Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

४६. प्रपंचांतील प्रसंगांना तत्त्वज्ञानाच्या सांच्यांत बसविलें म्हणजे मानवसमाजाची धडपड व्यवस्थित रीतीनें चालली आहे, अशी मनाची समजूत होते. व ही समजूत करण्याकरितां प्रपंचाचें तत्त्वज्ञान अथवा Philosophy of History उदयास येतें. शास्त्रांत व व्यवहारांत स्थलोस्थलीं व वेळोवेळीं कांहीं कल्पित गोष्टी गृहित करून चालल्याशिवाय नीट संगति बसत नाहीं. Jhon Doe व Riehard Roe ची कल्पना इंग्लिश कायद्यांत खरी धरून कांहीं व्यवहार सत्य मानतात; किंवा गतिशास्त्रांत घर्षणाचा अभाव कल्पितात, त्याप्रमाणेंच, व्यक्तमध्य अशा समाजाच्या तत्त्वज्ञानांत कांहीं कल्पित गोष्टी गृहीत कराव्या लागतात व ह्या ग्रहणापासून त्या त्या वेळेपुरती चित्तशांति होत असते आणि प्रपंचाचें रहाटगाडगें आनंदानें, उत्साहानें व हुरूपानें फिरूं लागतें. समाजशास्राला समाजाचा आदि व अंत माहीत नसतो, तो तत्त्चज्ञानाला माहीत असतो. समाज आला कोठून व जातो कोठें, ह्या बिकट प्रश्नाचें उत्तर तत्त्वज्ञान देतें. तें उत्तर शास्त्रीय प्रमाणांनीं समर्थित, अर्थात्, नसतें. कारण तत्त्वज्ञानाच्या प्रांतांत शास्त्रीय प्रमाणें म्हणून ज्यांना प्राय: ह्यणतात त्यांहून निराळ्या प्रमाणांची मातबरी असते. अन्वयव्यतिरेकाच्या खटपटींत शास्त्र सदां घुटमळत असतें. तत्त्वज्ञान जें आहे तें असल्या भिकार बाजारांत हिंडत नाही. आप्तांची वाक्यें, धर्मग्रंथांची प्रमाणें, मनोरचित कल्पना, ह्यांच्या जोरावर अदृश्य वातावरणांत अनिरुद्ध संचार करून, पृथ्वीतलांवरील भिकार बाजार कोठें आहे, तें तत्त्वज्ञान गंभीर स्वरानें व शहाणपणाच्या मुद्रेनें सांगत असतें आणि भिकार बाजारांतील भाबडीं, दु:खीकष्टी व भोंदू माणसें भक्तिभावानें ऐकत असतात. काल्पनिक सृष्टींत स्वैर संचार करणारें तत्त्वज्ञान अन्वयव्यतिरेकाच्या बंधनांनीं नियमित नसल्यामुळें त्याची स्वरूपें नानाप्रकारचीं आहेत. वडारांच्या गुरवापासून तों ब्राह्मणांच्या ज्ञानेश्वरापर्यंत व रानटी लोकांच्या भटांपासून तों युरोपांतील अत्यंत सुधारलेल्या राष्ट्रांतील क्यांटप्रभृति तत्त्वज्ञान्यांपर्यंत प्रपंचाचा अर्थ म्हणजे तत्त्वज्ञान सांगणारे पुरुष कमींतकमी शंभर दीडशें झालेले आहेत आणि त्यांतील प्रत्येकाचें तत्त्वज्ञान दुस-याच्या तत्त्वज्ञानाहून भिन्न आहे अर्थात् मानवसमाजाच्या धडपडीचा अर्थं जो तो आपापल्या तत्त्वज्ञानाच्या धोरणानें करीत आहे. जेथें प्रमाणांचें बंधन नाही व निव्वळ कल्पनेचाच स्वैर संचार आहे, तेथें ज्याचा त्याचा अर्थ ज्याच्या त्याच्यापुरताच व खराच आहे. ज्यांची श्रद्धा ज्या तत्त्वज्ञानावर असेल, त्यांनीं त्याचा अर्थ स्वीकारावा आणि प्रपंच नेटानें व उत्साहानें चालवावा किंवा आलस्यानें किंवा औदासिन्यानें टाकून द्यावा. जसें ज्याचें तत्त्वज्ञान तसा त्याचा प्रपंच, हा सिद्धान्त आहे. विवक्षित काळीं कोणताहि समाज घ्या, त्यांत कोणतें तत्त्वज्ञान नांदत आहे, एवढें कळलें, म्हणजे त्याचें चरित्र कोणत्या प्रकारचें आहे व कोणत्या स्वरूपाचें होईल, ह्याचें स्थूल अनुमान बांधता येतें. 'यो यच्छ्रद्धस्स एव स:-' ।

