Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ शितैन मया व अलफ, सन ११६९ फसली,
अवलसाल छ ९ सवाल, ५ मे १७५९,
ज्येष्ठ शुध्द १० शके १६८१.

अहमदनगरचा किल्ला मोंगलाकडून कवीजंग किल्लेदार याजकडे होता. तो पुण्यानजीक, मजबूत, सरकारांत असावा अशी खटपट बहुत दिवस मनांत होती. परंतु हा किल्ला हातीं येणें महत्प्रयास. त्याकरितां कांहीतरी किल्लेदाराशीं राज्यकारण केल्याशिवाय किल्ला हस्तगत होणार नाहीं. हा विचार करून किल्लेदार यास किल्ला गोळी न वाजतां सरकारांत तुह्मी दिल्यास वंशपरंपरें पनस हजारांची जहागीर देऊं अशी कराराची यादी शपथ बेलभंडारा देऊन ठरविली. त्याजवरून कवीजंग यानीं किल्ला या सालीं सरकारांत दिला, व त्यास कराराप्रमाणें जहागीरही पेशवे यांनीं पन्नास हजारांची दिली. छ १८ रमजान रोजीं (१६ मे १७५९) पा लखमेश्वर प्रांत कर्नाटकपैकी शिरहट्टी किल्ला व त्याखालील मुलूख लखमगौडा देसाई याजकडे होता. तो सरकारांत घेऊन देसाई व त्याचे पदरचे कारकून यांस कांहीं जमीन गांवगन्नापैकीं व नक्त नेणूक दमगी वगैरे चार गांव असे दिले, (५ मे १७६०) सोमवारीं. जंजिरेकर हपशी यानें बिघाड करून कोंकणप्रांतीं स्वार पाठवून उपद्रव करूं लागला. सबब याजवर रामाजी महादेव व शंकराजी नारायण व माणकर यांस पाठवून पारपत्य करून त्याजकडून उंदेरी किल्ला छ १० जमादिलाखर रोजीं (२९ जानेवारी १७६०) सरकारांत आला. या कामीं आंग्रे यांनीं बहुत कुमक केली. मानाजी आंग्रे यांनी कुमक केली. सोमवारीं घेतला. छ ६ रबिलावल रोजीं (२८ आक्टोबर १७५९) भाऊसाहेब डे-यांत असतां मुजफरखान याचा जांवई यानें डे-यांत शिरून भाऊसाहेब यांजवर हत्यार चालविलें. इतक्यांत जवळ लोक होते त्यांनीं त्यास धरिलें. विशेष जखम लागलीं नाहीं. तो हें कृत्य करण्यास मुजफरखान यानें सांगितलें ह्मणून बोलला, व त्याप्रमाणें मुजफरखान यानें कबूल केलें. त्या दोघांचा शिरच्छेद तेच वेळेस केला व रामचंद्र नारायण परभु कोणी त्या मसलतींत होता त्यासही धरून आणून किल्ल्यावर टाकिलें. नगरचा किल्ला कवीजंग किल्लेदार यानें पेशवे यांस अनकूल होऊन त्यांस दिला. ही खबर सलाबतजंग व निजामअल्ली यांस समजतांच त्यांनीं फौज किल्ला परत घेण्याकरितां तयार करून धारूरास पाठविली, व आपणही मागाहून सात हजार फौजेनिशी धारूराकडे निघाले. हें वर्तमान पेशवे यास कळलें. श्रीमंत व भाऊसाहेब व दादासाहेबसुध्दां स्वारीस निघाले. बरोबर फौज घेऊन निघाले. सबब उदगीरनजीक गांठले. लढाई झाली. त्यांत पेशवे यांचा कांहीं मोड झाला; परंतु छ १५ जमादिलाखर रोजीं ह्मणजे (३ फेब्रूवारी १७६०) उदगीर मुक्कामीं जी लढाई झाली, त्यांत नबाब अगदी शिकस्त होऊन दहा हत्ती व चार तोफा आल्या. शेवटीं तह होऊन पेशवे यांनीं नगर किल्ला घेतला. तो त्यांजकडे कायम राहून, शिवाय दौलताबाद व शिवनेर, जुन्नर, अशीरी व विजापूर येथील किल्ले सालेर मुल्हेर हे पेशवे यांस द्यावे.