Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
स्थलनामव्युत्पत्तिकोश
४ खानदेशांत वसाहत करतांना १४२८ गांवांना ३३५ वनस्पतीं वरून वसाहतवाल्यांनीं नांवें दिलीं. ती ती वनस्पति त्या त्या स्थलीं पहिल्या वसाहतवाल्यांना ज्या उत्कटत्वानें भासमान झाली तें च उत्कटत्व सध्यां त्या त्या गांवीं भासमान होतें कीं कसें, हें त्या त्या गांवच्या शोधक लोकांनीं पाहिलें पाहिजे.
५ वड, पिंपळ, उंबर, निंब, पळस, वगैरे मोठमोठ्या व तुळस, सांवा, मेथी, वगैरे प्रसिद्ध वनस्पती ह्यांचीं जीं संस्कृत नांवें तीं आज दोन अडीच हजार वर्षे त्या च कमजास्त अपभ्रष्ट रूपांनीं आपणां पर्यंत येऊन ठेपलीं आहेत, या बाबींत ह्मणण्या सारखा विशेष नाहीं. विशेष जे आहे तो इतर वनस्पतिनामां संबंधानें आहे. कर्क, कच, कवर वगैरे शेंकडों वनस्पतिनामें वैद्यशास्राच्या ग्रंथांतून आढळतात. एकेका वनस्पतीचीं अनेक नांवें ह्या ग्रंथांतून दिलेलीं असतात. हीं एका च वनस्पतीचीं अनेक नांवें लोकांत कधीं सररहा प्रचलित असतील कीं नाही,या बाबीची शंका येण्यास बहुत कारणें आहेत. गुणां वरून व रूपां वरून, अनेक नामां मधील कांहीं नांवें वैद्यशास्त्र्यांनी पाडिलीं असतील, हें उघड आहे. परंतु त्या अनेक नामांतून निदान एकेक नांव तरी सर्वजन प्रसिद्ध होतें, हें वरील यादीतील ३३५ वनस्पतिनामां वरून स्पष्ट होतें. वाळ्याला कच व तिळवणीला कवर हें नांव वसाहतकालीन जनसमूहांत प्रचलित होतें, एवढी बाब या ग्रामनामां वरून निःसंशय सिद्ध आहे. वसाहतकालीं जिला कवर ह्मणत तिला च सध्यां आपण तिळवण ऊर्फ तिलपर्णिका ह्मणतों. म्हणजे कवर व तिलपर्णिका हीं दोन नांवें एका च वनस्पतीचीं जनसमूहांत कालभदानें प्रसिद्ध होतीं असें झालें. प्रान्तभेदानें आणीक हि नांवें त्या च एका वनस्पतीचीं प्रचलित असण्याचा संभव आहे. तात्पर्य, एका च वनस्पतीचीं अनेक नांवें वैद्यशास्त्रग्रंथांत जीं येतात त्यां पैकीं कांहीं नांवें जनप्रचारांतील आहेत, इतकें स्पष्ट ह्मणण्यास वरील ग्रामनामावलीचा उपयोग होतो.
६ ऋग्वेदा पासून व अथर्ववेदा पासून तो तहत अगदी अलीकडील संस्कृत ग्रंथांची ऐतिहासिक परंपरा लावून जर वैद्यकशास्त्रांतर्गत वानस्पत्याचा पुढेंमागें एखाद्या दीर्घोद्योगी शंकरदीक्षितानें इतिहास लिहिला, तर प्रकृत ३३५ वनस्पतींचीं नांवें ज्या संस्कृत ग्रंथांत प्रथन येतील त्या ग्रथाचा काल त्या वनस्पांतिजन्य ग्रामनामाचा काल म्हणतां येईल. खानदेशांतील ही १४२८ ग्रामें एकदम दहा पांच वर्षात बसलीं असें नाहीं. वसाहत करण्याचा क्रम सुमार ५०० वर्षे चाललेला असावा. पाणिनीचा काल जर १००० शकपूर्व धरला, तर वसाहतकाल शकपूर्व ५०० च्या सुमारास ऐन भरांत येतो. म्हणजे बुद्धकालीं वसाहतकर्म बरेंच संपून गेलेलें होतें. जुनाट बौद्धग्रंथांत दक्षिणेंत बरीच वसती झाली असल्याचे उल्लेख आहेत, व त्या उल्लेखां बरोबर महाकान्ताराच्या अस्तित्वाचा हि उल्लेख आहे. म्हणजे इतरत्र बरी च दाट वसती होऊन सातपुडा व विंध्याद्रि यांच्या आसपास महाकान्तार अवशिष्ट राहिलेलें होतें. वसाहतकर्माच्या पहिल्या भरांत ग्रामसीमा सध्यां प्रचलित आहेत त्या ग्रामसीमां हून दुप्पटतिप्पटं विस्तीर्ण होत्या. पुढें एका गांवाचीं दोन, तीन किंवा चार गांवें होऊन ह्या सीमा निमपट, तृतीयांश किंवा चतुर्थांश झाल्या. खुर्द, बुजुर्ग, सीम, चहारम्, म्हणजे मोठें, लहान, तिसरें व चवथें किंवा पंजम म्हणजे पांचवें अशीं विशेषकें फुटून बनलेल्या पोटगांवांना मिळाली. हीं विशेषकें मुसुलमानकाळांत मिळाली, असें नव्हे. तीं तत्पूर्वीच मिळालेलीं होती. इतकें च कीं मुसुलमानकाळांत फारसी विशेषकें प्रचारांत आली. खानदेशांत हिंदुकालांत वसलेलीं एकोनएक सर्व गांवें मोठ्या नद्या, मध्यम नद्या व क्षुद्र नद्या किंवा ओढे ह्यांच्या पाण्याच्या आश्रयानें मैल पाऊण मैलाच्या अंतरानें वसलेलीं होती. बिनपाण्याच्या वैराण खडकां वर जी गांवें क्वचित आढळतात तीं पाण्याची मातब्बरी न ओळखणा-या मुसुलमानांनीं वसविलेलीं अलीकडील पांचशे वंर्षातील आहेत.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पाशीं [ पार्श्व = पारस = पारा = पासीं = पाशीं (सप्तमी), पासून, पासचा, पासाव] ( ग्रंथमाला)
पासंग १ [ प्रासंग: = पासंग ] वत्सानां दमनकाले स्कंधे काष्ठं आसज्यते स प्रासंग:
तागडीच्या आडव्या दांड्याला प्रासंग म्हणत. तो सरळ होण्याला कमीजास्त वजनें पारड्यांत घालीत त्यांना पासंगाचीं वजनें म्हणत.
