Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(३) सुदर्शनकालीन अतिथीला स्वस्त्रीसमर्पण करण्याच्या ह्या चालीला पुढे आस्ते आस्ते आळा पडल्याचाही दाखला भारतात नमूद आहे. शांतिपर्वाच्या २६६ व्या अध्यायात चिरकारीची कथा भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितलेली पाहावी. चिरकारीचा पिता गौतम अन्यत्र गुंतला असता इंद्र गौतमाश्रमात अतिथी म्हणून आला आणि चिरकारीच्या मातेशी संभोग करून चालता झाला. हे वृत्त गौतमास कळल्यावर गौतमाने चिरकारीस आपल्या मातेचा वध करण्यास पहिल्या झटक्यासरशी सांगितले व आपण रागे रागे अरण्याचा रस्ता धरिला. इकडे मातेचा वध न करिता, चिरकारी तसाच राहिला, अरण्यांत राग शांत झाल्यावर गौतमाला स्वस्त्रीचा पुत्राने वध केला असेल या निश्चितीने फार वाईट वाटले. तो म्हणाला, अतिथिसमागमांच्या असल्या अस्पष्ट अपराधाकरिता स्त्रीचा वध करणे अधर्म्य होय. नंतर पश्चात्ताप होऊन घरी आल्यानंतर, पुत्राने स्त्रीस ठार मारिले नाही असे पाहून, त्या ऋषीने चिरकारीची प्रशंसा केली. ह्या गौतमाच्या कथेत व मागील सुदर्शनाच्या कथेत अंतर आहे. सुदर्शन व गौतम दोघेही अतिथीला स्वस्त्रीसमर्पण करणे हा धर्म समजतात; परंतु ह्या धर्माने सुदर्शनाला कृतकृत्यता वाटते, तर गौतमाला पहिल्या झटक्याला क्रोध येतो. विचारांती स्वस्त्रीने अतिथिधर्म पाळण्यात जे केले ते धर्म्यच केले असे गौतमाला वाटले. याचा अर्थ इतकाच की ही अतिथिपूजनाची चाल समाजांत किंचित् गर्ह्य समजली जाऊ लागली होती, परंतु ह्या चालीचा पगडा अद्याप व्हावा तितका शिथिल झाला नव्हता.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(२) दोघा जीवश्च कंठश्च मित्रांमध्ये स्त्रीविनिमय होणे जसे नीतिबाह्य समजत नसत तसेच अनोळखी अतिथीला स्वस्त्री किंवा स्वदासी देण्यात एकेकाळी धर्म समजत असत.
शांतिपर्वाच्या १६८ व्या अध्यायात गौतम नावाच्या ब्राह्मणाला अतिथिसत्कार म्हणून इतर वस्तूंबरोबर कोण्या शबराने एक गतभर्तृका दासी दिल्याचा वृत्तान्त आहे. कोणी सन्मान्य अतिथी आला असता, त्याला दासी देण्याची चाल भारतवर्षात पुरातन काळी सर्वसामान्य होती, व अलीकडे पेशवाईतही ही चाल प्रचलित होती. पेशवाईतील कित्येक सरंजामदारांत अतिथिसत्काराची अशी चाल होती म्हणून सांगतात की अतिथीची चंची तांबुलादी द्रव्यांनी नित्य भरून ठेवावयाची व सेवा करण्याकरिता रात्रौ एखादी ठेंगणी ठुसकी दासी अतिथीकडे पाठवावयाची. कृष्ण, अर्जुन इत्यादी अतिथींना दासी दिल्याचे उल्लेख अनेक आहेत. आता केवळ दासी अतिथीकडे पाठविण्यात विशेष मातब्बरी दिसत नाही; कारण दासी म्हणजे बोलून चालून गुलाम. परंतु घरधन्याने किंवा गृहस्थाने आपल्या यज्ञपत्नीला अतिथीची ग्राम्यधर्माने सेवा करण्यास