४५. व्यक्तमध्य प्रपंचाच्या चरित्राची अशी असमाधानकारक स्थिति आहे. ती आजचीच आहे अशांतला प्रकार नाहीं. फार पुरातन काळापासून ती अव्याहत चालू आहे. आलों कोठून व जाणार कोठें, हा प्रश्न सोडवल्यावांचून, चाललें आहे काय, ह्या प्रश्नाचा उगलडा करता येत नाहीं. आणि हा उलगडा केल्याविना विचारी मनुष्याची चित्तशांति होत नाहीं. प्रपंच म्हणजे काय, हा शोध आज हजारों वर्षांपासून चालला आहे; व शेकडों शोधकानीं शेकडों उपपत्या काढिल्या आहेत. परंतु, सांगण्यास दु:ख वाटतें की, त्यांपैकीं एकहि उपपत्ति वर्तमानक्षणीं मनाला समाधान देणारी नाहीं.”आप एव ससर्जादौ” पासून “तत्त्वमति” पर्यंत शेकडों साध्या व भानगडीच्या उपपत्त्या युरोपांत व भरतखंडांत मागें निघाल्या होत्या व सध्यां निघत आहेत. परंतु, त्यांत गृहीत गोष्टींचा भाग बहुत व प्रमाणबद्ध पद्धतीचा अंश अत्यल्प आहे, असा संशय येतो. अशी संशयित स्थिति वर्तमानक्षणीं यद्यपि आहें, तत्रापि त्या त्या कालीं त्या त्या उपपत्तीनें मनुष्यमात्राचें समाधान झालेलें आहे. ह्यांत संशय नाहीं. मागील सर्व उपपत्या संशयग्रस्त आहेत, असें वर्तमानक्षणीं असणारे जे आपण त्यांना भासतें इतकेंच. परंतु, भूतकालीन लोकांचा प्रपंच, हा उपपत्या प्रमाणसिद्ध आहेत, असें निश्चयात्मक मत गृहीत धरून, चालला होता, हें इतिहासानें सिध्द आहे. सृष्टी निर्माण झाली कशी, तींत मनुष्याची स्थापना कोणत्या स्थलीं आहे, मानवसमाज कोणीकडे जात आहे, व व्यक्तिमात्राचें पर्यवसान कोठें होणार आहे, वगैरे बाबींचा निश्चयात्मक ऊहापोह ह्या उपपत्त्यांत केलेला असतो. तो सदा सशास्त्र व प्रमाणसिद्ध असतोच, अशांतला प्रकार नाहीं परंतु, त्याच्यावर तत्कालीन लोकांचा कांहीं काळ पूर्ण विश्वास बसलेला असतो, ही गोष्ट मात्र निर्विवाद आहे. ह्या विश्वासाचा अर्थ असा कीं, ह्या उपपत्यांवर मानवसमाजाच्या गतीचें व स्थितीचें धोरण अंशत: अवलंबून असतें. कां कीं, व्यक्तिमात्राचें व मनुष्यसमाजाचें आचरण त्याला जीं मतें विश्वास्य व अतएव उत्तमोत्तम वाटतात त्यांच्या अनुरोधानें चालत असतें. सारांश, ह्या तात्त्विक उपपत्त्या यद्यपि कमजास्त संशयित आहेत असें आपल्याला सध्यां वाटतें, तत्रापि त्यांच्या अनुरोधानें मानवसमाज चालतो, हें सिद्ध आहे. तत्त्वज्ञानाचा प्रपंचाशीं संबंध कसा जडलेला आहे, तें वरील विवेचनावरून स्पष्ट होतें.