-२ [ प्रासंग (separate yoke वैजयंती) = पासंग ]
-३ [ पार्श्वगः = पासंग ] हा मनुष्य त्या मनुष्याच्या पासंगालाही यावयाचा नाहीं, म्हणजे त्याच्या जवळजवळ हि यावयाचा नाहीं.
-४ [ उपासंग proximity = पासंग ] Proxiuity. त्याच्या पासंगाला हि तो लागणार नाहीं he can not come even to his proximity.
पासाव [ पार्श्वत् = पास्साअ= पासाव. पार्श्वात्= पासून ] जसें - गृहात् = धरून, नगरपार्श्वात् = नगरपासून, नगरस्य पार्श्वात् = नगरापासून. ( भा. इ. १८३४)
पास्त्रीं [ पश्च या शब्दाची पंचमी पश्चात् व सप्तमी पश्चे. पश्चे = पासीं-शीं. पश्चात् = पासोनि, पासून ] पश्च म्हणजे शेजार. पाशीं म्हणजे शेजारीं. पासून म्हणजे जवळून, शेजारून. घरापासीं (येथें घरा ही षष्ठी ) = घराशेजारी. घरापासून = घरा शेजारून. (भा. इ. १८३६)
पासून [ पासाव व पासीं पहा]
पासोडा-डी [ प्रच्छदपट: = पासोडा. प्रच्छदपट्टिका = पासोडी ]
पासोडी १ [ प्रछुडिका ( छुड्, थुड् to cover ) = पासोडी ] a coverlet.
-२ [ प्रच्छादनपटी = पासोडी ]
पांसोडी [ पांसुकूल = पांसुऊड = पांसूड = पांसोडी ] पांसुकूल म्हणजे चिंध्यांचा ढीग. ह्या चिंध्या एकत्र शिवून बुद्धभिक्षु पांघरण्यास गोधडी करीत. (भा. इ. १८३५)
पाहणें [ पहणें पहा ]
पाहतो [ स्पृहयति = पाहे, पाही ] स्पृहयति यवानां प्रसृतये = जवांचा पश्याला पाहातो. स्पृहयति = वांछति = पाहातो. ( भा. इ. १८३४)
पाहाटे, औपीस, औषीं [ प्रभाते उपसि = पाहाटे, औषीस, औषीं ] (भा. इ. १८३३)
पाहाड (मूळ) [ पाठ = पाआडा=पाहाड (वनस्पति)] ( भा. इ. १८३७)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पारंबी १ [ प्रालंबिका = पालंबी = पारंबी ]
-२ [ प्रालंब = पालंब = पारंब = पारंबी ] (स. मं.)
-३ [ प्रालंब ( Pendent ) प्रालंबिका = पारंबी ] Pendent roots of the banian tree.
पारसा [ परिश्रय = परिस्सअ = पारिसा = पारसा (पिंपळ) ] त्याखालीं बसण्यास योग्य असा पिंपळ.
पारोशाप्रहरीं [ प्रत्यूषप्रहरे = पारोशाप्रहरीं ] प्रत्यूष म्हणजे सकाळ. पारोशाप्रहरीं म्हणजे अगदीं सकाळच्या वेळीं.
पारोस [ पर्युषितं = पर्रुसिअ = पारुस = पारोस (सा- सी-सें ) ] पारोसें म्हणजे शिळें. ( भा. इ. १८३४)
पारोसा पिंपळ [ पार्श्वपिप्पली = पारोसापंपळ ]
पाल १ [ पल्ली (दुकान ) = पाल ]
-२ [ प्लवः = पाल ] एक प्रकारचें तारूं.
पालक १ [ पालक्या = पालक ] (भा. इ. १८३४)
-२ [ पालंकी = पालक ]
पालथा [ अस् १ गतौ ४ क्षेपणे. पर्यस्त = पल्लत्थो = पालथा ] ( धा. सा. श. )
पालव १ [ प्लावः = पालव. प्लवाका = पालवा ] एक प्रकारचें तारूं.
-२ [ पल्लवः = पालव ] ( शा. अ. ९ पृ. ६७ )
पालवणी [ पल्लवपानीयं = पालवणी ] निंब वगैरेंचा पाला टाकून कढविलेलें पाणी.
पाल्हाळ [ पल्लवित = पालइअ + ल (स्वार्थक) = पालाल = पाल्हाळ ] अलं पल्लवितेन = पाल्हाळाला आळा घाला. ( भा. इ. १८३४)
पाव [ निष्पू पासून निष्पावः ] पाव म्हणजे पाखडून नीट केलेलें धान्यादि, नंतर शुद्ध व स्वच्छ अन्न.
पावका १ [ पादिका ] (पायका पहा)
-२ [ पादुकः = पावका ] घटवंचीचा पावका.
पावटा १ [ प्रवटक = पवटा = पावटा ] प्रवटक म्हणजे गहूं, एक प्रकारचें धान्य. (भा. इ. १८३२)
-२ [ (पाट्ट) प्रवर्तः = पवट्टा = पावटा (पायाचा). प्रवृत्तिः = पवट्टि = पाउटी, पावटी ]
-३ [प्रावटः = पावटा ( धान्यविशेप)]
पावडें [प्रावणं = पावणें = पावडें ]
पावल [ पाद + ल = पाअ + ल = पावल ] पावला रुपया म्हणजे पाव रुपया, पावली. (भा. इ. १८३२)
स्थलनामव्युत्पत्तिकोश
(आ) अट्ट म्हणजे बाजार. तेव्हां अट्टशब्दांत जेवढीं ग्रामनामें तीं सर्व पुरातनकालीं बाजाराचीं गांवें होतीं. अट्ट शब्दाचें हाट हें दुसरें रूप आहे.
