[ १३१ ]
श्री. शके १६६० फाल्गुन शुद्ध ९.
राजश्री शामजीपंत मामा स्वामीचे सो।:-
सेवक बाबूराव मल्हार साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता। फालगुन शुद्ध नवमी बुधवार मुकाम जयपूर यथास्थित जाणोन स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. आह्मीं दिल्लीहून पादशाहासमागमें तोहमासकूलीच्या लढाईस गेलों होतों. त्यास, दिल्लीहून साठसत्तर कोसांवर त्याची यांची गाठी पडली, हें वर्तमान पूर्वी तुह्मांस लिहिलें आहे. अलीकडील वर्तमान : महमदशाहाची फौज तोफखानियाचा आसरा धरून मोर्चे बांधून बसली. तोहमासाचे कजलबास यऊने गोटाभोंवतें रोज माणसें मारताती. सादतखान वीस हजार फौजेनसीं आला. दुसरे दिवशीं पातशाहाची मुलाजमत केली, तों कजलबासांनीं बुनंगियाबर घातलें. हे वर्तमान ऐकोन, सादतखान त्यांचे फौजेवर चालोन गेला. मागाहून अमीरहि तयार होऊन गेले. युध्य मोठें जालें. सादतखानास कजलबासानें धरून नेलें. अमीरलउमराव जखमी होऊन रणांत पडले. यादगारखान, मुसफरखान वगैरे पांच अमीर मारले गेले. दाहा बारा हजार फौज मारिली. कोण्ही कोण्ही पळून गेले. याप्रकारें पूर्वी जालें. त्याउपर, अमीरलउमराव डेरियास येऊन येका दो रोजा मृत्य पावले. तदनंतर, या फौजेचा इस्तकलाल राहिला नाहीं. तेव्हां नबाब असफजांनी सलुक आरंभिला. सैदलष्करखानास तोहमासाकडे पाठविलें, आणि आपण जाऊन भेटून आले. दुसरे दिवशीं पातशाहास भेटीस नेऊन भेटून आले. त्याउपर, कर्दीखान, गाजद्दीखान, असफजा मेजवानी खावयास गेले. मेजमानी खाऊन आले. तोहमासकुलीयाचे डेरियास यावें, हा करार जाला, तों आठ पांच रोज गुदरले, तों यांच्या लष्करांत अन्न न मिळे ऐसें जालें. सा साता रुपयीं शेर अन्न न मिळे ! वैरण तो किमपि न मिळे पांच पांच उपोषणें लोकांस जालीं. तेव्हां आसफजास तोहमासानें बालाविलें. ते व सैदलष्करखान व हपीजुद्दीखान व गाजद्दीखान व सैदमहमदखान ऐसे गेले, ते दोन रोजपर्यंत फिरोन न आले. तिसरे दिवशीं बातशाहास बोलाविलें. हे गेले, ते लष्करासमीप जाऊन राहिले. त्यांचे दर्शनास कोण्ही न आले. रात्रौ पातशाहाजवळ आसफजा व सादतखान मात्र आले. त्याउपर पातशाहा तोहमासाच्या डेरियास जाऊन आलियावर, पातशाहाभोंवती चौकी बसविली. असफ, व गाजद्दीखान वगैरे अमीर कैद केले. प्रातःकाळीं तहमासाकडील लोक येऊन शाहाजादा नेला. तोफखाना लेऊन नेला. कमरद्दीखान धरून नेलें. तोंपर्यंत रविवारीं चतुर्दशीस तिसराप्रहरपर्यंत लष्करांत आह्मी होतों. हें नजरेनें पाहून, मग छातीचा कोट करून, लष्करांतून हत्ती, उंटे, माणसें, वस्तभाव, कुलसुद्धां निघालों. उंटे, हत्ती, पायीचीं माणसें, रस्तियास लावून, आह्मी वाट टाकून, रानांत निघालों. एक रात्र रानांत होतों. दुसरे दिवशीं चाळीस कोसांची मजल करून दिल्लीच्या रस्त्यास मिळालों. सादतखान कजलबासांची फौज घेऊन दिल्लीत आला. त्याचे पाठीमागें दिल्लीस तिसरे दिवशी पावलों. तेच दिवशीं दिल्लीहून ती कोसांवर महमदखानाचे सराईस येऊन राहिलों. चौथे रोजी पळवलास आलों. पांचवे रोजी सुरजमल्ल जाट याची भेटी घेऊन मुकामास आलों. त्याउपर, जयपुरास मंगळवारीं फाल्गुन शुद्ध अष्टमीस पावलों. येथें धोंडोपंत होते, त्यांची भेटी जाली. उंटें हत्तीहि दिल्लीस येऊन पुढें रेवाडीवरून आली. एका दो रोजीं जयनगरस दाखल होतील. ईश्वरानें मोठें संकट टाळून अब्रूनें बाहेर काढलें. तुह्मी खबर ऐकोन हैराण व्हाल, यास्तव हें पत्र मुजरद कासीदाबराबर पाठविलें आहे. चकतियाची पातशाही बुडाली ! इराणी जाली ! याउपर, बरी गोष्ट आहे ऐसें नाहीं. तुह्मी तेथें राहाल तर बहुत सावधपणें राहाणें. तीर्थरूपांनी याउपर गंगातीरीं राहावें ऐसें नाही. त्यांनीं पुणियास जावें. संकलित त्यास पत्र लिहिलें आहे, हें पावतें करणें; आणि या पत्राप्रों। वर्तमान लिहिणें. तुमच्या पत्रांची उत्तरें सविस्तर मागाहून लेहून पा।. दिल्लीचा किल्ला खाली जाला. शाहाजादे आहेत, त्यांजवर चौकी बसविली. नादरशाहाची द्वाही फिरली. पुढें वर्तमान होईल तें लिहून पाठवूं. याउपर, आह्मी आठच्यार जयपुरी राहून, असुदे होऊन, स्वार होऊन, श्रीमंतांचे भेटीस माळवियांत येऊन. तदोत्तर, पुढें तुह्मांस लेहून. विशेष काय लिहिणें ?
पौ फाल्गुन वद्य अमावास्या
शके १६६० कालयुक्तनाम
संवत्सरे, सन हजार ११४८,
छ. २८ जिल्हेज सु॥ तिसा
सलासीन मया अलफ.