[१४८] पै. कार्तिकवद्य ४ शके १६७८ श्री. २६ सप्तेंबर १७५६.
चिरंजीव राजश्री बाबुराव यांसी प्रती गोविंद बल्लाळ आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मी छत्रपुरच्या अजुरदाराबरोबर दक्षिणी मित्ती श्रावण वद्य प्रतिपदेचीं पत्रें पाठविलीं तीं अश्विन शुद्ध द्वितीयेस पावलीं. वर्तमान साद्यंत लिहिलें तें कळलें त्याचें उत्तरः-
आह्मी देशास सत्वर येतों. याजउपर दिवसागत लावीत नाहीं. आह्मांस तुमच्या लिहिल्यावरून जरूरच येणें. विलंब करीत नाहीं. १. |
रसदेच्या भरण्याविशीं तुह्मांस वरचेवर लिहितच आहों. ऐवजहि जोशाकडून देविला आहे तो त्यांनीं पावता केलाच असेल. रसदेचा भरणा करणें. १. |
सरकारी फर्मास येतांना उत्तम घेऊन येऊं. फर्मासीचे तरतुदेंतच आहों. घेऊन येऊं. १ |
शिवभट अचवळ्याचे साडे सोळाशेंचे हुंडीचें लिहिलें तें कळलें. त्यास आह्मी येथून हुंडी करून त्याजकडे श्रीस पाठविली. तो काशीद मार्गी मारला गेला. पांचसा महिने वर्तमान कळलेंच नाहीं. मागतीं कळलियावर श्रीस लिहिलें आहे. व्याज पडेल तें व मुद्दल देऊन कबज घेऊन पाठवून देऊं. ऐवज त्यास देविला आहे. १. |
हुंडी तुह्मी करीत जाणें. हुंडीचा कजिया पडणार नाहीं. अचवळ्याचा मात्र कजिया राहिला, तोही फडशा करू कबजे घेऊन पाठवूं. कजिया ठेवीत नाहीं. शिवभटाचा लाखोटा शिवभटाकडे पाठवून देऊं. १ |
गोपाळ महादेव याजकडील ऐवज तजविजेनें उठावून घेणें. पुढें फिरोन आह्मी गुंतणार नाहीं. १. |
र॥ गंगाधरपंत तात्यांनीं फडणिसास पंधरा हजार रु॥ देविलें. ते आह्मीं येऊं तों पावेतों टाळाटाळ होईल तर करणें. आह्मी आलियावर विचार पाहूं तसा करूं. तूर्त रुपये गतील तर हेंच सांगणें, कीं पंतास लिहितों, ते उत्तर करतील. याप्रमाणें सांगूं ह्मणोन शब्द न गुंततां विचारें करोन सांगोन आह्मी येऊं तो पावेतों थोंबून राखणें. मग आह्मी आलियावर तुमच्या विचारें करणें तें करूं. १. |
फडणीस ऐवज मागतात, धीर पडत नाहीं. त्यास कांहीं थोडाबहुत देणें, राजी करणें. त्यांचा ऐवज तो आह्मांस देणें जरूर आहे. तुह्मीहि त्यास राजी राखणें. कांहीं तूर्त देणें. कांहीं पुढें देणें. १. |
रामाजी महादेव बडतर्फ जाले. असामी रत्नागिरीची करून घेणें. १ |
र॥ गंगाधरपंत तात्याकडील वर्तमान लिहिलें तें कळलें. याउपर वर्तमान होईल तें लिहिणें. १. |
चिरंजीव राजश्री गणेशपंत यांचीं पत्रें पावलीं. वर्तमान कळलें. आदित्याच्या देवालयाचे कामाविशीं लिहिलें तें कळलें. ऐशियासी आह्मी देशास येतच आहों. तिकडे आलियावर सांगणें तें सांगूं. १. |
संगमेशर येथें गुमास्ता पाठवून वतनाचें कामकाज चाली लावणें. १. रंगीन कापड आलें त्याची चौकशी जाली ह्मणोन लिहिलें, त्यास आह्मांस कांहीं नफा खाणें नाहीं. मामलेदार चंदेरीहून माल पाठवून देतात. रंगाई पडती ती आह्मी देतों. ऐसें असोन इतबार नाहीं तर उपाय काय करणार? बरे! जें घेतील तें घेतील. १. |
वरकड तुह्मीं दरबारीं वर्तमान लिहिलें तें कळलें. याजउपर होईल तें लिहीत जाणें. १. |
फर्मास जरूर पाहिजे. त्याचे तलाशांत आहों. फर्मास उत्तम घेऊन येऊं. विस्मरण नाहीं. १. |
आम्ही बहुत निकडीनें येतों. रसदेच्या भरणियासी ऐवज पाहिजे याजविशीं जोशीबावास वरचेवर आह्मीं लिहिलेंच आहे. ते सहा लक्ष पावेतों ऐवज तुह्माकडे पावता करितील. याजमधें जो ऐवज पावला असेल तो पावला, राहिला असेल तो सहा लाखाची भरती करून देतील. इकडेहि प्रजन्य नाहीं, पैसा मिळणें कठिण जाला आणि तिकडील तैसा ओढीचा प्रसंग! उपाय काय करावा? तुह्मी रसदेचा भरणा करणें. आह्मीं जोशास लिहिलें आहे. मित्ती श्रावण शुध्द २. हे आशीर्वाद.