Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १३८ ]
श्री. शके १६६१ ज्येष्ठ शु॥ ६
राजमान्य राजश्री बाळाजी पंडितप्रधान यांसी आज्ञा केली ऐसी जे :-
रामराव जिवाजी व बापूजी खंडेराव व गोविंद खंडेराव चिटणवीस यांचे वडिलांनी राज्याभिवृद्धीस्तव श्रमसाहस बहुत केले. हालींहि करीत आहेत. याजवरून पूर्वीच्या चिटणविसांस सरंजाम आहे तो इनाम करून दिल्हाच आहे. हालीं नवा सरंजाम चहूं लक्षांचा लावून देण्याविशीं तुह्मांस आज्ञा केली आहे. तरी येणेप्रमाणें वसुली महाल व गांव किल्लेसुद्धां रु॥
रामराव जिवाजी बाबूजी खंडेराव
२,००००० १,०,००००
गोविंद खंडेराव
१,०००००
-----------------
४,०००००
सदर्हूप्रों। चहूं लक्षांचा सरंजाम लावून देण्याविशीं स्वामीचें वचन जालें आहे. तरी निवडून लावून देणें. जाणिजे. छ. ५ रावल सु॥ अबैन मया व अलफ. यास सरंजाम देणें, निवडून चहू लाखांचा. +सुदन असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १३७ ]
हकीगती बयान वाका.
शके १६६० फाल्गुन-
शके १६६१ वैशाख.
पातशाई वाका,
१ शके १६६० कालयुक्तनाम संवत्सरे सन तिसा सलासीन मया व अलफ. ल्गुन शुद्ध पक्षीचें वर्तमान आलें कीं, दिल्लीकडे इराणीची चाल दिल्लीवर जाली. जवरून महमदशा पातशा चालोन गेले. त्यांचे यांचें जूज जालें. महमदशाहाचा मोड झाला. खानडवरा वगैरे ठार पडले. सादतखान धरून नेला. मग किलीजखानें सल्यावर घातलें. महमदशा पातशा तामसकुली इराणीचे भेटीस गेले. त्यांनी फाल्गुन शु॥ ४ चकतेयांस ताहमसकुलीनें निजाम व कमरुदिखान व कीलीजखान व गाजुदीखान वगैरे कैद केले. पातशाइ आपण घेतली. चकतियाची पातशाई बुडाली. इराणियाची जाली. पातशा व आमीर धरले गेले. इराणियाचें नांवें पातशाहाचें नांव नादरशा, दिवाणाचें ताहमसकुलीखान, अशी सावकारी बातमी आली.
१ शके १६६१ सिधार्थीनाम संवत्सरे सन तिसा : सलासीन मया व अलफ वैशाख वा। १० दशमीचीं पत्रें दिल्लीची आली की नादरशा इराणी दिल्लीस चालोन आला होता. त्यानें दिल्लीमध्यें कतलअम केली. यावर खंड उमदेतुनहे यांजपासून व सुजानराये वकील यांजपासून दोन लक्ष व धर्मागंधराये वकील अबुलनबीखान व उजपागरचंद यांजपासून दाहा हजार, सयदखान शामीरखानाचा वकील यांजपासून पंचवीस हजार, रा. केशवराव हारकारे याजपासून पंधरा हजार रुपये व बाबूराव खानडवरा यांजकडील यांजपासून लाख रुपये घेतले. येक खेमा डेरे पातशाई न सोडिले. छ. ७ सफर मंदवारीं किलीयांतून कुच करून नेरळीवर छ. ८ सफरीं सोनपतास आपले फौजेनसीं गेला. जातेसमंई छ. ३ सफरीं महमदशा तख्तावरी बैसवून जवाहीर व कांहीं नगद वस्त्रें व नवाबास समशेर व घोडा व खलायेत येणेंप्रमाणें कुल आमिरास खलयेत देऊन समाधान केलें व च्यार फर्मान त्याचे मोहरेनसीं एक नासरजंगास व येक नसीरुदौलास वे राजे शाहूस व बाजीराव यांचे नावें दिधलीं व महमदशाहाचें नांवे फर्मानें दक्षणेच्या कुलआमीराम कांहीं रवाना केले व कांहीं करतील. छ. ८ सफरीं शहरांत आजच चैन जाले कतलेमध्यें तीन चार लक्ष माणसें कतल जालीं. हजारो स्त्रिया व उमदे व सावकार वगैरे बंदी धरून नेलीं. पंधरामण जवाहीर व पन्नास साठ करोड लुटीवेगळा खंड घेतला. पादशाही हत्ती, घोडे, व उंटे व बैल व तमाम अमीराचा माल येणेंप्रमाणे घेऊन गेला. फकीर करून सोडिले. ऐसा कहर दोन महिने दिल्लीत जाला. नादरशाहा इराणी आपले मुलकास गेला. अटकेपलिकडे गेला, महमदशाहा तख्तावर बसवून गेला, ह्मणोन पत्रें आलीं असे.