सांगितल्याचाही दाखला भारतात पाहावयास मिळतो. अनुशासन पर्वाच्या दुस-या अध्यायात सुदर्शनाची कथा आहे. सुदर्शन आपली भार्या ओघवती हिला सांगतो की, "गृहस्थाश्रमधर्माने माझी वागावयाची प्रतिज्ञा आहे, सबब अतिथीला प्रतिकूल असे कोणतेही वर्तन तू करू नयेस; इतकेच नव्हे तर प्रसंगी स्वतःचे शरीरही अतिथीला देण्यास मागेपुढे पाहू नकोस." नव-याची ही आज्ञा बायकोने शिरसावंदन केली. पुढे लवकरच परीक्षेची वेळ आली. सुदर्शनाच्या गैरहजेरीत एक ब्राह्मण अतिथी आश्रमात आला. अर्घ्वपाद्यादिपूजा यथाविधी घेतल्यावर अतिथीने सुदर्शनस्त्रीस संभोगेच्छा असल्याचे दर्शविले, तेव्हा अतिथीचा अवमान करावयाचा नाही या धर्माने ओघवतीने ब्राह्मणाची इच्छा पूर्ण केली. इतक्यात सुदर्शनऋषि घरी परत आले व त्यांना हा आतिथ्यप्रकार कळला. तेव्हा आपण आज धन्य झालो असे त्यांनी उद्गार काढिले व आपल्या बायकोची पातिव्रत्यधर्माबद्दल पाठ थोपटली. पितामह भीष्म धर्मराजाला सांगतात की ह्या सत्कृत्यामुळे सुदर्शनाची कीर्ती भुवनत्रयांत अक्षय्य पसरली व त्याला इंद्रलोक प्राप्त झाला. एके काली स्वस्त्रीही अतिथीला अर्पण करण्याची चाल भारतीय आर्यात होती, याला या कथेतून दुसरा आधार धुंडाळण्याची जरूर नाही. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, पॉलिनेशिया, मोंगोलिया आणि इतर बहुतेक सर्व देशांतील प्राचीन व अर्वाचीन रानटी व सुधारलेल्या समाजातील अतिथिपूजनाची ही चाल प्राचीन भारतीय आर्यात व अनार्यातही आढळावी हे काही एका संस्कृतीतील मनुष्यस्वभावास अनुरूपच आहे.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
प्रकरण ३ रे
आतिथ्याची एक आर्ष चाल
३. आतिथ्याची एक आर्ष चाल
(१) अथेन्स शहरातील तत्त्वज्ञ साक्रेटिस (सुक्रतुस) याने आपली स्त्री झांटिप हिला आपला स्नेही अल्कि बियाडिस याला संभोगार्थ दिली, तसेच रोम शहरातील प्रसिद्ध मुत्सद्दी केटो याने आपली स्त्री मर्शिया हिला आपला स्नेही होर्टेन्शियस याला त्याच कार्याकरिता दिली, असे प्लूटार्क लिहितो (प्लूटार्ककृत केटो). मित्राला स्वस्त्री उपभोगार्थ देण्यात कोणत्याही नीतीचा भंग झाला असे तत्कालीन ग्रीक व रोमन समाजाला वाटत नव्हते, हा ह्या उदाहरणाचा अर्थ. आपल्या इकडे भारतवर्षात प्राचीन काळी या मुद्दयासंबंधाने काय स्थिती होती ती भारतादी ग्रंथावरून निश्चित करू. उद्योगपर्वाच्या ४५ व्या अध्यायात खरे मित्रत्व कशाला म्हणतात ते सनत्सुजात सांगतात, आणि ख-या मित्रत्वाचे जे सहा गुण त्यांपैकी खालील गुणांचा निर्देश करतात--
"संकटसमयी मित्राला आपली स्त्रीदेखील निर्मळ अंतःकरणाने अर्पण करावी." (इष्टान् पुत्रान् विभवान् स्वाश्च दारान्)
