Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

४१. कातवडी, यहुदी, मुसुलमान, पारशी, ख्रिस्ती व हिंदू हे सर्व गट आचारानें, व्यवहारानें, प्रायश्चितानें, विद्येनें, देवधर्मानें, अथवा संकलित भाषेनें बोलावयाचें म्हणजे संस्कृतीनें इतके कांहीं विसदृश होतें कीं ह्या सर्वांचा थोड्या काळांत म्हणजे हजार दोन हजार वर्षांत एकजीव होणें अशक्यांतलें होतें. कातवडी जेव्हां सह्याद्रीच्या माच्यां वर एकटा च रहिवासी होता तेव्हां तो त्या वनींचा एकमेव अद्वितीय राजा होता. पुढें कोळी, वारली, ठोकर, मांगेले वगैरे जास्त सुधारलेले लोक आले. ते आचारादींनीं भिन्न पडल्या मुळें कातवड्यांत शरीरसंबंधानें मिसळून गेले नाहींत, अगदीं पृथक् राहिले. म्हणजे महाराष्टिकादि चातुर्वर्णी लोक उत्तरकोंकणांत येण्या पूर्वी व येथें अन्योन्यशरीरसंबंधव्यावृत्त अश्या जाती निर्माण होऊन गेल्या. नाग लोक आले त्यांत क्षत्रिय नाग व महार नाग अश्या दोन जाती होत्या. नंतर महाराष्ट्रिक आले. त्यांच्यांत चातुर्वर्ण्य असून, शिवाय सुतार लोहार इत्यादि जाती होत्या. यहुदी व पारशी आले. त्यांच्या हि ह्या जातिबद्ध समाजांत शरीरसंबंधव्यावृत्त जाती बनून गेल्या. शेवटीं मुसुलमान व ख्रिस्ती आले. ते हि ह्या जातिबद्ध समाजांत जातिरूपस्थ होऊन बसले. जातिरूपस्थ होऊन बसल्या मुळें, अन्योन्य बेटीव्यवहार म्हणजे प्रजोत्पादनाच्या कामीं सहकार ह्या निरनिराळ्या गटांत होणें अशक्य झालें. आणि कधींकाळीं हे सर्व गट मिळून एक भरींव सजातीय समाज होणें प्रायः असंभाव्य होऊन बसलें. एकटा देवधर्म घेतला आणि त्या दृष्टीनें ह्या गटां कडे पाहूं गेलें तर, कातकरी पिशाचपूजक होता, यहूदी मुसुलमान व ख्रिस्ती मनुष्याकार एक देवपूजक होते, पारशी अग्निपूजक ऊर्फ पंचभूतां पैकीं एका भूताचा पूजक होता, आणि हिंदू पशुपक्षिमनुष्याकार अनेकदेवपूजक असून शिवाय अग्न्यादिपंचभूतें, पिशाच्चें, एकदेव, झाडें व दगड, ह्यांचा भक्त होता, इतकें च नव्हें तर स्वत:च देव, ईश्वर व ब्रह्म हि होता, देव एक आहे हें जितकें खरें तितकें च ते कोट्यवधि आहेत हें हि खरें असल्या मुळें, म्हणजे दोन्ही कल्पना केवळ बागुलबोवा प्रमाणें असत्य असल्या मुळें, कातकरी, यहुदी, मुसुलमान, पारशी, ख्रिस्ती व हिंदू हे सारे च अनेक निराधार व अवास्तव कल्पनांच्या पाठी मागें धांवत होते व आपापल्या कल्पनांचा अनिवार उपभोग घेण्यांत सौख्य मानीत होते. अश्या ह्या नाना प्रकारच्या देवकल्पनांनीं पछाडलेल्या गटांचा एक भरींव समरस समाज बनवावयाला एकच तोडगा होता. तो हा कीं, ह्या सर्वांच्या डोक्यांतील निराधार व अशास्त्र अशी जी देवकल्पना ती च मुदलांत उपटून काढली पाहिजे होती, निदान एकसमाजत्वा प्रीत्यर्थ ह्या देवकल्पनेला व देवधर्माला गबाळांत गणून इतर राजकीय, वैय्यापारिक व शास्त्रीय व्यवहारांत तिला नितांत गौणत्व दिलें पाहिजे होतें. तें जो पर्यंत झालें नव्हतें, तों पर्यंत हे सहा हि गट एकसमाजत्वाला उपकारक होण्याची आशा नव्हती. देवकल्पनेचें असत्य युग पांच चार हजार वर्षे चालून समाप्तीस येण्याच्या रंगांत आहे हें ह्या देवभोळ्या लोकांच्या अद्याप लक्ष्यांत आलें नव्हतें. एकट्या अद्वैतवेदान्त्यानें तेवढें. देवकल्पनेला लाथाडलें होतें, परंतु अद्वैतवेदान्त्यांची चिमकुली संख्या देवभोळ्यांच्या प्रचंड संख्येच्या पासंगाला हि पुरेशी नव्हती.

