Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

१५. येथें कित्येक लोंक अशी शंका आणतात कीं, पूर्वात्य समाजाला प्रगतीच्या मार्गाला जाण्याचे अधूनमधून झटके मात्र येतात, सातत्यानें प्रगतीचा मार्ग अव्याहत क्रमण्याचा अभ्यास त्या समाजाच्या अंगवळणीं पडलेला नाहीं. यूरोपीयन समाज आज दोन हजार वर्षे प्रगतीचा व स्वातंत्र्याचा हव्यास धरून जसा चालला आहे तसा पूर्वात्य समाज चाललेला दिसत नाहीं. ह्या शंकेला उत्तर एकच आहे. तें हें कीं, हा कोटिक्रम निव्वळ खोटा आहे. अथेन्सची शंभर वर्षे व रोमची दीडशें वर्षे चांगल्या प्रगतीचीं गेलीं. पुढें हजार बाराशें वर्षे यूरोपांत जो काळाकुट्ट अंधार पडला त्यांतून यूरोपांतील कांही अर्वाचीन राष्ट्रें बाहेर पडून नुकती कोठें तीन सवातीनशें वर्षे झालीं आहेत. प्रगतीचे अव्याहत सातत्य येथें तर शेंकडों वर्षे अजीबात नाहींसें झालेलें दिसतें. अलीकडील तीनशें वर्षांतहि प्रगतीची संतती यूरोपांत अगदी अव्याहत चालली आहे, असेंहि निश्चयानें म्हणतां येत नाहीं. रशिया तर अजून देखील प्रगतीच्या विरूध्दच आहे. ग्रीस, इटली, जर्मनी, हे देश राष्ट्राच्या पदवीला पोचून पन्नास पाऊणशेंहि वर्षे अद्याप लोटलीं नाहींत. रूमेनिया, बल्गेरिया, वगैरे राष्ट्रें तर निव्वळ रडतराऊ घोड्यावर बसविल्यासारखीं आहेत. आणि आस्ट्रिया हंगारीशीं भांडण्यांत हैराण आहे. डेन्मार्क, स्वीडन नार्वे, स्वीत्सर्लंड, बेल्जम, हॉलंड, हीं छोटेखानी राष्ट्रें इतर बड्या राष्ट्रांच्या परस्परमत्सरानें व दयार्द्रबुद्धीनें अद्याप जीव धरून आहेत. रहातां राहिलें इंग्लंड व फ्रान्स. पहिल्या जेम्सच्या कारकीर्दीपर्यंत इंग्लंड जुलुमी राजांच्या अमलाखालींच होतें. अलीकडील अडीचशें वर्षांत मात्र तें प्रगतीच्या मार्गाला थोडेंबहुत लागल्यासारखें दिसतें वस्तुत: पहातां इंग्लंडांतदेखील न्याय, नीति किंवा स्वतंत्रता ह्यांचा फैलाव राष्ट्रांतील सर्व लोकांत झाला आहे, असें म्हणतां येत नाहीं. इंग्लंडांतील राज्ययंत्र पंधरा सोळा महाजनांच्या हातीं असून, परदेशाशीं जें कांहीं राजकारण करावयाचें, तें हे लोक आपल्याच जबाबदारीवर करतात, पार्लमेटचा किंवा लोकांचा ह्या बाबीसंबंधानें त्यांच्यावर वस्तुत: फारसा दाब असतो असें नाहीं. इंग्लंडांतील गृहनीति पहावी, तर आयर्लंडाचे निर्दय हाल करण्यांत तें आज पांचशें वर्षे दंग झालेलें आहे. कानडा, दक्षिण आफ्रिका, हिंदुस्थान, वगैरे भागांत दहा दहा वीस वीस वर्षांनी बंडें होतातच आहेत आणि पुढें किती होतील याचा अंदाज नाहीं. इंग्लंडच्या प्रगतीची ही अशी कथा आहे. फ्रान्सकडे पहावें तर त्याचा एक लचका जर्मनीनें तोडला असून, बहुतेक दर वर्षाला प्रधानमंडळ बदलण्याचा प्रसंग येत असल्यामुळें राज्ययंत्राची प्रकृति अगदीं काटेतोल झालेली आढळते. शिवाय १७९३, १७९५, १७९९, १८०३, १८१४, १८१५, १८३०, १८४८, १८५२, १८७० ह्या दहा प्रसंर्गी राजक्रांत्या झाल्याकारणानें फ्रेंच राज्ययंत्र बरेंच खिळखिळीतं झालेलें दिसतें. स्पेन व पोर्तुगाल ह्या जुनाट व मागासलेल्या (लढण्याच्या कामांत) देशांना तर सध्यां कोणी विचारीतसुद्धां नाहीं. त्यांना एशिआटिक समजत नाहींत हेंच महद्भाग्य ! पोलंड, फिन्लंड, आयर्लंड, आल्सेस लॉरेन्स, होल्स्टेन वगैरे देशांतील समाजांचा राष्ट्रनाश होऊन प्रगतीचा मार्ग कायमचा बंद झालेला आहे. सारांश, यूरोपांतहि अशी दंगल चाललेली आहे; व तटस्थ प्रेक्षकाला तींत दारूनें झिंगलेल्या कातक-यांच्या समाजांतल्यापेक्षां जास्त प्रगति दिसून आली नाहीं, तर काहीं मोठेसें नवल नाहीं.