श्री. शक १६८१ आश्विन वद्य ७.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री त्रिंबकराव विश्वनाथ स्वामी गोसावी यांसी:-
पोप्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत गेले पाहिजे. विशेष. राजश्री साबाजी शिंदे यांजकडील शिलेदार छ्यावणीची बोली करून, नांलबंदी घेऊन, चाकरी न करितां कोंण्ही औरंगाबाजेहून पळाले व कोंण्ही कोट्याच्या राज्यांतून पळाले. त्यास, मशारनिलेकडील कारकून शिलेदार मजकुराची नांवनिशी लेहून देतील. त्यास आसामीवार मसाला करून, नालबंदीचा पैका वगैरे जें काय पावलें असेल तें त्यापासून, उगवून, मशारनिलेस पावतें. करणें. जाणिजे. छ. २० सफर सु॥ सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे ? हे विनंती.
श्री. शके १६६० आश्विन शुद्ध ६.
राजश्री सटवोजी जाधव गोसावी यांसि:-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. सुहुरसन तिसा अशरीन मया अलफ. तुह्माकडे मामला बाबतीं सरदेशमुखी बाबत सरंजाम रा। पिलाजी जाधवराऊ यांचा आहे. तेथील सालमजकूरचे रसदेचा ऐवज येणें. त्यापैकी गु॥ शामजी सोनार ता।.
५० ऐन जमा पोता रोख आणून दिल्हे.
५० बाबत ऐवज पेट व वासदे वगैरे येथील मक्ता
रुपये १७५० पैकीं जाजती आले ते या ऐवजी
मजुरा दिल्हे पन्नास.
---------
१००
येकूण येकशे रुपये रास जमा जाहाले. मजरा पसंत जाणिजे. छ. ४ रबिलोवल.
लेखन
सीमा.
बार.
श्री
राजा शाहू नरप-
ति हर्षनिधान बा-
जीराव बल्लाळ
मुख्य प्रधान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १३६ ]
श्री. शके १६६१ चैत्र-वैशाख.
राजश्री पिलाजी जाधवराव यांसि आज्ञा केली ऐसी जे :--
तुह्मी वसईस गेलां होता, शरीरीं सावकाश नाहीं ह्मणोन घरास आलां, ऐसें परस्पर कळले. परंतु तुह्मीं कांहींच न लिहिलें. अपूर्व आहे ! याउपरि आपले शरीरभावनेंचें वृत्त सविस्तर लिहिणें ; व उपाय करणें. अळस न करणें. औरंगाबादप्रांतीं लाल चिंचा आहेत त्याणीं पांघरूण रंगतें व मुरंबा करीत असतात. लाल असते तिचें प्रयोजन आहे. तरी मुजरद जासूद पाठवून, आपले कमाविस लेहून, शहराआसपास बागांतील व गांवांतील झाडांचा तलाश करून, अथवा जेथें असतील त्या परगणियांत आढ़ळांनीं मनास आणून चिंचोक्यांसमेत सगळ्याच चिंचा दोन बैल भरून आणवून जरूर हुजूर पाठविणें. तुह्मी आपले बागांत सदरहु चिंच लाविली असेल, तरी पाहून, तिच्या चिंचा उतरून लिहिल्याप्रमाणें पाठविणें. सारांश हेंच की, तुह्मी प्रेत्नपूर्वक जेथें असेल तेथून आणवाल, यास्तव लिहिलें आहे. तरी नगराजवळ आहेत तेथें अथवा हर कोठे असेल तेथें माणूस पाठवून आणून हुजूर पाठविणें.