४४. मानवसमाजाचा प्रारंभ केव्हां झाला व समाप्ति केव्हा होणार, हें इतिहासाला माहीत नाहीं. अलीकडील दहा पांच हजार वर्षांची थोडी फार हकीकत जाणतो. गीतेंत म्हटल्याप्रमाणें व्यक्तमध्य असा जो प्रपंच, त्याची मधली माहिती तेवढी प्रस्तुतकालीन मनुष्यांना मिळणें शक्य आहे. प्रपंचाचा आदि व अंत मनुष्यकल्पित शास्त्रांना उपलभ्य नाहीं. प्रपंच आला कोठून व जातो कोठं, ह्याचा निर्णय, आदि व अंत याची निश्चित कल्पना नसल्यामुळें, शास्राला करतां येत नाहीं. जो थोडासा मधला दुवा प्रत्यक्ष आज किंवा इतिहासानें कालपासून माहीत झालेला आहे, त्याची लांबी रूंदी मोजण्यांतच शास्त्र गुंतलें आहे. ही मोजणी करून, प्रगति झाली व अधोगति झाली, वगैरे विधानें शास्त्र करतें. जेथें प्रपंच निघाला कोठून व जातो कोणत्या स्थळाला, हें निश्चयानें ठाऊक नाहीं, तेथें, पुढे गेलों किंवा पाठीमागें आलों, हें ठरावयचें कसें, तेंच समजत नाहीं. अशी स्थिति असल्यामुळें, काल जेथें होतों तेथें आज नाहीं, काल जसा होतों तसा आज नाहीं, आणि वर्तमानक्षण गतक्षणाहून भिन्न आहे, ह्यापेक्षां जास्त वैशद्य विचारांत येणें दुरापास्त होतें. अफाट व अज्ञात समुद्रांत सांपडलेल्या दुर्बल होडग्यांतील माणसांची जशी दिशाभूल व्हावी, तशी स्थिति मानवसमजशास्त्राची आहे. होडग्यांतील चार माणसें वल्हीं मारीत आहेत, दोन माणसें ओरडून ववकृत्व करीत आहेत, व एक माणूस स्तब्ध बसलेला आहे, असा एकदां प्रकार इतिहासाला दिसत आहे. फिरून कांहीं वेळानें पहावे तर, सर्व माणसें एकमेकांशीं भांडत आहेत, व कांहीं माणसें मरून पडलीं आहेत, असा देखावा उघडकीस येतो. किंचित् थांबून पुन: पहावें तों, होडग्यांतील माणसांत तट पडून प्रत्येकजण दुस-याच्या विरुद्ध वल्हवीत आहे, आणि प्रत्येकाला आपलें वल्हवणें उत्तमोत्तम वाटत आहे, असा चमत्कार दृष्टीस पडतो. इतक्यांत समुद्रांत भयंकर वादळ होऊन, वक्त्तृत्व, वल्हवणें, तट, भांडण व माणसें पार नाहींशीं झालीं आणि समुद्र, होडी व वल्हीं मात्र शिलक राहिलीं, असा प्रळय होऊन गेलेला नजरेस येतो. पुन: मात्वयान् क्षणार्धांने पहावें, तर, समुद्र शांत आहे आणि होडींत माणसें पूर्वीप्रमाणें गजबज करीत आहेत व जोरानें वल्हवीत आहेत, असें पहिलेंच चित्र डोळ्यापुढें उभे राहतें. आणि हे सर्व चमत्कार पहाणारा व अनुभवणारा इसम कोण, तर होडींतल्या इसमांपैकींच एक ! होडींतल्या माणसांची प्रगति झाली किंवा अधोगति झाली, हें तों सांगणार व बाकीचे ते मानणार किंवा कदाचित् न मानणार !

४३. Science of History हे भ्रामकशब्द टाकून देऊन, मानवसमाजशास्त्र हे शब्द योजले म्हणजे दृष्टि विमल होते. 'एक: शब्द: सम्यग्युक्त: कामधुग् भवति'। गति व स्थिति ह्या दोन अर्थांच्या अनुरोधानें मानवसमाजशास्राचें दोन भाग होतात:-- (१) मानवसमाजगतिशास्त्र व (२) मानवसमाजस्थितिशास्त्र. अन्चयव्यतिरेकादि ज्या तर्कपद्धति आहेत त्यांच्या अनुसंधानानें मानवसमाजाच्या गतिस्थितीची नियमपरंपरा ठरवावयाची असते. वन्यावस्थेंतून संस्कृतावस्थेंत येत असतां, मनुष्यसमाज मुळीं साधा व बिनभानगडीचा जो होता, तो सध्यां पराकाष्ठेचा गुंतागुंतीचा व भानगडीचा झाला आहे, हें ज्ञान यूरोपीयन शास्त्र्यांना ह्या नियमपरंपरेपासून झालें आहे. परंतु, पुरातनकाळीं मानवसमाज वन्य व रानटी होता, हें विधान सिद्धान्तवत् नाहीं. कारण, अगदीं अलीकडे जे नवीन शोध झालेले आहेत, ते जमेस धरतां, असें म्हणणें प्राप्त होतें कीं, हिमप्रल्याच्याहिपूर्वी जिला वन्य म्हणतां येणें मुकील आहे अशी ज्या अर्थी, एक मानवसमाजाची शाखा होती, त्याअर्थी वन्यावस्था अशी अखिल मानवसमाजाची कल्पना निराधार आहे. केवळ पश्चात्प्रलयीन यूरोपीयनसमाज जर घेतला-- व तोच यूरोपीयन समाजशास्त्री घेतात-- तर ही कल्पना खरी आहे. आर्यांच्या समाजाचा इतिहास पहातां, ही कल्पना टाकून द्यावी लागते व इतिहासाला माहीत असलेल्या कोणत्याहि काळीं कोठें ना कोठें तरी आर्यसमाज सुसंस्कृतावस्थेंत होता, आणि इतर समाज संस्कृतावस्थेप्रत येत आहेत, असें व्यापक विधान करावें लागतें. अलीकडील नवे शोध लागण्याच्यापूर्वी यूरोपीयन शास्त्र्यांनी जी नियमपरंपरा सिद्धान्तवत् मानिली, ती सध्यां निराधार वाटावी, हें रास्तच आहे. मानवसमाजगतिशास्राचा असा हा दुहेरी सिद्धान्त प्रस्थापित केल्यावर, त्या समाजाच्या स्थितिशास्त्राकडे वळणें ओघासच येतें. कोणत्याहि काळीं मानवसमाजाची स्थिति म्हणजे मानवसमाजाच्या निरनिराळ्या घटकांचा नैकविध परस्परसंबधं कोणत्या नियमांनीं नियंत्रित झाला आहे तें स्थितिशास्त्रापासून कळतें. ह्या द्विमुख समाजशास्त्राची येथेंच गति थांबते. ह्या पुढील विचार दुस-या एका शास्त्रानें सांगण्याचा पत्कर घेतला आहे, त्याचा निर्देश करतों.

