अलफ, सन ११६४ फसली,
अवल साल छ १३ साबान, ५ जून १७५४,
ज्येष्ठ शुध्द १५ शके १६७६.

छ २६ रमजान (१८ जुलै १७५४) भाऊसाहेब नाशकास जाऊन परत आले. भाद्रपद शुध्द २ (२० आगष्ट), मुक्काम किनई, जगजीवन परशराम ऊर्फ दादोबा प्रतिनिधि यांचा काळ जाला. भवानराव यांस प्रतिनिधिपद जालें. ते कृष्णाजी परशराम यांचे नातू. यांसच श्रीनिवास गंगाधर ह्मणत असत. छ ७ मोहरम, कार्तिक शुध्द ९ गुरुवार (२४ अक्टोबर १७५४). नानासाहेब व भाऊसाहेब कर्नाटकचे स्वारीस जाण्याकरितां गारपिरावर डेरे दिले होते तेथें दाखल जाले. त्यांजबराबर महादाजी अंबाजी पुरंधरेही गेले होते. छ १३ रबिलाखर (२६ जानेवारी १७५५) कर्नाटकचे स्वारीहून महादाजी अंबाजी यांची स्वारी वेगळी झाली. छ २७ रबिलाखरीं (३० जानेवारी १७५५) लढाई करून, ठाणें सर करून, बिदनुरापर्यंत खंडणी घेऊन परत आले. श्रीमंतांची स्वारी कर्नाटकांत जाऊन खाली लिहिल्या महालांची वांटणी बसविली. छ २६ रबिलाखर (६ फेब्रुवारी १७५५) विठ्ठल विश्राम यांजकडून बागेवाडी सरकारांत आल्याची खबर आली. छ ४ जमादिलाखर (१७ एप्रिल १७५५) एकेरींचें ठाणें सर जाल्याची खबर आली. छ २१ जमादिलाखर (५ मार्च १७५५) रोजीं ठाणें सर जालें. छ २९ जमादिलाखरीं (१२ एप्रिल १७५५) कर्नाटकचे स्वारीहून श्रीमंत पुण्यास परत आले. पेशवे कर्नाटकांतून परत आल्यावर आंग्रे यांचा मुलूख घेण्याविषयी इंग्रजांशी कुमक मागितली. पुढें पेशवे आपली फौज घेऊन तयार जाला. संभाजी आंग्रे मयत झाल्यावर त्याचा सावत्र भाऊ तुळाजी आंग्रे बाणकोटापासून सावंतवाडीचे दरम्यानचे मुलखाची वहिवाट करीत होता. सरकारांत नेमणुकीप्रमाणें ऐवज न देतां, उद्दामपणा करून समुद्रांतही इतर लोकांस उपद्रव देत होता. त्याचे बंदोबस्ताकरितां इंग्रजांची मदत मागितली, तेव्हां असे ठरलें कीं, पेशवे यांची लढाऊ गलबतें इंग्रजांनी घेऊन व इंग्रजांनीही तोफा वगैरे घेऊन आंग्रे यांजकडील समुद्रकिनारा किल्ले आहेत ते सरकारांत घ्यावे व बाणकोट इंग्रजांस द्यावें. परंतु पेशवे यांची गलबतें वक्तशीर न आल्यामुळें इंग्रजांकडील जेम्स नामे सरदार होता त्यानें ४ एप्रिल रोजीं सुवर्णदुर्ग किल्ला व त्यालगतचे खुष्की किल्ले त्या साहेबाच्या हाती लागले. पेशवे यांची गलबतें मागून येऊन दाखल जालीं. त्या जहाजावरील शिबंदीचा मुख्य नारोपंत ह्मणून होता. तो समुद्रांत युध्द करण्यास जात असे. पर्जन्यकाळातही पुढें नजीक यामुळें दुसरे किल्ले घ्यावयास वेळ राहिली नाहीं. सबब इंग्रजांनीं सुवर्णदुर्ग किल्ला रामाजी महादेवाचे स्वाधीन करून आपली जहाजें घेऊन माघारे मुंबईस गेले. तो सुवर्णदुर्ग किल्ला सर झाल्याविषयीं रामाजी महादेव यांजकडून पेशवे यांस छ १७ जमादिलाखर रोजी (३१ मार्च १७५५) फत्ते जाल्याविषयीं खबर कळली. त्या रामाजी महादेव यास मु॥ शिकेकटार सरकारांतून छ १७ रजबरोजीं (३० एप्रिल १७५५) दिल्ही. छ ६ रबिलावल पौष शु॥ ७ शनवार (२१ डिसेंबर १७५४) करवीरकर संभाजी महाराजांनी तुळाजी आंग्रे यांजकडून कार्यात मीठगावणें व प॥ सौदन व परगणा राजापूर व खारेपाटण दूर करून सरकारांत घेतले. त्यांची कमावीस खंडोजी माणकर यास सांगितली. छ १६ सफर मार्गशीर्ष वद्य २ रविवार (१ डिसेंबर १७५४) रवळा व जवळा हे किल्ले मोगलाकडून आले होते ते परत दिल्हे. तोफखाना नवा तयार करून माधवराव पानशी याजला सरदारी दिल्ही. 

