Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
भा भा ध्वनी करणा-या उज्वल व लखलखीत रंगाच्या पशुपक्ष्यांवरून प्रकाशाला भा हा शब्द मनुष्य लावू लागला. चोचीने, सोंडेने, पायाने किंवा दातांनी पदार्थ करकरा फाडण्याच्या किंवा खाण्याच्या ध्वनीवरून कर हा शब्द सोंडेला किंवा चोचीला किंवा स्वतःच्या हाताला लावण्याची बुद्धी मनुष्याला झाली व कृ करणे व कृ विदारणे हे दोन धातू निर्माण झाले. एणेप्रमाणे गुणांचे शब्दांनी प्रदर्शन करण्याची युक्ती सापडल्यापासून मनुष्याने शब्दांची केवळ टांकसाळ मांडिली.
द्रव्य, कर्म व गुण ह्यांचे दर्शक शेकडो शब्द मनुष्यापाशी साठले. तेव्हा त्यातील जाती ओळखण्याचा म्हणजेच व्यक्ती ओळखण्याचा आणीक एक शोध त्याला लागला. हिरवा, पांढरा, तांबडा, काळा इत्यादी अनेक वर्ण पाहून त्या सर्वांना सामान्य असा रंग हा शब्द त्याने मुकरर केला. रंज् हा मूळ लालभडक रंगाचा द्योतक शब्द होता. त्या शब्दाला सामान्यार्थक बनवून रंग हे जातिनाम मनुष्याने उत्पन्न केले, आणि अशी अनेक जातिनामे तयार केली. नंतर महत्कालान्तराने शास्त्रीय ज्ञानाचा अहंकार झाल्यावर जाती अगोदर की व्यक्ती अगोदर हा वाद तो घालू लागला जातिकल्पना मनुष्याच्या डोक्यात स्वयंभू आहे आणि भूतभविष्य-वर्तमान सर्व व्यक्तींना व्यापून जाती असते, असा निरर्गल सिद्धान्तही तो ठोकून देऊ लागला. वस्तुतः जातिनामे भाषेच्या व बोलण्याच्या सोईंकरता केवळ सांकेतिक आहेत व त्या नामांनी दर्शविलेला अर्थ मूर्त नसून केवळ मानसिक असतो हे त्याच्या लक्ष्यात परवा परवापर्यंत येईना. जातीचा मानसिक अर्थहि जसजशी माहिती वाढत जाते तसतसा बदलत जातो व कधी कधी अजिबात नष्ट होतो; सबब जातिकल्पना स्वयंभू, स्थिर व व्यक्तिप्राक् नाही, हेही तो ध्यानी धरीना. हा जाति-व्यक्तिवादाचा घोटाळा पुढला आहे; परंतु त्याचा उगम प्राथमिक मनुष्यसमाजात लाखो वर्षांपूर्वीच झालेला असल्यामुळे प्रस्तुत स्थली उल्लेख्य झाला. पुढे जरी असा हा घोटाळा जातिनामांनी केला, तत्रापि भाषेच्या व विचाराच्या प्रगतीला जातिनामे जशी सध्या तशीच किंवा त्याहूनहि जास्त पुरातनकाली उपकारक झाली. त्या पुरातनकाली मराठी भाषेची पूर्वज जी वैदिक भाषा तिची पंचवीस-तिसावी पूर्वज जी प्राथमिक अप्रत्यय भाषा ती निव्वळ सुट्या ध्वनींची होती.
