Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.

लेखांक १३६.

१६९७ फाल्गुन वद्य ३.

पु॥ राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. मसलत लांबणीस पडली. खर्चास तोड नाहीं. याजकरितां इंग्रेजी सरंजाम सोडून, फितुरियांवरी चालून जाऊन, लडाई करावी, श्रींने दौलत दिल्ही आहे तरी त्यास मारून घेऊन, नाहीं तर होणार तें होईल, ऐसें योजिलें होतें. परंतु, तातड न करावी, दोन लाख रुपये कर्ज देतों, म्हणून कारनेल हो बोलिले. त्याउपरी गाहाणवट द्यावें, याप्रों दिक्कत घातली. सरकारांत गहाण ठेवावयास कांहीं नाहीं. हे जाबसाल करतां आठ च्यार रोज गेले. तों धौशा येऊन मिळाला. ते सबळ जाले. याजकरितां तोहि प्रकार राहिला. हालीं मसलत कांहीं सुचत नाहीं. तेविसींचे प्रकार अलाहिदापत्रीं विस्तारें लिहिलें आहेत. कळतील. ऐशीं हजार जनरालानींहैदरनाईकाचे ऐवजीं देविले. त्याप्रों पन्नास आले. तीसहि आल्यादाखल. परंतु वोढ
भारी. रोजमरादेखील जाहला नाहीं. कोठपर्यंत ल्याहावें ? जाणिजे. छ १७ मोहरम.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १३५.

१६९७ फाल्गुन शुद्ध ११ वृद्धि.

राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि:-
सुाा सीत सबैन मया व अलफ. कितेक इंग्रेजाकडील पेंच व घरचेही कितेक आहेत ते वारंवार कोठवरी ल्याहावे ? बाहेरील मनसबे तोडजोडी कराव्या त्या राहिल्या. घरांतीलच पेंच उलगडणें प्राप्त होतें. एक प्रकार असतां तरी ल्याहावयास येतें. नित्य नवेच प्रकार इंग्रेजांचे व किरकोळ. याजकरितां जनरालाकडील इतबारी आमचें बोलणें समजावयास येथें असलियानीं समजोन त्यास सांगेल. इकडेही समजावील. याजकरितां जनरालांसी बोलोन हर कोण्ही पाठवावा, म्हणून पेशजी तुम्हांस लिहिलें होतें तें अद्याप जालें नाहीं. तरी याउपरी जनरालासी बोलोन त्याचा इतबारी शाहाणा दुभाश्या ऐसा पाठवून देणें. मसलतीस लांबण पडली. खर्चाची वोढ, लोकांचे गवगवे त्यांत नाना प्रकारचे. हें कोठवरी सोसावें ? अथ:पर मसलतीची गोष्ट सिद्धीस जात असलीयास उत्तम. नाहीं तर मुमईस उठोन यावें लागेल. सविस्तर मजकुराची आज्ञा करोन बाबू कोलटकर यास पाठविलें आहे. याचे जबानीवरोन कळेल. संकलितार्थ, अलाहिदा पुरवणीपत्रीं लिहिलें आहे, त्याजवरून कळेल. जाणिजे. छ १० मोहरम. जनरालाही मोघमपत्र सविस्तर तुम्हांस लिहिलें आहे. म्हणून पाठविलें असे. पावतें करणें. किरकोळ मजकूर वारंवार जनरालासी बोलावें, हें उचित नाहीं. परंतु येथें प्राप्त होतात तें तुम्हांस कळावें याजकरितां लिाा आहे. युक्त समजावया योग्य तें सांगणें. मुख्यत्वें त्याचा ईतबारी दुभाशा प्रामाणिक येथें डेऱ्याजवळ राहून वाजवी त्यांस सांगे ऐसा आला म्हणजे लडे पडणार नाहींत. छ मजकूर. सरकारची जोडी कलकत्त्यास मेस्र टेलर याजकडे पाठविली होती. त्या जोडीबा। जनरालास येथून पत्र आलें तें पाठविलें असे. पावतें करणें. पुरवणीपत्र पाठविलें नाहीं. सविस्तर जबानीवरून कळेल. छ. मा.

(लेखनावधि:)

श्रीसांब: सपुत्रो विजयते.

लेखांक १३४.

