प्रस्तावना
३. जुन्या मोडी लेखांच्या नकला अनभ्यस्त लेखकांकडून करून घेण्यांत किती त्रास पडतो, हें येथपर्यंत संक्षेपानें सांगितलें. आतां जुन्या मराठी बाळबोधी पोथ्यांच्या नकला करून, घेण्यांत काय काय अडचणी येतात तें सांगतों. एकवार, जुन्या संस्कृत पोथ्या लेखकाला उतरावयाला सांगितल्यास चालेल. परंतु, जुन्या मराठी पोथ्या लेखकांकडे देणें निव्वळ पाप होय. मराठी पोथ्यांतील जुने शब्द, जुनीं रूपें, जुनी भाषा व जुनी अक्षरें अवगत नसल्यामुळें, शब्द तोडून लिहावयाचें ह्या लेखकांना कळत नसतें तें नसतेंच; उलट आधुनिक शुद्धलेखनाची संवय झाल्यामुळें जेथें त्यांना पोथींतील भाषा समजतें असें वाटतें, तेथें तें मूळ पोथींतील शुद्धलेखन बदलून, नूतन शुद्धलेखनाचा आश्रय करतात व मूळाचें सर्व स्वारस्य घालवितात. एखादा जुना शब्द नीट कळला नाहीं, तर आपल्या पदरचें अक्षर घुसडून देऊन जुळतें करून घेतात; आणि कधीं कधीं तर मूळ पोथींत चूक झाली आहे असें वाटल्यास, तीहि सुधरावयाला कमी करीत नाहींत एवंच, अशा लेखकांना जुन्या मराठी पोथ्या नकल करण्यास देणें नाना प्रकारांनीं धोक्याचें आहे. सर्वच जुन्या पोथ्या स्वत: लिहूं जाणें अशक्य आहे, हें वर सांगितलेंच आहे.
४. सारांश, जुने लेख व जुन्या पोथ्या उतरून काढण्याचें काम जरा अवघडच आहे, इतकेंच नव्हे तर, बरेंच जोखमीचें आहे. उठला सुटला कोणीहि कारकून किंवा इंग्रजी पदवीधर हें काम बिनबोभाट करीलच, असा भरंवसा नाहीं. आतां बिनबोभाट काम उरकण्याला एकच उपाय आहे. तो हा कीं, इतिहासाचा नाद असणारा एखादा चणचणीत मनुष्य वर्ष दोन वर्ष जुने लेख वाचण्याकरितां व नकल करण्याकरितां उमेदवारीस ठेविला पाहिजे व संन्याशी नसल्यास, त्याला इंग्रजसरकारच्या हफीसांतून त्याच्याचसारख्या लोकांना मिळणा-या पगाराइतका पगार दिला पाहिजे. असे दहा पांच लोक तयार केल्याविना, लेखप्रकाशनाचें वाढतें काम जसें समर्पक चालावें तसें चालणार नाहीं.
५. प्रतिलेखक योग्य व तज्ज्ञ मिळत नाहींत ही एक लेखप्रकाशनाला प्रतिबंधक गोष्ट झाली. दुसरा प्रतिबंध छापखान्यांचा जुने ऐतिहासिकलेख यथाशास्त्र छापावयाचे म्हटले म्हणजे चार चार पांच पांच वेळां कच्चीं मुद्रितें तपासलीं पाहिजेत व संपादक जाग्यावर नसल्यास ती असेल तेथें पाठवितां आलीं पाहिजेत. आपल्या देशांतले एकोनएक छापखाने पाहिले तर त्यांचा कारभार किती तुटपुंजा असतो तें प्रसिद्धच आहे. चार चार पांच पांच वेळां कच्चीं मुद्रितें संपादक असेल तेथें पाठविण्याची व्यवस्था सोडूनच द्या. पण एकच कच्चें मुद्रित तपासून दिलें असतां, तें वेळेवर शुद्ध छापून निघालें, म्हणजे गंगेंत घोडे न्हाले; असा प्रकार सर्वत्र आहे. शिवाय, जुने ऐतिहासिक किंवा काव्यलेख जसेचे तसे छापण्यास, कधींकधीं नवे ठसे पाडणें जरूर असतें. शिक्यांत एखादे ठिकाणीं उलटा न छापावयाचा असल्यास, किंवा एखादा अष्टकोनी शिक्का हवा असल्यास, किंवा लेखांच्या प्रारंभींचा दकार काढावयाचा असल्यास, किंवा बीत रेघ दाखवावयाची असल्यास, नवीन ठसा संपादक स्वत: कोठून तरी पाडून आणील तेव्हां काम चालावयाचें. तात्पर्य, जुने लेख यथाशास्त्र प्रकाशण्यास, वाकबगार लेखक दोन दोन वर्ष फुकट पोसून तयार केले पाहिजेत व ठसे वगैरे जें जें काहीं नवीन सामान हवें असेल, तें तें संपादकानें स्वत: निर्माण केलें पाहिजे, आणि ही दुहेरी सामग्री सिद्ध होईपर्यंत, नाना त-हेची व्यंगे निमूटपणें सोशीत राहिलें पाहिजे. आवडीनिवडीचे चोचले करावयाचे मनांत आणलें म्हणजे हा इतका व्याप करणें अवश्य आहे.