[ १३० ]
श्री. शके १६६० पौष----माघ.
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री संभाजी जाधव यांसि :-
पिलाजी जाधवराऊ आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत जाणें. विशेष. येथील सविस्तर वृत गाड्याबराबरी पत्रीं लि॥ आहे, त्यावरून तुह्मांस कळेल. सांप्रत, आजि काळ अवघ्या फौजा जावयाचा मनसुबा राजश्री पंतप्रधान यांनी पेशजी लि॥ होता, त्यावरून तुह्मांस लि॥ होतें. ऐसियास, काळीं पुनरोक्त राजश्री रायांची पत्रें आलीं कीं, आह्मीं मजल दरमजल हिंदुस्थानांत जातों, इराण पादशाहा तोहमाशकुलीखा सार्वभोमावर आला आहे. त्याचे कुमकेस जावयाकरितां माळव्यांतील फौजा मल्हारजी होळकर, राणोजी शिंदे, पवार ऐसे पाठविणें. पाच्छाहाची कुमक यासमईं केलियानें या राज्याचा लौकीक आहे. वरकड गुजरातची फौज घेऊन. वसई घ्यावी. ऐसी पत्रें आली. त्यावरून माळव्यांतील फौजांस निरोप देणार. आह्मी व वरकड फौजा दोनमास गुंता जाला. पुढें दोन महिन्यांनी निरोप जालियानंतर वरघाटे छावणीस येतील. सारांश, आमचा गुंता इकडे जाला. चिरंजीव आपाहि तिकडे गुंतला. ईश्वरइच्छेनें लौकर निर्गम जाला. चिरंजिवास निरोप देऊन. नाहींतरी, कळेल त्याप्रकारें लग्नकार्य योजिलें आहे, तें सिद्धीस नेणें. राजश्री पंतप्रधान सार्वभौमाची कुमक करून, छावणीस त्याप्रांती राहातील. सविस्तर तुह्मांस कळावें, याजकरितां लि॥ असे. बहुत काय लिहिणें ? हा आशिर्वाद.