१४. ही व्याख्या भारतवर्षातील लोकांना कांहीं अश्रुतपूर्व नाहीं. राज्ययंत्र उत्तमोत्तम ठेवून व सैन्याच्या जोरावर अंतस्थ व बहिःस्थ शत्रूंचा नाश करून, धर्म, न्याय, नीति व स्वास्थ्य ह्यांचा लाभ करून घेण्याकरितां, चातुर्वर्ण्याची पद्धत भारतीय आर्यांनी काढिली, हें सुप्रसिद्ध आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी ही पद्धत भारतवर्षांत इतकी नामी सुरूं झाली होती कीं, ग्रीस देशांत अल्लातून नामक जो तत्त्ववेत्ता झाला, त्याला ती सर्वतोपरी अनुकरणीय वाटली अल्लातूनानें Republic ऊर्फ सुराज्य नामक जो ग्रंथ लिहिला, त्यांत अथपासून इतिपर्यंत चातुर्वर्ण्याचेच गोडवे गाईलेले आहेत. क्षत्रियांनी व ब्राह्मणांनीं सैन्याच्या जोरावर अंतस्थ व बहि:स्थ शत्रूंचा नाश करून राज्ययंत्र कांहीं काल इतकें सुव्यवस्थित ठेवलें कीं, सर्व शास्त्रांत गहन विचार करणारे तत्त्ववेते आणि अखिल प्राणिमात्राला समबुद्धीनें लेखणारे स्थितप्रज्ञ ह्या पवित्र भूमींत उत्पन्न होऊन ऋद्धि व सिद्धि साक्षात् अवतीर्ण झाल्या. समबुद्धीचा प्रकर्ष आर्यभूमींत त्या कालापासून इतका झाला कीं, शत्रु व मित्र ह्यांशी एकसारखें वागण्याचें वळण देशांतील सर्व लोकांना लागलें. असुर, यवन, पल्लव, शक, मुसलमान, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज वगैरे नाना प्रकारचे अन्नाकरितां हपापलेले म्लेंछ लोक अपहारबुद्धीनें आले असतां, त्यांच्याशींहि एतद्देशीयांनी सात्विक भावानें समबुद्धि ठेविली. अमेरिकेंतील तांबड्या इंडियनांच्या किंवा आफ्रिकेंतील निग्रोंच्या अज्ञानोज्जृंभित अनास्थेहून आर्यांची ही सात्विक समबुद्धि निराळी आहे हें ध्यानांत ठेविलें पाहिजे. नाहींतर, इंडियनांच्याप्रमाणें किंवा नीग्रोंच्याप्रमाणें भारतीय आर्य दोन हजार वर्षांपूर्वीच नामशेष झाले असते. Liberty, Fraternity व Equality , ह्या त्रिगुणात्मक समबुद्धीनें फ्रेंच लोकानीं जसें आपलें नुकसान वारंवार करून घेतलें आहे, तसेंच भारतीय आर्यांनींहि शत्रुमित्रांशी सात्विक समबुद्धि ठेविल्यानें अपरिमित नुकसान करून घेतलें आहे. परंतु, सर्पाला दूध पाजून, थोर नीतिमत्तेचा, अचाट बुद्धिमत्तेचा व अपार संपन्नतेचा घात होत आहे असें अनुभवास आलें, म्हणजे, निरुपायानें असल्या कृतघ्न सर्पाचे दांत पाडावयाला आर्यांनीं कमी केलेलें नाहीं. दोन हजार वर्षांपूर्वी जुनरास पन्नास शंभर वर्षे राज्य करणा-या शकांची, तीनशें वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत सुलतानी गाजविणा-या मुलसमानांची, दीडशें वर्षांपूर्वी उत्तरकोंकणांत अन्याय करणा-या रानटी पोर्तुगीजांची, किंवा निजामाच्या राज्यांत आगंतुकी करणा-या फ्रेंचाची, मराठ्यांनी कायमची उचलबांगडी केली, ती वरील विधानाचें सत्यत्व स्थापित करण्यास पुरे आहे. (१) महाराष्ट्रांतील आर्य लोक परकीय लोकांशीं प्रथम समबुद्धीनें वागतात; (२) नंतर नीतीला एकीकडे सारून कृतघ्नपणानें आगंतुक लोक शिरजोर झाले म्हणजे आश्चर्यानें चकित होतात; (३) पुढें ह्या शिरजोर व नीतिभ्रष्ट नराधमांच्या मनाची व हेतूंची संथपणें पुरती परीक्षा करितात; (४) आणि शेवटीं लत्ताप्रहार करून त्यांचें निष्कासन करितात; असा चतुर्विध सिद्धान्त निळकंठराव कीर्तने व माधवराव रानडे यांनी हिराबागेंतील एका व्याख्यानांत प्रतिपादिलेला प्रसिद्ध आहे. सारांश, उत्तम गतीकडे म्हणजे प्रगतीकडे जाण्याचे जे पाश्चात्य लोकांचे आधुनिक मार्ग आहेत, त्यांहून बरेच निराळे परंतु अत्यंत उदात्त मार्ग पूर्वेकडील भारतीय आर्यांचे व विशेषतः मराठ्यांचे फार पुरातन कालापासूनच आहेत हिंदुस्थानांत उत्पन्न झालेली बौद्ध संस्कृति ज्यांच्या अंगांत भिनली आहे, त्या जपानी लोकांनी तर यूरोपीयन लोक ज्याला Militarism म्हणतात त्याच्या जोरावर “प्रगतीचा” मार्ग अलीकडे फारच सुधारलेला आहे. आणि अशी जर वस्तुस्थिति आहे, तर जगाच्या इतिहासाचा खोल विचार करतांना पूर्वात्य देशांतील इतिहासाची गणना केल्याशिवाय इतिहासशास्त्राला संपूर्णता येणार कशी व इतिहासाचें समग्र तत्त्वदर्शन होणार कसें ?

११. History is past politics and politics is present history हें भ्रामक सूत्र तोडून टाकलें, म्हणजे इतिहासाचा विषय काय व प्रांत कोणता, तें यथाशास्त्र कळण्याचा मार्ग खुला होतो; आणि मानवसमाजाचें अखिल चरित्र हा इतिहासाचा विषय व वर्तमान क्षणाच्या पाठीमागील सर्व गतकाल हा त्याचा प्रांत, अशी व्यापक दृष्टि स्वीकारावी लागते. राजकीय उलाढाली घ्यावयाच्या व सामाजिक सोडावयाच्या, किंवा हजार वर्षांपलीकडील हकीकत द्यावयाची, व पांच वर्षांअलीकडील टाकावयाची, असा संकुचित भेदभाव रहात नाहीं तसेंच वर्तमानकाळ क्षणमात्रावस्थायी असल्यामुळें, वर्तमान इतिहास ह्या शब्दांपासून काहीं एक बोध होत नाही; आणि भविष्यकाल अनागत असल्यामुळें, भविष्येतिहास हा शब्द वायफळ ठरतो. सारांश, मानवसमाजांत गतकालीं घडलेल्या उलाढालींची हकीकत देण्याचें काम इतिहासाचें आहे, हा सिद्धान्त ग्रहण करणें अवश्यक होतें.