१६९७ फाल्गुन शुद्ध ११ वृद्धि. राजश्री

लक्ष्मण अपा गोसावी यासि :-
सु।। सीत. आज करनेल किटिंग यांणीं साहित्यपत्र आपला कारभार स्थीर रहावा ह्मणोन मागितलें. त्यांत भाव स्पष्ट दिसोन आला कीं, दुसरा कोणी करनेल याचे जागा पाठवून यास तेथें नेणार. ऐसियासी याणें साहित्यपत्र मागितलें, तेव्हां आह्मास देणेंच पडलें. दुसरा प्रकार ह्मणावा तरी, हे आम्हासी खेचाखेची बहुत करीत होते. परंतु आमचें काम व्हावें, या पल्ल्यावरहि बहुत. यास्तव आम्हास यास काढावेंच काढाव, हा आग्रह नाहीं. काढिले तरी हेच पाहिजेत, हाहि आग्रह नाहीं. जनरालाचा मर्जी दरकार आहे, कोणेहि प्रकारें काम सेवटास जावें. परंतु यांचे मुरवतीबद्दल पत्र देणें लागलें. हा प्रकार तेथें श्रुत करणें. दोहीं प्रकारांस आह्मी राजीच आहों. दुसरा येईल तोही ओढक मिळाला तरी हाच बरा. यास्तव कोणी अमीनादाखल आम्हांजवळ नेहमीं असावा म्हणजे आमचे मसलतीस सोय पडेल. हें पत्र बहुतच गुप्त लिहिलें असे. कोणास कळों नये. कळल्यास हे वाईट मानितील. यास्तव सावधपणें कानावर घालणें. जाणिजे. छ १० मोहरम.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १३३. (२)

१६९७ फाल्गुन शुद्ध ८.

पुाा राजश्री लक्ष्मण अप्पाजी गोा यांसी :-
सुाा सीत सबैन मया व अलफ. जाबीतजंग हरि बल्लाळ यास सामील जाले. परंतु नगर व अशेरी दोन किल्ले द्यावयास फुतुरियांनीं कबूल केले आहेत ते द्यावे, ऐसें जाबीतजंग ह्मणतात. हरि बल्लाळ ह्मणतात कीं, एक लढाई मारा, त्यानंतर किल्ले देऊं. याप्रों दोघांची अट पडोन जाबीतजंग दोन कोस रुसोन मागे फिरले, असें वर्तमान आलें आहे. दुसरें : जाबीतजंगाचें बोलणें सारे फौजेनें माझें आराब्याचे आंत रहावें. फितुरी तें ऐकत नाहीं. हेही बातमी आली. जनरालास सांगावीसें असलियास सांगणें. जाणिजे. छ ६ मोहरम. बहुत काय लिहिणें? बारभाईकडील बातमी लिहिली आहे. परंतु बाजार आवाई आहे. जाणिजे. छ मजकूर.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १३३.

१६९७ फाल्गुन शुद्ध ८.

राजश्री लक्ष्मण अप्पाजी गो। यांसि :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. एक दोन पत्रें तुचीं आलीं, त्यांत जनरालाचें बोलण्याची खातरजमा लिहिली. आठ पंधरा दिवसांत लढाई सुरू व्हावयाचें होईल, ह्मणून विनंति लिहिली होती. त्यास, येथें पत्रें पाऊन पंधरा रोज जाले. अद्यापि कांहीं दृष्टोत्पत्तीस येत नाहीं. प्रथम दिवस दिसतो. तापीतीरास तीन महिने एक जागा मुक्काम जाले. वैरणफांटें मिळावयाचें संकट. फौजेस रोजमरा नाहीं. पोटाचा गवगवा. लोकांनीं काय करावें ? पोटास तों पाहिजे ? त्याचे श्रम कोठपर्यंत पहावें ? तुमचे लिहिल्याचे तकव्यावरी पंधरा दिवस लोकांस उमेद होती. खर्चास असते, तरी चार दिवस अधिक उणे लागते तरी निभावलें जातें. याजकरितां हे प्रकार युक्तीनें जनरालासीं बोलून, सत्वर येथून कूच होय तें करणें. खानदेशांत गेलियानंतर, चार दिवस मुक्काम तेथें पडले तऱ्ही कामास पडतील. घोड्या माणसांत बाकी राहिली नाहीं. घोडी खराब जाहलियाउपरी लढाईच्या उपयोगी तऱ्ही काय पडतील ? इत्यादि प्रकार सुचऊन जलदी होय तें करणें. हैदर-नाईकाचे ऐवजीं जनरालानीं रुपये देविले आहेत, म्हणून कारनेल यांनीं विनंति केली. सुरतेस राउत पाठवावें, म्हणून सांगितलें. त्यावरून तेथें राउत पाठविलें. अैशीं हजार रुपये गंभीरांनीं द्यावे. त्यास, रुपये नाहींत, पंधरा रोजी पन्नास हजार देऊं, याप्रमाणें म्हणतात. येथें तों मोठें संकट, आजीचा दिवस गेला, प्रात:कालीं काय करावें, ऐसें प्राप्त आहे. गंभीर सरकारचे कामास नानाप्रकारें वोढितो. अलाहिदा पुरवणी-पत्रीं लिहिलें आहे, त्याजवरून कळेल. जाणिजे. छ ६ मोहरम. बहुत काय लिहिणें ?