आपलें वरत्त लिहिनं. चिच ताबडी तुमच्या बागांत असेल ती पाठवनं. आनखी ( तलास ) करून पाठवनं. औरंगाबाजेहून आननं. गधिलीच्या बागांत आहेत, आन नगरच्या बागांत आहेत. चिचोकसहित आननं. बहुत काय लिहिनं ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १३५ ]
श्री. शके १६६१ चैत्र वा। ३.
राजश्री पिलाजी जाधवराऊ साहेबाचे सेवसीः--
छ श्रीमंत सेवक सानु चव्हाण व रामजी गावडे चारण, वस्ति धोडंबा, पा। चांदवड, विनंति. लिहावयाचें कारण जेः-- आपली गुरें व बैल दमणाप्रति स्वारीमध्यें लुटलीं होती. यासी, साहेबीं मेहरबान होऊन आपली गुरें व बैल सर +++ भावानें लस्करांत होती ते देविलीं. आपण भरून पावलों. साहेबांकडे आपलें कांहीं राहिलें नाहीं. हें लिहिलें सही सके १६६१ सिधार्थीनाम संवत्सरे चैत्रवदी ३ नि॥ तराजु
दा।
मुधाजी जिवाजी.
छ. १६ मोहरम सु॥ तिसा सलासैन मया अलफ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १३४ ]
श्री. शके १६६१ चैत्र शुद्ध ९.
अवरंगाबादेहून चैत्र शु॥ ४ रविवारचें लिहिलें आलें त्यांत मजकूर कीं, तोहमासकुलीखान याचें वर्तमान तो तुह्मी ऐकिलेंच असेल. पठाण इरानचे सरदेस होते. ते चाकर चकातियाचे ह्मणवीत होते. त्यास सामील करून नादरशाहा आला होता. त्याचे लोकांचे विद्यमानें इमान देऊन, महमदशाहा, व निजाम, व कमरदीखान हे ताहमासकुलीचे भेटीस गेले होते. बेइमानी करून तोहमासकुलीनें जफ्त केले. पठाणाचें सांगितलें कबुल न केलें. शेवटी दिल्लीस प्रवेश करते-समयीं आसपास बंड कुलपठाणांचीच होती. तोहमासकुलीचे हत्तीमागें कांसीखान पठाण मोरचेल करीत होता. नादिरशाहामागें कांसीखाचा बंधु होता. दरवाजियासी आलियावर पठाणांनीं कटारा चालवून तहमासकुली व नादरशाहा–दोघेही-मारले; महमदशाहास पठाणांनीं तक्तीं बैसविलें ; हें वर्तमान तहकीक आलें आहे. परंतु अमिराचीं लिहिलें आलीं नाहींत. नोबत सुरू जाली नाहीं. श्रीमंत रा। राव बर्हाणपुरावर आहेत. सध्यां वसूल दरोबस्त मोगलाईअमल देखील घेतात. बर्हाणपुरापासून काय घेतील तें पाहावें. पौ छ. ८ मोहरम. चैत्र शुद्ध ९ शुक्रवार संध्याकाळ मुकाम पुणें. शके १६६१ सिद्धार्थनाम संवत्सरे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १३३ ]
श्री. शके १६६१ चैत्र शुद्ध २.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री अंताजी नारायण स्वामी गोसावी यासीः-