१२. इतिहासाचा विषय व इतिहासाचा काल यांचा निर्बंध ठरल्यावर, आणीक एका महत्त्वाच्या बाबीचा खल करणें अपरिहार्य होतें. ती बाब स्थलाची होय. एकंदर मानवसमाजाचें वसतिस्थान ही विस्तीर्ण पृथ्वी आहे. तेव्हां, त्याच्या इतिहासाच्या कक्षेंत पृथ्वीवरील सर्व समाज आले पाहिजेत, मग ते समाज पूर्वेकडील असोत किंवा पश्चिमेकडील असोत. तत्त्वत: हें विधान सर्व इतिहासकारांना मान्य असतें. परंतु, कृतींत फारच फरक दिसतो. जगाचा इतिहास लिहितांना अथवा इतिहासाच्या तत्त्वाचें प्रणयन करतांना पौर्वात्य व पाश्चात्य असे सर्व समाज जमेंत घेण्याचा आव हे इतिहासकार घालतात आणि साक्षात् कृतींत पहावें, तर जुन्या व नव्या दहा पांच पाश्चात्य राष्ट्रांच्या इतिहासापलीकडे जात नाहींत. The east is stationary and the west alone is progressive, असें एक ह्या इतिहासकारांचें सूत्र आहे; आणि ह्याच्या जोरावर आपल्या एकदेशीपणाचा हे लोक बचाव करूं पहातात. पूर्वात्य समाज स्थाणु असल्यामुळें, त्यांना इतिहासच नाहीं, अर्थात्, त्यांना प्रागतिक देशांच्या इतिहासांत गणतां येत नाहीं, असा कोटिक्रम ह्या लोकांनीं लढविलेला प्रसिद्ध आहे ह्या कोटिक्रमांत तथ्यांश कितपत आहे, तें अवश्यमेव पाहिलें पाहिजे.

१३. सदर कोटिक्रमाची मुख्य मदार प्रगति ह्या शब्दावर आहे. तेव्हां, पाश्चात्य इतिहासकारांच्या मतें ही प्रगति म्हणजे काय तें सांगितलें पाहिजे. गति दोन प्रकारची असते--अधम किंवा उत्तम. पैकीं उत्तम जी गति तिला प्रगति म्हणतात. समाजाची उत्तम गति म्हणजे आत्यंतिक नीतिमत्तेकडे, आत्यंतिक बुद्धिमत्तेकडे व आत्यंतिक संपन्नतेकडे समाजाची जी प्रवृति ती. ह्या तीन मत्तेकडे जो समाज जात असतो, तो समाज प्रागतिक व जो जात नाही तो अप्रागतिक. प्रागतिक अवस्था संपादन करण्याला मुख्य साधनें, पाश्चात्य समाजांत दोन मानिलीं जातात:-- एक युयुत्सुता व दुसरें सुयंत्र राज्यव्यवस्था. हीं दोन साधनें ज्या समजानें संपादिलीं नाहींत, त्या समाजाला प्रगतीच्या मार्गाला लागतां येत नाहीं; अर्थात् त्याला प्रागतिक म्हणतांहि येत नाहीं. थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें तर, Morality, Rationalism and Affliuence, fostered and realised under constitutionalism pushed by Militarism अशी आधुनिक यूरोपीयन इतिहासकारांची प्रागतिक अवस्थेची व्याख्या आहे. Morals, Rationalism, Wealth, Constiutionalism व Militarism ह्यांवर यूरोपांत जे इतिहास झालेले आहेत, ते पाहिले असतां, मीं दिलेलें हें लक्षण बरोबर आहे असे दिसून येईल.

८. ह्या दूषित इंग्लिश लक्षणापेक्षां आपल्या आर्य पूर्वजांनीं हजारों वर्षांपूर्वी इतिहासाचें जें लक्षण ठरविलें आहे, तें अगदी निर्दोष आहे. तटस्थ्यवृत्तीनें दोषरहित लक्षणें करण्यांत त्यांचा हातखंड़ाच असे. इति ह आस, असें झालें, असें होतें, हें इतिहासाचें लक्षण आर्यांचें होय. मानवसमाजाच्या गतचरित्रांतला अमुक भाग इतिहास नाहीं, व अमुक भाग इतिहास आहे, असें हे लक्षण सांगत नाहीं. तर जें जें कांहीं झालें, तें तें सर्व इतिहास होय, असें साध्या तीन शब्दांनीं तें जाहीर करीत आहे. ह्या लक्षणांत समाजांतील सर्व हालचालींचा अंतर्भाव होतो. इतिहासाचें हें आपलें वडिलोपार्जित लक्षण दोषरहित असल्यामुळें, शिरसा मान्य करण्यांत मोठा अभिमान वाटतो.

९. इति ह आस, ह्या लक्षणांत समाजाच्या गतचरित्राचाच तेवढा समावेश केलेला आहे, वर्तमान चरित्राचा केलेला नाहीं, अशी शंका आणितां येईल. परंतु, किंचित् सूक्ष्म विचार करून, शास्त्रीयरीत्या पाहतां वर्तमान म्हणून ज्याला म्हणतां येईल असें या जगतांत काय आहे? ज्या क्षणाला वर्तमान म्हणावें, तो क्षण बोलतांबोलतांच गत होऊन इति-ह-आस-पदवीला जाऊन पोहोंचतो. तेव्हां वर्तमान इतिहास, वर्तमान जग, वगैरे जे शब्दसमूह आपण योजितों, ते सर्व परस्परविरोधी आहेत, हें उघड आहे. आपल्या डोळ्यांसमोर नुकत्याच होऊन गेलेल्या ज्या गोष्टी, त्यांच्या वर्णनाला आपण वर्तमान इतिहास म्हणून परस्परविरोधी नांव देतों इतकेंच वस्तुत: तें वर्णन गतगोष्टींचेंच असतें. एवढेंच कीं, ह्या गतगोष्टी इतर दूरच्या गतगोष्टींहून कमीजास्त अलीकडच्या असतात. तात्पर्य,Present history, present politics, हे जे शब्द युरोपियन लेखक योजतात, ते सर्व भ्रामंक व अशास्त्र होत. त्यांच्या लेखांतील Present ह्या शब्दाचा अर्थ 'नुकतेंच होऊन गेलेलें, 'असा वस्तुत: असतो. Present ह्या शब्दाच्या ऐवजीं Immediate past, recent past, हे शब्द जर यूरोपियन इतिहासकार योजतील, तर योग्य अर्थाच्या उद्धोधनार्थ योग्य शब्दाची योजना केली, असें होईल आणि Politics is present history, वगैरे विरोधात्मक वाक्यरचना होणार नाहीं.