तेव्हां अल्पिष्टीन साहेब याणें हरेश्वरभाईस विचारिलें कीं आबी कैसा ? तेव्हां भाईंनी सांगितलें कीं, आप करोगे वैसा होगा. तेव्हां तो साहेब म्हणाला कीं पुण्यास धनी कोण आहे ? जशी आमचे बेटाची अवस्था केली तशी करूं. तेव्हां भाई बोलले कीं रयत गरीब, यांजकडे, महाराज, काय आहे ? तिकडील पक्षाचें येथें कोणी राहिलें नाहीं, रयत गरीब आहे. ते वेळेस बाळाजीपंत नातू यांणीं (विनंती शहर रा) खणेविशीं केली. ईश्वर त्याचे मनीं उभा राहून दोघांची गोष्ट मान्य करून सांगितलें कीं जर शहर राखणें तरी निशाणें लवकर लावा, तो थोटा साहेब आला ह्मणजे माझें चालावयाचें नाहीं, याजकरितां जितकी जलदी होईल तितकी करावी. ऐसें ऐकितांच साहेब इंग्रज व बाळाजीपंत नातू ऐसे उभयता बरोबर लोक अ॥ तीनशे कुडतीवाले घेऊन शहरांत आले आणि प्रथम थोरले वाडयापाशी येऊन किल्या आणून दरवाजे उघडविले. आंत साहेब आणि नातू उभयता जाऊन तंबूर वाजविला आणि गादीस कुरनिसा केल्या. आणि आकाशदिव्याचे काठीसच निशाण लाविलें. आणि दोनशे अ॥ लोक बरोबर घेतले आणि शंभर वाडयापाशी ठेवून पुढें आला तों बुधवारचे हवेलीपाशी येऊन उभा राहिला. तेथें एक पहारा, लोक अ॥८ ठेऊन, पुढें कोतवाल चावडीवर लोक अ॥ सत्तेचाळीस ठेवून, पुढें भृगुवारचे चावडीवर सात व रविवारचे चावडीवर वीस ऐसे ठेऊन थोरले वाडयांत गेला. तेथें कारकून होता तो म्हणूं लागला कीं, साहेब, हे पहारेकरी व मी आहे. शिपाई आहेत, यांचें कसें करावें ? तें साहेब याणें ऐकून त्यास सांगितलें कीं तुझीं येथें खुसीसे रहा. इतकियांत बाळाजीपंत नातू यास गोष्ट ते रुचली नाहीं. तो कारकुनास ह्मणाला कीं तुमचा धनी (आल्यावर तुह्मी) या; तोंपर्यंत कांहीं काम नाहीं; बाहेर आपली चीजवस्त असेल ती घेऊन जावें; तरवार, हत्यार वगैरे सारें घेऊन जावें. तेव्हां ते सारे बाहेर आपली चीजवस्तू घेऊन पडले. ऐशी व्यवस्था तीन वाडयांची केली. एक विश्रामबागचा वाडा तेथें पहारेकरीं जोग पेशजी बोलावून नेला होता त्यास सांगितलें कीं वाडयांत कोण आहे ? तेव्हां त्यानें सांगितलें कीं, साहेब, मी आहें आणि दिक्षित नानांकडील माणसें २० आहेत. त्यास सांगितलें कीं तुम्ही त्या वाडयाचा बंदोबस्त राखावा. असें सांगून त्यास वाटेस लाविलें. तों अस्तमान जाहाला. तोफेचे गोलंदाज पुसावयास गेले कीं तोफेचें कसें करावें. त्यांस सांगितलें कीं, शिरस्तेप्रमाणें तोफ सोडावी. तो ह्मणाला कीं, साहेब, दारू नाहीं व