४२. कल्पनांचा किंवा तत्त्वांचा इतिहास व त्यांचें शास्त्र ह्या दोन बाबीं भिन्न आहेत. उदाहरणार्थ गणित घ्या. गणितशास्त्र निराळें व गणिताचा इतिहास निराळा. संस्थेच्या कल्पनेची उत्पत्ति, बाल्यावस्था, वृद्धि, अपकर्ष, उत्कर्ष ह्या प्रकरणांची हकीकत गणिताच्या इतिहासांत येते; आणि संस्थेचे यच्चयावत् नियम गणितशास्त्रांत प्रतिपादिलें जातात. कोणत्याहि कल्पनेच्या चरित्राचा वृत्तान्त इतिहासांत येतो आंणि विवक्षित कालीं त्या कल्पनेची जी गति व स्थिति तिचा सोपपित्तक परिष्कार शास्त्र करतें. शास्र व इतिहास ह्यांचीं हीं लक्षणें मनुष्यसमाजाला लावलीं म्हणजे मानवसमाजाचा इतिहास मानव समाजाच्या शास्त्रापासून भिन्न आहे, हें स्पष्ट होतें. मानवसमाजाच्या चरित्राचा जो वृत्तान्त तों इतिहास होय, व त्या मानवसमाजाच्या गतिस्थितीच्या कार्यकारणांची जी नियमपरंपरा तिला मानवसमाजशास्त्र म्हणतात. ह्या मानवसमाजशास्त्रालाच कित्येक यूरोपीयन लोक Science of History अशी संज्ञा देतात आणि ह्या चुकलेल्या संज्ञेच्या जोरावर नानाप्रकारचे अनर्थ करतात. Science of History म्हणजे इतिहासाचें शास्त्र असा वास्तविक शब्दार्थ आहे. परंतु तो ह्या लोकांना विवक्षित नाहीं. Science of History, ह्या शब्दसमूहांत History ह्या पदाचा अर्थ ते “मनुष्यसमाजाची चळवळ” 'मनुष्यसमाजाचें चरित्र' असा करतात. वस्तुत: History म्हणजे चरित्राची भाषेंत दिलेली हकीकत होय. येणेंप्रमाणें 'चरित्र' व चरित्राची हकीकत ह्या दोन अर्थांचा घोटाळा करून Science of History हे शब्द यूरोपीयन लोक योजतात. Science of History ह्या शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे. Method of history म्हणून ज्याला म्हणतात, त्यालाहि हे लोक Science of History च म्हणतात. Historical Method नें एखाद्या विषयाचा, वस्तूचा, किंवा कल्पनेचा विचार करावयाचा म्हणजे आदिपासून आतांपर्यंत त्या विषयाच्या, वस्तूच्या, किंवा कल्पनेच्या विचार कल्पनेचा चरित्राचा विचार करावयाचा. म्हणजे कालानुक्रमिक पद्धतीने जो विचार करावयाचा, त्यालाच ऐतिहासिक पद्धति म्हणावयाचें असें होतें. ऐतिहासिक पद्धति म्हणजे इतिहास लिहिण्यांत ज्या पद्धतीचा प्राधान्यान उपयोग करतात ती. कालाशिवाय इतिहास नाहीं. तेव्हां ऐतिहासिक पद्धती म्हणजे दुसरें तिसरें कांहीं नाहीं, कालानुक्रमिक पद्धतीच आहे. यूरोपीयन लोकांनीं लिहिलेल्या इतिहासांत Science of History हें एक मोठें बंड आहे. परंतु, ह्या शब्दांना कांहीएक अर्थ नाहीं. हे शब्द यूरोपीयन इतिहासकारांच्या लिहिण्यांतून जितके लवकर जातील तितके उत्तम.