महिकावती (माहीम)ची बखर
३८. मुबलक अन्न व यथेच्छ जागा असल्या मुळें, कोंकणांत जीवनार्थ कलह युरोपांतील किंवा मध्यआशियांतील भुकेबंगाल देशांतल्या प्रमाणें जाज्वल्य नाहीं. संपन्नतेनें आपला वरद हस्त एकट्या कोंकणां वर च ठेविला असें समजूं नये. भरतखंड म्हणून ज्या खंडाला म्हणतात त्या बहुतेक सर्व खंडा वर अन्नपूर्णेची अशी च पूर्ण कृपादृष्टि आहे. ह्या कृपादृष्टीचा परिणाम येथें रहावयास आलेल्या कायमच्या सर्व लोकांच्या स्वभावांत दृष्टीस पडतो. वाटेल त्यानें येथें यावें व थोडीशी खडबड व गडबड करून आपल्याला हवी तशी व मिळेल तशी जागा करून घ्यावी. काळजी एवढी च घ्यावी कीं, दुस-याला आपल्या पासून तोशिस पोहोचूं नये. एखादा रानटी मोगल किंवा हापापलेला युरोपीयन प्रथम प्रथम बेवकूबपणें मारामा-या व रक्तपात करतो. परंतु वस्तुस्थिति ध्यानांत व अनुभवांत आल्या वर तो हि आस्तेआस्ते निवळत जातो व इतरांच्या प्रमाणें च सालस, निरुपद्रवी व पाहुणचारी बनतो. तात्पर्य, हिंदुस्थानांत माणसाचा स्वभाव अन्नसंपत्तीच्या मुबलक व सहजलभ्य पुरवठ्या मुळें मुक्तद्वारी बनतो पहिली भीड चेपे तों पर्यंत काय घासाघीस होईल तेवढी च. तदनंतर दोन्ही समाज शेजारधर्मानें परंतु तुटकपणें रहातात. तुटकपणाचा हा कल समाजा पुरता च न थांबून समाजांतील कुटुंबांना व व्यक्तींना हि पछाडतो. कारण समाजाला जसें अन्न अल्पश्रमानें मिळूं शकतें तसेंच कुटुंबांना व व्यक्तींना हि तें तितक्याच किंवा त्याहून हि अल्पतर श्रमानें मिळतें. अन्नाच्या सहजलभ्यते मुळें अन्योन्यावलंबित्व बहुतेक नसल्या सारखें होऊन, सर्व देश पृथक् पृथक् व अन्योन्यस्वतंत्र अश्या व्यक्तींचा बनून जातो. व्यक्तिस्वातंत्राचा अत्यन्त अतिरेक झालेला जर कोठें पहावयाचा असेल, तर तो हिंदुस्थानांत पहावा. हिंदुस्थानांत शेकडो खेडेगांवें अशीं आहेत कीं त्यांतील बहुतेक सर्व गरजा गांवांतल्या गांवांत भागल्या जातात. तेल, मीठ, बोंबील, गूळ व कपडा ह्यांची बेगमी जवळच्या जत्रेंत करून ठेविलीं, म्हणजे खेड्यांतल्या कुटुंबाला सगळें जग वर्षभर धाब्या वर बसवितां येतें. येणें प्रमाणें अन्नाच्या वैपुल्यानें हिंदुस्थानांतील माणसांचा स्वभाव जसा मुक्तद्वारी बनतो तसाच अन्नाच्या सौलभ्यानें तो तुटक निपजतो. दुस-याची विशेष पर्वा बाळगण्याची अपेक्षा रहात नाहीं. मुक्तद्वार पडल्या मुळें देशांत चाहेल त्यानें शिरावें आणि स्वभावांत तुटकपणा असल्या मुळें जुटीच्या अभावीं आगंतुक परकीयाला कमींत कमी अडथळा व्हावा, असा ह्या देशांतला मनुष्यस्वभाव आहे. पुढें वाढून ठेविलेलें सुग्रास अन्न टाका आणि परकीय बाह्याला शत्रू समजून त्याशीं लढण्यांत कदाचित् प्राण वेचा, हा खुळसट धंदा हिंदुस्थानांतला शहाणा माणूस सहज च करीत नसे. अशा स्थितींत पृथ्वी वरील कोणी हि माणूस असें च आचरण करता. भारतबाह्य परकीयांना प्राण वेंचून अन्न मिळवावयाचें असे. भारतीयांना प्राण वेंचून हातचें अन्न गमवावयाचें असे. विपुल अन्न आणि सुलभ अन्न हाताशीं तयार असल्या मुळें, हिंदुस्थानांतील माणसांला पोलिसाची म्हणजे सरकार म्हणून ज्या संस्थेला संज्ञा आहे त्या संस्थेची अडगळ फारच थोडी खपे. श्वापदां पासून व चोरचिलटांपासून अन्नाचें संरक्षण करण्याला महार व कुत्रा असला म्हणजे हिंदू गांवाचें काम