(इ) उदक शब्दा पासून उद प्रत्यय निघालेला आहे.
(ई),कुंब शब्द कुंपण या अर्थी यज्ञकर्मात लावत. कोप, कुवें, कुवा, कुई, कोपी, हे प्रत्यय ज्या ग्रामनामांत मराठींत येतात. तेथें कुंब (कुंपण) हा संस्कृत शब्द मूळ आहे असें समजणें प्रशस्त. कूप म्हणजे विहीर हा शब्द मूळ धरणें प्रकरणाला प्रशस्त दिसत नाही. कोप प्रत्यय कानडी ग्रामनामांत फार येतो. (उ) कुहर पासून खोरें शब्द मराठीत आला आहे.
(ऊ) कूटि पासून गुडी. गुड्ड, गुडी हा प्रत्यय कानडी ग्रामनामांत फार येतो.
(ऋ) कूल प्रत्यय पाणिनीनें ग्रामनामवाचक दिला आहे.
(ऋ) कोश शब्द संग्रहार्थक आहे.
(ए) क्षेप म्हणजे पुष्पगुच्छ
(ऐ) क्षोट-खुंटा,खुटा. पशुपालांची जनावरें बांधण्याची जागा.
(ओ) खनि-समूह
(औ) खल-धान्य मळण्याची जागा
(क) खेलि-संग्रहवाचक शब्द
(ख) गवादनी-गव्हाण. गवादनी म्हणजे कुरण. वसाहतवाल्यांना पशूंच्या करतां जीं कुरणें रानांत प्रथम सांपडलीं त्यांना ते गव्हाण ह्मणूं लागले. गव्हाण शब्द प्रत्येक गांवांतील कांहीं शेतांना सध्यां लावलेला आढळतो. ही शेतें पूर्वी कुरणें होती.
( ग ) गुल्म-समूहवाचक शब्द
(घ) चक्र म्हणजे प्रांत, प्रदश
(च) छद-आछादन, मंडप, छत, घर
(छ) ज प्रत्यय ग्रामनामवाचक पाणिनीय आहे
(ज) द्वार म्हणजे डोंगरांतील खिंडीचा रस्ता
(झ) दोला-झोकें घेण्या योग्य झाडांचें जेथें वैपुल्य दिसलें.
( ट) पट्ट, पट्टण, पद्र, पल्ल, पालिका, पत्तन, पाटक, वाटिका, हे सर्व शब्द प्रस्थ या मूळ पाणिनीय शब्दा पासून निघालेले दिसतात.
(ठ) पिंड-समूहवाचक
(ड) पूल-समूहवाचक
(ढ ) बुघ्न-झाडाचें खोड
(ण ) माण-समूहवाचक
(त ) पथिन्-नगरवाचक, प्रांतवाचक
(थ ) वरट-बरडी जमीन
(द) वाहन-रस्त्याचा वाचक
( ध) विवर-कुहर, खोरें
(न) वेल वेर } उपवन
(प) वेष्टक-बेट, झाडांचा समूह (कळकाचें बेट)
(फ) सूद-नगरवाचक पाणिनीय प्रत्यय
(य ) द्रु ( झाड ) - डु
(भ) पुत्रक म्हणजे पोटगांव, लहान गांव. पाटलीपुत्र म्हणजे पाटली नांवाच्या पूर्वीच्या मोठ्या गांवा पासून फुटून झालेलें लहान गांव. पुढें हें लहान गांव च मोटें अवाढव्य राजधानीचें शहर झालें.
स्थलनामव्युत्पत्तिकोश
१ मागील लेखांत वनस्पतींचीं एकंदर १३३ संस्कृतनामें, ५९९ ग्रामनामें व सुमार १०३७ ग्रामें अकारविल्ह्यानें नमूद केली. ह्या १३३ पैकीं बहुतेक सर्व वनस्पति सर्वप्रसिद्ध अश्या आहेत. आतां ह्या अंकांत इतर वनस्पतिनामजन्य ग्रामनामें देऊन शिवाय उरलींसुरलीं सर्व प्रसिद्ध वनस्पतिनामजन्य ग्रामनामेंहि देतों.
यापुढें दिलेलीं वनस्पतिजन्य गांवें कोशांत घेतली आहेत.
२ खानदेशांत एकंदर गांवें ३८९३. पैकीं वनस्पतिनामां पासून निघालेलीं ग्रामनामें सुमार १४५०. म्हणजे शेकडा ३७ ग्रामनामें वनस्पतिनामजन्य. त्या त्या स्थलीं वसति प्रथम करतांना चित्ताला ज्या वनस्पतीनें उत्कट चमत्कृति झाली त्या वनस्पतींच्या नांवा वरून वसतीचें नांव वसाहतवाल्यांना सुचलें. १४५० ग्रामनामें ३३५ वनस्पतिनामां वरून सुचलीं. पांचव्या लेखांकांत ज्या प्रत्ययांचे अडाखे दिले त्यां हून बरे च ज्यास्त प्रत्यय खानदेशांतील ग्रामनामांत आढळले. तेव्हां आतां पर्यंत आढळेलेल्या एकोनएक प्रत्ययांची व त्यांच्या संस्कृत मूळांची यादी पुन्हां एकदां देतों.
(यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
(अ) ह्या १९७ प्रत्ययांतून कांहीं प्रत्ययां संबंधानें चार शब्द सांगण्या सारखे आहेत. वटवृक्षाच्या नांवा खालीं वडनेर व वडनगर अशीं दोन ग्रामनामें येतात. येथें असा प्रश्न उद्भवती कीं, वडनेर हें नांव वडनगर ह्या नांवाचा अपरपर्याय आहे की काय ? डॉ. भांडारकर यांनीं जुन्नर शब्दाची व्युत्पत्ति जूर्णनगर अशी करून, नर, नेर हा शब्द नगर शब्दा पासून निघालेला आहे, असें प्रतिपादन केलेलें आहे. नगर-नयर-नर किंवा नेर. जुन्नर ग्रामनामाचा तत्प्रांतस्थ लोक जुनेर असा उच्चार करतात. आतां नेर प्रल्यय नगर शब्दा पासून निघालेला आह कीं काय हें नक्की करण्यास, नेर-प्रत्ययान्त इतर पांचपंचवीस नांवें घेतों १ घोडनेर, २ भीमनेर, ३ अकोळनेर, ४ संगमनेर, ५ पारनेर, ६ जामनेर, ७ थाळनेर, ८ भामनेर, ९ अंमळनेर, १० चिंचणेर ११ पळसनेर, १२ पिंपळनेर, १३ सिन्नेर, १४ इष्टनेर, १५ चंपानेर, १६ बडनेर, इत्यादि शेकडों नेरप्रत्ययान्त ग्रामनामें आहेत. शिवाय नेरी, नेरें, अशीं हि नामें आहेत. येथें नगर शब्द मूळ धरावा कीं काय हा प्रश्न. नेर हा शब्द १ नीर, २ नीहार, ३ नहर, ४ नगर, ह्या चार शब्दांचा अपभ्रंश असू शकतो. पैकीं नहर शब्द फारसी आहे. फारसी शब्द प्रचारांत येण्या पूर्वी वरील नेरप्रत्ययान्त ग्रामनामें शेकडों वर्ष प्रचलित होतीं, सबब नहर शब्द वगळून टाकूं. नीहार म्हणजे बर्फ, धुकें. वरील १६ नेरां पैकीं एकांत हि बर्फाचें किंवा धुक्याचें प्राबल्य नाहीं. तेव्हां नीहार शब्द हि गळून पडतो. वरील १६ नेरां पैकीं निम्यां हून अधिक नगरें म्हणजे लहानमीठों शहरें हि नाहींत. कित्येक तर निव्वळ खेडीं आहेत. तेव्हां नगर शब्दा पासून नेर शब्दाची व्युत्पत्ति करणें सररद्दा प्रशस्त दिसत नाहीं. नीर म्हणजे पाणी हा शब्द हि सर्वत्र लागू पडेल च असा प्रकार नाही. पळस, चांपा, पिंपळ, चिंच, वड, जांबुळ, इत्यादि झाडांच्या संबंधानें पाण्याचें वैपुल्य हि प्रकरणबाह्य भासतें. सबब, नेर शब्दाचीं व्युत्पत्ति करण्यास नीर, नीहार, नहर व नगर हे चार हि शब्द समर्पक दिसत नाहीत. वसाहतवाले प्रथम जेव्हां वसती करण्यास आले तेव्हां वसती करण्यास योग्य अश्या जागा व स्थलें व प्रदेश ते पहात व योग्य प्रदेशांना नीवर असें नांव ते देत. नीवर या संस्कृत शब्दाचा अर्थ, वसती करण्यास योग्य प्रदेश, असा आहे. निवा-याचें ठिकाण, जागा, असा मराठींत सध्यां प्रयोग होती, त्यांत निवारा हा शब्द नीवर शब्दाचा अपभ्रंश स्पष्ट दिसतो. ह्या नीवर शब्दा पासून मराठी नेर शब्द झालेला आहे. नेर म्हणजे वसाहत करण्यास योग्य प्रदेश. मुख्य प्रदेश व त्या प्रदेशांतील मुख्य पहिलें गांव यांना नेर शब्दानें वसाहतवाले संबोधू लागले.
स्थलनामव्युत्पत्तिकोश
२ वसाहतकालीन इतिहासाच्या ग्रामनामीय शोधमार्गात ह्या अश्या ठेंचा आहेत. त्या सर्व संभाळून, माग लावावयाचा आहे. नाणेमावळ हा प्रांत फार लहान, व ह्या चिमुकल्या प्रदेशांतील शें दोन शें ग्रामनामां वरून कोणता च सिद्धान्त करतां येत नाहीं, हा आक्षेप टळावा, एतदर्थ दंडकारण्यांतील असा एकादा विस्तीर्ण प्रदेश अभ्यासार्थ घेतों कीं, त्यांत पांच चार हजार गांवें असावींत. नाणेंमावळांतल्या प्रमाणें च ह्या हि विस्तीर्ण प्रदेशांत तो च अनुभव येऊं लागल्यास, उपरिनिर्दिष्ट फक्किकांना जास्त बळकटी येईल आणि त्या फक्किका सिद्धान्ताच्या जवळ जवळ ठेंपू लागतील. विस्तीर्ण प्रदेशांत पांच चार हजार गांवें असून, तो प्रदेश हवा, पाणी, सोई, वनस्पति, पक्षुपक्षी, भूमि, नद्या, पर्वत, भाषा, इत्यादि लक्षणांनीं एकजिनसी असावा. असे प्रदेश सध्यांच्या महाराष्ट्रांत अकरा आहेत:- नागपूर, बैतुल, व-हाड, खानदेश, गोदातीर, भीमथड, कृष्णाकाठ, उत्तर कोंकण, दक्षिण कोंकण, सह्याद्रीचीं खोरीं ऊर्फ कुहरें व डांग. ह्या अकरा भागांत आणीक हि पोटभाग करतां येतात. परंतु, हवा, पाणी, भाषा, वगैरे लक्षणांनीं हा एकेक भाग अनन्यसदृश आहे. पैकीं, प्रस्तुत विवेचनांत खानदेश ह्या विस्तीर्ण प्रांतांतील ग्रामनामांचें निर्वचन करतों. पश्चिमेस खांडवा व पूर्वेस खांडबारी आणि उत्तरेस नर्मदा व दक्षिणेस नाशिक एवढा प्रदेश म्हणजे खानदेश असें मी ह्मणतों. ह्या प्रदेशांत सध्यांचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश हे दोन जिल्हे येऊन, शिवाय बागलाण व मालेगांव हे दोन सध्यांच्या नाशिक जिल्ह्यांतील तालुके हि येतात. हा टापू हवा,पाणी, भाषा इत्यादि लक्षणांनीं एकजिनसी आहे. टापूत एकंदर म्रामसंख्या ३८९३ असून, इसवी सन १८६५ त, १०६५ गांवें पडीत होतीं. मुसुलमानी अंमलांत ही गांवें पडीत झाली. हीं ३८९३ ग्रामनामें शक १२०० तील आहेत, असें समजण्यास हरकत नाहीं. इसवी सन १८६५ सालीं एका मराठी कारकुनानें हीं नांवें त्याच्या काना वर जशीं पडलीं तशीं उतरून घेतलेलीं आहेत. Survey व Topographical नकाशांत व Local Rules and Orders made under Enactments applying to Bombay, Vols. I & II, ह्यांत ग्रामनामांच्या ज्या इंग्रजी उच्चारवटिका दिलेल्या आहेत त्या अनेक ठिकाणीं अपभ्रष्ट आढळल्या. त व ट, न व ण, र व ड, ल व ळ, आ व ऍ, हे उच्चार वरील नकाशांत व पुस्तकांत नीट दर्शविलेले नाहींत. सबब निरुक्तकाराच्या उपयोगाचे व्हावेत तितके होणें शक्य नाहींत, ग्रामसंख्या जवळ जवळ चार हजार आहे. तेव्हां टापू चांगला असावा तितका विस्तीर्ण आहे. ह्या चार हजार ग्रामनामांचें संस्करण करून पहातां असें दिसतें कीं, कांहीं नांवें वनस्पतीं वरून, कांहीं प्राण्यां वरून व कांहीं इतरत: पडलेली आहेत. सोई करितां प्रथम अतिप्रसिद्ध वनस्पतिजन्य नामें अकारविल्ह्यानें प्रथम देतों. एका च नांवाचीं अनेक गांवें जेथें आहेत, तेथें ग्रामनामा पुढे संख्येचे आंकडे दिले आहेत. क्वचित वनस्पतीचें संस्कृत नांव जेथें ओळखतां आलें नाही, तेथें तिचें मराठी नांव तेवढे दिलें आहे.