पोष्य बाजीराऊ बल्लाळ प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. सांप्रत तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं; तरी सविस्तर लिहित जाणें. येथील वर्तमानतर : बर्हाणपुरानजीक मुकाम आहे. उत्तर प्रांतें जावयाचा विचार राहिला. दिल्लीकडील वर्तमान तरः राजश्री बाबूराऊ मल्लार यांचीं व राजश्री सवाई जैसिंगजी यांची पत्रे- छ. २५ जिल्हेजची पत्रें-- जैनगरचीं आली. त्यांत वर्तमान हेंच की–नादरशाहा तक्तीं बैसले. महमदशाह व निजामन्मुलुक व कमरुद्दीखान व गाजुद्दीखान, तमाम अमीर व मुत्सद्दी, कैदेत आहेत. नादरशाहानें पातशाही खजाना, व अमिरांचा खजाना मिळोन एक अर्बुज जमा केला. आणखी शहरांत खणती लावून पैका जमा करीतच आहेत. धनाचा व बिशादीचा सुमार नाही. निजामन्मुलुक व कमरुद्दीखान यांची दौलत कुल् हत्ती, घोडे, पैका ज़फ्त केला. स्त्रिया होत्या त्यापौ। एकदोन ज्यांच्या त्यांस दिल्या. वरकड घेऊन कजलबसांस दिल्या. वरकड शाहरांत कल्पांत जाला असे. पन्नास हजार माणूस कजलबाशांनीं जिवें मारिलें. आडविहिरी भरून निघाल्या. व कजलबासहि मारिले गेले. कितेक दिल्लींतील हवेलिया जाळून खाक केल्या; कितेक जळत आहेत; कितेक लुटल्या; कितेक लुटीत आहेत. कोण्हाचे हवेलींत कोण्ही जाऊं पावत नाहीं. नादरशाह कोटांत आहे. कजलबास कुल शाहर लुटीत आहेत. महर्गता मोठी ज़ाली आहे. दिल्लीतील माणसें बाहेर जाऊं पावत नाहींत ; बाहेरील आंत जाऊ पावत नाहींत ; तमाम राहदारी बंदु जाली आहे. ज्या गोष्टी कधीं ऐकिल्या नाहीत, त्या गोष्टी कजलबाशांनी दिल्लीत केल्या आहेत. मोठा उल्कापात जाला आहे. दिल्लीचा बंदोबस्त जाला नाहीं. सादतखान मृत्य पावलियावरी दिल्लीत इतका प्रसंग जाला आहे. ईश्वरानें विचित्र करणी केली आहे. दिल्लीचा बंदोबस्त जालियावरी नादरशाह अजमेरीस पिराच्या दर्शनास येणार आहेत. यास्तव सवाईजींनी आपले वे लोकांचे कबिले उदेपुरास पाठवून सडे जाले आहेत. कदाचित् नादरशाह अजमेरीस आले, तरी त्याच्यानें झुजावत नाहीं, उदेपुरास जातील. इकड़ील दक्षणेच्या फौजा मातबर जातील तेव्हां नादरशाहासी प्रसंग पडेल ! तुह्मांस वर्तमान कळावें, यास्तव लिहिलें आहे. तुह्मांस पूर्वी कितेक लिहिलें आहे, त्याप्रों। वर्तणुक करणें. लोभ असो दीने. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १३२ ]
श्री. शके १६६० फाल्गुन.