४१. आर्य, दानव, असुर, मोगल वगैरे लोकांचे म्हणजे अखिल मनुष्यजातीचें चरित्र उत्कटत्वानें वासनैकजन्य असतें, असें विधान येथपर्यंत वारंवार करीत आलों आहें. ह्मा वासना दोन प्रकारच्या असतात:--विकरोभ्दूत वासना व विचारोभ्दूत वासना. ह्या दोन्ही प्रकारच्या वासनांच्या फलद्रूपतार्थ संस्धायंत्रें निर्मिलीं जातात. यंत्रणाचा उपयोग विकारांच्या समाधानार्थ जसाजसा वारंवार झालेला दृष्टीस पडतो, तसाच विचारांच्या समाधानार्थहि कधीं कधीं झालेला आढळून येतो. शत्रुत्वबुद्धीनें किंवा अन्नार्थ मनुष्य, पशु. पक्षी ह्यांची हत्या करण्याकरितां, किंवा परदेश, परधन, परदारा अपहरण करण्याकरितां जशीं राज्य, सैन्य वगैरे यंत्रें हमेश बनविलीं जातात, तसें कधीं कधीं मनुष्य, पशु, पक्षी वगैरेंचे जीव वांचविण्याकरितांहि अस्पष्ट प्रयत्न होत असतात. शरीराच्या पोषणार्थ, संरक्षणार्थ व उपभोगार्थ पदार्थ तयार करण्याकरितां जशा शिक्षणसंस्था स्थापिल्या जातात, तशाच, केवळ आंतर व बाह्यसृष्टीचें ज्ञान मिळविण्याकरितां देखील, लहानसहान सोई करण्याकडे मनुष्यसमाजाची प्रवृति असते. आतां इतकें कबूल केलें पाहिजे कीं, समाजसंरक्षणार्थ किंवा समाजपोषणार्थ जशा प्रचंड संस्था निर्मिल्या जाताता, तशा सदयता, सभ्यता व ज्ञानसंपन्नता यांच्या प्रीत्यर्थ निर्मिल्या जात नाहींत. ह्या दोन प्रकरणांत अशी जरी भेदबुद्धि आहे, तत्रापि संरक्षक व पोषक संस्थांच्या निर्माणांतहि विचाराचा अंश दिसून येतो. संस्था निर्माण करणें म्हणजे अव्यवस्था मोडून व्यवस्थेचा पाया घालणें आहे. आणि व्यवस्था म्हणजे विचाराचीच एक बाजू आहे. तेव्हां विकारांच्या समाधानार्थ निर्मिलेल्या संस्थांतहि विचाराचा अंश कमजास्त मानानें असतोच. हा जो विचाराचा अंश त्याच्याकडेच तेवढी दृष्टि देऊन कित्येक लोक इतिहास लिहीत असतात. History of Rationalism in Europe, History of Morals in England, Histoty of Civilization in France, वगैरे इतिहास सुवासनोभ्दूत स्वतंत्र विचाराचा संग्रह ऐतिहासिकरीत्या करीत असतात. असले इतिहास म्हणजे त्या त्या देशांतील Irrationalism, Immorality व Barbarism ह्यांची प्रखर व प्रचंड निंदाच होय. ह्यांना Histories of ideas म्हणून म्हणतात. असले इतिहास समाजाच्या चरित्राच्या एकाच धाग्याचा छडा लावीत असल्यामुळें जात्याच एकदेशीं असतात. ते एका दृष्टीनें यद्यपि अत्यंत महत्चाचे आहेत, तत्रापि एकदेशीयत्चाच्या दोषानें लिप्त असल्यामुळें, असमाधानकारकच म्हटले पाहिजेत. खरा, समग्र व विश्वसनीय इतिहास म्हटला म्हणजे तो, कीं ज्यांत Rationalism व irrationalism Morality व immorality आणि Civtlization व Barbarism, ह्यांची हकीकत, आवडीनिवडीचा कांटा कोणीकडेहि यत्किंचित् झुकूं न देतां. झाली असेल तशी साद्यंतनमूदली जाते. Rationalism, Barbarism वगैरे तत्वाच्या इतिहासाप्रमाणेंच, Millitarism, Marerialism, Socialism, Anarchism, Science, Literatuat, वगैरे तत्त्वांचे इतिहास Histories of ideas या सदराखालीं मोडतात. असल्या इतिहासांत एकेका कल्पनेच्या उगमाची, वृद्धीची, अपकर्षाची, उत्कृषची व झाला असल्यास नाशाची हकीकत दिलेली असते. कल्पनांचे इतिहास म्हणजे त्यांचीं चरित्रेंच होत.

३८. कौलिक पद्धतीनें कुल, उपकुल, राष्ट्र, लोक, वर्ग, व्यक्ति वगैरे विभाग पाडून, शरीरक पद्धतीनें वर्ग, लोक, राष्ट्र, वगैरेंतील संस्थांच्या वासनांचें, शरीरांचें व कार्यांचें वर्णन दिक्कालावच्छेदानें दिलें म्हणजे इतिहासाची कामगिरी संपली. अशा वर्णनांत मनुष्यसमाजाच्या सर्व प्रकारच्या हालचालींची हकीकत येते.

३९. पृथ्वीवरील निरनिराळ्या नष्ट व हयात समाजांची तुलना करण्यानें जी कांहीं सिद्धान्त-परंपरा बनते तिला समाजशास्त्र म्हणतात. निरनिराळ्या नष्ट व हयात राष्ट्रांतील राज्ययंत्रांची तुलना करून जी सिद्धान्तपरंपरा बनते तिला राज्ययंत्रशास्त्र अशी संज्ञा आहे. शासनशास्त्र, धर्मशास्त्र, स्धानिकराज्ययंत्रशास्त्र, राज्यनीतिशास्त्र, भाषाशास्त्र आचारशास्त्र वगैरे शास्त्रें तुलनापद्धतीनें निर्माण होतात. समाजशास्त्र किंवा राज्ययंत्रशास्त्र म्हणजे समाजांचा किंवा राज्ययंत्रांचा इतिहास नव्हे, हे लक्षांत घेतलें पाहिजे. कित्येक इतिहासकार आपापलीं समाजशास्त्रीय, राज्ययंत्रशास्त्रीय, राज्यनीतिशास्त्रीय, किंवा नीतिशास्त्रीय परिपक्क किंवा अपरिरक्क मतें व्यक्ति, वर्ग, राष्ट्र इत्यादींच्या इतिहासांत देत असतात व अशा इतिहासांना Rafiective history, philosophical history,इत्यादि नामाभिधानें मिळत असतात. असले इतिहास खुशालचंद वाचकांस कितीहि मनोरंजक वाटोत किंवा लेखकाच्या अवकलोकनशक्तीची किंवा विचारशक्तीची कितीहि महती वाढवोत, त्यांना निर्भेळ इतिहास हें नांव देतां येत नाहीं. त्यांना Ethics of history हें नांव उत्तमोत्तम शोभतें.