भागे. पंचायत, महार व कुत्रा ह्या हून जास्त भानगडीचें, भव्य किंवा भयंकर सरकार हिंदू ग्रामसंस्थेला नको असे. गेल्या तीन हजार वर्षांत हिंदुस्थानांत जी देशी व परदेशी सरकारें होऊन गेलीं तीं सर्व एका प्रकारच्या पोटबाबू चोरांची झालीं व सरकार म्हणजे एक उपटसुंभ चोरांची टोळी आहे. अशी हिंदू गांवक-याची अंतस्थ प्रामाणिक समजूत असे. त्या मुळें सरकाराच्या ब-या वाईटा कडे हिंदू गांवकरी स्वतः होऊन बिलकुल लक्ष्य देत नसे. जुनें सरकार मोडो किंवा नवीन सरकार जुडो, त्याचें सुखदुःख गांवक-याला तितपत च असे. अपरिहार्य आपत्ति म्हणून सरकार नांवाच्या चोराचें देणें एकदा कसें तरी देऊन टाकलें म्हणजे वर्ष भर पीडा चुकली, इतपत प्रेम सरकार नांवाच्या संस्थे वर गांवक-याचें असे. ह्या भावनेचा असा परिणाम झाला कीं, शातवाहन, जुने मराठे, मुसुलमान व पोर्तुगीज इत्यादि सरकारांचें जन्म व मृत्यू हिंदू गांवक-यांनीं हेातील तसे होऊन दिले. त्यांच्या भानगडींत आपण होऊन ते कधीं पडले नाहींत. जुन्या सरकाराच्या मृत्यू बद्दल गांवकरी कितपत रडले व नव्या सरकाराच्या जन्मा बद्दल गांवकरी कितपत हसले, ह्या प्रश्नाची ऐतिहासिक व मानसिक विवेचना ही असल्या मासल्याची आहे. हिंदू गांवक-याची सष्टिसिद्ध, परिस्थितिसिद्ध व अन्नसिद्ध मनोरचना इतकी मुक्तद्वारी, तुटक व स्वयंपूर्ण बनलेली असे कीं देशी किंवा परदेशी कोणतें च सरकार त्याला मनापासून नको असे.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
आपणास सध्या अज्ञात असलेल्या त्या ध्वनींवरून प्राथमिक मनुष्यांनी जे शब्द बनविले ते शब्द प्राथमिक ध्वन्यनुकरणात्मक नसून सादृश्यावरून बनविलेले साधित म्हणून ठरविण्याची चुकीही आपल्या हातून होण्यासारखी आहे. येथे ऐतिहासिक प्रमाण उपलभ्य नाही. ते लाखो वर्षांपूर्वीचे ध्वनी पुनरुज्जीवित करण्याचे साधन आपणाजवळ नाही. त्यामुळे मूळ शब्द कोणते व कृतक शब्द कोणते ते निवडता येणे परम दुर्घट आहे. उदाहरणार्थ, काळा, पांढरा, हिरवा वगैरे रंगवाचक शब्द घ्या. ह्या निर्जीव पदार्थांना नावे कशी मिळाली ? सादृश्यावरून मिळाली की ध्वनीवरून मिळाली ? काळा, पांढरा, हे जे साधे नित्य भेटणारे रंग आहेत त्यांची नामे प्राथमिक मनुष्याला निर्माण करण्याची आवश्यकता जरूर भासली असेल. त्याशिवाय अत्यन्त साधाही व्यवहार शक्य नाही. आमच्या मते काळा, पांढरा ही रंगनामे खालील त-हेने अस्तित्वात आली असावीत, अत्यन्त कृष्णवर्ण अशा एखाद्या तत्कालीन प्राण्याचा आवाज काल् काल् असा असावा व काळा रंग शब्दाने दर्शविण्यास प्राथमिक मनुष्याने काल् काल् ध्वनी करणा-या त्या काळ्याकुट्ट प्राण्याचा काल काल ध्वनी अनुकरला असावा. ध्वनीच्या आधारावर तो ध्वनी करणा-या प्राण्याचा जसा बोध करून देण्याचा शोध मनुष्याने लावला, त्याचप्रमाणे तो ध्वनी करणा-या प्राण्याच्या रंगावरून काळा, पांढरा, इत्यादी अध्वनी साध्या रंगांनाही नावे देण्याचा शोध त्याने केला. गुणींच्या ध्वनीवरून गुणांना नावे देण्याचा हा मनुष्यप्राण्याला लागलेला आणीक एक अपूर्व शोध होय. आतापर्यंत ध्वनी करणा-या प्राण्यांना, वस्तूंना व क्रियांनाच तेवढी नावे देण्याची कला त्याला माहीत होती. ह्यापुढे अध्वनी गुणांचेही शब्दाने प्रदर्शन करण्याची कला त्याला हस्तगत झाली.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