(यापुढें वनस्पतिजन्य ग्रामनामांच्या नांवांची व्युत्पति दिली आहे. तीं गांवें व त्यांची व्युत्पति कोशांत घेतली आहे)
स्थलनामव्युत्पत्तिकोश
( या विषयावर लिहिलेला पुढच्या अंकांतील मजकूर)
१ दुस-या अंकांत पुणें प्रांतांतील मावळतालुक्याच्या नाणेतर्फेतील गांवांच्या नांवां वरून वसाहतकालीन हालचालींचा निर्णय करण्याचा प्रयत्न केला. त्यांत असा निष्कर्ष निघाला की भिल्ल, पोल, कातकरी, वारली, वगैरे रानटी जातींचा पत्ता ह्या ग्रामनामांत बिलकुल लागत नाही. जो काय थोडा फार पत्ता लागतेी तो राक्षस, नाग, पारद, निष, अभीर व आर्य इत्यादि लोकांचा लागतो. त्यांत हि लक्ष्यांत बाळगण्या सारखी बाब ही कीं राक्षसनागपारदप्रमृतिकांच्या गांवांना हि आर्यांनीं च आपल्या संस्कृत भाषेंतील शब्दांनीं प्रख्या आणिली. राक्षसवाटिका, नागस्थली, अभीरपल्ली इत्यादि ग्रामनामांतील वाटिका, स्थली व पल्ली हे ग्रामवाचक शब्द आर्यांनीं स्वभाषेतले दिले, राक्षसादींच्या भाषेतले घेतले नाहींत. नाणेमावळांत राक्षसांचीं फक्त दोन गांवें होतीं, सबब त्यांच्या भाषेतील ग्रामवाचक शब्दांची डाळ बहुतमवस्तीच्या आर्यलोकांच्या भाषे पुढे शिजली नाहीं, असें एक वेळ म्हणतां येईल. परंतु, नागांच्या संबंधानें हें म्हणणें टिकणार नाहीं. ज्यांना सध्यां मराठे म्हणतात त्या लोकांत नागवंश सध्यां आहे व पुरातनकालीं होता. भारतांतील बहुतेक सर्व नागकुलनामें मराठ्यांत सध्यां आडनांवें झालीं आहेत, तसें च, महारांची जात नागवंशीय आहे, ह्या दोन बाबीं वरून दिसतें कीं, नागांच्या भाषेतील ग्रामनामें नाणेमावळांतील ग्रामपंक्तींत यावींत. पण, परीक्षणान्तीं दिसून आलें कीं, नाणेतफेंतील सर्व ग्रामनामें संस्कृतोत्पन्न आहेत. ह्या दृश्याचे दोन अर्थ संभवतात:-(१) नागलोकांत ग्रामनामें नव्हतीं, इतके ते रानटी होते; अथवा (२) आर्यांना अनार्य ऊर्फ म्लेच्छ शब्द खपत नसत इतके हे असहिष्णु होते. पैकीं, प्रथम पक्ष वास्तविक नाहीं. इंद्राचा सारथी जो मातली तो आपल्या अपत्याचा शरीरसंबंध नागांशीं करण्या करितां पाताळांत म्हणजे कोंकणपट्टीत गेला, असा भारतीय उल्लेख आहे. नागकन्यांशीं अर्जुनादिकांचे विवाह झालेले आहेत. सबब नागांना रानटीकोटींत ढकलणें ऐतिह्य नाहीं. अर्थात, दुसरा पक्ष जो आर्याच्या अस्पष्टोच्चारासहिष्णुतेचा तो उरती. तो पक्ष स्वीकारला म्हणजे १६८ नांवां पैकीं सारी चीं सारीं नावें संस्कृत कां, त्याचा उलगडा खास होतो. आर्य ज्या ज्या प्रदेशांत गेले त्या त्या प्रदेशांत मूळचीं म्लेच्छनामें एकीकड सारून, आपलीं प्रेष्ठ जीं संस्कृत ग्रामनामें तीं त्यांनीं अनपवाद प्रचलित केलीं, असा ह्या उलगड्याचा अर्थ होतो. आतां, एवढें खरें कीं, ही म्लेच्छभाषाऽसहिष्णुतेची फक्किका फक्त एका क्षुद्र तर्फेतील शें दोन शें ग्रामनामां वरून समर्थणें न्याय्य नव्हे. फक्किकेस सिद्धान्तत्व येण्यास दहा पांच हजार गांवें ज्या विस्तीर्ण टापूंत असतील तो टापू अभ्यासार्थ घेऊन, काय सिद्धि होत्ये तें पाहिलें पाहिजे; शिवाय, शोधकामें हें हि विसरतां कामा नये कीं, सद्यस्क मराठी ग्रामनामांचें संस्कृतभाषेत विपरिणमन करतांना, मोठा थोरला एक प्रमाद होण्याचा संभव आहे. एक च मराठी ग्रामनाम दहा पांच संस्कृत ग्राननामांचा अपभ्रंश असणे संभाव्य असतें. इतकेंच नव्हे तर, वृक्षादींच्या ज्या संस्कृत नामशब्दां वरून मराठी ग्रामनामशब्द साधावयाचे ते संत्कृत वनस्पत्यादि वाचक शब्द अगदीं मूळचे संस्कृत किंवा वैदिक आहेत च अशी हमी कशी घ्यावी ! संस्कृतांत किंवा