ठासावयाचे गजहि नाहींत. तेव्हां साहेब यांणें सांगितलें, आजचा दिवस चालीव, उद्या बंदोबस्त करून देऊं. याप्रमाणें सोमवार रात्र जाहाली. शिरस्तेप्रमाणें तोफ जाहाली. ऐशी रात्र गुजरल्यावर प्रात:काळीं मंगळवारचें वर्तमान. वाडे सरकारचे यांतील मोजदाद केली. आणि थोरले वाडयाचे बुरुजावर छपरें लोक रहावयाचीं होतीं तीं मोडलीं. आणि वर तोफां जंबुरे लहान चार नेऊन ठेविले. दोन प्रहर दिवस आला. दुसरी दवंडी आली कीं रयतेनें खुशाल असावें आणि शिपाई, स्वार असतील त्यांणीं शहराबाहेर आजचा दिवस उद्या दोन प्रहरपर्यंत निघोन जावें, न गेल्यास कुंपणी बहादर यांची गुस्तवारी पडेल. ऐशीं तिसरी (दवंडी आली). त्याजवर दोन प्रहर जाहाले. हरेश्वरभाई यासी बलाविलें आणि सांगितलें कीं तुम्हीं गांवांत सावकार मंडळीस दिलदिलासा देऊन दुकानें उघडवावीं. यांणीं उत्तर केलें कीं बरें आहे, ताकीद करतों. तों अस्तमान जाहाला. तेव्हां भाई यांसी विचारलें कीं शहरकी चाल कैसी है. गणेशराव खत्री बोलूं लागले कीं, साहेब, शहरचे लोक बहुत सोदे आहेत; तरी आज कत्तलची रात्र आहे; खेळे यांनीं डोले काढून खेळूं नये; व तोफही सोडावी. ते वेळेस भाई यास विचारलें कीं, वर्षास कसें होतें ? ते वेळेस भाईंनी सांगितलें कीं, वर्षास तोफ होत नाहीं व ज्याचे पाशीं पैका आहे तो तेल जाळून डोले शहरभर मिरवितो, ज्याजपाशीं कांहीं नाहीं तो आळाव्या भवता पाच प्रदक्षणा करितो, असें आहे. ते वेळेस साहेब यानें आपले लोकांस ताकीद करविली कीं आपले माणसांनीं त्यांशीं बोलूं नये, जशी चाल आहे त्याप्रमाणें करावें. तोफहि मना करविली. ऐशी ती मंगळवारची रात्र केली. बुधवारचे दिवशीं प्रात:काळीं प्रहर दिवसास दवंडी पिटली कीं बेटावरील चीजवस्त कोणी कांहीं नेली असेल ती जकाते यांचे हवेलीपाशीं आणून टाकावी. तेथें दोन शिपाई कुडतीवाले बसविले. ज्याणें वस्त न्यावी त्यानें तेथें टाकावी आणि माघारें जावें. दोन प्रहरीं तीन ब्राह्मण गुळटेकडीपाशीं लुटले. थोरला साहेब होता त्याजपाशीं फिर्याद आले. (सांगितलें कीं आह्मास) लुटलें. तेव्हां तेणें पुसलें कीं कोणीं लुटलें ? ते वेळेस उत्तर केलें कीं घोरपडे याचे स्वारांनीं लुटलें. ते कोठें आहेत ते दाखवा, ह्मणून दोन ब्राह्मण याजबरोबर दहा शिपाई देऊन घोरपडे याचे पेठेंत तें होते तेथें जाऊन त्या स्वारांस घेऊन आले. मागें एक ब्राह्मण बसविला होता, त्यासी पुसलें कीं, तुमचें काय गेलें ?

