Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
बासष्ट लक्षांची जहागीर देण्याची कबूल करून नबाब परत आपले जागीं गेले. श्रीमंत नानासाहेब व दादासाहेब परत पुण्यास आले. हिंदुस्थानाकडील वर्तमान:- जनकोजी शिंदे मारवाडाकडील बंदोबस्त करून रेवडीवर जाऊन पोहोंचले. तेथें दत्ताजीही जाऊन पोहोंचले. पुढें दिल्लीस जाऊन गाजुद्दीखान वजीर याचें व त्याचें बनेना. कारण यास नजीबखानाचा पक्ष धरण्याचा होता. पुढें कांहीं तोफा दिल्लीस होत्या, त्या गाजुद्दीन याजपाशीं मागितल्या असतां देईना. लढाई होऊं लागली. तत्रापि शिंदे यानीं बळेंच दोन तोफा घेऊन कुरुक्षेत्रास निघाले. तोफा फार जड, त्या मध्येच पडल्या. शतद्रूपर्यंत गेले. लाहोरचा सुभा अदीनाबेग त्याचा पुत्र भेटला. त्याचे विचारें साबाजी शिंदे व त्र्यंबक बापूजी यांस १५००० फौज देऊन लाहोर, मुलतान व काश्मीर व पंजाब अटकेपर्यंत मुलुखाचे जप्तीस पाठविलें, आणि आपण कुंजपुरानजीक येऊन मुक्काम केला. तेथें गोविंदपंत बुंदेले भेटले. त्यांजकडे पूर्वीं नजीबखान यानें संधान लाविलें होतें कीं, मल्हारबांनीं तुचे हातीं आह्मांस दिलें, तुह्मीं आह्मांस साह्य करावें असें बोलणें लाविलें होतें. त्याजवरून गोविंदपंत यांनीं दत्ताजीस सांगितलें जे, नजीबखान भेटतील, भागीरथीचे पुलाचा मनसुबा त्यांचे हातीं होऊन जाईल ह्मणून बोलला. ते शिंद्यांशीं बरें आहे असें बोलले. इतक्यांत नजीबखान पांच हजार फौजेनिशी येऊन भेटला. सर्व मंडळी व बाया वगैरे यांचे मनांत, हा अनायासें थोडे लोकांनिशी आला. याचें निर्मूलन करण्यास संधि बरी आहे, असें सर्वांनीं सांगितलें असतां दत्ताजींनीं न ऐकतां, भागीरथीस पूल बांधून द्यावा, पलीकडील जो मुलूख मिळेल त्यापैकीं दहावा हिस्सा तुह्मांस देऊं असा तह ठरविला. तो कपटी, त्यानें ही साजकरोटी ह्मणजे शफत शिंद्यांशीं केली. नंतर तो नजीबखान शुक्रताल येथें जाऊन सुजायतदौला यास सांगून पाठविलें कीं, दत्ताजी शिंदे तुह्मांवर येतात. तेव्हां त्यानें नजीबखान यास निरोप पाठविला कीं, मी तुमचा आहें, पन्नास हजार फौज तुह्मांस देतों व पैसाही लागेल तो देतों व तुचें साह्य करितों, गनीमास नदीपार होऊ देऊं नये. असें वचन ऐकतांच अबदालीकडे नजीबखान यानें संधान लाविलें, आणि शुक्रताल भागीरथी उत्तरवाहिनी येऊन पालखीच्या दांडीसारखी वळण पडून दक्षिणेकडे गेली आहे. जेथें शुकांनीं परिक्षिति राजास भागवत सांगितलें, ती जागा मोठी बिकट खळ्या भारी कांहीं ठिकाणीं वाट होती, तेथें तोफा व खंदक खणून फौज ठेवून असाध्य असें नजीबखान यानें केलें, आणि शिंदे यास निरोप पाठविला कीं, बरसात खलास झाल्याशिवाय पूल होत नाहीं, तुह्मीं येऊं नये, पुढें पाहूं, आह्मांस येण्यास होत नाहीं. तेव्हां दत्ताजीस त्याचें कपट उमजलें.