[ १३४ ]
श्री. शके १६६१ चैत्र शुद्ध ९.
अवरंगाबादेहून चैत्र शु॥ ४ रविवारचें लिहिलें आलें त्यांत मजकूर कीं, तोहमासकुलीखान याचें वर्तमान तो तुह्मी ऐकिलेंच असेल. पठाण इरानचे सरदेस होते. ते चाकर चकातियाचे ह्मणवीत होते. त्यास सामील करून नादरशाहा आला होता. त्याचे लोकांचे विद्यमानें इमान देऊन, महमदशाहा, व निजाम, व कमरदीखान हे ताहमासकुलीचे भेटीस गेले होते. बेइमानी करून तोहमासकुलीनें जफ्त केले. पठाणाचें सांगितलें कबुल न केलें. शेवटी दिल्लीस प्रवेश करते-समयीं आसपास बंड कुलपठाणांचीच होती. तोहमासकुलीचे हत्तीमागें कांसीखान पठाण मोरचेल करीत होता. नादिरशाहामागें कांसीखाचा बंधु होता. दरवाजियासी आलियावर पठाणांनीं कटारा चालवून तहमासकुली व नादरशाहा–दोघेही-मारले; महमदशाहास पठाणांनीं तक्तीं बैसविलें ; हें वर्तमान तहकीक आलें आहे. परंतु अमिराचीं लिहिलें आलीं नाहींत. नोबत सुरू जाली नाहीं. श्रीमंत रा। राव बर्हाणपुरावर आहेत. सध्यां वसूल दरोबस्त मोगलाईअमल देखील घेतात. बर्हाणपुरापासून काय घेतील तें पाहावें. पौ छ. ८ मोहरम. चैत्र शुद्ध ९ शुक्रवार संध्याकाळ मुकाम पुणें. शके १६६१ सिद्धार्थनाम संवत्सरे.