श्रीयासह चिरंजीव राजमान्य राजश्री संभाजी जाधव यांसिः--
पिलाजी जाधवराउ आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत जाणें. यानंतर तुह्मी सेखजी समागमें पत्र पाठविलें, प्रविष्ट होऊन सविस्तर वृत्त कळों आलें. वेथेचें वर्तमान ऐकिलें. त्यावरून चित्तास असमाधान जालें. येविस सविस्तर लेहून पाठवावे ह्मणोन लिहिलें. ऐसियास मालशेतचा घांट उतरून आलियावर पांच सात दिवस पोटांत शुल निर्माण होऊन श्रमी केलें होते. त्याउपर श्रीनें निशल्य आरोग्य केलें. सांप्रत शरीरीं उत्तमप्रकारें समाधान आहे. चिंता न करणें. घराचें वर्तमान पूर्वी तुह्मी लिहिल्यावरून व सांप्रत सेखजीच्या जबानीवरून साद्यंत अवगत जालें. घर ताबडतोब उजरें केलें, उत्तम आहे. लग्नाचा निश्चय फाल्गुनमासीं करावें ऐसें सांगितलें होतें. सांप्रत दिडा महिनियाचा अवकाश थोडका; यास्तव कोणती तीथ नेमस्त करावी ? ह्मणोन लि॥. लग्नास आह्मी अथवा चिंरजीव राजश्री आपाचें येणें कधी होईल ? तें ल्याहावें, ह्मणोन लि॥. ऐसियास, ब्राह्मणाचे मतें उत्तम निर्दोष लाभदायक तीथ योजेल तें योजणें. उभयतांचा यावयाचा विचार. तरी आह्मी इंद्रप्रस्थाकडे जावें, ऐसा उपक्रम श्रीमंतांकडून निघाला आहे. ऐसियास, राजश्री पंतप्रधानही स्वारीस जाण्याचे उद्देशें गंगातीरास येतील. तंदोत्तर आमचा उत्तरेकडील उपक्रम राहिला तरी, आह्मी स्वारीस जाऊन ; चिरंजिवास पाठवून ; अथवा तिकडे जाणें ऐसें जालें तरी चिरंजिवास येथें फौजेत असावें लागेल. मग उभयतांचे येणें होणार नाही. तुह्मीं लग्न सिध करणें. गहू, हरभरे, तांदूळ लि॥ प्रों। घेतले, पुढें घेणें ते घेतों ; ह्मणोन लि॥, उत्तम आहे. दाणापाणियाचें वर्तमान काय ? तें तपसिलें लि॥ ह्मणोन लि॥. ऐसियास, चिरंजीवाकडेही दाणापाणी उत्तम आहे; व आह्मांकडेही आहे. येतेसमई तुह्मांकडून तनिसे रु॥ घेतले होते ते व बाबुजी नाईक याजपासून दीडसे घेतले. त्यानंतर राजश्री आपांनीही तीनसे रुपये दिल्हे. चिरंजिवाकडेही दोमहिन्यांचा रोजमुरा चौतीससे रुपये मागून पाठवून दिल्हे. सारांश, दोहींकडे खर्चाची अथवा खाणियाची अबळ नाहीं. तेविसी चिंता न करणें. नेमणुका पाठवून द्याव्या ऐवज मालवज व कोणास वरात द्यावी घ्यावी लागती; यास्तव नेमणुका पाठवणें ह्मणोन लि॥. व महालकरी रोज उठोन नेमणुका पाठवाव्या ह्मणोन वरचेवरी लिहितात, ऐसियास, यंदा शिलेदार कोणी अद्यापि आले नाहींत, यास्तव नेमणुका पाठविल्या नसतील, ऐसियास, आह्मी चिरंजिवाची भेटी जालियानंतर मनास आणून पाठवून देऊन. तूर्त गुदस्ताप्रमाणेंच ऐवज महालकरियास लेहून पाठवून, ऐवज आपल्याजवळ आणवणें. तों मागाहून नेमणुका सत्वरीच पाठवून देतों, बहुत काय लिहिणें ? हा आशीर्वाद.
मोर्तब
सुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २१९
श्री १६५१ मार्गशीर्ष वद्य ४
तपोनिधी राजश्री भवानगिरी बावा महत गोसावी यासि
स्नो। माहदाजी बाजी घाटगे दडवत विनती उपरी येथील क्षेम जाणौन स्वकीय कुशल लेखन सदैव केले पाहिजे यानतर पत्र पाठविले पावोन लिहिले वर्तमान सविस्तर कळो आले मठाचे वर्सासनाविशी लिहिले ऐसीयासी आह्माकडून चालवावया किमपीहि अतर होत नाहीं तेथे आपला अतीत राहिलिया अवघेच चालेल सदैव आसिर्वादपत्र पाठऊन परामर्शासी अतर न कीजे विशेष काय लिहिणे हे विनति (शिक्का फारसी)
पौ। तेरीख छ १७ जमादि-
लावल सु॥ सलासीन मया
अलफ मु॥ ललगुण
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १३१ ]
श्री. शके १६६० फाल्गुन शुद्ध ९.