प्रथम मिश्र व नंतर साधे, ही परंपरा चित्रीकरणात जशी दिसते तशी ध्वनीकरणांतही दिसते. पशुपक्ष्यादी प्राणी एकेक सुटा ध्वनी करींत नाहीत, अनेकध्वनिसंवलित ध्वनिपरंपरा करतात. ही ध्वनिपरंपरा मनुष्याच्या कानावर पडते व तिचे अनुकरण ध्वनिपरंपरेने मुखद्वारा साधण्याचा प्रयत्न तो प्रथम करतो आणि नंतर त्या मिश्र ध्वनिपरंपरेतील एखाद्या सुट्या ध्वनीची अनुकरणार्थ निवड करतो. मिश्रांतून सुट्याचा उदय होण्याला किती कालावधी लागला असेल याची कल्पनाच करावी. मिश्र चित्रांतून सुट्या चित्रावर यावयाचा काल व मिश्र ध्वनींतून सुट्या ध्वनीच्या अनुकरणावर यावयाचा काल एक होय. मिश्र ध्वनीवरून व मिश्र चित्रावरून सुट्या ध्वनीवर व सुट्या चित्रावर येण्याच्या यातना भोगताना, प्राथमिक मनुष्य फारच गडबडला, गोंधळला, घुटमळला व भांबावला असेल. स्पानिश घोडेस्वार पाहून घोडे आणि स्वार ह्या दोन वस्तू एकच असाव्या हा जसा गोंधळ अमेरिकन इंडियनांचा प्रथमदर्शनी झाला व नंतर कालांतराने घोड्याचे स्वारापासून त्यांनी पृथक्करण केले, किंवा पाण्याचा थेंब पाहून तो अविभाज्य द्रव्य असावा अशी भ्रामक समजूत अनेक युगे चालून नंतर हैड्रोजन व आक्सिजन ह्या दोन द्रव्यांत त्याचे रसज्ञांनी पृथक्करण जसे नुकते परवा केले आणि हे पृथक्करण झाल्यावर जो हिरमुसलेपणा, अचंबा व हर्ष इंडियनांना व रसज्ञांना झाला तोच हिरमुसलेपणा, आचंबा व हर्ष मिश्र चित्रावरून व मिश्र ध्वनीवरून सुट्या चित्रांवर वे सुट्या ध्वनीवर येताना प्राथमिक मनुष्याला झाला.

४०. सामान्य लोक राज्ययंत्रा कडे बिलकुल लक्ष्य कां देत नसत ह्या बाबीची ही अशी मीमांसा आहे. अन्नवैपुल्य व अन्नसौलभ्य हें ह्या उदासीन वृत्तीचें कारण असे. ही उदासीन वृत्ति व हा तुटकपणा जसा राजकारणक्षेत्रांत भासमान होई, तसाच तो समाज, वेदान्त, धर्म, भक्ति, संसार, सारस्वत, व्यापार व देव इत्यादि क्षेत्रांत हि वावरतांना आढळे. जातिसंस्था व वर्णसंस्था ह्या देशांत मूळ उत्पन्न होण्याचीं जीं अनेक कारणें आहेत, त्यांत अन्नवैपुल्याचें व अन्नसौलभ्याचें कारण बरेंच प्रमुख आहे. प्रत्येक जातीनें आपापलें अन्न आपापला धंदा करून तुटकपणें सुखानें खावें. प्रत्येक माणसानें आपापला पृथक् देव करून खुशाल तदेकभक्त व्हावें. प्रत्येक माणसानें समाजा पासून विलग होऊन सन्यस्त होण्यांत परमपुरुषार्थ मानावा. इत्यादि सर्व स्थानीं उदासीन वृत्तीचा पाया भक्कम रोविलेला दिसे. उदासीन, सन्यस्त, तुटक, मुक्तद्धारी अश्या व्यक्तींनीं जर हा देश व्यापलेला असे, तर ह्या सर्व व्यक्ती मिळून समाज म्हणून ज्या संस्थेस नांव आहे ती संस्था कितपत बने ? समाज हें नांव हिंदुस्थानांतील व उत्तर कोंकणांतील तत्कालीन लोकांना कितपत लागू पडे ? तत्कालीन हिंदी लोक एक भरींव समाज होते काय ? ह्या प्रश्नाला उत्तर द्यावयाचें म्हणजे समाज ह्या