Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

हस्तनापुरास येऊन तेथून वैशाख शुध्द १० शके १६८१ रोजीं (२१ मे १७५९) दोन कोस मिरापुरावर मुक्काम केला. भाद्रपदपावेतों (सप्टंबर १७५९) गोळागोळी चालली. शिंद्याचे लष्करांत महागाई झाली. रसद येईना. भाद्रपदअखेरीस मोठी लढाई झाली. जनकोजी व दत्ताजीस जखमा लागल्या. जिवाजी हणमंतराव शिंदे पडले. नजीबखान याची फौज भागीरथीस पूल बांधिला होता त्यावरून पलीकडे गेली. पूल राखिला. नंतर कार्तिक शुध्द १ रोजीं (२१ आक्टोबर १७५९) शिंदे यांनीं गोविंदपंत बुंदेले व अंताजी माणकेशर याचे पुत्र तात्याजी, जिवाजी नाईक भोईटे व तुकोजी होळकर यांजबरोबर वीस हजार फौज देऊन जेता गुजर याचे विचारें हरिद्वाराजवळ भागीरथीपलीकडे गेले. असें नजीबखान यास कळतांच सुजायतदौला यास सांगून पाठविलें. तो पन्नास हजार फौजेनिशी आला. गोविंदपंत बुंदेले पळून गेले. हे मूळचे फितूरी होतेच. नंतर सुजायतदौला भागीरथीपलीकडे उतरला. इकडे अबदुलअल्ली खंदारबादशहा लाहोरास येऊन त्रिंबक बापूजीचा मोड केला. ते पळून दिल्लीस गेले. दिल्ली बादशहा यानें अबदालीस गाजुद्दीखान यास मारण्याचा संकेत ठरवून बोलाविलें. हीं संकेताची पत्रें गाजुद्दीन वजीर यास सांपडलीं. त्यावरून त्यानें एकदम बादशहा अलमशहाचा शिरच्छेद केला, आणि शिंदे यास लिहिलें. त्यावरून तेही कुंजपुरावर आले. मागाहून अबदाली आला. त्यास सुजायतदौला मिळाला. लढाई झाली. साबाजीचा पुत्र बयाजी शिंदा ठार पडला. मालोजी शिंदे पडले. जनकोजी शिंदे यास जबर जखम लागली. यशवंतराव जगदेव पडले. दत्ताजी गोळा लागून पडले. त्यांचा शिरच्छेद कुतुबशहानें केला. शिर नजीबखानाजवळ दिलें. त्यानें रुमालांत घालून अबदालीपाशीं नेलें. तें सुजायतदौला यानें दोन लाख रुपये देऊन मागून घेऊन दहन केलें. नंतर रूपराम कठारी जनकोजी घायाळ यास व भागीरथीबाई गरोदर होती तिजला व काशीबाई जनकोजीची स्त्री अशीं घेऊन पळाला, तों गिलचे पाठीस लागले. त्याजबरोबर गाजुद्दीन पळाला. एका दिवसांत ८० कोस कोटपुतळीस आले. मल्हारराव यास येणेंविषयीं पूर्वींच पत्र लिहिलें होतें. त्यांनीं जयनगरचा रोख सोडून शिंद्याकडे येत असतां त्यांची अशी दाणादाण होऊन कोटपुतळी येथें गांठी पडल्या. शिंद्यास डेरे, राहुट्या, पाल, पडदे वगैरे देऊन निघतात तों मागाहून लष्करचीं पळालेलीं माणसें फौज वगैरे मिळालीं. दोन फौजा एकत्र झाल्या. नंतर बायका देशी पाठवल्या. त्या दहावे दिवशीं चमेलीस आल्या. नंतर कुवरी नदीवर मुक्काम झाला. तेरावा पौष वा। १३ भागीरथीबाई प्रसूत झाली. पुत्र झाला. नंतर बाया उज्जनीस गेल्या. शिंदे होळकर यांचे पाठीस दुराणी लागले. नंतर पळत पळत ज्येष्ठमासपर्यंत (मे १७६०) जात असतां दुराणी कोळजळेश्वरास राहिला. यमुनेस पाणी आलें. शिंदे होळकर केरालीचे सुमारें चमेलीवर राहिले. दत्ताजी शिंदे वारल्याची खबर देशी आली. तेवेळेस भाऊसाहेब पड दुरानजीक मोंगलाईंतच तांदुळज्याची लढाई आटपल्यावर होते. तेव्हां या हिंदुस्थानचे स्वारीस दादासाहेब यांसच पाठविण्याचा श्रीमंतांचा विचार होता. परंतु त्यांनीं लाहोरच्या स्वारीस खजीना वगैरे कांहीं न आणितां उलटे कर्ज ८०००००० ऐंशी लाख करून आले होते. हें भाऊसाहेबांस बरें न वाटून मीच या स्वारींत जातों अशा आग्रहास पडले.