सनत्सुजात म्हणजे कोणी अलबत्ये गलबत्ये वाचाट माणूस नव्हते. महान् तपस्वी व तत्त्ववेते म्हणून ते भारतात प्रसिद्ध होते. ते ही मित्रनीती सांगत आहेत. तेव्हा एकेकाळी भारतीयांमध्ये मित्राला स्वस्त्रीसंभोगार्थ देण्यात नीतिभंग होतो असे मानीत नव्हते, असे विधान सप्रमाण करता येते. या विधानाचे पोषण पाणिनीच्या एका सूत्राच्या आधाराने करता येते. द्विगोर्लुगनपत्ये (४-१-८८) या सूत्राच्या अनुषंगाने द्वैमित्रिः हा तद्धित पाणिनि सांगतो. द्व्योर्मित्रयोरपत्यं द्वैमित्रिः । दोन मित्रांच्या अपत्याला द्वैमित्रि म्हणतात. एका मित्राने आपली बायको काही काल ग्राम्यधर्मार्थ आपल्या मित्राला दिली आणि मित्रापाशी राहून त्या बायकोला अपत्य झाले, तर बायको शास्त्रतः एकाची व मूल झाले दुस-या मित्राच्या समागमापासून, अशा स्थितीत पितृत्व सामान्य जनप्रवादाने दोघाही मित्रांकडे येई. शास्त्रतः नव-याकडे, समागमतः दुस-या मित्रांकडे सबब मुलाला द्वैमित्रि म्हणत. पाणिनिकाली मित्राला ग्राम्यधर्मार्थ स्वस्त्री देण्याची चाल होती, हे सिद्ध. ग्रीस व रोम या देशांत जी चाल होती तीच चाल पाणिनिकाली भारतवर्षात होती.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
७. येणेप्रमाणे प्रजापतिसंस्थेपासून प्राचीन आर्य समाजात तीन मोठे मोठे परिणाम झाले. प्राजापतिक कुले विभक्तपणे स्थापिण्याचा क्रम सुरू झाला, हा पहिला परिणाम. दूरदेशी वसाहत करण्याचा प्रघात पडला हा दुसरा परिणाम. बहुभार्याक व एकपतिक प्रजापतिसंस्थेत पुढे कोणकोणते फेरफार कसकसे होत गेले, हा तपशील भारतेतिहासावरून महर्षि व ब्रह्मचारी जे व्यास त्यांच्या अनुसंधानापुढील कित्येक टिपणांतून यथास्थल नमूद होईल.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
त्या प्राचीन काळी ब्रह्मचर्याखेरीज इतर कोणत्याही आश्रमाने इतके परिपूर्ण स्वास्थ्य मिळण्यासारखे नव्हते. ते स्वास्थ्य प्रजापतींच्या जुलमाने आर्य समाजातील काही सत्त्वशील पुरुषांस मिळून ब्रह्मचर्यसंस्था उदयास आली. असली ही थोर संस्था तत्कालीन किंवा अर्वाचीन इतर रानटी समाजात कोठेही निघाल्याचे इतर कोणत्याही इतिहासात नमूद नाही. रानटी आर्य लोकांत व इतर रानटी लोकांत जो मोठा भेद प्रथमदर्शनी अवलोकनात येतो तो हाच होय. इतर रानटी लोकांत जुलमी प्रजापतीच्या जबरदस्तीला कंटाळून घराबाहेर व प्रजापती कुटुंबाबाहेर जे तरुण लोक पडतात ते फार तर शेजारी किंवा दूरदेशी स्वतंत्र व विभक्त प्रजापतिसंस्था स्थापतात; परंतु आजन्म अपत्नीक व ब्रह्मचारी राहून आत्मानंदात किंवा लोकोपकारात आयुष्य खर्च करीत असलेले आढळत नाहीत, निदान प्रवाशांनी व निरीक्षकांनी तसा दाखला कोठे टिपून ठेवलेला आढळात नाही. आर्य लोकांतील ह्या ब्रह्मचा-यांजवळ आर्य लोकच केवळ नव्हेत, तर देव म्हणून जे श्रेष्ठ लोक होते तेही भीत अशी शेकडो