[ १३२ ]
श्री. शके १६६० फाल्गुन.
श्रीयासह चिरंजीव राजमान्य राजश्री संभाजी जाधव यांसिः--
पिलाजी जाधवराउ आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत जाणें. यानंतर तुह्मी सेखजी समागमें पत्र पाठविलें, प्रविष्ट होऊन सविस्तर वृत्त कळों आलें. वेथेचें वर्तमान ऐकिलें. त्यावरून चित्तास असमाधान जालें. येविस सविस्तर लेहून पाठवावे ह्मणोन लिहिलें. ऐसियास मालशेतचा घांट उतरून आलियावर पांच सात दिवस पोटांत शुल निर्माण होऊन श्रमी केलें होते. त्याउपर श्रीनें निशल्य आरोग्य केलें. सांप्रत शरीरीं उत्तमप्रकारें समाधान आहे. चिंता न करणें. घराचें वर्तमान पूर्वी तुह्मी लिहिल्यावरून व सांप्रत सेखजीच्या जबानीवरून साद्यंत अवगत जालें. घर ताबडतोब उजरें केलें, उत्तम आहे. लग्नाचा निश्चय फाल्गुनमासीं करावें ऐसें सांगितलें होतें. सांप्रत दिडा महिनियाचा अवकाश थोडका; यास्तव कोणती तीथ नेमस्त करावी ? ह्मणोन लि॥. लग्नास आह्मी अथवा चिंरजीव राजश्री आपाचें येणें कधी होईल ? तें ल्याहावें, ह्मणोन लि॥. ऐसियास, ब्राह्मणाचे मतें उत्तम निर्दोष लाभदायक तीथ योजेल तें योजणें. उभयतांचा यावयाचा विचार. तरी आह्मी इंद्रप्रस्थाकडे जावें, ऐसा उपक्रम श्रीमंतांकडून निघाला आहे. ऐसियास, राजश्री पंतप्रधानही स्वारीस जाण्याचे उद्देशें गंगातीरास येतील. तंदोत्तर आमचा उत्तरेकडील उपक्रम राहिला तरी, आह्मी स्वारीस जाऊन ; चिरंजिवास पाठवून ; अथवा तिकडे जाणें ऐसें जालें तरी चिरंजिवास येथें फौजेत असावें लागेल. मग उभयतांचे येणें होणार नाही. तुह्मीं लग्न सिध करणें. गहू, हरभरे, तांदूळ लि॥ प्रों। घेतले, पुढें घेणें ते घेतों ; ह्मणोन लि॥, उत्तम आहे. दाणापाणियाचें वर्तमान काय ? तें तपसिलें लि॥ ह्मणोन लि॥. ऐसियास, चिरंजीवाकडेही दाणापाणी उत्तम आहे; व आह्मांकडेही आहे. येतेसमई तुह्मांकडून तनिसे रु॥ घेतले होते ते व बाबुजी नाईक याजपासून दीडसे घेतले. त्यानंतर राजश्री आपांनीही तीनसे रुपये दिल्हे. चिरंजिवाकडेही दोमहिन्यांचा रोजमुरा चौतीससे रुपये मागून पाठवून दिल्हे. सारांश, दोहींकडे खर्चाची अथवा खाणियाची अबळ नाहीं. तेविसी चिंता न करणें. नेमणुका पाठवून द्याव्या ऐवज मालवज व कोणास वरात द्यावी घ्यावी लागती; यास्तव नेमणुका पाठवणें ह्मणोन लि॥. व महालकरी रोज उठोन नेमणुका पाठवाव्या ह्मणोन वरचेवरी लिहितात, ऐसियास, यंदा शिलेदार कोणी अद्यापि आले नाहींत, यास्तव नेमणुका पाठविल्या नसतील, ऐसियास, आह्मी चिरंजिवाची भेटी जालियानंतर मनास आणून पाठवून देऊन. तूर्त गुदस्ताप्रमाणेंच ऐवज महालकरियास लेहून पाठवून, ऐवज आपल्याजवळ आणवणें. तों मागाहून नेमणुका सत्वरीच पाठवून देतों, बहुत काय लिहिणें ? हा आशीर्वाद.
मोर्तब
सुद.