Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ इहिदे अर्बेन मया व अल्लफ, सन्न ११५० फसली,
अव्वल साल छ ९ रविलावल, २४ में १७४०,
ज्येष्ठ शुध्द १० शके १६६२.

वीरगड फत्ते झाल्याचें वर्तमान आलें त्याप्रमाणें नवस केलेला छ ८ रविलावल रोजीं (२३ मे १७४०) फेडला. छ २० रविलावल रोजी (४ जून १७४०) निघून सातारा, वाई वगैरे करून छ २ जमादिलाखर रोजी (१४ आगष्ट १७४०) परत आले. वस्त्रें आणण्याकरितां स्वारी गेली होतीं. छ ११ रविलाखर आशाढ शु॥ १२ बुधवार रोजी (२५ जून १७४०) सातारे मुक्कामीं दहा घटका दिवसास बाळाजी बाजीराव यास पेशवाईची वस्त्रें झाली. बरोबर चिमणाजी अप्पाही होते. छ २७ जमादिलाखर रोजी (८ सप्टेंबर १७४०) पेशवे व फिरंगी गोवेकर यांचे दरम्यान तह झाला. त्यांत वसई प्रांत पेशवे यास दिला. त्यांत पुन: फिरंगी यांनी उपद्रव करूं नये. छ २४ रविलाखर (८ जुलै १७४०) दिपाजी जाधवराव पुण्यास परत आले. कार्तिक शु॥ ३ छ १ साबान (१२ अक्टोबर १७४०) भांबवडें येथे स्वारी गेली. पुढें जाणार इतक्यांत चिमाजी अप्पांची प्रकृति बिघडली. सबब छ २० साबान (३१ अक्टोबर १७४०) परत आले. छ १४ रमजान (२३ नोव्हेंबर १७४०) नानासाहेब स्वारीस निघाले, मुक्काम कोरेगांव. हिंदुस्थानचे स्वारीस गेले. छ १७ रमजान (२६ नोव्हेंबर १७४०) बहिरजी बलकवडे यांजकडून कुरंगगड व तुरूप किल्ले घेतल्याचें वर्तान आलें. छ ३ सवाल (१२ डिसेंबर १७४०) रेवदंडा फत्ते झाल्याचें वर्तान खंडोजी माणकर यांजकडून आलें. छ ८ सवाल रोजीं (१७ डिसेंबर १७४०) चिमाजीअप्पा कैलासवासी झाले. अन्नपूर्णाबाई सती गेली, पौष शु ॥ १० सह ११ बुधवार (१७ डिसेंबर १७४०) पहिली रखमाबाई अगोदरच मयत झाली होती. छ २७ सवाल (५ जानेवारी १७४१) मल्हारजी होळकर याजकडून किल्ले धार फत्ते झाल्याचे वर्तमान आलें. छ २९ सवाल (७ जानेवारी १७४१) मुक्काम बेदे परगणें यदलाबाद नबाब निजाम उल्मुलूक यांची भेट झाली. पूर्वी पेशवे यांजकडून पिलाजी जाधवराव गेले होते. त्यावेळेस पेशवे यांनी माळवे प्रांताबद्दल मागणें केलें व त्याची उत्तरें निजाम उन्मुलूक यांनी दिली ती येणेंप्रमाणें :- (१) प्रथम कलमांत हा अर्ज आहे कीं, बादशहानीं बाळाजी बाजीराव यास माळवे सुभ्याचें काम सांगावें आणि त्या सर्व प्रांताची जहागीर द्यावी. याजवर निजाम उल्मुलूख याचा जबाब असा झाला कीं, सुभेदार तर आह्मी खुद्द आहोत, जर हुकुमाची तामिली करीत जाऊं अशी पेशवे यांची इच्छा असेल तर नायबीच्या सनदा त्यास दिल्या जातील. दुसरे कलमांत अर्ज आहे की, बादशहानी पेशवे यास मदतखर्चास पन्नास लक्ष रुपये देण्याचें कबूल केलें ते द्यावे. त्याजवर जबाब आहे कीं, ही रकम बादशहाकडून घेऊन तुह्मांस देण्याविषयीं प्रयत्न केला जाईल. हा बोलण्याचा प्रकार, नादिरशाहा हिंदुस्थानांतून परत गेल्यावर जेव्हां निजामउल्मुलूक दक्षिणेत आपल्या मुलानें पुंडावा माजविला होता त्याच्या शासनास जातांना माळव्यांत आला तेव्हां झाला असें दिसतें. छ २० जिलकाद (२७ जानेवारी १७४१) त्र्यंबक हरी सुभेदार याजकडून पुन: बांडे फत्ते झाल्याचें वर्तमान आलें, परगणे नेमाडपैकी. जिल्हेज महिन्यांत (फेब्रुवारी १७४१) देवरीवर लढाई होऊन छ १ मोहरम रोजी (८ मार्च १७४१) ठाणें फत्ते होऊन आवजी कवडे यांचे स्वाधीन केले. छ २५ सफर (३० एप्रिल १७४१) भाऊसाहेब रघुनाथपंत व जनार्दनपंतसुध्दां साताऱ्यास जाऊन छ ३ रविलावल रोजी (८ मे १७४१) पुण्यास परत आले.