वर्णने भारतात आहेत. ब्रह्मचा-याजवळ अशी कोणती जादू होती की, जिच्यामुळे मानवच नव्हेत तर देवसुद्धा त्यांना वचकत ? ही जादू दुसरी तिसरी कोणतीही नसून सर्वांभूती समदृष्टी ही होय. समदृष्टित्वामुळे, ब्रह्मचा-यांना सर्व लोक रानातील अनार्य, व म्लेंछ लोक देखील, वश असत, व त्यांची आज्ञा शिरसामान्य करीत. असे हे हत्यार जवळ असल्याकारणाने, प्रजापति, अधिराजे व इंद्रादी देवदेवेश्वरही ब्रह्मचा-यांना वचकून असत आणि वचकासारखी वजनदारी पृथ्वीवर दुसरी कोणतीच नाही. ब्रह्मचा-यांच्या वचकाचा आदर प्रजापतिकालानंतर इतका वाढला की, संपूर्ण आर्य समाजाचे अध्यापकत्व ब्रह्मचा-याकडे आले, व ब्रह्मचा-याचे अनुकरण आर्यलोकांतील तरुण स्त्रीपुरुषांनी नियमाने केलेच पाहिजे, असा दंडक निर्माण झाला. प्रत्येक आर्य प्रथम ब्रह्मचर्याश्रमातून तावून सुलाखून पुनः जन्म घेई व द्विज या सन्मान्य पदवीस आपणास पात्र करून घेई.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
बलिष्ठ प्रजापतींच्या अरेरावी व आपलपोट्या जुलमाने अपत्नीक रहाण्याचा दुर्धर प्रसंग ज्याच्यावर ओढवतो अशा लोकात धट्ट्याकट्ट्या परंतु बिनवजन तरुणाखेरीज पंगू व दुबळ्या लोकांचा समावेश होतो. पैकी पंगू व दुबळे दैवगतीने अनन्यगतिक असल्यामुळे त्यांच्या हातून रानावनात व गिरिगव्हरात जाऊन राहण्याचा खडतर मार्ग अवलंबिला जाणे संभाव्य सुद्धा नाही. सबब, उत्साही परंतु सत्त्वशील व पराक्रमी परंतु इंद्रियनिग्रही असे जे थोडे तरुण लोक ऋषिलोकांच्या प्राजापतिक समाजात असत त्यांनी हा ब्रह्मचर्याचा मार्ग स्वीकारलेला आहे. भारतेतिहासकार जे व्यास त्यांनी सनकननंदनादी सातांचाच जरी ग्रंथारंभी प्रामुख्याने उल्लेख केला आहे व तोही प्रजापतिसंस्थेच्या अनुषंगाने केला आहे, तत्रापि ह्या सनकसनन्दनाच्याही फार पूर्वीच्या प्राचीन काळापासून अपत्नीक अशा ब्रह्मचा-यांची परंपरा चालत आलेली आहे. इतकेच की, जुलमी प्रजापतीच्या काळी ही संस्था विशेष उठावाने लोकांच्या नजरेत भरू लागली. शिवाय सनकसनंदनादी योगसंपन्न पुरुष प्रजापतिकाली उत्पन्न जे झाले ते एकाएकी आकाशातून ज्ञान घेऊन पृथ्वीवर उतरले अशीही विपरीत समजूत करून घेण्यात समंजसपणा नाही. ज्ञानाची व योगाचा कित्येक पिढ्यांची काहीतरी पूर्वपरंपरा असल्याबिगर, सनकसनंदनासारखे योगी व ज्ञानी निपजत नसतात. तात्पर्य, ब्रह्मचर्यसंस्था प्रजापतिसंस्थेच्या समकालीनच नव्हे तर तीहून बरीच जुनी आहे. ब्रह्मचारी या शब्दाचा मूलार्थ ब्रह्मात चालणारा असा आहे. ब्रह्मात चालणारा म्हणजे घरदार सोडून मोठ्या व विस्तीर्ण जगात एकाकी भ्रमण करणारा. ब्रह्मन म्हणजे मोठे, ब्रह्मन म्हणजे समाजाच्या राहण्याच्या स्थलाहून मोठे असे जे अफाट पृथ्वीफलक ते ब्रह्मन. म्हणजे विस्तीर्ण