आस्तेआस्ते प्रत्ययार्थक सबंध शब्दांचे संक्षेप होता होता साक्षात् प्रत्यय निर्माण झाले. परंतु सप्रत्यय भाषेचा काल फार अलीकडील आहे. सध्या ज्या हजारो, किंबहुना लाखो वर्षांपलीकडील भाषेसंबंधी बोलणे चालले आहे तो काल अप्रत्यय भाषेचा होता. प्राणी व वस्तू यांच्या ध्वनीच्या अनुकरणात्मक शब्दांनी बनलेल्या त्या लाखो वर्षांपूर्वील प्राथमिक अप्रत्यय भाषेचा वैदिक किंवा संस्कृत भाषा कदाचित् पंचवीस-तिसावा अपभ्रंश असण्याचा यद्यपि पूर्ण संभव आहे, तत्रापि त्या ध्वन्यनुकारक अप्रत्यय प्राथमिक भाषेचा मागमूस अद्यापही संस्कृत भाषेत बराच राहिलेला आहे. हा मागमूस पाणिनीने दाखवून दिलेला आहे. धन्य आहे ह्याच्या पृथक्करण शैलीची की बहुतेक सर्व संस्कृत शब्दांची धातुबीजे प्रत्ययोपसर्गांची टरफले सोलून काढून त्याने धुतल्या तांदुळाप्रमाणे मोकळी करून ठेविली आहेत. पाणिनीय धातुकोशातील धातू व इतर धातू यांची परीक्षा करता आम्हास असे आढळून आले आहे की सुमारे सातशे धातू ध्वन्यनुकरणोत्पन्न आहेत. कित्येक एकध्वन्यात्मक आहेत व कित्येक अनेक ध्वनींच्या संयोगापासून झालेले आहेत. याशिवाय बोलण्याच्या भाषेत चिमचिम, गपगप, फसफस, धपधप इत्यादि ध्वन्यनुकारक धातु पाणिनीने व कोशकारांनी जे दिलेले नाहीत, परंतु संस्कृत ग्रंथांतून वारंवार जे भेटतात व जे केवळ बोलण्यात होते असे मराठीतील त्यांच्या अपभ्रंशावरून अनुमानता येते ते हजारो निराळेच. तात्पर्य, लाखो वर्षांपूर्वील आर्यपूर्वज प्राथमिक मनुष्याला किंवा मनुष्यसमाजाला हजारो ध्वन्यनुकारक शब्दांची भाषा अवगत होती आणि अशी स्थिती असणे काही विचित्र नाही. मुळीं बोलणे म्हणजे विकार, विचार, वस्तू व क्रिया ह्यांचे प्रदर्शन मुखातील ध्वनींनी करणे. जो जो म्हणून काही अनुभव आला त्याचे प्रदर्शन मुखध्वनीने करण्याच्या या कलेचे सारसर्वस्व म्हणजे सर्व ब्रह्मांड ध्वनिरूप करून दाखवावयाचे. कोणत्या प्राथमिक समाजाने ब्रह्मांडाचा कितवा भाग कोणत्या त-हेने ध्वनिमय केला असेल हे त्या त्या समाजाच्या बहिःसृष्ट्यनुभवावर व प्रतिभेवर अवलंबून राहणार हे उघड आहे. सध्या आपल्या भोवतील प्राण्यांचे व पदार्थांचे जे आवाज आपण ऐकतो त्याहून भिन्न असे आवाज लाखो वर्षांपूर्वील प्राथमिक मनुष्यसमाजाने ऐकिले असतील हे सांगावयास नको. तत्कालीन दोन सोंडाचे हत्ती किंवा पन्नास हात लांबीच्या सुसरी कोणता ध्वनी करीत असतील अगर तत्कालीन नद्या, झाडे कोणता आवाज करीत असतील त्याची सध्या आपणास कल्पनाही नाही.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
३. अध्वनिपदार्थवाचक व जातिवाचक नामे
अनुकरणात्मक ध्वनींच्या द्वारा आपले मनोगत दुस-यांना कळविण्याचा किंवा आपले भूत मनोगत वर्तमानकाली स्वतःचे स्वतःला प्रत्यक्ष करण्याचा हा शोध मनुष्यमात्राच्या प्रगतीच्या इतिहासात मोठा क्रांतिकारक झाला. ज्या समाजात हा शोध अद्याप झाला नव्हता त्या समाजावर हरएक प्रकारे वर्चस्व मिळाले. टेलिग्राफने मनोगत कळविता येणा-या सध्याच्या पाश्चात्त्यांना तदनभिज्ञ हिंदू, निग्रो, चिनी इत्यादी पौरस्त्यांवर जे वर्चस्व मिळालेले आपण पहातो त्याच अपूर्व मासल्याचे वर्चस्व अनुकरणात्मक ध्वनीच्या भाषेचा शोध लावणा-या समाजांना मिळाले. परंतु