त्यांचीं वतनें व जमिनी त्याजकडे चालणार नाहींत. लष्करवाले व हरएक कोणी मुलुख लुटतील व वाट भारतील ते जिवानिशीं गेल्या शिवाय राहणार नाहींत. तारीख ११ माहे फेब्रुवारी सन १८१८ ईसवी मुतावी छ ५ रवीलाखर. याप्रमाणें जाहीरनामा केला. आणि सारे लष्करांपैकीं सडी फौज व तुरक स्वार घेऊन इस्मीत साहेब बाजीराव साहेब यांचे मागें गेले. बाकी फौज मोठया तोफा सुध्दा अल्पिष्टिन साहेब किल्ले घ्यावयाकरितां सिंहगडास आले. शिवापुराकडून कल्याण दरवाज्याखालीं लष्कर उतरोन मोर्चे किल्यास दिल्हे.
(५१) इस्मीत साहेब यांचे लष्कर श्रीमंताचे मागें जावयाचे बातमीवर श्रीमंत निघोन सोलापुरास गेले. तेथें सदाशिवपंत भाऊकडील आबा पुंडले मामलेदार व मल्हारराव बाजी वगैरे मंडळीस कैद करून त्यांचा ऐवज धोत्रीस होता तो काढून किल्ल्यांत विसाजीपंत देवराव यास ठेऊन फौज सुध्दा टेंबुर्णीकडून गोपाळाच्या अष्टीवर मुक्कामास गेले. ती बातमी इस्मीत साहेब यांस बेलापुरास समजली. तेथून रातोरात जाऊन माघ शु॥१४ सह १५ शुक्रवारीं छ १२ रबिलावरीं जाऊन दोन गोळे श्रीमंताचे लष्करांत मारिले. श्रीमंतास बातमी नवती. त्याजमुळें हवालदील होऊन पळों लागले. बापू गोखले तयार होते ते पुढें आले. त्यास गोळया लागोन ठार जाले. आनंदराव बाबर, गोविंदराव घोरपडे त्याजबरोबर पडले. आणखी कांहीं लोक पडले व जखमी झाले. बुणगे श्रीमंताचे लुटले गेले. श्रीमंत निघोन गेलें. सातारकर महाराज यांस इशारा होता त्याजवरून ते मागें राहिले. त्यास इस्मीत साहेब यांणीं आपले लष्करांत आणून मुक्काम केला. नंतर त्यांची व अल्पिष्टण साहेब यांची भेट करावयाकरितां माघारे बोलेसरावर आले.
(५२) सिंहगड किल्ला एक दिवस लढला. नंतर छ २३ रबिलाखर १-३-१८ माघ वद्य रविवारी सर करून फौज रफीजरनेल साहेब याजबराबर पुरंदरास पाठवून अल्पिष्टण साहेब महाराजांचे भेटीकरिता थोडीशी सडी फौज घेऊन गेले. छ २५ र॥ खरीं ३-३-१८ महाराजांच्या व त्यांच्या भेटी होऊन महाराज अल्पिष्टण साहेब यांचे लष्करांत आले. इस्मीत साहेब श्रीमंतांचे मागें गेले. अल्पिष्टण साहेब महाराज याजला घेऊन जेजोरीस जाऊन वीरवाल्यावर गेले. तेथें रफीजरनेल साहेब लष्करसुध्दा आले. त्यासुध्दा पुरंदराखालीं आले. सासवडास आबा पुरंदरे यांचे वाडयांत लोक होते त्याणीं गोळे मारिले. सबब त्यांची हत्यारे घेऊन त्यांस काढून दिल्हे. नंतर पुरंदर किल्ला घेतला.
(५३) मुंबईकडून फौज येऊन कोकणचे किल्ले सर केले व जरनेल मनरो साहेब कर्नाटकातून फौज घेऊन येऊन बदामी, बागलकोट, बेळगाव वगैरे किल्ले घेऊन तिकडील
बंदोबस्त संस्थानिकसुध्दा केला.
(५४) मानाजी आंग्रे मृत्यु पावले. त्यांचे पुत्र राघोजी आंगरे यांस श्रीमंतांनी पळत फिरतां वस्त्रें पाठविली.
(५५) भोसले याणीं जनकान साहेबांशी लढाई करावयाचा मोकदमा नसतां बाजीराव साहेब यांचे संकेतावरून आपण होऊन जाऊन लढाई केली. जनकीन साहेब यांजवळ थोडी जमेत असतां हाल्ला केला. याजमुळे भोसले शिकस्त झाले. नंतर बोलणें लाविलें आणि पळोन जावयाची तजवीज केली. ही बातमी समजतांच कैदेंत ठेऊन प्रयागास रवाना करीत असतां मार्गात पाहारा फिताऊन रात्रीस पळोन गेले. रघोजी भोसले यांच्या बायका वगैरे यांचा बचाव इंग्रजांनी करून त्यांचे मांडीं दत्तक पुत्र गुजर कन्येचा देऊन, त्याचें नांव रघोजी भोसले ठेऊन, त्यास अधिकार देऊन, इंग्रजी सरकारचे विचारें संस्थान चालविले.
(५६) येशवंतराव होळकर याचा लेक मल्हारराव यांणीं बाजीराव यांचे संकेतावरून माळवे प्रांती मलकड साहेब यांशी लढाई केली. या लढाईत होळकर शिकस्त झाले. मलकड साहेब यांणी त्याशी तहनामा करून बंदोबस्त केला.
(५७) गोपाळराव मुनशी मार्गशीर्ष शु॥ ७ छ ५ सफर १५-१२-१७ मुक्काम वाई मृत्यु पावले.
समाप्त