१०. एवंच, समाजाच्या चरित्रांतील गत गोष्टींची जी हकीकत ती इतिहास होय; मग ती गोष्ट होऊन एक दिवस झालेला असो किंवा हजार वर्षे झालेलीं असोत. गतकाल हाच तेवढा इतिहासाचा सशास्त्र प्रांत असून, वर्तमानकाल केवळ क्षणमात्रावस्थायी असल्यामुळें, वर्णनाचा किंवा हकीकतीचा विषयच होऊं शकत नाहीं. हा असा विभाग यथास्थित न केल्यामुळें वर्तमानकाळचा इतिहास लिहिणें धोक्याचें, नाजूक व अतएव अशक्य, निदान अहितकारक आहे, असें विधान पाश्चात्य इतिहासकार वारंवार करतांना दृष्टीस पडतात. वस्तुत: पाहतां ज्याला ते वर्तमानकाळ म्हणतात, तो भूतकाळ होऊन गेलेला असतो, व त्याच्यावर हजारों लेख व विचार येऊन गेलेले असतात व येत असतात. हे विचार व हे लेख ज्याला ते वर्तमानकाळ म्हणतात, त्यांचेच अपूर्ण इतिहास असतात. मात्र, इतिहास म्हणून संभावित नांव त्यांना दिलेलें नसतें. इतिहासलेखनाचा राजरोस धंदा करणारे जे आहेत, ते मनांत मांडे खात असतात कीं, वर्तमानकाळचा इतिहास अद्याप लिहिला गेला नाहीं, व लिहिला जाणारहि नाहीं परंतु, हा त्यांचा केवळ भ्रम असतो. अनंतहिंतकाळांतील ज्या मोठमोठ्या व्यक्ती हयात असतात, त्यांचा उपमर्द होईल, त्यांची गुह्यें फुटतील व त्यांचा रोष होईल, या भावनेनें संभावित इतिहासकार ह्या वर्तमान म्हणून समजलेल्या काळाचा इतिहास लिहित नाहींत. वस्तुत: पाहतां दूरच्या भूतकालीन इतिहासांशी ज्यांचा गाढ परिचय झाला, त्यांना जवळच्या भूतकालीन इतिहासावर विचार प्रकट करण्याचा सर्वतोपरी अधिकार आलेला असतो. त्या अधिकाराचा त्यांनी योग्य कालीं उपयोग न करतां स्तब्ध बसावें, ही गोष्ट निव्वळ, त्यांच्या हट्टाची व अज्ञानाची दर्शक होईल. त्यांनीं इतिहास लिहिला नाहीं म्हणून इतर लोक तो लिहावयाचा थोडाच सोडतील !

३. चिमणाजी बल्लाळ, बाजीराव यांचे धाकटे बंधू, दोन लग्नें झाली होती.
(अ) पहिली बायको रमाबाई छ २८ सफर, इहिदे सलासीन मया व अलफ (३१ आगष्ट १७३०) साली वारली. इजला संतती :-
(१) पुत्र सदाशिव चिमणाजी.
(२) मुलगी एक, नांव बयाबाई, इजला गंगाधर नाईक ओंकार यास दिली. लग्न खमस अर्बैंन रबिलाखर (मे १७४४) महिन्यांत झालें. ही छ २० साबान तिसा खमसैन मया व अलफ चैत्र व॥ ७ गुरुवारी (१९ एप्रिल १७५९) मयत झाली.
(ब) दुसरी बायको छ १९ जमादिलाखर इसन्ने सल्लासीनांत (८ डिसेंबर १७३१) लग्न झाले. नाव अन्नपूर्णाबाई.
(क) छ ८ सवाल, इहिदे अर्बैन मया व अलफ पौष शुध्द १०/११ (१७ डिसेंबर १७४०) बुधवार रोजी वारले. बायको अन्नपूर्णाबाई सती गेली.

 ४. बाळाजी बाजीराव.
(अ) यांचा जन्म शके १६४३ मार्गशीर्ष व॥ १३ सह १४ (२१ नोव्हेंबर १७२१) रोजी मौजे सातें ऊर्फ नाणेमावळ येथे जाहाला.
(ब) मुंज शके १६४९ माघ शु॥ ११ रोजी झालीं. (११ जानेवारी १७२८).
(क) लग्नें दोन झालीं. पहिली बायको नांव गोपिकाबाई मल्हारराव भिकाजी रास्ते यांची बहीण. लग्न शके १६५१ माघ शुध्द ४ सल्लासीन मया व अलफ (११ जानेवारी १७३०) रोजी झाले. इचे पोटी वंश :-
(१) वडील मुलगा विश्वासराव.
(२) दुसरा मुलगा माधवराव.
(३) तिसरा यशवंतराव.
(४) चवथा नारायणराव.
(ड) दुसरी बायको देशस्थ ब्राह्मण नारोबा नाईक वाखरे यांची मुलगी, नांव राधाबाई. हें लग्न इहिदे सितैन मया व अलफ, मार्गशीर्ष व॥ ६ शके १६८२ (२७ डिसेंबर १७६०) रोजी झालें. इजला संतती झाली नाही. छ १ साबान इहिदे सबैनांत (१९ नोव्हेंबर १७७०) वारली.
(ई) राज्याधिकार बाजीराव साहेब वारल्यावर यांजकडे येऊन यांस पेशवेपदाची वस्त्रे छ ११ रबिलाखर इहिदे अर्बैन मया व अलफ, आषाढ शुध्द १२ शके १६६२ साली झाली (२५ जून १७४०).
(फ) शके १६८३ वृषनामसंवत्सरे ज्येष्ठ व ॥ ६ बुधवारी रात्रौ पर्वतीस वारले (२४ जून १७६१).
(ग) पहिली बायको गोपिकाबाई शके १७१० श्रावण शुध्द २, तिसा समानीन मया व अलफ सालीं पंचवटीस वारली (३ आगष्ट १७८८).

५. रामचंद्र बाजीराव यांचा जन्म सल्लास अशरीन रमजान महिन्यांत झाला. सल्लास
सल्लासीन रबिलावलांत लहानपणीच वारले.