व अमर्याद जग, त्यात संचार करणारा तो ब्रह्मचारी. जबरदस्त प्रजापतीच्या जुलमाने वैतागून जाऊन अफाट जगाचा ज्याने रस्ता सुधारला तो ब्रह्मचारी, घर सोडून अनिकेतन जो बनला म्हणजे प्राजापतिक कुटुंबाबाहेर जो पडला तो ब्रह्मचारी. ब्रह्मचारी अरण्यात व गिरिगव्हरात एकान्तात राहू लागल्याकारणाने, इतर जमावांशी मारामा-या, घरघुती तंटेबखेडे, स्त्रीसंबंधक मात्सर्यादी दोष, अन्नार्थ वन्य व ग्राम्य पश्वादींची हिंसा, पोराबाळांच्या पोटापाण्याची तरतूद करण्याची जबाबदारी इत्यादी काळज्यांतून मुक्त होऊन, त्यांना समाजाचे, लोकांचे व जगताचे चिंतन करण्याला मनमुराद अवधी व स्वास्थ्य मिळाले, आणि ह्या स्वास्थ्याचा आत्मानंदार्थ व लोकोपकारार्थ त्यांनी त्या त्या कालाला व परिस्थितीला अनुरूप असा चांगला उपयोग केला. ऋषिसमाजात ज्या ज्या म्हणून सुधारणा, जी जी म्हणून शास्त्रे व व जे जे म्हणून धर्म उदयास आले, त्यांचे त्यांचे आद्यप्रवर्तक हे ब्रह्मचारी तपस्वी लोक होते.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
ह्या सत्त्वशीलांच्या निरुपद्रवी मार्गाला ब्रह्मचर्याचा मार्ग असे जगविख्यात व सर्वश्रुत नाव पुढे कालांतराने मिळालेले आहे. एकपतिक, बहुभार्याक प्रजापतिक समाजात पंगू, दुबळ्या व सत्त्वशील अशा इसमांवर व तरुण लोकांवर अपत्नीक राहण्याचा बलिष्ठ प्रजापतींच्या अमलात जबरदस्तीने प्रसंग असाच सर्वत्र ओढवत असलेला पृथ्वीवरील अनेक रानटी समाजात दृष्टीस पडतो. The Plurality of wives becomes the privilege of small number of the strongest and the most feared, the Chiefs, the Sorcerers, or the priests, where there are any. In Australia, for example, the adult men take possession of the woman of all ages, and in consequence, the greater number of young men cannot become proprietors of a woman before the age of about thirty years. Among the Ancas or Arancanos of South America the poor of the people are frequently reduced to remain celibate, ( Latourneau, P. 130). Polygamy is the luxury of the rich or chiefs (P. 133). बहुपत्नीत्व हा मूठभर सामर्थ्यवान, ज्यांची दहशत असते असे सरदार, मांत्रिक, आणि जेथे असतील तेथे धर्मगुरु यांचा खास अधिकार बनतो. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियात तरुण पुरुष सर्व वयाच्या स्त्रियांवर मालकी प्रस्थापित करतात. परिणामी युवकांना ते जवळ जवळ तीस वर्षांचे होईतो स्त्री मिळत नाही. दक्षिण अमेरिकेतील अनकास किंवा अरनकानोस यांच्यातील गरिबांना ब्रह्मचारीच राहावे लागते. (लिटोर्न्यू पृ. १३०). बहुपत्नीत्व ही श्रीमंतांची आणि राजेरजवाड्यांची चैनबाजी असते (पृ. १३३ ).
