प्रस्तावना
६. हा व्याप झेंपण्याचा प्रयत्न एकदम जरी नाहीं, तरी आस्ते आस्ते होत आहे. इतिहासाची गोडी महाराष्ट्रांत आज दोनतीनशें वर्षांपासूनची आहे; व त्याचीं साधनें प्रकाशित करण्यापासून कांहीं फायदा आहे, असे मत अलीकडे सार्वत्रिक झालें आहे. परंतु, प्रकाशनाच्या कामीं येणारा खर्च सोसण्यास लोक जितपत तयार असले पाहिजेत, तितपत नाहींत, असें, ऐतिहासिक पुस्तकांच्या व मासिकांच्या तुटपुंज्या खपावरून, म्हणावें लागतें. पण ही बाब सामान्य लोकांची झाली. असामान्य लोक म्हणजे शिक्षणाच्या अत्युच्च शिखराप्रत जाऊन पोहोंचलेले लोक पहावे, तर तेहि लेखप्रकाशनाला कांही मदत करतात, असें दिसत नाहीं. सामान्य लोकांत शंभर वर्गणीदार जर मिळाले, तर ह्या असामान्य लोकांत एकहि मिळण्याची मारामार पडते. म्हणजे वस्तुत: अशिक्षित लंगोट्यांची व ह्या सुशिक्षित पाटलोण्यांची योग्यता बहुतेक सारखीच आहे. अत्यंत अशिक्षित व अत्यंत सुशिक्षित अशा ह्या निरुपयोगी लोकांना सोडून दिलें, म्हणजे बाकी राहिलेला जो आमच्यासारखा सामान्य लोकांचा वर्ग, तोच ह्या कामाला कांहीं उपयोगी पडला तर पडेल. आतांपर्यंत जें प्रकाशन झालेलें आहे, तें याच लोकांच्या सहानुभूतीनें व आश्रयानें झालेलें आहे, आणि पुढें व्हावयाचें तें याच लोकांच्या मदतीनें होईल अशी उमेद आहे. इतकेंच कीं, ह्या लोकांच्यापुढें आपली फिर्याद यथास्थित रीतीनें मांडली पाहिजे. राष्ट्ररचनेंत इतिहासाची कामगिरी काय, व त्याच्या साधनांचे कार्य कोणतें, हें जर ह्या सारासारविचारी पंचापुढें मांडलें, तर ते या कामाला हळूंहळूं खात्रीनें साहाय्य करतील, अशा प्रेमळ आशेनें पुढील विवरण करण्याचें योजिलें आहे. ह्या विवरणांत, इतिहासाचें खरें स्वरूप काय सध्यां आपल्या देशांत तो कोणत्या रूपानें दाखविला जातो व वस्तुत: तो कोणत्या रूपानें दाखविणें जरूर आहे, ह्या तीन प्रकरणांचा विचार कर्तव्य आहे.
७. इतिहासाचें खरें स्वरूप काय, ह्या मुद्याला हात घालण्यापूर्वी एका कच्च्या इंग्रजी कल्पनेला कांट देणें जरूर आहे. History is past politics and politics is present history, असें विधान कित्येक इंग्लिश इतिहासकार करतात. इतिहास म्हणजे गतराजकारण व राजकारण म्हणजे वर्तमान इतिहास, हें इतिहासाचें लक्षण सर्वस्वीं अपुर्ते आहे. मानवसमाजाच्या चरित्रांत राजकारणाखेरीज इतर अनेक व्यवहारांचा समावेश होत असतो. धर्म, आचार, विद्या, व्यापार, वगैरे अनेक व्यवहारांच्या घडामोडी राष्ट्रांत होत असतात आणि त्यांचा समावेश समाजाच्याच रित्रांत करणें अत्यावश्यक असतें. केवळ राजकारणाचाच तेवढा विचार करून इतिहासाला थांबतां येत नाहीं केवळ राजकारणावरच उदरनिर्वाह करणा-या इंग्लंडसारख्या देशांतल्या इतिहासकारांना इतिहासाचें व राजकारणाचें समानाधिकरण भासत असेल. परंतु, इतर देशांतील इतिहासकारांना तें तसें भासत नाहीं, ही निर्विवाद गोष्ट आहे, इतर देशांत राजकारणाला फारसें महत्त्व देत नाहींत, अशांतला भाग नव्हे. तर राजकारणाप्रमाणेंच, धर्मकारण, व्यापारकारण, समाजकारण, वगैरे अनेक कारणांचें महत्व त्या देशांतील इतिहासकारांना सारखेंच वाटतें. सबब, इतिहास म्हणजे राष्ट्रांचें सर्व त-हेचें गतकालीन चरित्र व सर्व प्रकारचें वर्तमान चरित्र म्हणजे वर्तमान इतिहास, असें लक्षण स्वीकारणें अपरिहार्य आहे. इंग्लिश इतिहासकारांच्या ध्यानांत हें व्यापक लक्षण येऊं लागलें नाहीं असें नाहीं. परंतु, तें ध्यानांत ठेऊन, नांव घेण्यासारखा इंग्लंडचा इतिहास इंग्लिश इतिहासकारांकडून अद्याप लिहिला गेलेला आढळांत नाहीं. इंग्लंडच्या इतिहासावर सर्व त-हेनें व्यापक असा विचार जर्मन व फ्रेंच इतिहासज्ञांकडूनच थोडाफार झालेला आहे. १८६० पासून १८८० पर्यंत इंग्लिश इतिहासकारांतला प्रमुख असा जो फ्रीमन तो History is past politice हें वचन सिध्दान्तवत् मानी.