(लेखनावधि:)

श्रीशंकर.

लेखांक १३२.

१६९७ माघ वद्य ८.

राजश्री लक्ष्मणपंत अण्णा स्वामीचे सेवेसी :-
पोष्य सखाराम हरी कृतानेक प्रों विनंती येथील वर्तमान ता। माघ वद्य अष्टमीपर्यंत सुखरूप असो. विशेष. आपणाकडील माघ शुध द्वितीयेचीं व सप्तमी- नवमीचीं पत्रें आली तीं विस्तारें अक्षरशा सरकारचीं पाहिलीं व आह्मांस एक बंद पाटीपोटीं व पुरवणीचा वर्ख ऐसें लिहिलियानें सर्व मजकूर समजला. अण्णा ! आपण विस्तरें येथील मसलतीचे अर्थ ध्यानांत आणून कालजी करितां. येविसींचीं साधनेंही करितात, याचे प्रकार मजला विदित. आपणासारखे आपणच आहेत. परंतु यास तरी संशय नाहीं. मसलत पेंचांत पडली आहे. येथें उपाय नाहीं. गोष्ट बोलली आहे. सर्व श्रीमंतांनीं वरचेवर लिहिलेंच आहे. याउपरी कांहीं सुचत नाहीं. व लिहवत नाहीं. सारे विलग अर्थ जाले आहेत. त्यांतही आपले आपल्यांत विरुद्धें वाढलीं आहेत. इंग्रज आह्मावर कारनेल किटण रुष्ट जाले आहेत. त्यास संबोधनास आपले थोरले ग्रहस्त सरकारबावा अनुकूल. नारो गोपाल गोदादर्शनीं हे एकत्र होऊन रात्रंदिवस खलबतें करितात. श्रीमंताची मर्जी तरी सवत-मत्सरें वाढवावें. हें सर्व येथूनच आहे. यामुळें अधींच विलग. त्यांत हे अर्थ प्राप्त! तेव्हां बुडत्याचे पाय खोलीं, ऐसें जालें आहे. आह्मी येथें मुलें माणसें सुधा आहों. त्यास, कोणी आलिया संकटीं पडलों आहों. ऐशास इंग्रजी स्थलें सुरत भडोच. याशिवाय कोठें जागा नाहीं. सबब जनरालासी पक्कें बोलोन त्याचें आश्वासन घ्यावें. दोहीस्ते लाऊन हरयेक जागा ठेऊं. नंतरीं खातरेस येईल तिकडे जातील. त्यास मनाई न करावी. परवानगीनें ठेविली तैसी परवानगीनें जावी, ऐसें न करावें. बारीक मोठे पेंच सर्व ध्यानांत तुमचे आहेत. ल्याहावसें नाहीं. इतके अर्थास संभाळोन जें कर्तव्य तें करावें आणि अपटणास लेहून पाठवावें. वरकड गोविंदराव-बावाचे वगैरे मजकूर लिहिले ते सवीवर आहेत. येक श्रीमंताचे कल्याणाखेरीज बाकीचें नीट आहे. हे गोष्ट प्रमाणच आहे. त्यांतही साधन रदबदली करणें तितक्या करून ठेवाव्या. बावाची मर्जी करणें सर्व तुह्माखेरीज नाहीं. आपला ऐवज देवलाबाबत बेदरचे तलावरील गुतऊन ठेविला आहे. सांगाल ल्याहाल तेथें पावता करूं. वरकड दरबारीं मसलतसमईंचे कांहीं सुचत नाहीं. प्राणरक्षण कसें होईल हेंच सलाह पडलेलें