वैदिकभाषेत वृक्षादिवाचक जे शब्द येतात ते च मुळी त्या त्या टापूंतील म्लेच्छ ऊर्फ अनार्य लोकांच्या भाषेंतील नसतील कशा वरून? व्युत्पादन करतांना ह्या दोन प्रकारच्या अडचणी डोळ्या आड होऊं देतां नये. दहा पांच संस्कृत शब्दां वरून जेथें एकच मराठी शब्द साधला असलेला स्पष्ट दिसतो, तेथें अमूकच संस्कृत ग्रामनाम प्रकरणाला योग्य आहे, हें ठरविण्यास एक मार्ग आहे. तो हा कीं, त्या किंवा इतर प्रदशांतील ताम्रपट्ट, शिलापट्ट, व्याकरणें, काव्यें व इतर संस्कृत ग्रंथ, ह्यांत तें ग्रामनाम प्राकृत किंवा संस्कृत रूपांत आढळल्यास पहाणें. पण पहाणीचा हा प्रदेश फार संकुचित आहे. ताम्रपट्टादिलेखांत फारच थोड्या ग्रामनामांचा उल्लेख येतो. सबंद भारतवर्षांत लाखा वर गांवें आहेत. आणि सा-या संस्कृत वाङमयांत दोन अडीच हजार ग्रामनामें आलीं असतील नसतील. तशांत, ह्या वाड्यांतील अर्धी अधिक नांवें कानडी आहेत. एवंच मराठी ग्रामनामांच्या पडताळ्या करितां राहिलीं हजार पांचा शें. तेवढ्यां वर महाराष्ट्रांतील वीस पंचवीस हजार ग्रामनामांच्या व्युत्पत्तीचा निर्वाह लागणें दुर्घट आहे.
स्थलनामव्युत्पत्तिकोश
नवलाख हा शब्द नवलाक्ष या शब्दाचा अपभ्रंश आहे. नवलाक्ष हें राक्षसनाम आहे. राकसवाडी शब्दांत हि राक्षसांचा उल्लेख दिसतो. म्हणजे राक्षस नांवाच्या लोकांचें वास्तव्य ह्या तर्फेतील एका गांवांत तरी त्या कालीं असावें, असा तर्क होतो. परंदवडी नांवांत पारदांचा वास येतो. हे पारद म्हणजे प्रसिद्ध Parthians होत. ज्या प्रमाणें मग लोकांना धारण करणारा जो देश तो मगधदेश व निष लेकांना धारण करणारा जो देश तो निषधदेश, त्या प्रमाणें च निष लोकां पासून उत्पन्न झालेल्या नैषांचें जें वासस्थान तें नेसावें, असें विधान करण्याकडे प्रवृत्ति होते. कुरु, कुरव लेकांची वाडी म्हणजे कुरवंडें. आणि नागांचीं जीं गांवें तीं नागाथली व नागरगांव. Fleet आपल्या Dynasties of the Canarese district मध्यें नागरखंडाचा म्हणजे नागांच्या देशाचा उल्लेख करतो. नाग ह्या शब्दाची षष्टी र प्रत्यय लागून नागर रूप होत असावें. नाग-र-खंड म्हणजे नागां चें खंड व नाग-र-गांव म्हणजे नागां चे गांव. टंकाचें ऊर्फ टक्कांचें गांव. कान्हें म्हणजे कर्णांचें गांव. करण नांवाचे भ्रष्ट क्षत्रिय मनुसंहितेंत सांगितले आहेत. त्यांचें हें गांव असेल. ढाले, करण, आंध्रमृत्य, सिंद, अंध्र, भट, भल्ल, कुरु, नैष, टक्क, अभीर, पारद, नाग व राक्षस, ह्या चौदा लोकांची किंवा कुळांची वसती ह्या तर्फेतील सतरा गांवांत असलेली दिसते. पैकीं ढाले, करण, आंध्रमृत्य, सिंद, अंध्र, भट, भल्ल व कुरु हे आर्य म्हणून महशूर आहेत. नैष व निषघ शब्दांतील निष मूळचे कोण व कोठील याचा मागमूस नाहीं. टक्क पंजाबांतील व पारद पार्थियांतील माहीत आहेत. अभीर सिंध व रजपुताना प्रांतांत सध्यां हि आहेत. तेथून आर्या बरोबर ते हि दक्षिणारण्यांत आले. राक्षस कोण व कोठील माहीत नाहीं. लंकेंत राक्षस होते व दक्षिणारण्यांत राक्षसांच्या वसाहती होत्या असें रामायण म्हणतें. परंतु त्यांचे वंशज सध्यां कोण आहेत तें मला अद्याप ओळखतां आलें नाहीं. वसाहतवाल्यांनीं राक्षसवाडीस राक्षस रहात असल्या मुळें त्या गांवास तें नांव दिलें असेल. म्हणजे वसाहतवाल्यांच्या काळीं नाणेंमावळांतील एका गांवांत राक्षसांची बहुतम किंवा मान्यतम संख्या होती, असा निष्कर्ष निघतो. नाग लोक कोण व त्यांचे वंशज महाराष्ट्रांत सध्यां कोण आहेत, त्याचें विवेचन मी इतरत्र (भारतवर्ष मासिक पुस्तकांत) केलें आहे.
