नवलाख हा शब्द नवलाक्ष या शब्दाचा अपभ्रंश आहे. नवलाक्ष हें राक्षसनाम आहे. राकसवाडी शब्दांत हि राक्षसांचा उल्लेख दिसतो. म्हणजे राक्षस नांवाच्या लोकांचें वास्तव्य ह्या तर्फेतील एका गांवांत तरी त्या कालीं असावें, असा तर्क होतो. परंदवडी नांवांत पारदांचा वास येतो. हे पारद म्हणजे प्रसिद्ध Parthians होत. ज्या प्रमाणें मग लोकांना धारण करणारा जो देश तो मगधदेश व निष लेकांना धारण करणारा जो देश तो निषधदेश, त्या प्रमाणें च निष लोकां पासून उत्पन्न झालेल्या नैषांचें जें वासस्थान तें नेसावें, असें विधान करण्याकडे प्रवृत्ति होते. कुरु, कुरव लेकांची वाडी म्हणजे कुरवंडें. आणि नागांचीं जीं गांवें तीं नागाथली व नागरगांव. Fleet आपल्या Dynasties of the Canarese district मध्यें नागरखंडाचा म्हणजे नागांच्या देशाचा उल्लेख करतो. नाग ह्या शब्दाची षष्टी र प्रत्यय लागून नागर रूप होत असावें. नाग-र-खंड म्हणजे नागां चें खंड व नाग-र-गांव म्हणजे नागां चे गांव. टंकाचें ऊर्फ टक्कांचें गांव. कान्हें म्हणजे कर्णांचें गांव. करण नांवाचे भ्रष्ट क्षत्रिय मनुसंहितेंत सांगितले आहेत. त्यांचें हें गांव असेल. ढाले, करण, आंध्रमृत्य, सिंद, अंध्र, भट, भल्ल, कुरु, नैष, टक्क, अभीर, पारद, नाग व राक्षस, ह्या चौदा लोकांची किंवा कुळांची वसती ह्या तर्फेतील सतरा गांवांत असलेली दिसते. पैकीं ढाले, करण, आंध्रमृत्य, सिंद, अंध्र, भट, भल्ल व कुरु हे आर्य म्हणून महशूर आहेत. नैष व निषघ शब्दांतील निष मूळचे कोण व कोठील याचा मागमूस नाहीं. टक्क पंजाबांतील व पारद पार्थियांतील माहीत आहेत. अभीर सिंध व रजपुताना प्रांतांत सध्यां हि आहेत. तेथून आर्या बरोबर ते हि दक्षिणारण्यांत आले. राक्षस कोण व कोठील माहीत नाहीं. लंकेंत राक्षस होते व दक्षिणारण्यांत राक्षसांच्या वसाहती होत्या असें रामायण म्हणतें. परंतु त्यांचे वंशज सध्यां कोण आहेत तें मला अद्याप ओळखतां आलें नाहीं. वसाहतवाल्यांनीं राक्षसवाडीस राक्षस रहात असल्या मुळें त्या गांवास तें नांव दिलें असेल. म्हणजे वसाहतवाल्यांच्या काळीं नाणेंमावळांतील एका गांवांत राक्षसांची बहुतम किंवा मान्यतम संख्या होती, असा निष्कर्ष निघतो. नाग लोक कोण व त्यांचे वंशज महाराष्ट्रांत सध्यां कोण आहेत, त्याचें विवेचन मी इतरत्र (भारतवर्ष मासिक पुस्तकांत) केलें आहे.
(७) आतां ह्या चौदा लोकांतून अगोदरचे कोण व मागोदरचे कोण व स्वयंभू ऊर्फ मूळचे कोण त्याचा पत्ता लागल्यास पाहूं. ढाले, कारण, आंध्रमृत्य, सिंद, अंध्र, भट, भल्ल व कुरु हे आर्य लोक विंध्योत्तरप्रदेशांतून नाणेमावळांत आले, ते पाणिन्युत्तरकालीं आले. टक्क, अभीर, पारद वरील आर्यांच्या नंतर आले. नैष निषधांतील मूळचे लोक असल्यास, ते हि आर्यांच्या बरोबर किंवा नंतर आले असावेत. नाग हे पाताळांतील म्हणजे कोंकणांतील लोक नाणेंमावळांत कोंकणसान्निध्या स्तव सर्वां हून अगोदर आले असावे. आणि त्यांच्या च समकालीं किंवा किंचित अगोदर राक्षस मावळांत आले असावेत. म्हणजे राक्षस प्रथम, नंतर नाग व नंतर इतर लोक असा कालक्रम लागतो. परंतु, ह्यांपैकीं कोणी हि एक लोक नाणेंमावळचे स्वयंभू नव्हत, सर्व आगंतुक आहेत. येथील स्वयंभू व सर्वांत पुरातन लोक कोण याची खूण एथील ग्रामनामांत आढळत नाही. म्हणजे, तात्पर्य असें निघतें कीं, आर्य, नाग व राक्षस येण्या पूर्वी नाणेंमावळ हा प्रांत निर्भेळ अरण्य होतें. ह्यांत मनुष्याची वसती नव्हती.
(८) मावळ या अपभ्रंशाचें दोन हजार वर्षा मागें मामल असें रूप होतें. हा मामल शब्द बहुश: संस्कृतांतून अपभ्रंश होऊन आलेला आहे. कारण, उपरिष्ट १६८ गांवांच्या नामां पैकीं एक हि नांव संस्कृतेतर देशी भाषांतलें नाहीं. मूळचें हें जर अरण्य होतें, तर ह्या प्रांताला मामल हें नांव वसाहत झाल्या वर आर्यांनीं च दिलें असलें पाहिजे. राक्षस, नाग, ह्यांच्या वसाहती फार तुरळक होत्या व सबंद प्रांताला सामान्य नांव देण्या इतका बुद्धीचा प्रकर्ष त्यांच्या ठाई झालेला असेल, असा संभव दिसत नाही.