आहे. अनुपत्यकालांत सर्व गोष्टी प्रतिकूल मसलतीस पडल्या आहेत. विलाज नाहीं. राजश्री आबा आले. ते आह्मी येक जागाच आहो. त्यामुळे नारिंगाची मसलतैक्य होऊन इंग्रज आह्मावर चिडविलें. त्यास सदाशिवबावा अनुकूल पडले आहेत. श्रीमंतास विनंती करून नारोपंताचें जाणें इंग्रजांकडे मना करविलें. त्यास त्या कामातून काढिलें, हें समजोन कर्नेलीजवळोन रदबदली सख्त श्रीमंतासी करविली कीं, त्याखेरीज दुसरा कामांत नसावा. ऐसें केलें आहे. तेव्हां कर्नेलीचे मर्जीस्तव नारोपंत फिरोन कामांत घालणें. प्राप्त. श्रीमंतांनीं अप्पाजीपंत निहाय नेमिले होते. परंतु आतां पुढें चालत नाहीं. इंग्रज दाब धरू लागले आहेत. मसलत विलग. त्यांत हे प्रकार बनले आहेत. ऐसे बारीक मोठे प्रकार किती ल्याहावे ? नाना प्रकारचे पेच व कटकटी ! कोणांत कोणी नाहीं ! ऐसी गोष्ट जाली आहे. इतकेंहि सोसून आमचा निश्चय जो आहे तोच खंबीर प्राण जाईतों सुटणार नाहीं. प्राणाचा संकल्प घालोन श्रीमंताची सेवा आरंभिली आहे. त्याचा शेवट करावा. एक वेळ फितुरियांचें पारपत्य व्हावें. श्रीमंत दौलतीवर बसले ह्मणजे कृतकृत्य जालों. पुढें इच्छा दुसरी नाहीं, यांत संशय नाहीं. कसेंही गुजरलें तरी श्रीमंताचे चरणाचें लक्ष व मसलतीचे शेवटास जाणियाचें ध्यान दुसरें कदापि होणार नाहीं, हे खातरजमा तुमची आहे व माझा निश्चय हाच यांत गुंता नाहीं. परंतु आढळले अर्थ लिहिले आहेत. श्रीमंताचे मर्जीत दुसरा प्रकार नाहीं, हे माझी खातरजमा. परंतु ज्याणीं जें समजवावें तें ऐकावें, हा प्रकार प्रारंभापासून आहे तो मात्र आहे. त्यास विलाज नाहीं. अस्तु ! श्रीकृपेनें मसलत मात्र सिद्धीस जावी, हेच काळजींत आहे. परंतु ऐशा बखेडियांनीं दुष्मन शेर होतात व कितेक येणारांसहि संशय पडतो. गोविंदराव गाईकवाडामुळें लोक दोष ठेवितील. आह्मासी इंग्रज असें चालल्यानीं श्रीमंतांचा व इंग्रजांचा इतबार लोक कसा धरितील. हे मसलतीस विरुद्ध हें समजोन श्रीमंतांनीं आज्ञा निक्षून करावीं, तें मात्र घडत नाहीं. अस्तु ! दैवच मसलतीचे विलग, त्यास यत्न काय ? तत्रापि जेथवर होईल तेथवर प्रेत्न सेवक लोकांनीं करावा, यांतच श्रेयस्कर जाणून श्रम साहास करीत आहों. परिणाम लावणार श्रीं व श्रीमंत आहेत. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ कीजे. हे विनंती.