प्रस्तावना

६. हा व्याप झेंपण्याचा प्रयत्न एकदम जरी नाहीं, तरी आस्ते आस्ते होत आहे. इतिहासाची गोडी महाराष्ट्रांत आज दोनतीनशें वर्षांपासूनची आहे; व त्याचीं साधनें प्रकाशित करण्यापासून कांहीं फायदा आहे, असे मत अलीकडे सार्वत्रिक झालें आहे. परंतु, प्रकाशनाच्या कामीं येणारा खर्च सोसण्यास लोक जितपत तयार असले पाहिजेत, तितपत नाहींत, असें, ऐतिहासिक पुस्तकांच्या व मासिकांच्या तुटपुंज्या खपावरून, म्हणावें लागतें. पण ही बाब सामान्य लोकांची झाली. असामान्य लोक म्हणजे शिक्षणाच्या अत्युच्च शिखराप्रत जाऊन पोहोंचलेले लोक पहावे, तर तेहि लेखप्रकाशनाला कांही मदत करतात, असें दिसत नाहीं. सामान्य लोकांत शंभर वर्गणीदार जर मिळाले, तर ह्या असामान्य लोकांत एकहि मिळण्याची मारामार पडते. म्हणजे वस्तुत: अशिक्षित लंगोट्यांची व ह्या सुशिक्षित पाटलोण्यांची योग्यता बहुतेक सारखीच आहे. अत्यंत अशिक्षित व अत्यंत सुशिक्षित अशा ह्या निरुपयोगी लोकांना सोडून दिलें, म्हणजे बाकी राहिलेला जो आमच्यासारखा सामान्य लोकांचा वर्ग, तोच ह्या कामाला कांहीं उपयोगी पडला तर पडेल. आतांपर्यंत जें प्रकाशन झालेलें आहे, तें याच लोकांच्या सहानुभूतीनें व आश्रयानें झालेलें आहे, आणि पुढें व्हावयाचें तें याच लोकांच्या मदतीनें होईल अशी उमेद आहे. इतकेंच कीं, ह्या लोकांच्यापुढें आपली फिर्याद यथास्थित रीतीनें मांडली पाहिजे. राष्ट्ररचनेंत इतिहासाची कामगिरी काय, व त्याच्या साधनांचे कार्य कोणतें, हें जर ह्या सारासारविचारी पंचापुढें मांडलें, तर ते या कामाला हळूंहळूं खात्रीनें साहाय्य करतील, अशा प्रेमळ आशेनें पुढील विवरण करण्याचें योजिलें आहे. ह्या विवरणांत, इतिहासाचें खरें स्वरूप काय सध्यां आपल्या देशांत तो कोणत्या रूपानें दाखविला जातो व वस्तुत: तो कोणत्या रूपानें दाखविणें जरूर आहे, ह्या तीन प्रकरणांचा विचार कर्तव्य आहे.

७. इतिहासाचें खरें स्वरूप काय, ह्या मुद्याला हात घालण्यापूर्वी एका कच्च्या इंग्रजी कल्पनेला कांट देणें जरूर आहे. History is past politics and politics is present history, असें विधान कित्येक इंग्लिश इतिहासकार करतात. इतिहास म्हणजे गतराजकारण व राजकारण म्हणजे वर्तमान इतिहास, हें इतिहासाचें लक्षण सर्वस्वीं अपुर्ते आहे. मानवसमाजाच्या चरित्रांत राजकारणाखेरीज इतर अनेक व्यवहारांचा समावेश होत असतो. धर्म, आचार, विद्या, व्यापार, वगैरे अनेक व्यवहारांच्या घडामोडी राष्ट्रांत होत असतात आणि त्यांचा समावेश समाजाच्याच रित्रांत करणें अत्यावश्यक असतें. केवळ राजकारणाचाच तेवढा विचार करून इतिहासाला थांबतां येत नाहीं केवळ राजकारणावरच उदरनिर्वाह करणा-या इंग्लंडसारख्या देशांतल्या इतिहासकारांना इतिहासाचें व राजकारणाचें समानाधिकरण भासत असेल. परंतु, इतर देशांतील इतिहासकारांना तें तसें भासत नाहीं, ही निर्विवाद गोष्ट आहे, इतर देशांत राजकारणाला फारसें महत्त्व देत नाहींत, अशांतला भाग नव्हे. तर राजकारणाप्रमाणेंच, धर्मकारण, व्यापारकारण, समाजकारण, वगैरे अनेक कारणांचें महत्व त्या देशांतील इतिहासकारांना सारखेंच वाटतें. सबब, इतिहास म्हणजे राष्ट्रांचें सर्व त-हेचें गतकालीन चरित्र व सर्व प्रकारचें वर्तमान चरित्र म्हणजे वर्तमान इतिहास, असें लक्षण स्वीकारणें अपरिहार्य आहे. इंग्लिश इतिहासकारांच्या ध्यानांत हें व्यापक लक्षण येऊं लागलें नाहीं असें नाहीं. परंतु, तें ध्यानांत ठेऊन, नांव घेण्यासारखा इंग्लंडचा इतिहास इंग्लिश इतिहासकारांकडून अद्याप लिहिला गेलेला आढळांत नाहीं. इंग्लंडच्या इतिहासावर सर्व त-हेनें व्यापक असा विचार जर्मन व फ्रेंच इतिहासज्ञांकडूनच थोडाफार झालेला आहे. १८६० पासून १८८० पर्यंत इंग्लिश इतिहासकारांतला प्रमुख असा जो फ्रीमन तो History is past politice हें वचन सिध्दान्तवत् मानी.