अर्थाची व्याख्या सांगितली पाहिजे. कांहीं एका अर्थाच्या सिद्धयर्थं अन्योन्योपकारक व्यक्तींचा जो सहकारी समवाय तो समाज, अशी व्याख्या केल्यास, उत्तर कोंकणांतील तत्कालीन मनुष्यसमूहाची समाजत्वा संबंधानें परीक्षा करण्यास सोपें जाईल. तत्कालीन म्हणजे शालिवाहनशकाच्या सोळाव्या शतका पर्यंतचा जो काल त्या काळांतील, असा अर्थ विवेचनसुखार्थ घेऊ. त्या कालीं उत्तरं कोंकणांत वन्य, यहुदी, मुसुलमान, ख्रिस्ती, पारशी, अंत्यज, शूद्र, वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण असे दहा प्रकारचे लोक कायमची वस्ती करून असत. देवधर्मदृष्ट्या पाहिलें तर वन्य, यहुदी, मुस्लीम, ख्रिस्ती, पारशी व हिंदू असे सहा गट असत. ह्या सहा गटांत हिंदूंची संख्या अधिकतम असे. हे सहा हि गट अन्योन्योपकारक म्हणण्या पेक्षां अन्योन्यापकारक जरी नव्हत तरी अनेक बाबतींत अन्योन्योदासीन असत. एका बाबींत, मात्र, हे सहा हि गट अन्योन्योपकारक होते असें म्हणतां येण्या सारखें आहे. ती बाब म्हणजे दोनप्रहरच्या अन्नाची. सहा ही गट परस्परांत कोणत्या नाहीं कोणत्या तरी रूपानें अन्नविनिमय करीत. कातकरी करवंदें, तोरणें व फाटीं विकी; यहुदी तेल पुरवी; मुसुलमान आफ्रिका, मलबार व अरबस्थान ह्या देशांत भाताची वगैरे नेआण करी; ख्रिस्ती बाट्या शेती पिकवी; आणि पारशी आधेंमधें कोठें तरी लुडबुड करून दैन्यवाणें पोट भरी. अहिंदूं पैकीं बाकी राहिला यूरोपीयन ख्रिस्ती जो पोर्तुगीज तो. त्याचें एक च एक काम राज्ययंत्र हाकून अन्नशोषण करण्याचें. हिंदूंना किंवा अहिंदूंना पोर्तुगीजाच्या राज्ययंत्राची बिलकुल जरूर नसे. त्याच्या यंत्राखेरीज ते आपला बचाव व संरक्षण महार व कुत्रा ह्यांच्या द्वारा चोरांचिलटां पासून व पशूंपाखरां पासून करण्यास पूर्ण समर्थ होते. पोर्तुगीजांच्या धाडी पासून मात्र बचाव करण्याचें मानस त्यांच्या ठाईं नव्हतें. कारण हिंदू व अहिंदू असे सर्व लोक मुक्तद्वारीं, तुटक व उदासीन असत. करतां, स्वत:च्या धाडी पासून हिंदूचा व अहिंदूंचा बचाव करण्याकरितां पोर्तुगीज लोक जबरदस्तीनें राज्ययंत्र चालवीत, म्हणजे दुसरें तिसरें कांहींएक करीत नसत, करांच्या रूपानें लोकां पासून अन्न व पैसा उकळीत, अथवा स्पष्ट सांगावयाचें म्हणजे हिंदू व अहिंदू ह्यांच्या कष्टा वर चरत. परोपजीवी अश्या ह्या पोर्तुगीजांचा वर्ग सोडला, म्हणजे बाकी राहिलेले सर्व लोक अन्नोत्पादनाच्या बाबतीत एकमेकांचें साहाय्य करीत. तात्पर्य, फक्त अन्नोत्पादनाच्या दृष्टीनें कोंकणांतील ह्या दहा हि सहकारी जातींना एक समाज म्हटलें असतां चालण्या जोगें आहे. इतर सर्व दृष्टीनीं प्रजोत्पादन, विद्योत्पादन, कलोत्पादन, मोक्षोत्पादन, राष्ट्रोत्पादन, वगैरे इतर व्यवसायांत हे गट स्वयंस्फूर्तीनें अन्योन्यसाहाय्य करीत नसत, अथवा खरें म्हटलें असतां करण्याच्या स्थितींत नसत.