श्री.

लेखांक १३१.

१६९७ माघ वद्य ६.

राजश्रि लक्ष्मण आबाजी गोसावी यांसी :-
सुाा सीत सबैन मया व अलफ. पाा. अंकलेश्वर येथील पाऊण लाख रुपये दरसाल इंग्रेजास द्यावे याप्रमाणें तहनाम्यांत करार असतां, मेस्तर राबट गंभीर याणीं परगणे मजकुरीं ठाणे घालून झाडून अंमल बंद केला आहे. त्याविसीं वारंवार तुह्मांस लिहिलें व गंभीरासही सांगितलें. परंतु अंमल सुटत नाहीं. जनरालाची परवानगी पाहिजे ह्मणतात. तहनाम्याखेरीज वर्तणूक करावयाविसीं जनरालानी यास सांगितलें असें नाहीं. पावणेदोन लक्षांचा महाल बळावून बसले आहेत. त्यास, तुह्मीं जनरालासी बोलोन माहाल सरकारचा सरकारांत घ्यावयाविसी पत्र जनरालाचें गंभीरास पाठविणें. अगर सध्यां माहाल द्यावयाचा अनमान असला, तरी लाख रुपये तऱ्हीं परगणे मजकूरचे सरकारांत द्यावे. येथें खर्चाची वोढ. कोठून ऐवज मिळावयास जागा नाहीं. फौज पोटावांचून हैराण आहे. दोन्हीं प्रकारांतून कोणता तो करून घेणें. माहाल सरकारांत द्यावा, पाऊण लाख रुपये घेत जावे; अथवा लाख रुपये सरकारांत सध्या सालमजकूरचे द्यावे. पुढे कराराप्रमाणें अंमलात येईल. व शहर सुरत येथील चौथाईची बाकी सनवातची मोगलाकडे राहिली होती. त्यास, मेस्तर गंभीराचे मुर्वतीमुळें निम्मेसिम्में सोड देऊन ऐवज पेशजी घेतला. हालीं सालमजकूरचा ऐवज वाजवी यावा त्यास सुरतकर मोगल निम्मे ऐवज देतो आणि चौथाईचा दरोबस्त ऐवज पावला ह्मणून कबज द्यावे ह्मणतो. गंभीरानी पान ९९ ताकीद करावी ते करीत नाहीं. याजकरितां हाही मजकूर जनरालास समजावून एविसीं मोंगलास व गंभीरास पत्र पाठविले कीं, वाजवी चौथाईचा ऐवज कराराप्रमाणें देणें. येणेंप्रमाणें पत्रें पाठवून ऐवज पावेसा करणें. चहूंकडून नाना प्रकारचे लडेलटके प्राप्त होतात. बाहेरील मोगलाचा अंमल बंद करावा तरी गंभीर वाईट मानितील. काय लिहितील नकळे. येथें तों मसलतीचे लांबणीमुळें वोढ पडली ते लिहिता पुरवत नाहीं. ज्याचा भरवसा त्याजकडूनच विक्षेप होतो. उपाय नाहीं ! हें सर्व जनरालांनी चित्तांत आणून सुधरावें हें उचित आहे. सर्व भरंवसा त्यांचा आहे, ऐसें बोलणें. तुमची पत्रें माघ शुद्ध शष्ठीची पावली. त्यांची उत्तरे मागाहून समजोन लेहून पाठवितों. जाणिजे. छ १९ जिल्हेज. बहुत काय लिहिणे ?

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १३०.

१६९७ माघ शुद्ध ३.

राजश्री लक्षुमण अप्पाजी यासि :-
सुहूर सन सीत सबैन मया. ग्रहणाचे आधले दिवशीं धवशा व हरी फडके भेटले. शत्रूस बहुत आव आला. धवशा नव्हता तेव्हां मध्यम होते. हाली जबरदस्तीनें घाटाखालीं येऊन गांठ घालावी, हा त्यांचा विचार जाहला. सामान बहुत जहालें. तीस हजारापर्यंत जहालें. आमचे सामान थोडें. त्यांत भक्षावयास नाहीं. सबब बेदिल जहालें. कारनेल आठाची गोष्ट सांगतात व करितीलही. यशअपेश मनुष्याचे अधीन नाहीं. लोकदृष्टीनें आमची बाजू हलकी दिसते. लज्या रक्षील दुसरा उपाय नाहीं. अंगरेजाची व आमची बैदी करून, सेवट बरा दिसत नाहीं. आतां मुंबर्सहून कुमक यावयास दिवसगत पाहिजे, लढाई तरी दोन च्यार पांचा दिवसां अलीकडे पलीकडे होईल. धवशा आला नवता तें आह्मींच लढतों, ऐसी बराबरी होती सांप्रत ते भारी दिसतात. इंग्रेज थोडे, कसें होईल तें पहावें. उपाय काहीं सुचत नाही. जनराल व सारे अंगरेज शहाणे ह्मणोन वाटत होते; परंतु या वेळेस आमची फजिती जाहल्यास त्यांचीही जहाली. अबरूसी व प्राणासी गांठ आहे. अद्यापि आठ च्यार दिवस लागले तरी तुमची कुमक आल्यास व कांही लक्ष दोन तरी खर्चास आल्यास शत्रूचीं पारपत्यें होतील. नाहीं तरी मगची गोष्ट पत्रीं कशास ल्याहावी ? समजतच आहे. ते परिछिन्न गांठ घालितात. आमचे व अंगरेजी सामान बहुत थोडें. खर्चास नाहीं, याजवरून समजणें. अंगरेज जनरालास लिहीत असतां कांही तर्तूद न केली, हे बारभाईंचे पुण्य समजावें. दुसरे काही दिसत नाहीं. मसलत मारली असतां सर्वही गमावलें. तेव्हां आमचेंच अदृष्ट समजावें ! अत:पर काय वारंवार ल्याहावें ? आतां हिंमत सोडीन म्हटल्यावर परिणाम दिसत नाहीं. सर्व भरवसा चरणाचा आहे. दारू शिसेंही सामान पाठविल्यास कांही पाठवणें. आठच्यार दिवस त्याणीं दम खादला व मुंबईचें सामान आल्यास मोठेंच काम होईल. दोहींतून येक फडशा होईल. आतां लांबत नाहींसें दिसतें. जाणिजे. छ १ जिल्हेज, बृहस्पतिवार.