पेशव्यांची वंशावळ

१. बाळाजी विश्वनाथ भट हे दंडाराजपुरी येथील वतनदार देशमुख असून त्यांजवर जंजीरकर हबशी याचा कांही पेच आल्यावरून रोजगारास साताऱ्यास आले. प्रथम धनाजी जाधवराव सेनापती यांजकडे कारकुनीचे कामावर सन १७०९ इसवीचे अगोदर दोन चार वर्षे होते. नंतर धनाजी जाधवराव सन १७१० इसवींत वारले. तेव्हां त्यांजकडील सर्व कारभार सरकार मर्जीप्रमाणे बाळाजी विश्वनाथ पांहू लागल्यावर शाहू महाराज यांणीं त्यांची हुशारी पाहून सदर्हू साली सेनाकर्ते असा किताब देऊन सन १७११ इसवी, इसने अशर मया व अलफ सालीं छ १७ रजब रोजीं काही सरंजाम दिल्हा. पुढें यांचे पराक्रम पाहून पेशवाईपद पिंगळे यांजकडे होते ते त्यांजकडून काढून छ ९ जिलकाद अर्बा अशर मया व अलफ, शके १६३५ साली शाहू महाराज यांणी यांस पेशवाईपद दिलें, मांजरी बुद्रूक या गांवी. दिल्लीहून चौथाई व सरदेशमुखी अमलाबद्दल सनदा बादशाहाकडू याणींच आणिल्या. यांचे बायकोचे नांव राधाबाई, अंताजी मल्हार बर्वे डुबेरकर यांची कन्या. इचेपोटी संतती जाहाली ती येणेंप्रमाणें :-

(अ) पुत्र दोन :- वडीलपुत्र बाजीराव, धाकटे चिमाजी अप्पा.
(ब) कन्या दोन :- एक कन्या भिऊबाई अबाजी नाईक बारामतीकर यांस दिली होती. ती
छ ९ जमादिलाखर, समान अर्बैन सालीं मयत झाली, सन ११५७ फसलीत (७ जून १७४७).
दुसरी कन्या अनुबाई व्यंकटराव नारायण घोरपडे इचलकरंजीकर यांस दिली होती.
(क) बाळाजी विश्वनाथ सु॥ अशरीन मया व अलफ छ ५ जमादिलाखर, चैत्र शुध्द
६ शनवारी (२ एप्रिल १७२०) सासवड मु॥ वारले.
(ड) बायको राधाबाई छ १४ जमादिलावल सलास खमसैन मया व अलफ सन ११६२ साली वारली (२० मार्च १७५३).

 २. बाजीराव बल्लाळ.
(अ) पेशवेपदाचा अधिकार बाळाजी विश्वनाथ वारल्यावर यांजकडे आला. त्यांस साताऱ्याहून पेशवेपदाबद्दल वस्त्रें छ २० जमादिलाखर अशरीन मया व अलफ, शके १६४२ सालांत, शार्वरी संवत्सरी मिळालीं (१७ एप्रिल १७२०).
(ब) यांची लग्नाची बायको एक, काशीबाई, कृष्णराव चासकर यांची बहीण. इचे पोटी संतती झाली ती :-
(१) वडीलपुत्र बाळाजी बाजीराव
(२) दुसरे पुत्र रामचंद्र बाजीराव
(३) तिसरे पुत्र रघुनाथ बाजीराव ऊर्फ दादासाहेब.
(४) चवथे पुत्र जनार्दन बाजीराव.
येणेंप्रमाणें चार पुत्र प्रसिध्द झाले. आणखी कांही बालपणीं होऊन गेले.
(क) मस्तानी ह्मणून कलावंतीण मुसलमानीण होती. इचे पोटी समशेरबहादर व याचा पुत्र अल्लीबहादर. यांचा वंश हिंदुस्थानप्रांती संस्थान बांदे येथें आहे.
(ड) छ १२ सफर, अर्बैंन मया व अलफ, रौर्द्र संवत्सरे, शके १६६२ वैशाख शुध्द १३ रविवारी रेवातीरीं वारले (२८ एप्रिल १७४०).

प्रस्तावना

३. जुन्या मोडी लेखांच्या नकला अनभ्यस्त लेखकांकडून करून घेण्यांत किती त्रास पडतो, हें येथपर्यंत संक्षेपानें सांगितलें. आतां जुन्या मराठी बाळबोधी पोथ्यांच्या नकला करून, घेण्यांत काय काय अडचणी येतात तें सांगतों. एकवार, जुन्या संस्कृत पोथ्या लेखकाला उतरावयाला सांगितल्यास चालेल. परंतु, जुन्या मराठी पोथ्या लेखकांकडे देणें निव्वळ पाप होय. मराठी पोथ्यांतील जुने शब्द, जुनीं रूपें, जुनी भाषा व जुनी अक्षरें अवगत नसल्यामुळें, शब्द तोडून लिहावयाचें ह्या लेखकांना कळत नसतें तें नसतेंच; उलट आधुनिक शुद्धलेखनाची संवय झाल्यामुळें जेथें त्यांना पोथींतील भाषा समजतें असें वाटतें, तेथें तें मूळ पोथींतील शुद्धलेखन बदलून, नूतन शुद्धलेखनाचा आश्रय करतात व मूळाचें सर्व स्वारस्य घालवितात. एखादा जुना शब्द नीट कळला नाहीं, तर आपल्या पदरचें अक्षर घुसडून देऊन जुळतें करून घेतात; आणि कधीं कधीं तर मूळ पोथींत चूक झाली आहे असें वाटल्यास, तीहि सुधरावयाला कमी करीत नाहींत एवंच, अशा लेखकांना जुन्या मराठी पोथ्या नकल करण्यास देणें नाना प्रकारांनीं धोक्याचें आहे. सर्वच जुन्या पोथ्या स्वत: लिहूं जाणें अशक्य आहे, हें वर सांगितलेंच आहे.

४. सारांश, जुने लेख व जुन्या पोथ्या उतरून काढण्याचें काम जरा अवघडच आहे, इतकेंच नव्हे तर, बरेंच जोखमीचें आहे. उठला सुटला कोणीहि कारकून किंवा इंग्रजी पदवीधर हें काम बिनबोभाट करीलच, असा भरंवसा नाहीं. आतां बिनबोभाट काम उरकण्याला एकच उपाय आहे. तो हा कीं, इतिहासाचा नाद असणारा एखादा चणचणीत मनुष्य वर्ष दोन वर्ष जुने लेख वाचण्याकरितां व नकल करण्याकरितां उमेदवारीस ठेविला पाहिजे व संन्याशी नसल्यास, त्याला इंग्रजसरकारच्या हफीसांतून त्याच्याचसारख्या लोकांना मिळणा-या पगाराइतका पगार दिला पाहिजे. असे दहा पांच लोक तयार केल्याविना, लेखप्रकाशनाचें वाढतें काम जसें समर्पक चालावें तसें चालणार नाहीं.