६. चित्रांचे व ध्वनींचे पृथक्करण

शब्दसाधनाला फक्त तोंड व कान ही दोन इंद्रिये लागतात. चित्रसाधनाला हात व डोळे ही दोन इंद्रिये लागून शिवाय एखादा चित्रक्षम बाह्य पदार्थ लागतो. शब्दसाधन अंधारात व उजेडात सारखेच उपयोगी पडते, परंतु गैरहजर माणसाला निरुपयोगी असते. जणू काय, चित्रसाधन गैरहजर माणसाच्याच करिता प्राथमिक मनुष्याने निर्माण केले. पहिल्या वस्तूचा कालांतराने स्वतःला किंवा इतरांना पुनः पुनः अनुभव आणून देण्यास चित्रकलेचे हे साधन प्राथमिक मनुष्याला फारच साहाय्यक झाले असावे. इतके की चित्राने तो निरोपही पाठवीत असावा. ह्या कलेचा जसजसा जास्त अनुभव येत चालला तसतशा त्यात सुधारणा होत गेल्या. फळ्यांवर किंव भूर्जपत्रांवर महत्त्वाच्या प्रसंगाची किंवा वीरांची चित्रे काढून ती गोत्रांतील आसपास जवळ दूर राहणा-या मनुष्यांस दाखवीत हिंडणारे वक्ते उत्पन्न झाले व चित्रांच्या अनुषंगाने रसभरित कथा करू लागले, आपल्याकडे निरक्षर लोकांत चित्रकथी हा धंदा अद्यापही करतात. ही चित्रकथकांची संस्था अत्यंत जुनी आहे, इतकी जुनी की वेदादिग्रंथ तिच्या मानाने अत्यंत अर्वाचीन समजावे लागतात. ऋग्वेदांत चित्र हा शब्द येतो व त्याचा अर्थ आश्चर्यवत् पहाणे असा करतात. धातुपाठकार चित्रीकरण व कदाचित् दर्शन असे दोन अर्थ चित्रधातूचे देतो. ऐतिहासिक दृष्ट्या पहाता चित्रीकरण हा अर्थ जुना धरावा असे मत होणे रास्त आहे. चित् हा प्राथमिक अवस्थेतील अत्यंत जुना धातू. त्यापासून संज्ञा ज्या वस्तूची झाली ती वस्तू बाह्य पदार्थावर रेखाटणे या क्रियेला चित्र् हा शब्द लावू लागले. मन् विचार करणे यापासून दुस-याच्या हृपटावर तो विचार काढणे याला मंत्र हा शब्द, किंवा तन् पसरणे पासून दुस-यावर हुकुमत पसरणे या अर्थी तंत्र हा शब्द, याच मासल्याचे आहेत. चित्र, मंत्र, तंत्र हे शब्द चित्, मन् तन् या शब्दांहून अर्वाचीन. येणेप्रमाणे चित्रीकरणाची ही कला वैदिक लोकांच्या पूर्वजांत अती जुनी आहे व विचार प्रगट करण्याचे एक साधन म्हणून मुख्यतः ती प्रथम अस्तित्वांत आली. शब्दसाधन व चित्रसाधन यांमध्ये दुसरा फरक असा आहे की ध्वनीचे अनुकरण शब्दसाधन करते व आकृतीचे अनुकरण चित्र करते. आकृती जशी दिसते तशी मनुष्य डोळयाने ग्रहण करतो. सृष्टीत आकृत्या बहुत मिश्र असतात, साध्या नसतात. तळ्यावरील झाडावर हातात दगड घेऊन उभ्या राहिलेल्या माकडाने चोचीत सर्प धरणारी घार मारिली, ही सर्व मिश्र अवस्था माणूस एकदम पहातो व तिचे मिश्र चित्र प्रथमतः काढतो. नंतर बहुत कालांतराने मिश्र अवस्थेतील एक एक बाब तो पृथक् करावयाला शिकतो.

व रंगचित्रकर्म ही दोन्ही मनुष्याला स्वयंभू आहेत. तत्रापि, आपणा आर्याचा संबंध हिंदुस्थानातील प्राथमिक कोरीव व रंगीत चित्रकर्माशी दुस-या एका बाजूने पोहोचतो. वैदिक आर्यांच्या पूर्वी या देशात नागलोक रहात असत. ते जर येथील मौल असतील? तर प्राथमिक अवस्थेतील त्यांचे हे चित्रकर्म असू शकेल. नागलोकांची चित्र ख्याती असे. ह्यांचा शरीरसंबंध वैदिक आर्यांशी झालेला इतिहाससिद्ध आहे व नागवंशाचा अंतर्भाव आर्यवंशात करण्याची रूढीही आहे. कसेही असो, कोरीव किंवा रंगीत चित्रकर्माने मनोगत व्यक्त करण्याची कला ध्वनींनी मनोगत व्यक्त करण्याच्या कलेइतकीच बहुतेक प्राथमिक आहे. प्राथमिक अवस्थेत चित्रीकरणाचे हे साधन सामान्य रोजचे विचार प्रगट करण्याच्या उपयोगी पडे. प्राथमिक अवस्थेत ह्या स्वयंभू चित्रसाधनाचा अवलंब विचारप्रकटनार्थ केल्यावाचून आर्य राहिले असतील हे संभवत नाही.