कोणत्याही शोधाप्रमाणे हा शोध अपुरा भासू लागला. ध्वनी ज्यापासून ऐकू येईल त्या पदार्थांचे व क्रियांचे नामकरण करता आले हा काही थोडाथोडका लाभ झाला असे नव्हे. परंतु ध्वनी ज्यांना नाही असे पदार्थ व वस्तू असंख्य राहिल्या. ह्या असंख्य अध्वनी वस्तूंचे व क्रियांचे प्रदर्शन येथपर्यंत हावभावाने होत असे. कावळा मांस खातो, हा आशय कळविण्याला अनुकरणार्थ काक हा शब्द उच्चारावा, अध्वनी जे मांस त्याचा तुकडा दाखवावा, खाण्याची क्रिया बक्, भक्, भक्ष या अनुकरणात्मक ध्वनीने ऐकवावी व वर्तमानकालाचा बोध हात किंवा बोट खाली करून दर्शवावी, इतका खटाटोप करावा लागे. ध्वनी व हावभाव यांचे मिश्रण करून मनोगत कळविण्याची ही त-हा शेकडो वर्षे चालली. ह्या मिश्र त-हेत कान, तोंड, डोळे व हात अशा चार साधनांचा उपयोग करावा लागे. ही त-हा उजेडात बरीच कामास पडे. परंतु अंधारात ही फारच लुली व तोकडी भासे. ज्यांना ध्वनी नाही त्या पदार्थाचे व क्रियाचे प्रदर्शन ध्वनीने कसे करावयाचे ऊर्फ त्यांना नांवे कशी द्यावयाची ही अडचण विचारप्रदर्शनाच्या प्रगतीत अत्यंत संकटाची होती व ती काढून टाकण्याला मनुष्याला फार कालावधी लागला असावा. कालांतराने कोण्या कल्पकाला अध्वनी पदार्थांना व क्रियांना सध्वनी पदार्थांच्या व क्रियांच्या आधाराने नांवे देण्याची युक्ती सुचली. दाह किंवा उकाडा झाला असता मराठीत हुषू हुषू असा उद्गार आपण काढतो. वैदिक लोकांचे पूर्वज उष् उष् असा दाहदर्शक उद्गार काढीत. हाच दाहार्थक उद्गार पाणिनीने आपल्या धातुपाठात 'उष् दाहे' म्हणून दिला आहे. ह्या दाहार्थक उष् उद्गारावरून जळजळींत वाळूमधून उन्हाच्या तडाक्यात मनुष्याला वाहून नेणा-या प्राण्याला उष्ट्र म्हणून शब्द निर्माण झाला. उषू म्हणजे दाह, त्यातून तारून नेणारा तो उष्ट्र. दाह करणा-या वनस्पतिरहित ओसाड जागेला उषर व दाहाचा प्रतिकार करणा-या डोक्यावरील आच्छादनाला उष्णीष नांव पडले. त्या प्राण्याच्या अवाजावरून उष्ट्र हे नाव पडलेले नाही. सबब असा तर्क करता येतो की आर्यांच्या अत्यंत प्राथमिक मूलस्थानात उष्ट्र प्राणी नव्हता. ह्या उद्गारावरून प्रभातवाचक उषा, संध्यारागवाचक उषस व ऊनवाचक उष्ण हे तीन अध्वनी शब्द अस्तित्वांत आले. उषा, उषस् , उष्ण इत्यादी शब्दांत जे प्रत्यय संस्कृतभाषा बोलणारे लावीत ते प्रत्यय संस्कृतभाषा बोलणा-यांचे हजारो वर्षांपलीकडील पूर्वज लावीत नव्हते. प्रत्ययाऐवजी ते प्रत्ययार्थक सबंध शब्दच योजीत.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
अप्रत्ययान्त केवळ शुद्ध शब्दजन्य जी प्राणिनामे ती अत्यंत प्राथमिक धरण्याचे कारण असे आहे की शब्दज्ञान हे, स्पर्शज्ञान वगळले असता, सर्व ज्ञानांत अत्यंत प्राथमिक असते व ते कर्णेंद्रियावरती आघात भानगडीवाचून करते. एका आकाशतत्त्वाचे तेवढे साहाय्य ह्या ज्ञानाला पुरे होते. रंगावरून, गतीवरून किंवा क्रौर्यादि गुणांवरून जी ज्ञाने होतात त्यांना पृथ्वी, तेज, वायू इत्यादी अनेक मिश्र उपाधींचे साहाय्य लागते. स्वल्पश्रमाने बहुत लाभ करून घेण्याचा प्राणिमात्राचा स्वभाव पहाता, शब्दजन्य प्राणिनामे सहज सुचणारी अतएव सर्वोत पुरातन समजणे न्याय्य होते. रात्र असो, दिवस असो, प्राणी दिसो वा न दिसो, शब्दावरून त्याचे अस्तित्व मनुष्याला प्रतीत