Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

रविलावल अखेरसाल या महिन्यांत (मे १७४१) ढवळपूरचे मळीस मुक्काम असतां, सवाई जयसिंग माळवे प्रांतांचा सुभेदार त्याची भेट नानासाहेब यांणी माळवा मिळण्याकरितां घेऊन बोलणें होऊन अखेर ज्येष्ठ शुध्द १४ ह्मणजे छ १२ रबिलाखर रोजी संवत् १७९७ इसवी सन १७४१ रोजी (१८ मे १७४१) उभयतांमध्ये तहाचे बोलणे ठरलें. तें असें की :- पहिलें कलम :- परचक्र चढ करून आलें असतां अगर परचक्रावर चढ करून जाणें झाल्यास जयसिंगांनी व मराठे यांनी एकमेकांची मदत ठेवावी. दुसरें कलम विचित्र आहे. बादशाहाशी बेइमान होण्याचा प्रसंग येईल अशी कल्पना मनांत घेऊन हें कलम लिहिले आहे कीं, हा प्रसंग मी येऊं देणार नाहीं, कदाचित् आल्यास मी जयसिंग पेशवे याचे पाठीशीं असेन. कलम ३ व ४ मोघम आहेत. पांचव्या कलमांत जयसिंग वचन देतो कीं, चमेला नदीच्या उत्तरेकडील ज्या रजपूत सरदारांविषयी बाळाजीनें शिफारस केली आहे, त्यांच्या हितावर मी दृष्टि देईन, जरासें बादशाहाच्या ताबेदारीत फरक करणार नाहीं, तर व खंड देतील तर त्यांच्या जमिनी त्यांजकडे चालवीन. शेवटील कलम सर्वांत महत्त्वाचें आहे कीं, सुभे माळव्याचे वजरीची सनद व त्याबद्दल रिवाजाप्रमाणें खिलत शाहूकडे पाठविण्याविषयी व चंबळा नदीचे उत्तरेकडील राज्यावर बसविलेला खंड घेण्यास परवानगी देण्यास सहा महिन्यांच्या आंत मी बादशाहाचा हुकूम आणितों. याप्रमाणें तह सन १७४१ इसवींत ठरून दुसरे वर्षी जयसिंग मयत झाला. शिंदे होळकर यांनी ग्वाल्हेरीस येऊन छावणीस राहून छ ४ जमादिलावल (७ जुलै १७४१) इसन्ने अर्बैन साली पुण्यात आले. बाबूजी नाईक यास पेशवेपद मिळालें नाही तेव्हां त्याचा कर्जाऊ पैसा पेशवे याजकडे येणें होता तो येण्याविषयी तो फार तगादा करूं लागला. यामुळें पेशवे यास बहुत संकट प्राप्त झालें. तेव्हां महादजी अंबाजी पुरंदरे पेशवे यांचे दिवाण यांनी त्या संकटांतून पेशवे यांची मुक्तता केली. यामुळे त्या दिवाणावर अत्यंत प्रीति करू लागले. रघूजी भोसले यानें चालविलेली खटपट व्यर्थ गेली. सबब तो बाबूजी नाईक यास बरोबर घेऊन कर्नाटकांत प्रतिनिधि श्रीमंत राव व फत्तेसिंग भोसले यांसुध्दां जाऊन सन्न १७४१ चे मार्च महिन्यांत त्रिचनापल्ली मराठ्याच्या हातीं लागली, व चंदासाहेब तेथील धनी कैद करून साताऱ्यास पाठविला आणि मुरारराव घोरपडे यास ठेवून दरसाल वीस हजार रुपये पेशवे यास देत जावे असें ठरलें. बाळाजी बाजीराव पेशवे यांनी शाहू महाराजांस आपली गरिबी दाखवून, फिरंगी लोकांकडील साष्टी, वसई वगैरे मुलूख सर केला त्याची सनद करून घेतली, व गुजराथ खरेदी करून नर्मदेच्या उत्तरेकडील मुलुखांतील खंडणी जी द्यावयाची त्याचाही वसूल पेशवे यांनीच करावा अशी सनद महाराजांकडून घेतली. बंगालचा नबाब सुजायतखान यानें आपला हस्तक लाहोर सुभ्यावर अल्लीवर्दीखान ठेविला. तो सुजायत मयत झाल्यावर त्याचा पुत्र तक्ताधिपति झाला; परंतु त्याची व याची लढाई होऊन तो तक्ताधिपति मरण पावला, सबब अल्लीवर्दीखान यास तें आधिपत्य प्राप्त झालें. त्यावेळेस उरसा सुभ्यामध्ये पहिले नबाबाचा हस्तक मुशरद कूली ह्मणून होता, त्याचा दिवाण मीर हबीब याशी अल्लीवर्दीखानानें युध्द करून त्यास सुभ्याचे पार घालविले. पुढें तो कांही दिवस गेल्यानंतर त्या अल्लीवर्दीखानाकडे चाकरीस राहिला. तो बंगाल्यात मराठे लोकांची सत्ता होण्याच्या कामी पुढे उपयोगी पडला. मुशरद कूलीखान यास अल्लीवर्दीखान यानें मुलुखांतून पार केल्यावर मीर हबीबाचा व व-हाडांत रघूजी भोसले याचा हस्तक भास्करपंत यास कटक सुभा सुटणेविषयी मसलत करून सल्ला दिला. तेव्हां भास्करपंतानें आपला धनी कर्नाटकांत होता त्याची येण्याची वाट पाहिली. इतक्यांत अल्लीवर्दीखान लष्करसुध्दां येऊन सुभा घेतला. त्यास मीर हबीबही जाऊन मिळाला. नंतर कांहीं निमित्त करून भास्करपंत बंगाल्यांत जाण्यास निघाला. बाळाजी बाजीराव पेशवे हिंदुस्थान प्रांत आपले सत्तेत आणण्याची वाट पाहात होता. त्यांनी हिंदुस्थान प्रांतातील गढा व मंडळा किल्ला हस्तगत केला. पुढें बरसात नजीक आली. सबब नर्मदा तीरीं छावणीस शिंदे होळकर यांस ठेवून आपण स्वत: परत निघाला. तो छ ४ जमादिलावल (७ जुलै १७४१) इसने अर्बैन साली पुण्यांत दाखल झाला. रामचंद्र हरी पटवर्धन यांची स्वारी इस्तकबिल छ २८ सवाल (६ जानेवारी १७४१) इहिदे अर्बैन तागायत छ २३ रबिलाखर (२६ जून १७४१) इसने अर्बैन.