५. प्रतिलेखक योग्य व तज्ज्ञ मिळत नाहींत ही एक लेखप्रकाशनाला प्रतिबंधक गोष्ट झाली. दुसरा प्रतिबंध छापखान्यांचा जुने ऐतिहासिकलेख यथाशास्त्र छापावयाचे म्हटले म्हणजे चार चार पांच पांच वेळां कच्चीं मुद्रितें तपासलीं पाहिजेत व संपादक जाग्यावर नसल्यास ती असेल तेथें पाठवितां आलीं पाहिजेत. आपल्या देशांतले एकोनएक छापखाने पाहिले तर त्यांचा कारभार किती तुटपुंजा असतो तें प्रसिद्धच आहे. चार चार पांच पांच वेळां कच्चीं मुद्रितें संपादक असेल तेथें पाठविण्याची व्यवस्था सोडूनच द्या. पण एकच कच्चें मुद्रित तपासून दिलें असतां, तें वेळेवर शुद्ध छापून निघालें, म्हणजे गंगेंत घोडे न्हाले; असा प्रकार सर्वत्र आहे. शिवाय, जुने ऐतिहासिक किंवा काव्यलेख जसेचे तसे छापण्यास, कधींकधीं नवे ठसे पाडणें जरूर असतें. शिक्यांत एखादे ठिकाणीं उलटा न छापावयाचा असल्यास, किंवा एखादा अष्टकोनी शिक्का हवा असल्यास, किंवा लेखांच्या प्रारंभींचा दकार काढावयाचा असल्यास, किंवा बीत रेघ दाखवावयाची असल्यास, नवीन ठसा संपादक स्वत: कोठून तरी पाडून आणील तेव्हां काम चालावयाचें. तात्पर्य, जुने लेख यथाशास्त्र प्रकाशण्यास, वाकबगार लेखक दोन दोन वर्ष फुकट पोसून तयार केले पाहिजेत व ठसे वगैरे जें जें काहीं नवीन सामान हवें असेल, तें तें संपादकानें स्वत: निर्माण केलें पाहिजे, आणि ही दुहेरी सामग्री सिद्ध होईपर्यंत, नाना त-हेची व्यंगे निमूटपणें सोशीत राहिलें पाहिजे. आवडीनिवडीचे चोचले करावयाचे मनांत आणलें म्हणजे हा इतका व्याप करणें अवश्य आहे.

त्यांचीं वतनें व जमिनी त्याजकडे चालणार नाहींत. लष्करवाले व हरएक कोणी मुलुख लुटतील व वाट भारतील ते जिवानिशीं गेल्या शिवाय राहणार नाहींत. तारीख ११ माहे फेब्रुवारी सन १८१८ ईसवी मुतावी छ ५ रवीलाखर. याप्रमाणें जाहीरनामा केला. आणि सारे लष्करांपैकीं सडी फौज व तुरक स्वार घेऊन इस्मीत साहेब बाजीराव साहेब यांचे मागें गेले. बाकी फौज मोठया तोफा सुध्दा अल्पिष्टिन साहेब किल्ले घ्यावयाकरितां सिंहगडास आले. शिवापुराकडून कल्याण दरवाज्याखालीं लष्कर उतरोन मोर्चे किल्यास दिल्हे.

(५१) इस्मीत साहेब यांचे लष्कर श्रीमंताचे मागें जावयाचे बातमीवर श्रीमंत निघोन सोलापुरास गेले. तेथें सदाशिवपंत भाऊकडील आबा पुंडले मामलेदार व मल्हारराव बाजी वगैरे मंडळीस कैद करून त्यांचा ऐवज धोत्रीस होता तो काढून किल्ल्यांत विसाजीपंत देवराव यास ठेऊन फौज सुध्दा टेंबुर्णीकडून गोपाळाच्या अष्टीवर मुक्कामास गेले. ती बातमी इस्मीत साहेब यांस बेलापुरास समजली. तेथून रातोरात जाऊन माघ शु॥१४ सह १५ शुक्रवारीं छ १२ रबिलावरीं जाऊन दोन गोळे श्रीमंताचे लष्करांत मारिले. श्रीमंतास बातमी नवती. त्याजमुळें हवालदील होऊन पळों लागले. बापू गोखले तयार होते ते पुढें आले. त्यास गोळया लागोन ठार जाले. आनंदराव बाबर, गोविंदराव घोरपडे त्याजबरोबर पडले. आणखी कांहीं लोक पडले व जखमी झाले. बुणगे श्रीमंताचे लुटले गेले. श्रीमंत निघोन गेलें. सातारकर महाराज यांस इशारा होता त्याजवरून ते मागें राहिले. त्यास इस्मीत साहेब यांणीं आपले लष्करांत आणून मुक्काम केला. नंतर त्यांची व अल्पिष्टण साहेब यांची भेट करावयाकरितां माघारे बोलेसरावर आले.

(५२) सिंहगड किल्ला एक दिवस लढला. नंतर छ २३ रबिलाखर १-३-१८ माघ वद्य रविवारी सर करून फौज रफीजरनेल साहेब याजबराबर पुरंदरास पाठवून अल्पिष्टण साहेब महाराजांचे भेटीकरिता थोडीशी सडी फौज घेऊन गेले. छ २५ र॥ खरीं ३-३-१८ महाराजांच्या व त्यांच्या भेटी होऊन महाराज अल्पिष्टण साहेब यांचे लष्करांत आले. इस्मीत साहेब श्रीमंतांचे मागें गेले. अल्पिष्टण साहेब महाराज याजला घेऊन जेजोरीस जाऊन वीरवाल्यावर गेले. तेथें रफीजरनेल साहेब लष्करसुध्दा आले. त्यासुध्दा पुरंदराखालीं आले. सासवडास आबा पुरंदरे यांचे वाडयांत लोक होते त्याणीं गोळे मारिले. सबब त्यांची हत्यारे घेऊन त्यांस काढून दिल्हे. नंतर पुरंदर किल्ला घेतला.

(५३) मुंबईकडून फौज येऊन कोकणचे किल्ले सर केले व जरनेल मनरो साहेब कर्नाटकातून फौज घेऊन येऊन बदामी, बागलकोट, बेळगाव वगैरे किल्ले घेऊन तिकडील
बंदोबस्त संस्थानिकसुध्दा केला.

(५४) मानाजी आंग्रे मृत्यु पावले. त्यांचे पुत्र राघोजी आंगरे यांस श्रीमंतांनी पळत फिरतां वस्त्रें पाठविली.