होते. अस्तित्व प्रतीत झाल्यावर, तो शब्द करणा-या प्राण्याची ओळख इतर मनुष्यांना पटविण्याकरिता किंवा तो प्राणी अंतर्धान पावला असता त्याच्या संबंधाने इतरांशी बोलताना, कर, कुर, इन् इत्यादी प्रत्यय न लावता (कारण, प्रत्यय त्याकाली अस्तित्वातच आलेले नसतात.) त्या प्राण्याच्या शब्दाचे होईल तितके हुबेहुब अनुकरण करून त्या प्राण्याची आठवण इतरांना करून देण्याची खटपट मनुष्य करतो. येथे केवळ गुणाने गुणीचा निर्देश करण्याचा शोध मनुष्याला सहजगत्या होतो. गुण आणि गुणी ह्यांच्यामधील भेद ह्या काली त्याला होत नाही. शब्दांवरून प्राण्यांना ज्याप्रमाणे तो नामे देतो त्याचप्रमाणे तो रहातो त्या टापूतील एकोनएक ध्वनि ज्या सजीव पदार्थापासून साक्षात् निघतात किंवा निघाले अशी त्याची समजूत होते त्या ध्वनीवरून नदी, धबधबा, झाड, मेघ इत्यादी सजीव पदार्थांना तो नामे देतो. ह्या त-हेने पदार्थदर्शक शेकडो ध्वनींचा साठा मनुष्याजवळ साचतो. मनुष्याचा हाच पहिला शब्दकोश होय. ह्या सजीव पदार्थदर्शक ध्वनींबरोबरच धडपडणे, घोरणे, हुंगणे, फरफटणे, कुरकुरणे, थापणे, थापटणे इत्यादि क्रियाचेही ध्वनी तो ओळखू व नामाथू लागतो व त्या क्रियांचे नामकरण त्या ध्वनीनी करतो. विशिष्ट ध्वनींनी विशिष्ट पदार्थ व क्रिया यांचे विशिष्ट निर्देशन व प्रत्यभिज्ञान करूंन देण्याचे सामर्थ्य ज्या काली त्याला येते त्या काली भाषा म्हणून जिला म्हणतात तिची दोन मुख्य अंगे-नाम व क्रिया ह्यांचे दर्शक ध्वनी- यांचा अपूर्व शोध त्याला लागतो. येथेच परिपूर्ण भाषा निर्माण झाली. भाषा म्हणजे दुसरे तिसरे काही नाही. मुखातून निघू शकणा-या शब्दांनी क्रियांचे व पदार्थाचे आविष्करण करण्याची कला. ध्वनी काढण्याला तोंड व ते ऐकण्याला कान ह्या दोन इंद्रियांची साधने या कलेला बस्स होतात आणि दोन्ही साधने बहुतेक प्रत्येक मनुष्यापाशी असतात.
महिकावती (माहीम)ची बखर
३७. शकपूर्वं देन हजार वर्षां पूर्वी किती हजार वर्षे कातवडी उत्तरकोंकणांत आहेत त्याचा अंदाज हेात नाहीं. हे लोक कधी हि मछीमार नाहींत व नव्हते व समुद्रकिना-याच्या वा-यास हि हे कधीं उभे राहिले नाहींत. ह्यांची वसती सह्याद्रीच्या रानांत ह्यांच्या समकालीं समुद्रा वर कोण लोक होते तें कळण्यास मार्ग नाहीं. मिसरी व असुर लोकांशीं भरतखंडाचा व्यापार त्या वेळीं म्हणजे शकपूर्व दोन हजार वर्षां पूर्वी जर कोंकणच्या किना-या वरील बंदरांच्या द्वारा होत असेल, तर एवढें मात्र निश्चित कीं दमण पासून मुंबईचेऊल पर्यंतच्या वर्तमान बंदरां पैकीं एक हि बंदर व्यापारी पेठेच्या पदवीस त्या कालीं पोहोचल्याचा संशय सुद्धां घेण्यास जागा नाहीं. दमण, सोपारें, वसई, घोडबंदर, ठाणें, कल्याण, हीं बंदरें त्या प्राचीन काला नंतर दोन हजार वर्षांनीं इतिहासप्रांतांत डोकावूं लागलीं. सह्याद्रीच्या माच्यांवर कातवडी वसती करून असतांना, समान्तर समुद्रकिना-या वर व सह्याद्रीच्या तळरानांत मनुष्याची हालचाल प्रायः नसावी असा अंदाज आहे. परंतु सह्याद्रीच्या शिखरां खालील कपा-यांत व गुहांत प्राचीन गुहाशय माणसांची तुरळक वसती कातवड्यांच्या माच्यांच्या वरल्या भागास असावी. माच्यां वर कातवडी व डोंगरकपारींत व गुहांत गुहाशय, असा प्रकार कित्येक हजार वर्षे चालला असावा. गुहाशयां हून कातवडी