हे वर्तमान अबदालीस कळतांच चालोन घेतले. तेव्हां फौज पळों लागली. मल्हारजी होळकर वगैरे सरदार निघाले. ते समयीं भाऊसाहेबांवर लगट केला. लोक पडले व जखमी झाले. भाऊसाहेब व जनकोजी शिंदे व यशवंतराव पवार वगैरे यांचे ठिकाण लागले नाहीं. तिकडील गर्दी जाल्यावर नानासाहेब खेचीवाडयापावेतों गेले होते, तेथून फिरोन पुण्यास माघारे आले. समाधान वाटेनासें झालें. इहिदेसितैनांत ज्येष्ठमासीं कैलासवास केला. ऐशियास, बाळाजीपंत नानांनी साहसकर्म करून महाराजांची कृपा संपादिली. त्याजवर रावसाहेब व आपासाहेब यांहीं सरदार व मुत्सद्दी वगैरे लहान मोठे याजवर ममता वाढवून, ज्याची जशी योग्यता पाहून, त्याचें स्वरूप वाढवून बहुमान करून, परमसदयत्वें कृपा दर्शवीत होते. त्यांचे मागें नानासाहेबही पूर्वान्वय दृढोत्तर चित्तांत धरून सर्वांचे मनोधारण करून गांव, मोकासे व हत्ती, घोडे, पालख्या, अबदागिरे, इनाम, बक्षिसें व अलंकार देऊन मनुष्य पाहून उमेदवार केलें व सेवक लोकांनी धन्याची कृपा नि:सीम सर्वांनी पाहून कायावाचामनें करून एकनिष्ठ सेवा करून, महत्पदास योग्य होऊन स्वामिसेवा केली. सरदार व लोक साहसकर्ते, मर्द आणि नानासाहेब अजातशत्रू, तेणेंकरून शत्रू पराभवातें पाववून, महाराजांच्या राज्याची वृध्दी करून कीर्ती भूमंडळी मेळविली. नानासाहेब अति पुण्यवान, त्यांच्या तपोबलेंकरून शत्रू विनयभावें शरणांगत होऊन, करभार देऊन, हात जोडून चाकरीस तत्पर राहिले. पूर्वी पांडवांना, श्रीकृष्ण परमात्मा प्रत्यक्ष सानकूल, तेणें दैत्यदानव पृथ्वीचे विलयास नेऊन दानधर्म अगाध केला. त्याअलीकडे नर्मदेपासून पलीकडे उत्तरेस विक्रमराजा व अलीकडे शालीवाहन शककर्ते जाले. त्या अलीकडे नानासाहेबीं रामेश्वरापासून इंद्रप्रस्थपावेतों शत्रू पादाक्रांत करून देव, ब्राह्मण, प्रजापालन व दानधर्माची कीर्ती कलियुगीं विख्यात केली.
त्यांचा अवतार पूर्ण जालियावर श्रीमंत माधवरावसाहेब व दादासाहेब सातारियास गेले. राजारामसाहेबीं कृपाकरून रावसाहेब यांस प्रधानपणाची वस्त्रें बहुमान संप्रदाययुक्त हत्ति, घोडा, जवाहीर, तरवार, शिक्केकटार देऊन निरोप दिल्हा. दादासाहेबांसही बहुमान, घोडा व जवाहीर व वस्त्रे दिल्ही. पुण्यास आल्यावर निजामअल्लीखान बिघाड करून भागानगराहून पुढें आले. श्रीमंतही कूच करून दरमजल गंगातीरास गेले. श्रीमंतांनी लोकांचे मनोधारण करून फौज जमा केली. नवाब गंगातीरास आले. मजरथास गांठ पडोन लढाई करीत करीत नवाब घाट चढोन आले. ते समयी हरोळीस मीरमोंगल नवाबाचे भाऊ व रामचंद्र जाधवराव होते. त्यांशी राजकारण करून फोडोन आणिलें. मोगल हलका पडला. तथापि तसाच पाटसापावेतों आला. त्याचे लष्कराभोवती गांवखेडी जाळून, दाणा वैरण जाळून त्यांस महागाईचा पेंच पाडला. त्यामुळें आयास आला. तेव्हां निरोप घेऊन भागानगरास गेला. उभयतां श्रीमंत पुण्यास आले. दुसरे वर्षीं दादासाहेब पुण्यास राहिले. रावसाहेबाबरोबर त्रिंबकरावमामा देऊन कर्नाटकास रवाना केले. मजलदरमजल शिऱ्यापावेतो जाऊन खंडण्या संस्थानिकांपासून घेऊन आगोटीस स्वारी पुण्यास येऊन दाखल जाले. त्या वर्षी रावसाहेबांचा व दादासाहेबांचा पेंच वाढला. तेव्हा दादासाहेब गंगातीरास गेले. फौज जमा करून लढाईस आले. रावसाहेबीं फौज जमा करून पुढे गेले. भीमेवर लढाई होऊन उभयतांच्या भेटी जाल्या. गोपाळराव गोविंद मिरजेस जाऊन पलीकडे गेले. नवाब निजामअल्लीखान बालेघाटी होते. ते भेटीस पेडगांवचे मुक्कामी येऊन भेटी फारच निखालसतेच्या जाल्या. विठ्ठल सुंदर दिवाण याच्या डेऱ्यास श्रीमंतास भोजनास नेले. नवाब नावेंत बसोन पहावयास आले. निखालसतेचें बोलणे होऊन नवाब बालेघाटावर निघोन गेले. जानोजी भोसले यांस श्रीमंतांनी कुमकेस बोलाविलें असतां न आले. नवाबाचे भेटी जाल्यावर भोसले येत होते, त्यांस सखारामपंत कांही अधिक आगळे बोलिले. तें वकिलांनी लेहून पाठविले. त्याजवरून वाईट मानून नवाबाकडे राजकारण करून बिघाडाचा डौल धरिला. श्रीमंत उभयतां मिरजेस जाऊन किल्ला घेतला. गोपाळराव मोगलाकडे गेले. श्रीमंतांनी कर्नाटकास जावें असा मनसबा होता. त्यास नवाब व भोसले पुणियाचे रोखें आले. श्रीमंत उभयता व मल्हारजी होळकर भागानगरास गेले.