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
प्रजापतिसंस्था बहुसंख्य झाल्याचे एकच शाब्दिक प्रमाण येथे देतो. कुटुंबाच्या मुख्य धन्याला प्रजापती हे जसे नामाभिधान मिळाले, तसेच प्रजापतीपासून झालेल्या प्रजेला प्रजा व प्रज हे नाव मिळाले. हा प्रज व प्रजा शब्द इतका प्रसिद्ध आहे की, दोनचारशे वर्षांपलीकडील जुन्या मराठी कागदपत्रांत शेतकरी या अर्थाने प्रज शब्द वापरलेला आधुनिक इतिहाससंशोधकांच्या चांगला परिचयाचा आहे. ऋग्वेदात ज व प्रज हे शब्द येतात, हेही सांगावयाला नकोच. देशातल्या देशात राहून प्रजापतिक कुटुंबस्थापकांचा हा पहिला मार्ग झाला. तिसरा मार्ग स्वदेशत्याग करून दूरदेशी वसाहत करणा-यांचा. ह्या दूरदेशी वसाहत करणा-यांचा उल्लेख हरिवंशाच्या तिस-या अध्यायात आलेला आहे. दक्षप्रजापतीला वरिणप्रजापतीची मुलगी असिवकी इच्या पोटी पाच हजार पुत्र झाले. त्यांना बेसुमार प्रजावृद्धी करण्याच्या नैसर्गिक छंदात निमग्न होण्याच्या बेतात असलेले पाहून, नारदाने अर्थशास्त्रीय उपदेश करून दूरदेशी घालवून दिले. नारद म्हणाला, तुम्ही प्रजावृद्धी करू इच्छिता खरे, परंतु वर्धमान प्रजेला अन्न पुरविण्याचे पृथ्वीला सामर्थ्य कितपत आहे ते प्रथम पाहा आणि मग प्रजावृद्धीच्या उद्योगाला लागा. नारदाचा हा उपदेश त्या पाच हजार पुत्रांना पटला व ते दूरदेशी जे अन्नशोधार्थ गेले ते पुन्हा परत आले नाहीत; बहुधा जिकडे गेले तिकडेच वसती करून कायमचे राहिले. अशा युक्तीने पाच हजार पुत्रांची वासलात लागल्यावर दक्षाने असिवकीच्या ठायी पुनः एक हजार पुत्र उत्पन्न केले, त्यांचीही वाट पूर्वीच्याचप्रमाणे नारदांनी लाविली. मूळ आर्य लोकांची फाटाफूट होऊन पूर्वेकडे, पश्चिमेकडे, दक्षिणेकडे व उत्तरेकडे रशिया, जर्मनी, इटली, ग्रीस, हिंदुस्थान, तिबेट इत्यादी पृथ्वीभागात आर्य लोक अतिप्राचीन काळीं जे पसरले त्या प्रसाराचा हा इतिहास आहे. विदेशगमनाच्या तिस-या मार्गाचा हा असा पौराणिक तपशील आहे. पहिल्या व तिस-या मार्गाचा खुलासा झाल्यावर, दुसरा मार्ग अविवाहित राहून अरण्यवास पत्करणा-यांचा. त्याचा आता परामर्श घेऊ. युक्तीने प्रजापतीच्या कुटुंबातील चार स्त्रियांना भुलवून स्वदेशातल्या स्वदेशात स्वतंत्र व विभक्त निराळीं कुटुंबे स्थापण्याचे कौशल्य व करामत ज्यांच्या अंगी होती ते स्वदेशातच राहिले आणि ज्यांच्या अंगात विशेष धाडस व साहस होते त्यांनी परदेश पत्करला; परंतु भिडस्त व पापभिरू स्त्रियांशी विशेष लगट करण्याचा ज्यांना सौजन्यामुळे कंटाळा, प्रजापतीशी भांडण तंटा करण्याचा ज्यांचा मूळ स्वभाव नव्हे, असे जे थोडे सत्त्वशील पुरुष होते त्यांनी प्रजापतींच्या कुटुंबातून कोणालाही न दुखविता, देशातील निर्जन अरण्ये व गिरिकंदरे व नदीतटाके यात कुट्या व आश्रम करून राहण्याचा बिनबोभाट मार्ग स्वीकारला. हरिवंशाच्या पहिल्या अध्यायात ब्रह्मदेवाचे सनकसनंदनादि जे सात पुत्र सांगितले आहेत ते या सत्त्वशील वर्गापैकी अत्यंत पुरातन व इतिहासात दाखल झालेले पाहिले होते.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