जास्त सुधारलेला. कातवडी कातडीं तरी पांघरी. गुहाशयांना ती हि कला अवगत नव्हती. सध्यां जीं बुद्धांचीं लेणीं सह्याद्रीच्या शिखरां खालीं खेादलेलीं दिसतात तीं गुहाशयांच्या मूळच्या ओबडधोबड स्वभाव सिद्ध कपा-यांच्या व गुहांच्या सुधारलेल्या आवृत्या आहेत. नागड्या गुहाशयांचा व कातडीं पांघरणा-या कातवड्यांचा कित्येक शतकें शेजार होऊन शेवटीं कातवडी शिल्लक राहिला. सह्याद्रींत दोघांना हि विपुल अन्न होतें. एकानें दुस-यास ठार केलें च पाहिजे असा प्रकार नव्हता. गुहाशय निर्वश झाल्या वर, कातवड्याच्या शेजाराला नाग, वारली, कोळी व ठाकर लोक आले. त्यांना हि रानांत व किना-या वर मुबलक अन्न मिळण्या सारखें होतें. तेव्हां कातवड्यांच्या व नागादींच्या लढाया वगैरे न होतां नागांदींना हि ह्या प्रदेशांत बिगरअडथळा रहातां येऊं लागलें. नंतर आंध्र, मांगेले व माहाराष्ट्रिक आले. त्यांना हि येथें विपुल अन्न सांपडलें व ते हि ह्या प्रांतांत गुण्या गोविंदानें नांदूं लागलें. पुढें चालुक्यादि जुने मराठे आले. ते हि ह्या देशांत समावले. कालान्तरानें मुसुलमान व पोर्तुगीज कोंकणांत शिरले व ते हि सुखानें पोट भरून येथें आहेत. जो जो म्हणून येथें येतो तो तो सुखासमाधानानें देशांत कायमचा बिनबोभाट समावला जातो. ह्याचा अर्थ इतका च कीं, ह्या देशांत उद्भिज्ज व प्राणिज संपत्ति ऊर्फ अन्न इतकें मुबलक आहे कीं येईल त्याला येथें रहाण्यास यथेच्छ वाव आहे.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
हा प्रश्न सुटावयाचा म्हणजे त्या त्या प्राण्याचे मूळ वसतिस्थान किंवा जन्मस्थान कोणते त्याचा निश्चय झाला पाहिजे. समजा की हिमालयोत्तरप्रदेशात कावळा नाही व हिमालयदक्षिणप्रदेशात आहे. तसेच अशीही कल्पना करा की वैदिक भाषा बोलणारे ऋषींचे मूळस्थान हिमालयोत्तर मेरूपर्वतावर होते; तर काक हा शब्द हिमालयाच्या दक्षिणेस उतरल्यावर वैदिक ऋषींच्या भाषेत आला असे अनुमान सहजच निघते. हा काक शब्द ऋषींच्या पूर्वीच्या रानटी जातीत निर्माण झालेला ऋषींनी उचलला असेल व तो बराच जुना ठरेल. जुना म्हणजे एक लाख किंवा पाच लाख वर्षांचाही जुना ठरेल. भुस्तरशास्त्राप्रमाणे मनुष्य ह्या पृथ्वीवर वावरत असलेल्याला लाखो वर्षे लोटून गेली आहेत. ह्या लाखो वर्षांत त्याची प्रगती अत्यंत मंदगतीने होत असलेली अनुमानास येते. भाषणादि मुखविक्षेप तो आज लाखो वर्षांपासून करीत आला आहे व विशिष्ट ध्वन्यादी आघातांवरून वस्तूंना नामे देण्याचा शोध त्याला लाखो वर्षांच्या पूर्वीच लागलेला आहे. नवेनवे प्राणिशब्द कानावर पडताच भाषेत नवी प्राणिनामे वेळोवेळी तो बनवीत आल्याचे भाषेतिहासावरून व व्युत्पत्तीवरून दृष्टोत्पत्तीस येते. तात्पर्य, प्राणिशब्दजन्य प्राणिनामे अत्यंत जुनी. संस्कृत किंवा वैदिक भाषेतील अत्यंत जुनी असे म्हणण्याचा आशय नाही, तर मानववंशातील कोणत्या तरी त्या किंवा शेजारच्या शाखेतील माणसाच्या भाषेतील अत्यंत जुनी. वैदिक ऋषींना काक शब्द हिमालयदक्षिणप्रदेशात आल्यावर माहीत झाला असेल; परंतु ऋषींच्या पूर्वीचे जे रानटी लोक ह्या देशात होते त्यांच्या भाषेत तो रूढ व जुना होता.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
२. ध्वनींच्या अनुकरणातून भाषोत्पत्ती