राजश्री शामजीपंत मामा स्वामीचे सो।:-
सेवक बाबूराव मल्हार साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता। फालगुन शुद्ध नवमी बुधवार मुकाम जयपूर यथास्थित जाणोन स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. आह्मीं दिल्लीहून पादशाहासमागमें तोहमासकूलीच्या लढाईस गेलों होतों. त्यास, दिल्लीहून साठसत्तर कोसांवर त्याची यांची गाठी पडली, हें वर्तमान पूर्वी तुह्मांस लिहिलें आहे. अलीकडील वर्तमान : महमदशाहाची फौज तोफखानियाचा आसरा धरून मोर्चे बांधून बसली. तोहमासाचे कजलबास यऊने गोटाभोंवतें रोज माणसें मारताती. सादतखान वीस हजार फौजेनसीं आला. दुसरे दिवशीं पातशाहाची मुलाजमत केली, तों कजलबासांनीं बुनंगियाबर घातलें. हे वर्तमान ऐकोन, सादतखान त्यांचे फौजेवर चालोन गेला. मागाहून अमीरहि तयार होऊन गेले. युध्य मोठें जालें. सादतखानास कजलबासानें धरून नेलें. अमीरलउमराव जखमी होऊन रणांत पडले. यादगारखान, मुसफरखान वगैरे पांच अमीर मारले गेले. दाहा बारा हजार फौज मारिली. कोण्ही कोण्ही पळून गेले. याप्रकारें पूर्वी जालें. त्याउपर, अमीरलउमराव डेरियास येऊन येका दो रोजा मृत्य पावले. तदनंतर, या फौजेचा इस्तकलाल राहिला नाहीं. तेव्हां नबाब असफजांनी सलुक आरंभिला. सैदलष्करखानास तोहमासाकडे पाठविलें, आणि आपण जाऊन भेटून आले. दुसरे दिवशीं पातशाहास भेटीस नेऊन भेटून आले. त्याउपर, कर्दीखान, गाजद्दीखान, असफजा मेजवानी खावयास गेले. मेजमानी खाऊन आले. तोहमासकुलीयाचे डेरियास यावें, हा करार जाला, तों आठ पांच रोज गुदरले, तों यांच्या लष्करांत अन्न न मिळे ऐसें जालें. सा साता रुपयीं शेर अन्न न मिळे ! वैरण तो किमपि न मिळे पांच पांच उपोषणें लोकांस जालीं. तेव्हां आसफजास तोहमासानें बालाविलें. ते व सैदलष्करखान व हपीजुद्दीखान व गाजद्दीखान व सैदमहमदखान ऐसे गेले, ते दोन रोजपर्यंत फिरोन न आले. तिसरे दिवशीं बातशाहास बोलाविलें. हे गेले, ते लष्करासमीप जाऊन राहिले. त्यांचे दर्शनास कोण्ही न आले. रात्रौ पातशाहाजवळ आसफजा व सादतखान मात्र आले. त्याउपर पातशाहा तोहमासाच्या डेरियास जाऊन आलियावर, पातशाहाभोंवती चौकी बसविली. असफ, व गाजद्दीखान वगैरे अमीर कैद केले. प्रातःकाळीं तहमासाकडील लोक येऊन शाहाजादा नेला. तोफखाना लेऊन नेला. कमरद्दीखान धरून नेलें. तोंपर्यंत रविवारीं चतुर्दशीस तिसराप्रहरपर्यंत लष्करांत आह्मी होतों. हें नजरेनें पाहून, मग छातीचा कोट करून, लष्करांतून हत्ती, उंटे, माणसें, वस्तभाव, कुलसुद्धां निघालों. उंटे, हत्ती, पायीचीं माणसें, रस्तियास लावून, आह्मी वाट टाकून, रानांत निघालों. एक रात्र रानांत होतों. दुसरे दिवशीं चाळीस कोसांची मजल करून दिल्लीच्या रस्त्यास मिळालों. सादतखान कजलबासांची फौज घेऊन दिल्लीत आला. त्याचे पाठीमागें दिल्लीस तिसरे दिवशी पावलों. तेच दिवशीं दिल्लीहून ती