धोडप किल्ल्यानजीक युध्द होऊन त्यांची फौज मागें सरली. दादासाहेब व रावसाहेब पुण्यास आले. त्याजवर दुसरे वर्षी रावसाहेब कर्नाटकांत स्वारी करून संस्थानिकांपासून खंडण्या घेतल्या व निजगळचा किल्ला मोर्चे देऊन हल्ला करून घेतला. त्या वर्षी त्रिंबकराव मामा यांजबराबर फौज व तोफखाना देऊन छावणीस ठेऊन खासा मजल दरमजल पुण्यास आले. त्रिंबकराव मामा दोन छावण्या राहिले. हैदरखानाशी लढाई करून त्यास मोडून लुटून फस्त केला. जातीनें पायउतारा पळोन श्रीरंगपट्टणास गेला. त्रिंबकराव मामांनी पैका मेळवून तिसरे वर्षी पुण्यास आले, व रामचंद्र गणेश व विसाजी कृष्णा यांजबरोबर हुजरातची फौज देंऊन हिंदुस्थानांत रवाना केले, व तुकोजी होळकर व महादजी शिंदे यांचीही रवानगी केली. हिंदुस्थानात गेल्यावर दाब बसवीत चालिले. त्यास रामचंद्र गणेश यांचे व विसाजी कृष्ण यांचे मनसुब्याचे रीतीस वाकडे पडों लागले. तेव्हां रामचंद्र गणेश यास हुजूर आणून विसाजीपंत व होळकर व शिंदे एक विचारें मनसबा करून बंदोबस्त करीत चालिले. त्यांस, हिंदुस्थानांत नजीबखान रोहिला मातबर. त्याजवर जरब बसली नव्हती. त्याचा लेक जाबतेखान तोही त्याचप्रमाणें पराक्रमें करून होता. त्याजवर जावयाचा मनसबा करून दरमजल भागीरथीतीरास गेले. पथ्थरगड पार होता. त्या किल्ल्यास जाऊन पारपत्य करावें, हा सिध्दांत केला. त्यास गंगेस पाणी फार होतें. तेव्हां श्रीस प्रार्थना केली. ते समयीं श्री भागीरथीनें उतार दिला. तेव्हां गंगा उतरून पार जाऊन पथ्थरगडावर हल्ला केला. जावतेखान लढाईस नमूद होऊन युध्द जाहले. पथ्थरगड फत्ते झाला. खजिना वगैरे कुल सरकारांत आणून तेथून कूच करून दरमजल देशी आले. हिंदुस्थानांत व कर्नाटकांत नानासाहेबाचे कारकीर्दीस गड, किल्ले, स्थळें आलीं नव्हती, ते रावसाहेबांचे कारकीर्दीस किल्ले, गड घेतले व शत्रू पादाक्रांत केले. बारा वर्षे रावसाहेबांनी राज्यरक्षण करून अधिक पराक्रम केला. त्याजवर त्यास वेथा होऊन दोन तीन वर्षे हैराणच होते. त्यास सन सल्लाम सबैनांत कार्तिकमासीं थेऊरचे मुक्कामी कैलासवास केला. सौ मातुश्री रमाबाईंनी सहगमन केले.
त्याजवर श्रीमंत नारायणरावसाहेब सातारियास श्रीमंत महाराज राजारामराजे यांच्या दर्शनास गेले. महाराजांनी कृपा करून प्रधानपणाचीं वस्त्रें बहुमान संप्रदाययुक्त हत्ती, घोडा व जवाहीर, समशेर, शिकेकटार देऊन निरोप दिला. पुण्यास आल्यावर नऊ महिने पद चालविले. त्याजवर भाद्रपद शुध्द त्रयोदशीस सन अर्बात गाडद्यांनी वाडयावर चालून घेऊन वाडयांत शिरोन रावसाहेबांस दगा केला. दादासाहेब वाडयांत होते. ते बाहेर निघोन फौज जमा करून नबाब निजामअल्लीखान याजवर चढाईचा कस्त करून मजल दरमजल चालिले. निजामअल्लीखान हैदराबादाहून कूच करून बेदरास आले. यांची त्यांची गांठ पडोन बेदरास वेढा घातला. ते वेळेस नवाबांनी वीस लक्षांची जागीर द्यावयाचा करार कृष्णराव बल्लाळ यांचे विद्यमानें करार करून दुसरें दिवशी भेटीचा समारंभ जाला. नवाब व रुकनुदौला दोघे मात्र दादासाहेबाचे डेऱ्यास आले. ते वेळेस नवाबांनी कितेक स्नेह घरोबा चालवावयाचा मजकूर बोलिले. ते समयीं स्नेहावर दृष्टी देऊन, जागीर माफ करून, तेथून कूच करून पंचमहालांत जाऊन, स्वराज्याचे अमलाचा बंदोबस्त करून भीमेकृष्णेचा कोडलूरसंगम उतरून कर्नाटकास चालिले. मुरारराव हिंदुराव घोरपडे, ममलकतदार सेनापती, भेटीस बोलाविले. नवाब बसालतजंग यांसही भेटीस बोलाविले. त्यांणी येऊन आदवाणी तालुक्याची खंडणी चुकविली. तेथून कूच करून तुंगभद्रेवर जाऊन दरमजल बलारी पावेतों गेले. महमदअलीखान याजकडून आरकटप्रांताच्या स्वराज्याचे अमलाचे खंडणीचा मजकूर वकील बोलू लागले व हैदरखान यांजकडून करनाटकप्रांतींच्या खंडणीचा करारमदार करावयास वकील लागले. त्यास राजश्री नाना फडणीस व सखारामपंत व मोरोबादादा व बाबूजी नाईक व कृष्णराव बल्लाळ यांही दादासाहेबाचे मर्जीचा भाव पाहून, शरीरप्रकृतीची वगैरे निमित्ये करून, निरोप घेऊन पुणियास आले. व सर्वांनी विचार करून सो मातुश्रीबाई काकूबाई यांस किल्ले पुरंदरास नेऊन ठेऊन राज्याचा बंदोबस्त करूं लागले.