हात बांधून भेटावयाला या म्हटल्या बरोबर शिवाजी बंदा गुलाम म्हणून जयसिंगाच्या तंबूंत गेला. भिकार पंचहजारी व्हा म्हटल्या बरोबर सगळ्या जगाला पालाण घालणारा तो महावीर क्षुद्र पातशाही सरदार बनला. आणि आग-यास चला म्हटल्या बरोबर पातशाहाला आदबीनें कुरनीस करण्या करतां, शिवाजी आग-यास निघाला. जयशिंगानें हा शेवटला हुकूम करावा व तो आपण क्षणाचा हि विलंब न लावतां ताबडतोब अमलांत आणावा ह्या च पर्वणीची वाट शिवाजी चातका प्रमाणें पहात होता. अवरंगझेबाची प्रत्यक्ष व समक्षासमक्ष भेट होण्याचा व भेटीच्या प्रसंगी पातशाहत व पातशाहा गारत करण्याचा हा कधीं न येणारा कपिलाषष्टीचा योग शिवाजीनें लग्नमुहूर्ता प्रमाणें उत्सुकतेनें साधिला. अवरंगझेबाच्या खुद्द मामाचीं बोटें छाटणारा व मामाच्या पोराचा जीव घेणारा शिवाजी पातशाहाला कुर्निसा करावयाला निघालेला पाहून संन्यास घेतलेल्या लांडग्याची आठवण जयसिंगाला व्हावयाला हवी होती. परंतु, तसा कांहींएक प्रकार न होतां खुळ्या जयसिंगाला आपण बडी पातशाही कामगिरी बजावीत आहों अशी फुशारकी वाटली. हें च शिवाजीला हवें होतें. शिवाजीनें लीनतेचें सोंग इतकें कांहीं बेमालूम आणिलें कीं शिवाजीला आपण नरम केला अश्या वल्गना जयसिंग बडबडूं लागला. दिल्लीन्द्राचें पद पटकविण्याची ईर्ष्या शिवाजी आजन्म बाळगीत होता,हें हिंदुस्थानांतील मुत्सद्दी जाणत होते व जयसिंगाच्या हि काना वर गेलें नव्हतें असें नव्हतें. शिवप्रभृतिभूपालाः दिल्लीन्द्रपदलिप्सव: असें शिवाजीचें वर्णन जयसिंगाचा प्रशस्तिकार करण्या इतकी जगजाहीर ही आकांक्षा झाली होती. तत्रापि शिवाजीची हड्डी आपण मोकळी केली अशी फुशारकी जयसिंग मारित च होता व स्वतःच्या मामाचा हात तोडणा-या व मामाच्या मुलाचा वध करणा-या आततायाची भेट घेण्यास अवरंगझेब सिद्ध झाला होता. जखमे वर फुंकर घालणा-या शिवाजीनें अवरंगझेबाला ही जी भुरळ पाडली ती पाहून तत्कालीन शहाण्यांनीं तोंडांत बोटें घातलीं असतील ह्यांत संशय नाहीं. शिवाजी अवरंगझेबाला स्नेहालिंगन देण्यास कडेकोट बंदोबस्त करून निघाला. बरोबर हजार पांचशें करोल व जातिवंत सरदार जीवाचे जीवलग व छातीचे निधडे असे त्यानें घेतले आणि मजल दर मजल दहा दहा पांच पांच माणसें ठेवीत ठेवीत आग-यांतील व्याघ्राच्या गुहेंत सरज्यानें प्रवेश केला. प्रथम भेटीच्या प्रसंगीं कुरनीस करण्याच्या वेळीं पातशाहाची व आपली जी लगट होईल त्या लगटींत सिंहासना वर उडी मारून पातशाहाचा निकाल लावावा आणि दरबारांत जमा झालेल्या उमरावांची कत्तल करून तेथल्या तेथें हिंदुपदपातशाहीची स्थापना करावी आणि सरहद्दी वर जय्यत ठेविलेल्या सैन्याच्या जोरा वर व धाका वर ती पातशाही स्थिर करावी असा शिवाजीचा बूट होता. चंद्रराव, अफजलखान, शाहिस्तेखान, इत्यादींचा फडशा शिवाजीनें असा च पाडला होता. तें च दूरदृष्टिमिश्रित अघटित साहस ह्या प्रसंगीं फलद्रूपतेस आणण्याचा शिवाजीचा आशय होता. परंतु, शिवाजीच्या बारश्यास जेवलेल्या अवरंगझेबाला त्याचें दैव थोर म्हणून दरबारांत शिवाजीला आपल्या पासून शंभर हात दूर उभें करण्याची बुद्धि आयत्या वेळीं झाली म्हणून निभावलें; नाही पक्षीं, चकत्यांच्या पातशाहींचा रामबोलो त्या च