५. (१) पाशवावस्थेत वानरांतील एकपतिक सर्व भार्याक समाज, (२) मानवावस्थेतील बहुपतिक बहुभार्याक सरमिसळ करणारा समाज, (३) नंतर बहुस्वसृभार्याक बहुभातृपतिक समाज, (४) नंतर बहुस्वसृभार्याक एकभ्रातृपतिक समाज आणि एकभार्याक बहुभ्रातृपतिक समाज, (५) आणि शेवटी बहुभार्याक एकपतिक समाज ऊर्फ प्रजापतिसंस्था. अशा परंपरेने प्राचीन आर्यसमाज ज्या काळी परिणत झाला त्या काळापासून व्यासांनी आपल्या भारतेतिहासाचा प्रारंभ केला आहे. मरीचि, प्रजापति, अत्रिप्रजापति, अंगिरस प्रजापति, पुलस्त्य प्रजापति, ऋतुप्रजापति, वसिष्ठप्रजापति, कर्दमप्रजापति, धर्मप्रजापति, वीर प्रजापति, अरण्यप्रजापति, प्राचीन बहिप्रजापति, दक्षप्रजापति, अंगप्रजापति, क्रचिप्रजापति, सूर्यप्रजापति, मनुप्रजापति इत्यादी अनेक प्रजापतींची नावे भारतात व हरिवंशात दिलेली आहेत. आर्य लोकांत पितृप्रधान कुटुंबसंस्था म्हणजे पित्याच्या नावावरून पुत्राचे नाव ज्या कुटुंबसंस्थेत पडते ती संस्था प्रथम जेव्हा सुरू झाली तेव्हाच्या प्रसिद्ध कुटुंबसंस्थापक ऊर्फ कुलसंस्थापक कुलपतींची ऊर्फ प्रजापतींची ही नावे आहेत. या प्रजापतिक कुटुंबसंस्थेत सर्व स्त्रिया एका प्रजापतीच्या भार्या असल्यामुळे, समाजात इतर नर जे वयात येत त्यांना तीन मार्ग खुले असत. एक मार्ग म्हटला म्हणजे मूळ कुटुंबातून काही प्रिय स्त्रिया काढून नेऊन निराळे स्वतंत्र कुटुंब स्थापून स्वतः प्रजापती व्हावयाचे. दुसरा मार्ग म्हटला म्हणजे आजन्म अविवाहित राहावयाचे, व प्रजापतीच्या कुटुंबात भारभूत रिकामटेकडे न राहता अरण्यवास पतकरावयाचा. तिसरा मार्ग म्हटला म्हणजे प्रजापती कुटुंबाला सोडून देऊन दूरदेशी तत्प्रांतीय सरमिसळ समागम करणा-या मागसलेल्या रानटी समाजातील स्त्रियांशी प्रजापती नात्याने राहून पृथ्वीभर वसाहती करावयाच्या. या तिन्ही मार्गांची वर्णने भारतेतिहासात आली आहेत. मूळ प्रजापतिक कुटुंबाच्या शेजारी स्वदेशातल्या स्वदेशात निराळीं विभक्त प्रजापतिक कुटुंबे स्थापिली जाऊन आर्यसमाज बहुसंख्य होऊन आर्यप्रजावृद्धी कशी झाली याचा तपशील प्रस्तुत स्थळीं देण्याचे कारण नाही. असा प्रकार झाला नसता तर ऋषीनी कुटुंबे व पुढे प्रजा जी इतकी बहुसंख्य झाली, ती झालेली न दिसती.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