(७) आतां ह्या चौदा लोकांतून अगोदरचे कोण व मागोदरचे कोण व स्वयंभू ऊर्फ मूळचे कोण त्याचा पत्ता लागल्यास पाहूं. ढाले, कारण, आंध्रमृत्य, सिंद, अंध्र, भट, भल्ल व कुरु हे आर्य लोक विंध्योत्तरप्रदेशांतून नाणेमावळांत आले, ते पाणिन्युत्तरकालीं आले. टक्क, अभीर, पारद वरील आर्यांच्या नंतर आले. नैष निषधांतील मूळचे लोक असल्यास, ते हि आर्यांच्या बरोबर किंवा नंतर आले असावेत. नाग हे पाताळांतील म्हणजे कोंकणांतील लोक नाणेंमावळांत कोंकणसान्निध्या स्तव सर्वां हून अगोदर आले असावे. आणि त्यांच्या च समकालीं किंवा किंचित अगोदर राक्षस मावळांत आले असावेत. म्हणजे राक्षस प्रथम, नंतर नाग व नंतर इतर लोक असा कालक्रम लागतो. परंतु, ह्यांपैकीं कोणी हि एक लोक नाणेंमावळचे स्वयंभू नव्हत, सर्व आगंतुक आहेत. येथील स्वयंभू व सर्वांत पुरातन लोक कोण याची खूण एथील ग्रामनामांत आढळत नाही. म्हणजे, तात्पर्य असें निघतें कीं, आर्य, नाग व राक्षस येण्या पूर्वी नाणेंमावळ हा प्रांत निर्भेळ अरण्य होतें. ह्यांत मनुष्याची वसती नव्हती.
(८) मावळ या अपभ्रंशाचें दोन हजार वर्षा मागें मामल असें रूप होतें. हा मामल शब्द बहुश: संस्कृतांतून अपभ्रंश होऊन आलेला आहे. कारण, उपरिष्ट १६८ गांवांच्या नामां पैकीं एक हि नांव संस्कृतेतर देशी भाषांतलें नाहीं. मूळचें हें जर अरण्य होतें, तर ह्या प्रांताला मामल हें नांव वसाहत झाल्या वर आर्यांनीं च दिलें असलें पाहिजे. राक्षस, नाग, ह्यांच्या वसाहती फार तुरळक होत्या व सबंद प्रांताला सामान्य नांव देण्या इतका बुद्धीचा प्रकर्ष त्यांच्या ठाई झालेला असेल, असा संभव दिसत नाही.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पायली [ पाय्या = पाय + (स्वार्थे) ली = पायली ] यौतवं द्रुवयं पाय्यं (अमर, द्वितीय कांड, वैश्यवर्ग ८५ ) पायली हें जोडीचें माप आहे.
पायवणी [ पादपानीयं = पायवणी ]
पाया पडतो [ पादयोः पतति = पाया पडतो ] येथें पाया हें पाय ह्या शब्दाचें सप्तमीचें द्विवचन आहे.
पायाळू १ [ स्पृहयालुः = पायाळू ], one longing for - wealth. पाय ह्या शब्दाशीं कांहीं एक संबंध नाहीं.
-२ [ पाताल = पायाल = पायाळ = पायाळु = पायाळू ] ज्याला पाताळांतील वस्तू दिसतात तो. (स. मं.)
पायी [ उपाय ]
पार १ [ प्राय ] (फार पहा )
-२ [ प्रकरः (चव्हाटा) = पार ] चव्हाटा.
-३ [ पार (अत्यन्त, पलीकडील तीर ) = पार (सफ्फा) ] पार खाऊन टाकलें = संपेपर्यंत खाऊन टाकलें इ. इ. इ. पार हें संस्कृतांत नाम आहे; मराठींत निपात आहे.
(भा. इ. १८३३)
-४ [ पर, परम = पार ] आंबा पार सारा खाल्ला = आम्र: परमसर्वः खादितः किंवा आम्रः प्रायः सर्वः खादितः
पार हें अव्यय पर, परम पासून व प्रायस् पासून, अश्या दोन मूळांपासून निघालें आहे.
-५ [ प्रायः = पार (अव्यय) ] तो पार मरून गेला = स प्रायः मृतः. वाघ पार पळून गेला = व्याघ्रः प्रायः पलायितः पार म्हणजे बाहुल्यानें, फार करून.
पारखणें [ ईक्ष् १ दर्शने. परीक्षणं = पारखणें ] ( धा. सा. श. )
पारठी १ [ परेष्टुका (पुष्कळदा व्यालेली गाय) = पारठी ]
-२ [ प्रष्ठौही गर्भिणी गौः. प्रष्टौही = पारठाइ = पारठी ] पारठी गाय म्हणजे गाभणी गाय (भा. इ. १८३४) पारडी [ पाड + तरी ] ( रूं पहा)
पारडूं [ पाड + तर ] ( ,, )
पारडें [ पाड + तरी ] ( ,, )
पारणें [ प्रार्ण + chief debt ) = पारणें ] कृष्णाला पाहून, डोळ्यांचें पारणें फिटलें = Discharged the debt of the eyes.