समयीं होण्याचा प्रसंग बहुतेक ठेपल्या सारखा च होता. खुद्द पातशाहा व त्याचे हजार पाच शें सरदार उडविल्या वर, मुक्तद्वारीं, तुटक व सुखाची भाकर खाण्यास चटकलेले हिंदुमुसुलमान प्रजाजन शिवाजीची पातशाहात निमूटपणें बिनतक्रार चालू देते, ही खूणगांठ शिवाजीनें पक्की बांधून ठेविलेली होती. तात्पर्य, राज्ययंत्राच्या व राज्यकर्त्यांच्या ब-या वाईटा कडे विपुल व सुलभ अन्न मिळणा-या हिंदवासीयांचे बिलकुल लक्ष्य नसे. उघड च झाले कीं ह्या देशांत ज्याला राज्य आक्रमण करावयाचें असे त्याला तें मिळविण्या साठीं सामान्य लोकांची मनधरणी करण्याची जरूर पडत नसे, राज्ययंत्रचालकांच्या लहान कंपूची वासलात लाविल्यानें त्याचें काम बेश साधे.

५. अभिप्रायदर्शक चित्रकर्म

मुखध्वनींनी विचारप्रदर्शन करावयाचे म्हटले म्हणजे ऐकणारी व्यक्ती बोलणा-या व्यक्तीच्या आटोक्यात हजर असावी लागते. व्यक्ति गैरहजर असली तर ह्या ध्वनिसाधनाचा कांहीएक उपयोग होत नाही. ध्वनी धरून ठेवून गैरहजर इसम त्या स्थानी आला असता तो त्याच्या कानांवर पडावा, ही युक्ती त्या प्राथमिक अवस्थेत असंभाव्य होती. तथापि प्राथमिक अवस्थेत त्यांतल्या त्यांत मनुष्याला एक युक्ती सुचलीच. तो ज्या स्थली रहात असे–प्रायः डोंगरकपारी किंवा गुहा-तेथील भित्तिसदृश खडकावर किंवा खाल्लेल्या अथवा मारलेल्या प्राण्याच्या हाडावर आपल्या अवस्थेचे रेखाचित्र तो कोरी व त्या चित्रद्वारा आपले मनोगत आतेष्टांना कधीकाळी तरी कळेल अशी आशा बाळगी. ह्या कोरकामाप्रमाणेच रंगचित्राचेही काम प्राथमिक मनुष्याला माहीत होते, असे विंध्यपर्वतांतील अवशेषांवरून उघड होते. गैरहजर मनुष्यांकरताच तेवढे कोरकाम किंवा रंगचित्र प्राथमिक मनुष्य काढी असे नव्हे. जेथे भाषेने संपूर्ण मनोगत शब्दद्वारा कळविता येत नसे, तेथे हजर मनुष्यांना काठीने किंवा बोटाने जमिनीवर रेघा व पाने, भूर्जपत्रे, इत्यादींवर रंगचित्रे काढून तो आपले मनोगत स्पष्ट करी. रंगचित्र व कोरीव रेखाचित्रे यांचा प्राथमिक मनुष्य शब्दांच्या बरोबरीने उपयोग करीत असावा असा बळकट अंदाज आहे. प्राथमिक मनुष्याचे जे रेखाकर्म किंवा रंगचित्रकर्म हिंदुस्थानात सापडते त्याचा संबंध आपणा वैदिक लोकांच्या पूर्वजांशी नाही. कारण आपण ह्या देशांतील मौल नव्हो. तथापि, आपणा आर्यांचे मूलस्थान हिंदुस्थानाबाहेर जेथे कोठे असेल तेथे आपल्या प्राथमिक पूर्वजांनी कोरीव व रंगीत चित्रे विचारप्रदर्शनार्थ काढिली असतील यात बिलकुल संशय नाही. ध्वनी ऊर्फ भाषा जशी मनुष्याला उपजत आहे तसेच कोरकाम

४. मूळभूत अनेक ध्वनिपरंपरा

ही परंपरा वैदिक आर्यांची झाली. पृथ्वीवर इतर अशाच पाच सात ध्वनिपरंपरा आहेत. असुर भाषा, द्राविड भाषा, चिनी भाषा, अमेरिकन इंडियनांच्या भाषा, आफ्रिकन भाषा इत्यादि विचारप्रदर्शनाची ध्वनिसाधने अनेक झाली आहेत आणि त्यांचे ध्वनी आर्यध्वनींहून भिन्न आहेत. भिन्नध्वनी असण्याचे कारण प्राथमिक अवस्थेत त्या त्या लोकांच्या कानावर आर्याना भेटले त्याहून इतर प्राण्यांचे व वस्तूचे भिन्न ध्वनी पडले हे होय. ह्या आर्येतर लोकांच्या ध्वनिसाधनांचा विचार येथे इतकाच स्पर्शून, आर्याच्या दुस-या एका विचारप्रदर्शक साधनाकडे वळू.