आधुनिक दृष्टीने बोलावयाचे म्हणजे ज्यांची उत्पत्ती कोणापासून म्हणजे कोणत्या विवक्षित स्त्री-पुरुषांपासून झालेली सांगता येण्यास साधन नाही, त्यांना मानसपुत्र म्हणून व्यास म्हणतो इतकेच. तात्पर्य, प्रजापतीच्या पूर्वीची माहिती व्यासाला फारशी नव्हती व ती असण्याचा संभवही नव्हता. पूर्व पुराणांतून, वेदांतून व दंतकथांवरून व्यासांना जी सर्व माहिती मिळाली तिच्यावरून त्यांनी असा कयास बांधला की प्रजापती हे मनुष्यसृष्टीचे आदि होत. प्रजापतीपासून कौरवपांडवांच्या काळापर्यंतची वंशपरंपरा बहुतेक बिनतूट अशी पुराणांवरून, वेदांवरून व दंतकथावरून जी त्यांना उपलब्ध झाली ती त्यांनी प्रामाणिकपणाने जशीच्या तशी, विशेष फेरफार न करता दिलेली आहे, अशी सर्व भारत ग्रंथ पाहून माझी खात्री झालेली आहे. व्यासांच्या प्रामाणिकपणाबद्दल एकच एक मोठ्यांतले मोठे प्रमाण म्हणजे, स्वकालीन नीतिदृष्ट्या गर्ह्य वाटणा-या अशा नाना प्राचीन चाली, कोणाचीही व कशाचीही पर्वा भीडमुर्वत न धरिता, त्यांनी पुरातन इतिहास म्हणून, प्रांजलपणे लिहून ठेवण्यास माघार घेतली नाही, हे होय. सरमिसळ समागम, अतिथीला स्वस्त्रीसमर्पण, पशूसमागम, गुरुपत्नीगमन, बहुपतित्व, अल्पकालीन विवाह अटींचे विवाह इत्यादी नीतिबाह्य चालींचा निर्देशच नव्हे तर तपशीलवार वृत्तान्त स्थलोस्थली जो त्यांनी दिला आहे त्यावरून प्रामाणिक इतिहासकाराचे अवघड काम त्यांनी किती उत्कृष्टपणे पारं पाडिले आहे, ते विशद होते. गर्ह्य व निंद्य म्हणून वरील चालींची हकीकत जर व्यासांनी दाबून टाकली असती, तर जगाच्या इतिहासाची केवढी भयंकर हानी झाली असती तिचा अंदाज समाजशास्त्राचे परिशीलन करणा-या विद्वानास यथायोग्य करता येतो. प्रजापति संस्था निर्माण झाल्यावर त्या संस्थेच्या पूर्वी ज्या विचित्र चाली समाजात रूढ होऊन बसल्या होत्या त्या समाजातून एकाएकी नाहीशा झाल्या नाहीत. त्यापैकी बहुतेक सर्व चाली नाना देश, नाना पोटसमाज यात प्रजापति संस्था निर्माण झाल्यानंतरही प्रचारात होत्या व पुरातनधर्म म्हणून लोकमान्य होत्या. त्यांचा तपशील न देण्याचे जरी व्यासांनी मनात आणले असते, तत्रापि त्यांनी पिढ्यानुपिढ्यांची परंपरागत मनोरचना त्यांच्या आड निःसंशय आली असती. जी भाषा, ज्या संस्था, जी परिस्थिती मनुष्याच्या मनाची रचना करते त्या भाषेला, संस्थांना व परिस्थितीला सोडून मनुष्य एक वाक्यही इतिहास म्हणून उच्चारू शकत नाही, अशी स्थिती मनुष्यमात्राच्या मनोरचनेची असल्याकारणाने गर्ह्य म्हणून अनेक प्राचीन चालींचा वृत्तान्त व्यासांनी जर दाबून टाकण्याचा प्रयत्न केला असता तर एकच निष्पत्ती फळास आली असती. ती ही की, महाभारत म्हणूस जो उत्कृष्ट इतिहास आज आपणास पाहावयास मिळतो तो मुदलातच लिहिला जाणे अशक्य झाले असते.