(लेखनावधि:)

खास दस्तुरी पत्र याच मजकुराचें कारनेलीकडे दिल्हे आहेत. तें ते जनरालाकडे पाठवितील. ते तुह्मांस देतील. पत्र मोकळें आहे. संशय येईल कीं, लखोटा फोडिला. तरी पत्र मोकळें दिल्हें आहे. जनराल यांणी वाचलें तरी चिंता नाहीं. बरेंच आहे. ह्मणोन मोकळेंच पत्र कारनेलीकडे दिल्हें. तें आगोदर पोंचलेंच असेल. हें पत्र दुसरें पाठविलें आहे. जाणिजे. छ मजकूर.

(लेखनावधि:)

श्रीशंकर.

लेखांक १२९.

१६९७ माघ शुद्ध २.

राजश्री लक्ष्मणपंत अण्णा स्वामीचें सेवेसी :-
पोष्य सखाराम हरी साष्टांग दंडवत प्रणाम विनंति येथील वर्तमान ता। माघ शुद्ध द्वितीयापर्यंत यथास्थित असे. विशेष. पूर्वी आठा दिवसांत वर्तमान जालें तें अलाहिदा लिहिलेंच आहे. कारनेलीची बेमर्जी आह्मांवर त्यासी कारणें तुह्मांस दिसतच आहेत. निमित्य, गाडे सुरतचे वाटेवर येतां लुटलें तें तुचे रावतांनी, हें ठेविलें.त्याचा मुद्दापत्ता कांही लागेना. फितुरियांकडील पेंढारी येऊन कही मारितात. हेच गोष्ट पक्की दाखल्यांनी पुरली. यामुळें विचारावर कारनेल आले आहेत. परंतु वारेवीराचे दु:ख पेडवली याचें आहे. मसलत सर्व त्याजवर. याजमुळें मात्र सर्व सोसावें लागतें. विलाज नाहीं ! आह्मीही वोढिलें नाहीं. लाचारीस मात्र कूच करून चाललों. परंतु श्रीमंत येऊन माघारे आणिलें. आह्मीं मानाजी शिंदे वगैरे फौज मिळोन तफावतीनें डावे बाजूस उतरलो आहोंत. रात्रंदिवस घ्यास तुह्मांकडील लागला आहे. हरतरेनें अपटणास मोह जनरालाजवळोन पाडवावा आणि मसलतच सर्व सिद्धीस न्यावी. मूल खरें, याजवर भांडण भांडतील. तरी मुलाविसीं इंग्रेजांनी खातरजमा करून श्रीमंताचे वोटीत घालावें त्यास दगा पेंच नाहीं. परंतु फितुरियाचें पारपत्य झालें पाहिजे. त्याणीं मूल नसतां विनाकारण फितुर केला व दौलत गारद करून मोगलास दिली. पुढेंही लबाडी करतात. वचनें, प्रमाणें देऊन श्रीमंतांसीं बेमानी केली. पुढेंही इतबार नाहीं. त्यांचा अभिमान गैरवाजवी याणीं नच धरावा. ऐशी गोष्ट ज्या तरेनें होईल ते खटपट साधन आण्णा ! करावें. तुह्मीं कराल तें येथें निभेल. परंतु सर्व मसलतीचा गुना तुह्मावर आला आहे. याचें विस्तारें कोठवर ल्याहावें? इतके दिवस श्रममेहनत केलियाचें सार्थक निरार्थक होऊं न द्यावें. निदान जें मागतील तें इंग्रेजांस देऊं. राहील तीच दौलत करूं. परंतु नबाबसुद्धां फितुरियाचें पारपत्य घडे तेच गोष्ट करावी. यांत श्रीमंतही कबूल आहेत. तूर्त लांबणीवर पडलें. येथें तापीतीरीं दोन महिने जालें. वैरण बारा पंधरा कोस, तेही मिळेना. महागाई, पोटास नाहीं. ऐसा पेंच जाला आहे. बारा पंधरा कोस कही जाती, तेव्हां फितुरियाकडील पेंढारी, बेदड व धाड्या राऊत निवडक येऊन कहीवर घालवितात. रखवालीस