सार्थ ध्वनी एकापुढे एक काढणे हीच तत्कालीन भाषणशैली. नदीच्या काठावरील सिंहांनी मनुष्य मारिला, हा आशय-नदी कंठ स्थान सिंह मनुष्य झोप-हे शब्द एकापुढे एक उच्चारून कसातरी अर्धामुर्धा दर्शविला जात असे व बाकी राहिलेला अर्थ अंगविक्षेपांनी पूर्ण केला जाई. अनेकवचन बोटांनी किंवा हातांनी दाखविले जाई. अध्वनिपदार्थवाचक शब्द व जातिवाचक नामे अस्तित्वात आल्यावर कालदर्शक व संख्यादर्शक शब्द अस्तित्वात आले. नंतर लिंगभेद समजू लागला. शेवटी वाढ होत होत वारंवार येणा-या संबंधदर्शक शब्दांचे संक्षेप होऊन प्रत्ययोपसर्गादीची निर्मिती झाली आणि लाखो वर्षांनी वैदिक भाषा जीस म्हणतात ती उत्क्रान्त झाली. तिच्यापासन किंवा तिच्या बहिणीपासून जुनी महाराष्ट्री, महाराष्ट्री, अपभ्रंश व जुनी मराठी अशा परंपरेने आपण सध्या बोलतो ती अर्वाचीन मराठी उदयास आली. प्राथमिक, वैदिक, संस्कृत, महाराष्ट्री, मराठी ह्या भाषांची म्हणजे मुखध्वनींनी विचारप्रदर्शन करणा-या साधनांची परंपरा ही अशी आहे.

३९. सरकार नांवाच्या कृत्रिम, उपटसुंभ, चोरट्या व जुलमी संस्थे संबंधानें गांवकरी जर इतका पराकाष्ठेचा उदासीन असे, तर असा प्रश्न उत्पन्न होतो की, येणारें नवें सरकार व जाणारें जुनें सरकार ह्यांच्या मधील युद्धें, तंटे, मारामा-या व झटापटी कोण खेळे ? हिंदुस्थानचा राजकीय इतिहास ऊर्फ सरकारांचा इतिहास तर अथ पासून इतिपर्यंत मारामा-यांनीं तुडुंब भरलेला आहे. या मारामा-या कोण करी ? मृत सरकारा बद्दल कोण रडे ? आणि नव्या सरकाराची जयंती कोण करी ? ह्या प्रश्नाचें उत्तर असें आहे कीं, ज्या मूठभर उपटसुंभांनीं सरकार स्थापिलें ते मूठभर लोक जुन्या सरकाराच्या वतीनें नव्या सरकाराशीं झुंजत,तंडत व पराभूत झाले असतां रडत आणि विजयी झाले असतां खिदळत. हिंदुस्थानांत सरकार ही संस्था सदा कांहीं अत्यल्पसंख्याकांची असे, सार्वलौकिक कधीं हि नसे. एवढें मोठें मोंगलांचें साम्राज्य; परंतु त्यांतील मुख्य घटकावयांची संख्या राजघराण्यांतील पुरुषांच्या संख्ये हून म्हणजे पांच पंचवीस राजपुरुषां हून जास्त नसे, कमाल ओढाताण केली तर साम्राज्यांतील मुलकी व लष्करी सुभे व नायबसुभे मिळून दीड दोन हजारां हून जास्त नसे. हे दीड दोन हजार लोक मोगल साम्राज्या करितां लढत, तंडत, मरत व रडत. बाकीच्या कोट्यवधि हिंदवासीयांना मोंगल, मराठा, पोर्तुगीज इत्यादि सर्व एका च दर्जाचे चोर भासते. तात्पर्य, हिंदुस्थानांत होऊन गेलेली सर्व सरकारें मूठभर अल्पसंख्याकांची आहेत व ह्या मूठभर अल्पसंख्याकांचें सरकार त्यांच्या च सारख्या इतर मूठभर परंतु समबल किंवा वरचढबल अल्पसंख्याक सरकाराच्या ऊर्फ टोळीच्या हातून नाश पावतें. त्यांत गांवक-याचा हात शपथेला सुद्धां नसतो. एतत्संबंधानें अनेक ऐतिहासिक उदाहरणांतून एक अत्यन्त ठळक असें उदाहरण येथें नमूद करतों व तें मराठ्यांच्या इतिहासांतले घेतों. शिवकालीं मराठे व मुसुलमान ह्यांच्या