[ १३३ ]
श्री. शके १६६१ चैत्र शुद्ध २.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री अंताजी नारायण स्वामी गोसावी यासीः-
पोष्य बाजीराऊ बल्लाळ प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. सांप्रत तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं; तरी सविस्तर लिहित जाणें. येथील वर्तमानतर : बर्हाणपुरानजीक मुकाम आहे. उत्तर प्रांतें जावयाचा विचार राहिला. दिल्लीकडील वर्तमान तरः राजश्री बाबूराऊ मल्लार यांचीं व राजश्री सवाई जैसिंगजी यांची पत्रे- छ. २५ जिल्हेजची पत्रें-- जैनगरचीं आली. त्यांत वर्तमान हेंच की–नादरशाहा तक्तीं बैसले. महमदशाह व निजामन्मुलुक व कमरुद्दीखान व गाजुद्दीखान, तमाम अमीर व मुत्सद्दी, कैदेत आहेत. नादरशाहानें पातशाही खजाना, व अमिरांचा खजाना मिळोन एक अर्बुज जमा केला. आणखी शहरांत खणती लावून पैका जमा करीतच आहेत. धनाचा व बिशादीचा सुमार नाही. निजामन्मुलुक व कमरुद्दीखान यांची दौलत कुल् हत्ती, घोडे, पैका ज़फ्त केला. स्त्रिया होत्या त्यापौ। एकदोन ज्यांच्या त्यांस दिल्या. वरकड घेऊन कजलबसांस दिल्या. वरकड शाहरांत कल्पांत जाला असे. पन्नास हजार माणूस कजलबाशांनीं जिवें मारिलें. आडविहिरी भरून निघाल्या. व कजलबासहि मारिले गेले. कितेक दिल्लींतील हवेलिया जाळून खाक केल्या; कितेक जळत आहेत; कितेक लुटल्या; कितेक लुटीत आहेत. कोण्हाचे हवेलींत कोण्ही जाऊं पावत नाहीं. नादरशाह कोटांत आहे. कजलबास कुल शाहर लुटीत आहेत. महर्गता मोठी ज़ाली आहे. दिल्लीतील माणसें बाहेर जाऊं पावत नाहींत ; बाहेरील आंत जाऊ पावत नाहींत ; तमाम राहदारी बंदु जाली आहे. ज्या गोष्टी कधीं ऐकिल्या नाहीत, त्या गोष्टी कजलबाशांनी दिल्लीत केल्या आहेत. मोठा उल्कापात जाला आहे. दिल्लीचा बंदोबस्त जाला नाहीं. सादतखान मृत्य पावलियावरी दिल्लीत इतका प्रसंग जाला आहे. ईश्वरानें विचित्र करणी केली आहे. दिल्लीचा बंदोबस्त जालियावरी नादरशाह अजमेरीस पिराच्या दर्शनास येणार आहेत. यास्तव सवाईजींनी आपले वे लोकांचे कबिले उदेपुरास पाठवून सडे जाले आहेत. कदाचित् नादरशाह अजमेरीस आले, तरी त्याच्यानें झुजावत नाहीं, उदेपुरास जातील. इकड़ील दक्षणेच्या फौजा मातबर जातील तेव्हां नादरशाहासी प्रसंग पडेल ! तुह्मांस वर्तमान कळावें, यास्तव लिहिलें आहे. तुह्मांस पूर्वी कितेक लिहिलें आहे, त्याप्रों। वर्तणुक करणें. लोभ असो दीने. हे विनंति.