छ ९ जमादिलावल रोजीं मल्हारजी होळकर व मीर शाबुद्दीन गाजुद्दीनखान यांची भेट झाली, फाल्गुन शुध्द १० सोमवार (४ मार्च १७५४). छ ११ जमादिलावल रोजी (६ मार्च १७५४) बादशहा दिल्ली यांजकडून दादासाहेब यांस वस्त्रें आली. छ ८ जिल्हेज, आश्विन शुध्द १० रविवार रोजी (६ आक्टोबर १७५३) श्रीमंत नानासाहेब यांची स्वारी मुहूर्तानें पर्वती वानवडीकडे वगैरे पुण्यालगतच फिरून छ ३० मोहरम रोजी (२६ नोव्हेंबर १७५३) परत आले. श्रीमंत माधवराव बल्लाळ यांचे लग्न छ १३ सफर, मार्गशीर्ष शुध्द १४ रविवार रोजी (९ डिसेंबर १७५३) पुण्यास जालें. शिवाजी बल्लाळ जोशी सोलापूरकर यांची कन्या रमाबाई. याच महिन्यांत अल्लीबहादूर यांचें लग्न झाले. हा लग्नसमारंभ झाल्यावर श्रीमंत कर्नाटकचे स्वारीस गेले, जमादिलावल महिन्यांत (फेब्रुवारी-मार्च १७५४). हरिहर व अंभी व बागलकोटवर लढाई झाली; व जमादिलाखरांत मुंडलगीवर लढाई झाली; व रजब महिन्यांत (मे १७५४) मिरजेस मोर्चे लावून छ १७ रोजीं (११ मे १७५४) स्वारी पुण्यास परत आली. या स्वारीत जमखिंडी व तेरदाळ हे महाल पेशव्यांनी घेतले. छ १८ जिल्हेज (१६ अक्टोबर १७५३) रामाजी महादेव नामजाद यांजकडून किल्ले पालव फत्ते झाल्याचें वर्तमान आलें. छ ३ रबिलावल (२९ डिसेंबर १७५३) व छ ११ सबान (३ जून १७५४) यमाजी शिवदेव यांनी महिपतगड घेतल्याचें वर्तमान आले. छ २९ जमादिलावल (२४ मार्च १७५४) भगवंतराव त्रिंबक यांजकडे खासे नगारा व निशाण दिलें. छ ८ जमादिलाखर (२ एप्रिल १७५४) कृष्णराव चासकर, काशीबाईचे बंधू, चैत्र शुध्द ९ सोमवार रोजी मयत झाले. छ १ रजब (२५ एप्रिल १७५४) त्रिंबकराव शिवदेव यास सरदारी दिली, वैशाख शुध्द ३ गुरुवार. छ ११ साबान (३ जून १७५४) जीवधन व निंबगिरीवर सरकारचें निशाण चढविले. जनार्दन बल्लाळ, बाबूरावराम फडणीस व कृष्णराव पारसनीस व अन्याबा मजमदार व महीपतराव चिटणीस व कोन्हेर त्रिंबक एकबोटे यांस पालखीची वस्त्रें आली. यशवंतराव दाभाडे मयत झाले. दमाजी गायकवाड यांजकडे ऐवज करार, ब॥ मु॥ ५२५००० नजर नानासाहेब, २५००० भाऊसाहेब, २५००० गोपिकाबाई, २५००० रामचंद्रबाबा, एकूण ६२५००० ठरले. अमृतराव कवी विसा मोरो अवरंगाबादकर यांचे घरी असत ते वारले. कल्याणप्रांत पूर्वी सरकारांत आला होता. या साली आंग्रे याजकडून त्यांजकडे निम्मे होता तो आला.