मध्यें घनघोर झगडा सुरू होता, अशी भाषा वापरलेली सामान्य इतिहासांतून आढळते. त्या भाषेंत कितपत तथ्य आहे तें पाहूं. शिवाजीच्या बाजूला एकोन एक सर्व मराठे होते असें म्हणतां येत नाहीं. महाराष्ट्रांतील सर्व मराठ्यां पैकीं शेंकडा नव्वद मराठे अवरंगझेबाचें प्रजाजन होते व त्यां पैकीं कांहीं त्याचे सैनिक होते. मुसुलमानां पैकीं शेंकडों लोक शिवाजीचे प्रजाजन होते व कांही त्याच्या सैन्यांत होते. तेव्हां शिवाजी व अवरंगझेब यांच्यांत जीं युद्धें झालीं त्यांना मराठे व मुसुलमान ह्या दोन लोकां मधील युद्धें म्हणणें इतिहासाला धरून नाहीं. हीं लोकां लोकां मधील युद्धें नव्हतीं. हीं दोन्हीं बाजूच्या अल्पसंख्याक राज्यकर्त्यांचीं म्हणजे सरकारांची युद्धें होतीं. सामान्य गांवकरी ह्या दोघां हि कडे ढुंकून सुद्धां पहात नसे. तो केवळ उदासीन असल्या मुळें, त्याची संमती घेण्याच्या किंवा त्याचें औदासीन्य घालविण्याचा किंवा त्याला शिक्षण देण्याचा किंवा त्याला राजकीय उपदेश पाजण्याचा खटाटोप करण्याची जरूर नव्हती. त्याला सरकारें बनविण्याची गरज भासत नसल्या मुळें, कोणत्या हि पक्षाच्या वतीनें युद्धाच्या नाटकांत तो सोंग घेईल ही आशा च करावयाला नको होती. ही बाब शिवाजी व अवरंगझेब दोघे हि जाणून होते. भाषा मात्र दोघे हि अघळपघळ वापरीत. धर्मा करितां, देशा करितां, लोककल्याणा करितां लढावयाचें व शत्रूचा निःपात करावयाचा अशी भाषा दोघे हि योजीत. त्या भाषेंतील तथ्य एवढें च असे कीं शिवाजी ह्या व्यक्तीला ठार करण्यास अवरंगझेब प्रयत्न करी व अवरंगझेब ह्या व्यक्तीचा प्राण घेण्या करितां शिवाजी टपून बसे. पुढा-याची उत्सवमूर्ति व तिचे हजार पांजशें प्रमुख सरदार उडविले म्हणजे दौलत गारत झाली, ही बाब दोघे हि जाणून होते. एकमेकांचा प्राण घेण्याचे दोघांचे असे डांवपेंच चालले असतां, शिवाजीच्या मनांत अवरंगझेबाला उडविण्याची व पातशाही काबीज करण्याची एक अचाट, परंतु सर्वथा व्यवहार्य कल्पना आली. अवरंगझेब स्वत: जातीनें दक्षिणेस फार वर्षे आला नव्हता व पुढें हि कित्येक वर्षे येण्याचा संभव नव्हता. अवरंगझेबाला उचलावयाचें म्हणजे तो स्वत: दक्षिणेंत आला पाहिजे किंवा शिवाजीनें तरी उत्तरेस आग्-याला गेलें पाहिजे. पहिला मार्ग नाहीं; तर शिवाजीनें दुसरा मार्ग पतकरिला. कसें तरी करून खुद्द आग्-यास जावयाचें व तेथें अवरंगझेबाचा म्हणजे त्याच्या पातशाहीचा कबजा घ्यावयाचा असा बेत शिवाजीनें केला आणि तो बेत अत्यन्त शिताफीनें अमलांत येण्याच्या मार्गास लाविला. शाहिस्तेखानादि अनेक मुसुलमान सरदारांना खडे चारणारा शिवाजी जयसिंगा पुढें दातीं तृण धरून केवळ गाय झाला. इतका गाय आला कीं जयसिंग सांगेल तें करण्यास तो राजी झाला. जयसिंग तोंडांतून शब्द काढण्याचा अवकाश कीं शिवाजीनें त्या प्रमाणें केलें च म्हणून समजावें. किल्ले द्या म्हटल्या बरोबर जयसिंगाच्या स्वाधीन शिवाजीनें किल्ले केले.