पथकें पाठवावीं तीं एकीकडे जाऊन दगा भलतीकडे होतो. त्यांतही नित्य फौजेनें जावें, हेलपटे, पोटास नाहीं. आह्मीं, मानाजीबाबा आणखी एकदोन टोळिया, ऐसें बारीनें जावें. त्यांत वरकड गेले तरी दगाच होतो. मानाजीबाबा, आह्मी जावें, तरी नित्य पंधरा कोस जाणें येथें पडतें. फौज खराब होत चालली. सबब, हरतरेनें तजवीज करून येथोन दहा पंधरा कोस कूच चारापाणी पाहून सोनगडापुढें पूर्वेस घडे ते गोष्ट करून परवानगी पाठवावी. येथें बसलियानींच परिणाम लागून फौज जगत नाहीं. येविसींचें साधन करून जरूर परवानगी पाठवावी. बारी चढोन गेलियांत सर्व मसलत सिद्ध आहे. मोठे हंगामाचे दिवस जातात. फितुरियांकडील फौज गलबलली आहे. सर्वांची राजकारणें सिद्ध: परंतु बारी चढावी हें व इंग्रज काय करितात. इतकी वाट पाहतात. पुढें लढाई अगर फार दिवस मेहनत इंग्रेजांस पडत नाहीं. सहजांत हे रूख मात्र होऊन खानदेशांत गेले ह्मणजे मसलती सिद्धीस जातील आणि सर्व गोष्टी त्याच्या व श्रीमंताचे मनोदयानरूप घडतात. त्याविसीं तुह्मांस तिकडेही समजतच असेल. येथून ल्याहावेसें नाहीं. सूचनाअर्थ लिहितों. वाचावयास कंटाळा न करावा. तूर्त कारनेलानीं फितुरियावर रोष धरावा, त्याचे अपराध त्यास शासन योजावें; तें सोडून आमचेच गळां पडेल. लाचार होऊन सोशीत आहों. श्रीमंतांचे मर्जीचाही दुसरा अर्थ नाहीं. कृपाच करीत आहेत. परिणामावरि सर्व नीट आहे. गाइकवाडाचें आहे तसेंच आहे. कांही एक नवें घडलें अथवा घडणार नाहीं. मसलत ज्यारी जाली ह्मणजे श्रीमंतांचे चाकरीस फौजसुद्धां गोविंदराव यांस आणितों. येथील गुंता नाहीं. दुसरें तरी इंग्रजच होऊन राहिले आहेत. मेस्त्र इष्टोलाजवळोन आमची फर्मास व येक आरबी घोडा वळो करावयाला एक मागावा. रामसिंगास सांगत जावें. त्याचें वर्तमानही लिहीत जावें. बहुत काय लिहिणे ? कृपा लोभ कीजे. हे विनंति.

श्रीसांब. सुपत्रो विजयते.

लेखांक १२८.

१६९७ माघ शुद्ध २.

प॥ राजश्री लक्ष्मण अपाजी गोसावी यांस :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. थोरल्या मनसुब्याचीं शुभसूचनें लिहिली तीं कळलीं. बहुत आनंद जहाला. ऐसेंच दिवसेंदिवस शुभवार्तेचीच इच्छा आहे. कलम १

भूतसरचे पहिले लिहिल्याप्रों कलम पुसावें. उगेच दाबले आहेत. कलम १

हसोटचा मजकूर कारनेलीनीं उपक्रम केला. तेव्हां जवळ मेस्तर होमहिहोते. त्यास काईल केलें. नारो गोपाळ व विश्वनाथ व त्रिंबकजी भालेराव जवळच होते. त्यांस काईल केलें. विश्वनाथ व नारो गोपाळ त्रिंबकजी भालेरावहि पष्ट बोलले. परंतु आह्मींच आणविली नाहीं. खटे मात्र होतात. जाबसालांत काईल मात्र होतात. मिस्तर होमाचा दुभाषा लक्ष्मण आहे, तोहि जवळ होता. काईल केलें. पुढें सनद आणऊं. जलदी केली नाहीं. कलम १