४०. कित्येक इतिहासांना Critical असें विशेषण लावतात. असल्या इतिहासांत हकीकत देतांना प्रसंगांची, तारखांची, मतांची, किंवा संस्थायंत्रांची विवेचक दृष्टीनें जागजागीं छान करुन दाखविलेली असते. येथें एवढें लक्षांत घेतलें पहिजे कीं, प्रसंगांची तारखांची, मतांची, किंवा संस्थायंत्रांची विवेचक दृष्टीनें छान करणे म्हणजे इतिहास लिहिणें नव्हे, इतर ग्रंथकारांशीं वाद घालणें म्हणजेहि इतिहास लिहिणें नव्हे. ही इतिहास लिहिण्याच्या पूर्वीची तयारी होय विवेचक पद्धतीचा उपयोग प्रत्यक्ष इतिहास लिहितांना करावयाचा नसतो. तर साधनें व सामग्री तपासून व छान करून घेतांना ह्या उत्कृष्ट पद्धतीचा उपयोग व्हावयाचा असतो. नवीन इतिहास लिहितांना सिद्धांर्थ मूळांत घालणें व सिद्धार्थाची सिद्धि ज्या विवेचनपद्धतीनें केली, तो टीपांत देणें सोईस्कर व सशास्त्र असतें. प्रयोग दाखविण्याच्या रंगभूमीवर, नेपथ्यांतील सजवासजव व कुजबुज अप्रस्तुत व ग्राम्य होय. ह्या विवेचक किंवा Critical पद्धतीलाच Logic of History असें नांव आहे.

इ. स. १६२८ तली एक लेख

अज् दीवाणे रख्तखाने खास वजानेबू कारकुनानी व देशमुखानी प।। पुणें व मुकासाईयानी व हुदेदारानी अजहतदी मुकासाई हाल व इस्तकबाल व मोकदमानी मौजे देऊळगौ नजदीक आलेगौ कर्याती पाटस प॥ मजकूर बिदानद. सु।। सन तिसा असर अलफ. दामोधरभट बिन नारायणभट व रामेश्वरभट बिन नारायनभट साकिन आरवी मुद्रल बंदगी हजरती माळून केले जे, आपणियासी इनाम जमीन सेत खुद खासा दोरी सवा दर सवाद मौजे देउळगौ नजदीक आलेगौ कर्याती पाटस परगणे मजकूर ब॥ हुज्जती हैबतखान सलाम अलफ आहे. येणेप्रमाणें फर्मान करूनु देणे म्हणोन. रोखा ममलकत मदारी मलक अंबर एकंदर इनामदारानी तिसा असर अलफ छ २० माहे सौवालु आहे. फर्मान म-हामती होये. मालूम जालें बा। ई आ। ती दिवाण खासा बराये ई रुके ७ देवविले. दामोधरभट बिन नारायनभट व रामेस्वरभट बिन नारायनभट साकिन आरवी मुद्रळ यांसीं इनाम जमीन सेत खुद खासा दोरी सवा दर सवाद मौजे देउळगौ ना आलेगौ कर्याती पाटस पा। मजकूर बा। हुज्जती हैबतखान सलास अलफ दिधले आहे, तेणेप्रमाणें करार केले असे. ता। सबा असर अलफ जैसा भोगवटा व तसरुफाती चालत असेल तेणेप्रमाणें दुमाला कीजे. दर हर साल फर्मानाचा उजूर न कीजे. तालीक घेऊन असली फिराऊन दीजे. वा रोखा मा। मा। मलक अंबर एकंदर इनामदारानी तिसा असर अलफ छ २० सौवालू प्रा। दामोदरभट व रामेस्वरभट सेत दोरी बा। सवाद दफ्तर यास मोर्तब सूद. १।

रुजू सूद. रुजू मुजमू. रुजू सुरनवीस.
तेरीख २७ माहे सफर समान इसरैन अलफ.
पा। हुजूर.

