६२. शक १२३९ पासून १७३९ पर्यंत, इतिहास, समाजशास्त्र व सामाजिक तत्त्वज्ञान ह्यांची हालहवाल महाराष्ट्रांत कशी काय होती, त्याचा संक्षिप्त उल्लेख येथपर्यंत केला. आतां शक १७३९पासून आतांपर्यंत म्हणजे शक १८२२ पर्यंत ह्या तिन्ही शाखांची स्थिति महाराष्ट्रांत कोणत्या प्रकारची आहे, ते सागतों.
६३. शक १७३९ पासून १८२२ पर्यंतच्याकाळाचे दोन भाग केले पाहिजेत. पहिला भाग शक १७७९ त संपतो. ह्या भागांतील चाळीस वर्षांत महाराष्ट्र पूर्वीप्रमाणेंच तत्त्वज्ञानी, संन्यस्त, हटयोगी, विलासी व आलस्यमग्न होतें. अर्थात्, समाजाच्या स्थितीचें व चरित्राचें सूक्ष्म अवलोकन, पृथक्करण, एकीकरण किंवा परिशीलन करण्याचें अवश्यकत्त्वच त्या कालीं कोणाला भासलें नाहीं. शक, १५७९ पासून १७३९ पर्यंत साध्या बखरी अथवा समाजाचे साधे इतिहास लिहिण्याचा जो व्यासंग मराठ्यांनीं स्वीकारला होता, तोहि ह्या कालांत लुप्तप्राय आला. ह्या कालांत तंजावर, सातारा, इंदूर, धार, ग्वालेर, बडोदें, पुणें, कोल्हापूर, नागपूर, बुंदेलखंड, वगैरे स्थलीं असणा-या संस्थानांत मोठमोठ्या क्रांत्या झाल्या; कित्येक संस्थानें सपशेल बुडून गेलीं; कित्येकांचे स्वातंत्र्य सपुष्टांत आलें; आणि कित्येक निव्वळ जमीनदारीच्या स्थितीला येऊन पोचलीं महाराष्ट्रांतील लोकस्थितींतहि मोठे परिवर्तन झालें. लढवय्ये लोक घरी बसले; प्रजा नि:शस्त्र झाली; पांढरपेशा लोकांचा धंदा गेला; व्यापारीवर्गाचा व्यापार बुडत चालला; शिल्प्यांचा रोजगार बसत चालला; सोनें पश्चिमेकडे धांव घेऊं लागलें; शेतीवर सर्व लोकांचा उदरनिर्वाह होण्याचा दुर्धर प्रसंग आला, भटाभिक्षुकांची मिळकत बंद झांली; शास्त्रीपंडीत निराश्रित झाले; सारांश, सर्व दर्जाच्या लोकांत चलबिचल झाली. परंतु, समाजांच होत चाललेल्या ह्या अफाट क्रांतीची परीक्षा करून ती थोपविण्याचें कोणींच लक्ष्यांत आणिलें नाहीं. तत्कालीन समाजाचें चरित्र, समाजाच्या धडपडीचा कार्यकारणसंबंध अथवा समाजाचें शास्त्र, व समाजाचें तत्त्वज्ञान, ह्यापैकीं एकाचाहि पत्ता ह्या चाळीस वर्षात नव्हता. विचारी व तत्त्वजिज्ञासु जे एकदेशी साधुसंत व विरक्त ते संन्यासाच्या अभ्यासांत गर्क झालेले होते; आणि प्रपंचाची धडपड करणारे राजे, संस्थानिक, व्यापारी, उदमी, मुत्सद्दी, व कारकून, तत्कालीन धडपडीचा अर्थ न कळल्यामुळें, कोठें तरी व कसें तरी मोहानें अंध होत्साते प्रपंचाचें व समाजाचें व राष्ट्राचें गाडें हाकोत होते. 'विवेकभ्रष्टानां भवति विनिपात शतमुख:’! आपण करतों आहों काय व चाललों आहों कोठें, ह्याचा ज्यांना नीट उलगडा करण्याची आवश्यकता भासली नाहीं, त्या मोहान्ध लोकांना राष्ट्र कोठलें, प्रपंच कसचा, व इतिहास काय करावयाचा !!!