Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

मुसलमान यांनीं तोफा पुढें करून डावे बाजूस अफगाण लोकसुध्दां सुजायतदौला व नजीबखान व उजवे बाजूस अमेदखान बंगष व रोहिले. मध्यें शहाअल्लीखान वजीर व या सर्वांचे डाव्या बाजूस शहापसंतखान होता. इब्राहिमखान यानें आपल्यासमोर अमेदखान रोहिला होता त्याजवर चाल करून याचे ८००० लोक मारिले. भाऊसाहेब वजिरावर गेले. युध्द मोठेंच झालें. फार लोक पडले. अडीच प्रहर सुभेदार शहापसंतखान मध्यें येऊन वजिरास कुमक केली. मोठें हातघाईचें युध्द झालें असतां विश्वासराव यास जखम लागली. सबब भाऊसाहेब हत्तीवरून उतरून होळकर यास निरोप पाठविला कीं, तुह्मास पहिलें जें सांगितलें तें आतां करावें. असें सांगून घोड्यावर बसून गर्दीत शिरले ते दिसेनासे झाले. तो निरोप होळकर यास पोहोंचताच होळकर निघाले व गायकवाडही निघाले. सर्व बायकामुलें शिपाई वगैरे जवळच पानपत गांवांत शिरले. दिवस गेला. रात्र झाली. रात्री अफगाणांची टोळी येऊन त्या गांवासभोंवती वेढा पडला. नंतर प्रात:काळीं त्यांनीं मराठे लोकांस बाहेर काढून अफगाणांनीं बायकामुलें वांटून घेतलीं. पुरुषांच्या दावणी देऊन डोकीं उडविलीं. त्यांचे शिरांचे ढीग आपल्या डे-यापुढें ठेविले. विश्वासराव याचें प्रेत सांपडलें. तें अहमदशा अबदलीजवळ राहिलें व सुजायतदौला यानीं अर्ज करून मराठ्यांचें हाती दिलें, तें हिंदूंनी जाळलें. जनकोजी शिंदा व इब्राहिम गार्दी जखम होऊन शत्रूहातीं लागले. तेव्हां त्यांनीं त्यांस मारून टाकिलें. यशवंतराव रणांत पडले. समशेरबहादर जखम होऊन पळत असतां कोणी गांवकरी यानीं त्यास मारिलें. विठ्ठल शिवदेव व नारो शंकर व दमाजी गायकवाड व मल्हारजी होळकर वगैरे फौज जी गेली, त्याचे चौथे हिशानें परत आली. सुरजमल्ल जाटाकडे गेली, त्यानें त्यांचा समाचार चांगले प्रकारें घेतला. इकडे श्रीमंत नानासाहेब याजकडील वर्तमान श्रीमंत छ १२ रबिलावल (१२ अक्टोबर १७६०) बुधवारीं स्वारीस निघाले. जानोजी व मुघोजी भोसले बरोबर होते, दादासाहेबसुध्दां. बरोबर सखारामबापूही होते. छ ३ रबिलाखर बाळाजी गोविंद यांनीं पठाणास बुडवून भेटी घेतल्याची बातमी आली. छ २१ रबिलाखर अशेरीचा किल्ला घेतल्याची खबर आली. छ १८ जमादिलावल नानासाहेब यांनीं आपलें दुसरें लग्न देशस्थ ब्राह्मण नारोबानाईक पैठणकर यांच्या कन्येशीं केलें. नंतर दादासाहेब यांची स्वारी छ ११ जमादिलाखर रोजीं वेगळी होऊन सखारामबापूसुध्दां निघून गुडमटकलाकडे गेले. ते अखेर सालीं गुडमटकल घेऊन छ १७ रमजानीं परत आले. श्रीमंतांची स्वारी भेलशास होती. तेथें पानपताचें वर्तमान समजलें. छ १३ साबान रोजीं रामगड पहाण्यास गोपाळराव गोविंद यास छावणीस ठेवून देशीं निघाले. छ १ जिल्काद सुमारें टोक्यास वैशाख शु॥ १३ चें बाजीरावाचें श्राध्द करून, परत पुण्यास आले. श्रीमंतांची स्वारी नर्मदातीरीं असतां पौष शु॥ १३ रोजीं पानपतचा काशीद सावकार लोकांचा पांचा दिवसांत औरंगाबादेस जाण्याचे करारानें निघाला तो सहावे दिवशीं श्रीमंतांस भेटला. अबदालीची व दक्षिणी फौजेची लढाई झाली, फौज बुडाली, असें सांगितलें. त्याजवळ एक कागद मिळाला त्यांत, दोन मोतीं गलत व दसबीस अशरफात व रुपयाको गणत नहीं, इतका मजकूर होता. कोणीं कोणास लिहिलें तें नांव वगैरे लिहिलें नव्हतें.