कोसांवर महमदखानाचे सराईस येऊन राहिलों. चौथे रोजी पळवलास आलों. पांचवे रोजी सुरजमल्ल जाट याची भेटी घेऊन मुकामास आलों. त्याउपर, जयपुरास मंगळवारीं फाल्गुन शुद्ध अष्टमीस पावलों. येथें धोंडोपंत होते, त्यांची भेटी जाली. उंटें हत्तीहि दिल्लीस येऊन पुढें रेवाडीवरून आली. एका दो रोजीं जयनगरस दाखल होतील. ईश्वरानें मोठें संकट टाळून अब्रूनें बाहेर काढलें. तुह्मी खबर ऐकोन हैराण व्हाल, यास्तव हें पत्र मुजरद कासीदाबराबर पाठविलें आहे. चकतियाची पातशाही बुडाली ! इराणी जाली ! याउपर, बरी गोष्ट आहे ऐसें नाहीं. तुह्मी तेथें राहाल तर बहुत सावधपणें राहाणें. तीर्थरूपांनी याउपर गंगातीरीं राहावें ऐसें नाही. त्यांनीं पुणियास जावें. संकलित त्यास पत्र लिहिलें आहे, हें पावतें करणें; आणि या पत्राप्रों। वर्तमान लिहिणें. तुमच्या पत्रांची उत्तरें सविस्तर मागाहून लेहून पा।. दिल्लीचा किल्ला खाली जाला. शाहाजादे आहेत, त्यांजवर चौकी बसविली. नादरशाहाची द्वाही फिरली. पुढें वर्तमान होईल तें लिहून पाठवूं. याउपर, आह्मी आठच्यार जयपुरी राहून, असुदे होऊन, स्वार होऊन, श्रीमंतांचे भेटीस माळवियांत येऊन. तदोत्तर, पुढें तुह्मांस लेहून. विशेष काय लिहिणें ?
पौ फाल्गुन वद्य अमावास्या
शके १६६० कालयुक्तनाम
संवत्सरे, सन हजार ११४८,
छ. २८ जिल्हेज सु॥ तिसा
सलासीन मया अलफ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १३० ]
श्री. शके १६६० पौष----माघ.
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री संभाजी जाधव यांसि :-
पिलाजी जाधवराऊ आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत जाणें. विशेष. येथील सविस्तर वृत गाड्याबराबरी पत्रीं लि॥ आहे, त्यावरून तुह्मांस कळेल. सांप्रत, आजि काळ अवघ्या फौजा जावयाचा मनसुबा राजश्री पंतप्रधान यांनी पेशजी लि॥ होता, त्यावरून तुह्मांस लि॥ होतें. ऐसियास, काळीं पुनरोक्त राजश्री रायांची पत्रें आलीं कीं, आह्मीं मजल दरमजल हिंदुस्थानांत जातों, इराण पादशाहा तोहमाशकुलीखा सार्वभोमावर आला आहे. त्याचे कुमकेस जावयाकरितां माळव्यांतील फौजा मल्हारजी होळकर, राणोजी शिंदे, पवार ऐसे पाठविणें. पाच्छाहाची कुमक यासमईं केलियानें या राज्याचा लौकीक आहे. वरकड गुजरातची फौज घेऊन. वसई घ्यावी. ऐसी पत्रें आली. त्यावरून माळव्यांतील फौजांस निरोप देणार. आह्मी व वरकड फौजा दोनमास गुंता जाला. पुढें दोन महिन्यांनी निरोप जालियानंतर वरघाटे छावणीस येतील. सारांश, आमचा गुंता इकडे जाला. चिरंजीव आपाहि तिकडे गुंतला. ईश्वरइच्छेनें लौकर निर्गम जाला. चिरंजिवास निरोप देऊन. नाहींतरी, कळेल त्याप्रकारें लग्नकार्य योजिलें आहे, तें सिद्धीस नेणें. राजश्री पंतप्रधान सार्वभौमाची कुमक करून, छावणीस त्याप्रांती राहातील. सविस्तर तुह्मांस कळावें, याजकरितां लि॥ असे. बहुत काय लिहिणें ? हा आशिर्वाद.