सप्रसूद सप्रसूद सप्रसूद सप्रसूद सप्रसूद
मुश्रीफ दफ्तरदार  मजमू  न्याबती सूरनिवीस 
बारसूद  बारसूद  बारसूद  बारसूद  बारसूद 
तालीकसूद  तालीकसूद    तालीकसूद   तालीकसूद

हा लेख अहमदनगरच्या निजामशाहींतल्या शहाजी भोसल्यांच्या राजोपाध्यांना इनाम दिल्यासंबंधाचा आहे, व तो साता-यांतील भाऊसाहेब राजोपाध्ये ह्यांच्या, दफ्तरांतील आहे. हा दोन भाषांत लिहिला आहे. प्रथम सर्व मजकूर फारशी व नंतर त्याच्या खालीं तोच मजकूर भाषांतर करून मराठींत दिला आहे. मराठी मजकुरांची लिपी मोडी आहे. हा मराठी मजकूर जशाचा तसाच वर दिला आहे. हें मराठी सध्यांच्या महाराष्ट्रांतील कोणा फारशी न जाणणा-याला समजेल असें वाटत नाहीं. तरी इ. स. १६२८ त हें मराठी महाराष्ट्रांत सरकारदरबार करणा-या लोकांना समजत असे असें दिसतें. ह्या लेखांत एकंदर २३६ शब्द आहेत. पैंकीं विशेषनामें सोडून दिलीं असतां, फक्त ३४ शब्द मराठी आहेत, व तेहि प्रायः तदर्थवाचक फारशी शब्दाचें भाषांतर आहेत.
आतां ह्या इ. स. १६२८ तील लेखाशीं तुलना करावयास इ. स. १७२८ च्या सुमाराचा एक लेख देतों. 

 

३७. वासना--यंत्रणा--व साधना, किंवा इच्छा--शरीर--व कर्म, अशी मानवसमाजाच्या चळवळीची त्रिविध परंपरा आहे. ह्या त्रिविध परंपरेची हकीकत देणें म्हणजेच इतिहास लिहिणें होय कोणत्या वासनेकरितां संस्थायंत्राचें कोणतें इंद्रिय निर्माण झालें, त्या इंद्रियानें इष्टकार्य कितपत होतें, व तें इंद्रिय सबंध यंत्राच्या अनुरोधानें चालतें किंवा प्रतिरोधानें चालतें, ही हकीकत देण्याचें काम शरीरकपद्धतीचें असतें. वस्तुत: पाहतां संस्थांच्या शरीरांपेक्षां शरीराच्याद्वारा झालेलें जें काम त्याच्यांशीं इतिहासाचें मुख्य कर्तव्य आहे, परंतु, काम सिद्ध व्हावयाला शरीराची अपेक्षा असल्यामुळें व शरीराच्या सिद्धयर्थ समाजाची झटपटहि विशेष असल्यामुळें, किंबहुना शरीराची रचना व सुधारणा हेंच कांहीं काल किंवा सर्वकाल राष्ट्राचें मुख्य कर्तव्य होऊन बसल्यामुळें, शरीर, शरीररचना व शरीरसुधारणा, हाच इतिहासाचा एक मुख्य विषय झाला आहे. History of English Parliamentary institutios, History of English Constitutional Govermnrnt, History of French Parliamentary procedure, History of Garman Religious, Social, Moral, educational legal and bellicose institions, वगैरे इतिहास त्या त्या संस्थांच्या शरीररचनेचे आहेत. असले इतिहास लिहिण्याला शरीरक पद्धतीचा उपयोग होतो. असल्या इतिहासांत वासना, तत्सिद्धयर्थ उत्पन्न झालेलें संस्थायंत्र व त्या यंत्रानें केलेलें कार्य, ह्यांची हकीकत येते. बहुतेक सर्व जगाचें चरित्र व विशेषत: असुर, दानव व मोगल, ह्या कुलांचे चरित्र उत्कटत्वानें वासनोत्पन्न आहे. तेव्हां, ह्या पद्धतीला वासनिक पद्धति म्हटलें असतांहि चालेल. यूरोपीयन लोक हिला Morphological व Physiological पद्धति म्हणतात. Morpholoical पद्धती केवळ संस्थाशरीरीचें वर्णन देते व Physiological पध्दती शरीरेंद्रियांची लक्षणें देते. शरीर व शरीराची लक्षणें दिल्यावर, शरीरानें केलेल्या कार्यांची हकीकत जें देणें त्याला Resultant पद्धती असें नांव द्यावें लागेल. तर्कशास्त्रदृष्ट्या पहातां, ही तिसरी पद्धती यूरोपीयन इतिहासकारांनीं काढावयाला पाहिजे होती ! परंतु ती त्यांनीं निराळी काढली नाहीं. संस्थाशरीराचा ऊहापोह करतांनाच ते तत्कृतकार्यांची हकीकत देतात. ह्याचा अर्थ असा कीं, वासना- शरीर-व कार्य, ही त्रयी इतकी एकजीव आहे कीं, तिचें पृथक्करण करण्यापासून विशेष सौकर्य नाहीं. वासनेचा निर्देश केल्यावांचून शरीर निर्माण कां झालें तें सांगतां येत नाहीं व कार्याचा निर्देश केल्यावांचून शरीराचीं लक्षणेंहि ठरवितां येत नाहींत. ही अडचण लक्षांत घेऊन, शरीरक म्हणून एकच पद्धती मीं स्वीकारिली आहे. शरीरक शब्द शारीरक शब्दापासून भिन्न समजावा. शरीरासंबंधी जें तें शरीरक; व शरीराचा चालक जो आत्मा तत्संबंधी जें तें शारीरक, असा अर्थ घेतला आहे.