सहज विक्षेपांचे प्रत्यभिज्ञान होऊन यत्नाने त्यांची पुनरावृत्ती करण्याची बुद्धी होणे ही ह्यापुढची पायरी आहे. हा गुण मनुष्याइतका दुस-या प्राण्यांत वर्धमान झालेला दिसत नाही, किंबहुना दुस-या प्राण्यांत हा गुण बहुतेक नाहीच म्हटला तरी चालेल. विक्षेपांचे शास्त्र बनविण्याचे सामर्थ्य एकट्या मनुष्यप्राण्यानेच तेवढे दाखविलेले आढळते. पूर्वी केलेला विक्षेप ज्ञानतः पुनः करणे म्हणजे पुनरावृत्तिसामर्थ्य एकट्या मनुष्यातच दिसून येते. ही पुनरावृत्ती तो आपल्या स्वतःच्याच विक्षेपांची करतो असे नाही, इतर प्राण्यांच्या विक्षेपांचीही पुनरावृत्ती तो करू शकतो. म्हणजे अनुकरणसामर्थ्य त्याच्या ठायी विलक्षण आहे. विक्षेपांपैकी हालचालींचीच तेवढी पुनरावृत्ती मनुष्य करून थांबत नाही, तर त्या त्या प्राण्याच्या विशिष्ट शब्दांची पुनरावृत्ती व अनुकरण करून त्या त्या प्राण्याची ओळख तो इतर मनुष्यांना पटवून देतो. मनुष्य शब्दानुकरण करू लागला म्हणजे त्या त्या प्राण्याला त्या त्या प्राण्याच्या शब्दावरून तो नाव देऊ लागतो. एथेच मनुष्याला प्राण्यांचे नामकरण करण्याचा शोध लागतो. कावकाव करणा-या पाखराला काकः, किः खिः करणा-या माकडाला किखिः, रू रू आवाज करणा-याला रु रुः, भृंग आवाज करणा-याला भृंगः, अशी शब्दांवरून प्राण्यांना नावे तो देतो. कृकवाकू, कोकिल, कुक्कुट, फेरव, कुक्कुर, करेटु, ऋकर, चिल्ल, कीर, कुरर, केकी, मयूर, तित्तिरिः, ही सर्व प्राणिनामे शब्दानुकरणजन्य आहेत. कित्येक नामांत कर वगैरे प्रत्यय लावलेले आहेत व कित्येकांत केवळ शब्दच प्राणिवाचक केला आहे. कर, कुर, र, इन्, रव इत्यादी प्रत्ययान्त जी प्राणिनामे आहेत ती करकरणे, कुर आवाज करणे, इन जवळ असणे, रव आवाज करणे ह्या धातुनामांचा शोध लागल्यानंतरची असल्यामुळे ती प्रत्ययान्त नामे काक, कृकवाकू, चिल्ल, कीर ह्या अप्रत्ययान्त नामांहून अर्वाक्तन आहेत हे उघड आहे. केवलशब्दजन्य प्राणिनामे सर्व नामांत अत्यन्त जुनाट ऊर्फ प्राथमिक होत. प्राथमिक म्हणजे केव्हाची ? तर मनुष्याला हे प्राणी प्रथम भेटले तेव्हाची. कोणत्या मनुष्याला ? संस्कृत किंवा वैदिक भाषा बोलणा-या मनुष्याला की इतर पूर्वकालीन मनुष्याला ?
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
हा दुसरा प्रकार मिश्र आहे. हे दोन्ही प्रकार सर्वस्वी सहज म्हणजे जन्मसिद्ध असून मनुष्यातल्याप्रमाणेच पशुपक्ष्यादींत दृष्टीस पडतात. हे कोणी कोणाला शिकवावे लागत नाहीत; कारण प्राण्यांच्या त्या त्या अवयवांचे हे धर्मच आहेत. प्राणित्वाची घटनाच अशी आहे की आंतर किंवा बाह्य कारणांचा आघात झाला असता प्रत्याघात ह्या प्रकारांचे रूप घेऊन अवश्यमेव प्रगट होतो. उपरिनिर्दिष्ट सर्वच विक्षेप सर्वच प्राण्यांत प्रादुर्भूत होतात असे नाही. आनंदाने किंवा कृतज्ञतेने किंवा समाधानाने लांगूलविक्षेप कुत्र्यांत उत्कटत्वाने दृश्यमान होतो. लांगूलाभावास्तव मनुष्यात हा विक्षेप संभाव्यच नाही. हसणे मनुष्यास शक्य आहे; पण कान टवकारणे प्रायः नाही. प्रायः म्हणण्याचे कारण असे की कानाच्या शिरा हलविण्याचे सामर्थ्य क्वचित् मनुष्यांत आढळून आल्याचे ग्रंथांतरी लिहिलेले आठवते. सांगण्याचा मुद्दा एवढाच की वर नमूद केलेले विक्षेप प्राणिमात्रांत सहज ऊर्फ जन्मसिद्ध असतात. कृत्रिम ऊर्फ यत्नसिद्ध नसतात.