(५५) भोसले याणीं जनकान साहेबांशी लढाई करावयाचा मोकदमा नसतां बाजीराव साहेब यांचे संकेतावरून आपण होऊन जाऊन लढाई केली. जनकीन साहेब यांजवळ थोडी जमेत असतां हाल्ला केला. याजमुळे भोसले शिकस्त झाले. नंतर बोलणें लाविलें आणि पळोन जावयाची तजवीज केली. ही बातमी समजतांच कैदेंत ठेऊन प्रयागास रवाना करीत असतां मार्गात पाहारा फिताऊन रात्रीस पळोन गेले. रघोजी भोसले यांच्या बायका वगैरे यांचा बचाव इंग्रजांनी करून त्यांचे मांडीं दत्तक पुत्र गुजर कन्येचा देऊन, त्याचें नांव रघोजी भोसले ठेऊन, त्यास अधिकार देऊन, इंग्रजी सरकारचे विचारें संस्थान चालविले.

(५६) येशवंतराव होळकर याचा लेक मल्हारराव यांणीं बाजीराव यांचे संकेतावरून माळवे प्रांती मलकड साहेब यांशी लढाई केली. या लढाईत होळकर शिकस्त झाले. मलकड साहेब यांणी त्याशी तहनामा करून बंदोबस्त केला.

(५७) गोपाळराव मुनशी मार्गशीर्ष शु॥ ७ छ ५ सफर १५-१२-१७ मुक्काम वाई मृत्यु पावले.

समाप्त

प्रस्तावना

१. आठवा खंड १९०३ सालीं संपला. पुढें दोन वर्षांनीं हा सहावा खंड संपत आहे. विलंबाचें कारण असे कीं, ह्या खंडांत इतर कोणत्याहि खंडांतल्यापेक्षां मजकूर जास्त आहे. शिवाय, तंजावर वगैरे स्थलीं प्रवास करण्यांत फार वेळ गेल्यामुळें, मजकूर देण्याला वेळोवेळीं दिरंगाई झाली. वांई, सातारा व नासिक येथील दोघा तिघा गृहस्थांनीं मजकूर तयार करण्याचें जर मनावर घेतलें नसतें, तर इतर कामें संभाळून, तो देतां आला असतां किंवा कसें, याचीच शंका आहे. खरें पाहिलें तर, काम वेळच्या वेळीं उठण्यास, दोन चार स्वतंत्र मनुष्यांची योजना पाहिजे आहे. तशांत मनुष्यें नुसतीं स्वतंत्र असून उपयोगीं नाहीं, तर तीं तज्ज्ञ असलीं पाहिजेत. म्हणजे मूळ शुद्ध व विश्वसनीय लिहून निघून, मजकूरहि वेळेवर तयार होत जाईल. परंतु, असला सुदिन उगवे तोंपर्यंत जसें लिहून निघेल तसें घेतलें पाहिजे; आवडनिवड करण्याची सोय नाहीं.

२. आवडनिवड करावयाची म्हटली म्हणजे तज्ज्ञ माणसें व भरपूर पैसा पाहिजे. मूळ कागद वाचून तो नीट बाळबोधींत लिहून काढावयाचें काम वरवर पहाणा-याला वाटतें तितकें सोपें नाहीं. शक १६२२ पासून शक १७६० पर्यंतच्या ऐतिहासिक पत्राचें मोडी अक्षर वस्तुत: प्रत्येक सुशिक्षित महाराष्ट्रीयाला वाचतां यावें. परंतु, अनुभवाची गोष्ट आहे कीं, हें आधुनिक मोडीहि बहुतेकांना नीट वाचतां येत नाहीं. याचें मुख्य कारण स्वदेशाच्या इतिहासाचें व भाषेचें जितपत सशास्त्र ज्ञान असावें, तितपत सध्यांच्या इंग्रजी व मराठी शिकलेल्या एतद्देशीय लोकांना असत नाहीं. मुसलमानी नांवें, जुनीं मराठी नांवें, जुने मराठी शब्द, स्थलनामें, वगैरे कधींहि कानावरून गेलीं नसल्यामुळें, संशयित व असंशयित अशा दोन्ही ठिकाणी ह्या लोकांच्या चुका होतात; व ह्यांना नकला करावयाला सांगण्यापेक्षां आपण स्वतःच लिहून काढणें जास्त सोयस्कर वाटूं लागतें. ही कथा १६२२ पासून १७६० पर्यंतच्या लेखांची झाली. शक १६२२ च्या पलीकडील तीन चारशें वर्षांचे जे लेख आहेत, ते तर ह्या लोकांना मुळीं वाचतांच येत नाहींत. जुने ताम्रपट व शिलालेख वाचणें, ह्या लोकांना जितकें कठिण जाईल तितकेंच हे लेख वाचणेंहि कठीण जातें. ही अडचण इंग्रजी शिकलेल्या नवीन लोकांनाच भासते असें नाहीं. तर मोठमोठ्या जुन्या फर्ड्या कारकुनांचीहि ह्या जुन्या लिखितांपुढें बोबडी वळलेली मीं पाहिली आहे. श्रीमंत बावडेकर यांचें दफ्तर तपासतांना अशा एका जुनाट कलमबहादराची व माझी गांठ पडली. पत्रें शिवाजी महाराजांच्या वेळचीं होतीं. त्यांतील एखाददुसरें अक्षर हे गृहस्थ अधूनमधून लावूं शकत. कोणतेंहि एक वाक्य सबंद लावण्याची ह्यांना मुष्कील पडे. शब्द, प्रयोग, रूपें वगैरे सर्वच प्रकार जुना पडल्यामुळें ह्या कारकुनाला वाचण्याची अडचण पडे, असा तर प्रकार होताच. परंतु त्याला मुख्य अडचण जी पडे ती तत्कालीन मोडी अक्षरें ओळखण्याची पडे. तशांत, मराठी बनलेले फारशी शब्द ह्या पत्रांतून फार असल्यानें अशा अनभ्यस्त वाचकाला मोठी पंचाईत पडते. सबब स्वेतिहासाच्या प्रेमानें जुना किंवा नवा कोणीहि अनभ्यस्त मनुष्य ह्या पत्त्रांच्या नकला करून देण्याला सिद्ध झाला, तर त्याला तुझे उपकार करून घेण्याची सोय नाहीं, असें निरूपायानें सांगावें लागतें. आतां सर्व लेख स्वतःच लिहूं जावें, तर तेंहि अशक्य आहे. कितीही उत्साह असला, तरी मानवी बोटांनी काम करण्याची कांहींतरी मर्यादा आहेच आहे.