पारध १ [ पराधिः = पारध ]
-२ [ प्रार्थन = पारधन = पारध ] (भा. इ. १८३२)
पार पाडणें [ परिपारणं = पारपाडणें ] एवं कुलपुत्रावलोकितेश्वरो बोधिसत्वो महासत्वः सत्वान् धर्मं देशयति, परि-पारयति, निर्वाणभूमिमुपदर्शयति । (कारंडव्यूह-अष्टमप्रकरणम्) (भा. इ. १८३४)
स्थलनामव्युत्पत्तिकोश
सबंद महाराष्ट्रांतून ही नाणेंमावळाची तर्फ अभ्यासा करितां अशा करितां घेतली कीं, दंडकारण्याचा हा तीन हजार वर्षांपूर्वी केवळ निर्भेळ गाभा होता असा माझा पूर्व समज आहे. व-हाड, नागपूर, उत्तर कोंकण, आंध्र देश, गोदातीर, ह्या दंडकारण्याच्या परिसरा वरील भूमि असल्यामुळे, ह्यांत आर्यांची वसाहत प्रथम झाली. हा मावळ प्रांत अरण्याच्या अगदीं गाभ्यांत व सह्यपर्वताच्या कुहरांत असल्या मुळे, ह्यांत वसाहती ब-चा च उशिरां झाल्या असाव्यात, असा मी पूर्व तर्क करतों. ह्या रानांत जर आर्यांच्या पूर्वी कोणी लोक असतील, तर त्यांची कांहीं तरी खूण अवशेष ह्मणून एथील गांवें, डोंगर, नद्या, नाले, यांच्या नांवांत अल्पस्वल्प तरी सांपडल्या वांचून सहसा राहूं नये. पैकीं गांवांच्या नांवांत कांहीं खूण सांपडते कीं कसें त्याचा प्रस्तुत विवेचनांत अभ्यास आरंभिला आहे. नाणेंमावळांत एकंदर गांवें १६८. पैकीं १६७ ची संस्कृत नांवें वरील यादीत दिलीं आहेत. एका ग्रामनामाचें तेवढें संस्कृत रूप ओळखतां आलें नाही. तें ग्रामनाम ताजें. हें संस्कृतोत्पन्न आहे ह्या बद्दल मला संशय नाहीं. इतकें च कीं, तें नक्की काय असावें, याचा निश्चय अद्याप झाला नाही. इतर प्रांतांतील ग्रामनामांचा अभ्यास करतांना, ह्या नामाची व्युत्पत्ति सुटेल. १६७ नांवां पैकी बरोबर ५० नांवें वृक्ष व वनस्पती यांच्या संस्कृत नांवां वरून वसाहतवाल्यांना सुचलेली दिसतात. त्या त्या स्थलीं त्या त्या वनस्पतीच्या वैपुल्या वरून तीं तीं नांवें सुचावीत, हें साहजिक आहे. नदी, संगम, पत्थर, डोंगर, माळ, दही, दूध, खिंड, वगैरें वरून ७८ नांवें दिलेलीं आढळतात. लोक, जाती, गोत्रें, व व्यक्ति यांच्या वरून १७ नांवें दिलेलीं आहेत. बौद्धांच्या संसर्गानें १२ नांवें पडलीं. आणि तत्कालीन आर्य राजांच्या संबंधानें १० नांवें निष्पन्न झालेली दिसतात. पैकीं- राज्यसंस्था उद्भवल्या वर राजसंबंधक १० नांवें अस्तित्वांत आलीं व बौद्धधर्माचा ह्या प्रदेशांत प्रसार झाल्यावर बौद्धसंबंधक १२ नांवें प्रचलित झालीं, हें उघड आहे. राजाच्या राजधानीला पाटण (पट्टण, पत्तन) हें नांव असे. सध्यां जशीं नगर, शहर, The City हीं नांवें वैशिष्ट्यानें राजधानीला देतात, तो च प्रकार त्या काली हि होता. देवघर (देवगृह, राजगृह) हें नांव राजाच्या आवडल्या खास वसतीच्या गांवाला होतें. देवघर हें नांव महाराष्ट्रांत व कोंकणांत त्या कालीं असणा-या संस्थानिकांच्या खास गांवांना असलेलें आढळतें. राजसंबंधक १० नांवें नाणेंमावळांतील हीं:-( १ ) पाटण, (२) देवघर, (३) देवळे, (४) शिरवतें, (५) कान्हें, ( ६) राजपुरी, (७) मंगरूळ, (८) वहाणगांव, (९) शिरगांव, व (१०) खडकाळें. खडकी, खडकाळें, कडें, हीं नांवें राजाच्या कटकस्थानाला असत. पाणिनीच्या नंतर बौद्धधर्माचा प्रसार झाल्या वर त्याचा संसर्ग नाणेंमावळाला हि शका पूर्वी दोन तीन शें वर्षे झाला. त्याची खूण खालील १२ गांवांच्या नांवांत सांपडते. तीं बारा गांवें हीं:- (१) वेहेरगांव, (२) थुगांव, (३) करंडोल, (४) माणकोली, (५) सदापूर (६) नाणें, (७) वाडिवळे, (८) बुधवडी, (९) नाणोली, ( १०) पुसाणें, ( ११) नाणोली चाकण, ( १२ ) बुधेलें. सोमठणें, वडेश्वर, शिरवतें (श्रीप्रस्थ ), शिरगांव (श्रीग्राम ) ह्या ग्रामनामां वरून दिसतें कीं, सनातनधर्म नाणेंमावळांत असून, शिवाय बौद्धधर्माची छाया ह्या मावळावर बरी च दाट पडली होती. लोक, जाती, गोत्रें व व्यक्ति यांच्या वरून खालील ग्रामनामें साधिलेलीं आहेतः- (१) अहीरवडें, (२) राकसवाडी, (३) परंदवडी, (४) नागाथली, (५) अंध्राव, ( ६) टाकवें, (७) नागरगांव, (८) धालेवाडी, (९) कुरवंडें, (१०) नेसावें, (११) नवलाख उंबरें (१२) भाजें, (१३) भाजगांव, (१४) माळेगांव, (१५) भडवली, (१६) कान्हें, (१७) सिंदगांव. पैकीं धाळेवाडी, माळेगांव, भडवली व सिंदगांव, हीं चार ग्रामनामें ढाले, भल्ल, भट व सिंद या चार क्षत्रियांच्या कुळांवरून पडलेलीं आहेत. भाजें व भाजगांव हीं दोन नांवें ( आंध्र) मृत्य ह्या शब्दा वरून निघाललीं दिसतात. आंध्रमृत्यांचें राज्य ह्या प्रदेशा वर असतांना हीं नांवें पडलेलीं असावींत. अंध्राव हें नांव अंध्रवह किंवा आंध्रवह ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. अर्थात हें हि नांव अंध्रांनीं दिलेलें असावें. एथील जवळच्या एका नदीचें व तर्फेचें हि नांव अंध्रा व अंधर ( अंदर) मावळ असें आहे. सारांश, बौद्धांच्या प्रमाणें अंध्राच्या संबंधाची हि खूण ह्या तर्फेतील ग्रामनामांत आढळते. अहीरवडें ह्या नांवांत अभीर लोकांचा उद्धार झालेला आहे. अर्थात, त्या कालीं ह्या तर्फेतील एका गांवांत तरी अभीरांची वसती होती असें हाणावें लागतें.