[७] श्रीनिवास १७२६
श्रियाविराजित राजन्य राजश्री राजीपंत स्वामी गोसावी याशी.
सेवक केशवराव रघुनाथ कृतानेक नमस्कार८. विनंति. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. तुह्मी र॥ रुद्रोमेलगीर या समागमें पत्र सुटविले. सुसमयीं प्रविष्ट होऊन लेखनार्थ कळों आला. त्या प्रांतें सुभ्याचे मुक्काचें वर्तमान लिहिलें कळों आलें. व निरंतर तिकडील वर्तमान परस्परें कळतच आहे. राजश्री रावसाहेब व राजश्री वजारमाब व मोगल सर्व एकत्र होऊन मनसबा उत्तमच केला. दौलतेंत कांही ताकद नसतां लौकिक उत्तमच केला. मुख्य गोष्ट राजश्री रावसाहेब पुण्यवंत त्यामुळे सर्वत्र यशच येतें. राजश्री९ नाईक त्या प्रांतींच राहिले. राजश्री आबाजी नाईक मात्र आले. बारामतीस आहेत. फौजबंदी करितात. राजश्री स्वामीस कांही नवा जिल्हा मामला सरंजाम मागावयाच्या विचारांत असेत. देतील न देतील या दावेयामुळें राजश्री राव वजारतमाब याचा लौकिक उत्तम जाला, राजश्री स्वामी निरंतर तारीफ करितात, येणेंकरून घोरपडे त्या प्रांतें आहेत त्याशी बोलावें, सलूक राखावा, ऐंसे जालें. इतके दिवस घोरपडे कोण्हीकडे आहेत ऐसें होतें. राजश्री स्वामींच्या चित्तीं राजश्री रावसाहेबाचा व राजश्री नाइकाचा स्नेह करून द्यावा, ऐसे आहे. अलीकडे राजश्री राव वजारतमाब याकडील पत्रें येत नाहींत. त्याकडील कारकून निराळेच आले असेत. त्याकडे येत असतील. कांही असो. आह्मी प्रसंगोपात्त जें साहित्य करावें तें करितों. हें परस्परें कळतच असेल. त्याचा विश्वास असो नसो. आह्मी आपणापासून अंतर करीत नाहीं. अलीकडे तिकडील वृत्तांत वर्तमान जालें असेल, तें लिहावें. उत्तरही पाठवावें. एकदा जालें येणेंकरून शेवटास गेलें असें नाहीं. या गोष्टीचा पिच्छा भारी असे जाणून, महाराज साहेबांचे पुण्य अधीक असे, हे जाणूनच, वर्तन करावें भलता मार्ग कोठोन मिळोन राहावें. राजनी गुजाबा गेले. मागिती हुडकीत आले ऐसें आहे. बरें! आह्मी तरी चिंता कशास करावी? राव वजारतमाब यांचे वकील यशवंतराव ह्मणून मातबर हजारो रुपये खर्च करून बसले आहेत. ते आपल्या तरतुदेंत आहेत. सर्व गोरीचें गोरेपण जाणवलें. येथील अभिप्राय :- आमचे सामर्थ्य आपण मिरजेच्या तक्तावरी पाहिलें असे. कळावे ह्मणून लिहिले असे. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)