चवथ्या वाक्यांत तीनच शब्द शुद्ध मराठी आहेत, व दुंबाला क्रर्दन् (म्हणणे-कडे देणें) हें फारशी संयुक्त क्रियापद योजिलें आहे. पांचव्या वाक्यांत, पहिल्यांदा ह्या अर्थी पहिलें हा शब्द योजिला आहे व तो फारशी अव्वल ह्या शब्दाप्रमाणें हुबेहुब योजिला आहे. पुढील पांचही वाक्यांची व्यवस्था म्हणजे लिहिणा-याच्या मनांत मूळ मजकूर प्रथम फारशी शब्दांच्या व प्रयोगांच्या रूपानें येतो व नंतर मूळ फारशी शब्दांपैकी ठळकठळक शब्द जसेचे तसेच मराठी भाषांतरांत राहून, संयुक्त क्रियापदांचें, शब्दयोगी अव्ययांचे व निपातांचे प्रयोग फारशी प्रयोगांच्या धर्तीवर दियानतराव विजापूरच्या आदिलशहाचा दफ्तरदार असल्यामुळे त्याचें मराठी फारशीच्या धर्तीवर जातें अशी येथें शंका आणितां येईल. परंतु ह्याच वेळचीं शिवाजीचीं पत्रे पाहिलीं असतां ही शंका अवास्तव आहे असें दिसून येईल. प्रस्तुत खंडांतील ३६ वा लेखांक इ. स. १६७७ त शिवाजीनें काढिलेलें एक आज्ञापत्र आहे. ह्या लेखांतील १ बिन, २ फिरंगोजी, ३ हवालदार, ४ इमारत, ५ मजकूर, ६ हवाला, ७ सरंजामी, ८ मजमूदार, ९ तैनात, १० तपशील, ११ खासा, १२ सालीना, १३ चाकर, १४ रिवाज, १५ हुजूर, १६ पोता, १७ आसासी, १८ नून, १९ वा॥, २० पा।, २१ रास, २२ सदर्ह, २३ बाकी, २४ वजा, २५ वजावाटा, २६ बेरीज, २७ मजुरा, २८ सुरू, २९ सूद, ३० बार, ३१ व इतकें शब्द फारशी आहेत व ह्यांपैकीं कित्येक शब्द दोन दोनदा तिनतिनदा आले आहेत. हवालदार इ इमारत इ कोट इ उटलूर, हा प्रयोग शुद्ध फारशी आहे. केदारजी बिन फिरंगोजी, इमारतमजकूर, हवाला देणें, सरंजामी करणें, खासा तैनात सालीना, हुजूरपोतापैकीं, रास केले असेत, वजा करणें, बजावटा, बेरीज घेणें, मजुरा असें, सुरू सूद, बार, हे सर्व प्रयोग फारशी आहेत लेखाच्या प्रारंभींचा मायना तेवढा शिवाजीनें संस्कृत बनविला आहे. परंतु त्यांतहि, यासि आज्ञा केली ऐसी जे, हें ऊरा हुक्म फर्मूद के, ह्मा फारशी शब्दांचें भाषांतर आहे. यासि आज्ञा करतो ह्याअर्थ अस्मै आज्ञां करींति, असा प्रयोग संस्कृतांत किंवा महाराष्ट्रांत होत नाहीं, एनं आज्ञापयति, असा होतो. आतां इतकें खरें आहे कीं, दियानतरावाच्या पत्रांतल्यापेक्षां शिवाजीच्या पत्रांत मायन्यांतले शब्द बरेच संस्कृत आहेत. परंतु शिवाजीच्यापूर्वी तीनशें वर्षे फारशी शब्दांचा व प्रयोगांचा जो बेसुमार भरणा मराठींत होत होता तो राजव्यवहारकोशादि साधनांनीं भाषा सुधारणा-या ह्या शककर्त्यालाहि पदोपदीं स्पर्श केल्यावांचून राहिला नाहीं. शिवाजीच्या नंतर मराठ्यांचा व्याप सर्व हिंदुस्थानभर झाल्यामुळें व चोहोदिशांनीं मुसुलमानी संस्थानांशींच व्यवहार करावयाचा असल्यामुळें मराठी भाषेंत रूढ झालेले फारशी शब्द कायम राहून, शिवाय आणीक हजारों फारशी शब्द ह्या भाषेत सारखे शंभर वर्षे शिरत होते. परंतु अठराव्या शतकांत पेशव्यांच्या अमलांत झालेला हा फारशी शब्दांचा शिरकाव चौदाव्या, पंधराव्या व सोळाव्या शतकांतल्याप्रमाणें मराठीला मागें सारून होत नव्हता, तर मराठीची मर्जी संभाळून होत होता. हा प्रकार कसा होत होता, ह्याच्या विशदीकरणार्थ शिवाजीच्या पूर्वीचा एक फारशीं-मराठी लेख देतों व नंतरचा पेशवाईतला एक देतों.