जनराल व कोशल सारे मायेंत गोड बोलून, दिवसेंदिवस अधिक अधिक मेलवावे. त्यांची मर्जी किरकोळ मजकुरासाठीं खटी करावयाची नाहीं. युक्तीचे वाटेनें गोडीनें कायल करून होईल तितके जाबसाल उगवावे. कलम १

मिस्तर हाटली दरबारास येत नाहींत. आह्मीं बलावावें तरी कारनेल वाईट मानितील. त्याणीं यावें तरी तोच प्रसंग. यास्तव त्यास जनरालाचें लिहिलें आल्यास आठा पंधरा दिवसीं दरबारास येत जातील. माझी पूर्ती ओळखच नाहीं. सखाराम हरीचीं मात्र गांठ कधीं कधीं पडते. कलम १

हैदराकडील कागद लक्षाचे होन पाठविले ह्मणोन आला. होन तरी न आले येविसीं हैदर व बाजीरायास आह्मी परभारें लिहितों व जनरालानीहि ल्याहावें कीं, तुह्मीं लटीक श्रीमंतास लिहून लटीक वाद आह्मांकडे कसा आणिलांत. ह्मणजे ऐवज फजीत होऊन पाठवीलच. आह्मांस जनराल लटकें बोलणार नाहीं, हे खातरजमाच आहे. परंतु जनरालानीं त्यास फजीत करून ल्याहावें, हें बरें दिसतें. कलम १

आंकलेश्वराचे महालपों पाउण लक्ष द्यावे, ऐसें करारांत आहे. यांतच भाव आहे कीं, सरकारचे कमावीसदार असावे. निके रुपये मात्र यांस द्यावे. दुसरे उगऊन कलम लिहिलें नसेल. परंतु यातच स्पष्ट भाव आहे. महाल पावणेदोन लक्षांचा आहे. त्याचा कमावीसदार राहिला तरी लक्ष रुाा त्याणें आह्मांस द्यावे लागतील. तेहि त्यास नडच पडेल. तेव्हा सिबंदी वाढवून मनास येईल तसा खर्च वाढवितील. आणि ऐवज देणार नाहीं, हें कसे योग्य दिसेल ? यास्तव कमावीसदार आमचा राहील. तो ऐवज पाउण यास पावते करील. येणेप्रों कलम १.

दरमहाचे ऐवजात बलसाड आहे. तेथें कमावीसदार आमचे असावे सबब की, कमाल बेरिजेस तोटा नफा आमचा. दरमहा ऐवज मात्र त्यांस निक्का द्यावा. त्यांचा कमावीसदार असिल्यास आह्मी परगण्याची कमाल बेरीज दरमहांत धरूं तेव्हां त्यासच संकट पडेल. हे पेच समजवावे. कलम १ गोव्याकडील फिरंग्याकडील राजकारणाचा मजकूर जनरालाचे कानावर घालून त्याच्या विचारें जाहाल्यास करावें. कलम १

रो गोविंदराव गाइकवाड याचे जाबसालास तुह्मी माहीत नाहीं, सबब त्याचे तर्फेने कारकून पाठवावा, ह्मणोन नारो गणेश हजूर आहेत त्यास ताकीद केली. ते पाठवितील. तुह्माजवळ येतील. त्यांची रुजुवात करून देणें. वरकड जाबसाल वाजवीचे रुईने होईल तो करीत जाणें. गैरवाजवी पक्ष धरून गोष्ट कोणाचीहि न बोलणें. पत खरें बोलावयाची बहुत संरक्षण करणें. मोठें काम यांतच आहे. कलम १

खर्चाचा ताण मोठा बसला. कांहींच इलाज चालत नाहीं. किटिंग, फत्तेसिंगाकडील ऐवजाविसीं जनरालास लिहिलें आहे, जाब आला नाहीं, ह्मणोन सांगतो. दोन तीनदां लिहिले ह्मणोन सांगितलें. याविसीं त्यास जरूर जरूर सांगावें. फौज पोटावांचून काय खाईल? कलम १

सुरतेस बंदुखा वगैरे विकत घेऊं येविसी एकंदर परवानगी गंभीरास यावी. कलम १

आपटणाचीं खबर नाहीं. कलम १

राा छ २१. सवाल. शुक्रवार (लेखनावधि:) कलमें तेरा लिहिलीं आहेत. पैकी बेदरीचा चंदूररायाकडे अंमल आला. पो छ ३० जिल्काद.