Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

आह्मी राणोजीसिंग, मल्हारजी होळकर, यशवंतराव पवार आणि पिलाजी जाधव स्वदस्तूर लिहून देतों की :- बाळाजीराव मुख्य प्रधान यांनी बादशाहाची नोकरी करणे कबूल केली आहे. त्यास जर तो यापुढें चाकरी करण्यास मागें पुढें पाहील तर आह्मी त्यास दोन गोष्टी सांगून तसें करूं देणार नाही आणि आह्मी सांगितले असतां जर बाळाजीराव चाकरी न करण्याचा हट्ट करील तर आह्मी सारे पंडितप्रधान याची चाकरी सोडूं. दाखल्याभावी हा दस्ताऐवज लिहून दिला असे. हा दस्ताऐवज सन १७४३ त छ ७ बिलावल (२१ एप्रिल १७४३) बादशाही कारकीर्दीच्या विसावे वर्षी ह्मणजे सन २४ जुलूस साली लिहून दिला. याप्रमाणें पेशव्यांची कबुलात झाल्यावर दिल्लीबादशाहा महमदशाहा यांनी आपले पुत्र अहमदशाहा याचे नावाच्या सनदा व परवाने शिरस्तेप्रमाणे छ २२ जमादिलावलचा (४ जुलै १७४३) व दुसरी सनद छ १८ रजबची (२८ आगस्ट १७४३) याप्रमाणें दोन पेशवे यास दिल्या, अर्बा अर्बैनात. बादशाहाकडून सनदा पदरी पडेतोपर्यंत या सालांत पेशवे यांनी हिंदुस्थानांत असतां व पुण्यास दादासाहेब वगैरे यांनी काय काय कामें केली ती खाली दाखविली आहेत. छ ८ रमजान (२६ अक्टोबर १७४२) महिन्यांत गढे मंडळावर लढाई झाली, व छ १ सवालरोजी (१८ नोव्हेंबर १७४२) गढे मंडळ फत्ते झालें. छ ९ सवाल उंडे-याचे (२६ नोव्हेंबर १७४३) अहीर यासी लढाई होऊन मोर्चे लाविले. छ २२ सवाल (९ डिसेंबर १७४२) झाशी घेतल्याची खबर आली. छ ३ जिलकाद (२० डिसेंबर १७४२) भाऊसाहेब व दादासाहेब जनार्दनपंतसुध्दां नाशिकास गंगास्नानास गेले. नानासाहेब हिंदुस्थानांत असतां छ ११ जिल्हेज रोजी (२७ जानेवारी १७४३) प्रयागास यात्रेकरितां आले. छ २४ जिल्हेज (९ फेब्रुवारी १७४३) रामपुरा काशी दक्षिणतीरास मुक्काम केला. तेव्हां श्रीमंतांच्या मनांत काशीक्षेत्र हस्तगत करावें ह्मणून आल्यावर स्वारीच्या ढाला काशीकडे फिरविल्या. त्यासमयीं काशींत सफदरजंग अधिकारी होता, त्यास ही गोष्ट कळली. तेव्हां त्यांनी घाबरून सर्व काशी क्षेत्रांतील नारायण दीक्षित पाटणकर आदि शिष्ट ब्राह्मण जमा करून आणून त्यांस सांगितलें की, तुमचे ब्राह्मण राजे यांनी काशी घ्यावयाचा बेत केला, याप्रमाणें ढाल उभी करून हिकडे येतात, त्यांस माघारे फिरवावें, नाहीतर तुह्मां सर्वांस मुसलमान करीन. अशी जरब देतांच सर्व ब्राह्मणांनी भिऊन त्यास सांगितलें की, आह्मी माघारें फिरवितों. असे बोलून दीक्षित आदिकरून चारशें ब्राह्मण उघडे बोडके काशीबाहेर श्रीमंत ज्या ठिकाणी उतरले होते त्या ठिकाणीं रात्रीस चार घटिका रात्र झाली त्यावेळेस पोहोंचले. ब्राह्मण समुदाय पाहून श्रीमंत डे-याबाहेर येऊन उभे राहून दीक्षित पाटणकर यांस पाहून बोलले कीं उघडे बोडके कां आला ? तेव्हां झालेला मजकूर श्रीमंतांस कळवून ब्राह्मण राखावयाचे असल्याचे आपण माघारें फिरावें हें चांगले आहे. हा मजकूर श्रीमंतांनी ऐकून इतक्या ब्राह्मणांस आह्मांकरिता दु:ख होतें तर आह्मांस या गोष्टीची जरूर नाही. तेव्हा ब्राह्मणांनी आपण माघारे फिरावें असे सांगितले. नंतर श्रीमंत बोलले की आह्मांस गंगास्नान करावयाचें आहे ते कसें घडेल ? हे ऐकून दीक्षित बोलले, आमचे मेळ्यांत आपण चलावें, आपल्यास स्नान घालून परत पाठवितों. त्यावरून श्रीमंत एकटेच त्या ब्राह्मणांबरोबर काशीत जाऊन स्नान करून माघारे उलटले. हा मजकूर सफदरजंग यानें ऐकिल्यावर त्याचा सन्मान झाला नाहीं ही आमची चूक झाली असें बोलले. श्रीमंत काशीहून गयेस चालते झाले. छ १० मोहरमी (२४ फेब्रुवारी १७४३) गयेस जाऊन गयावर्जन केले. त्यावेळेस बरोबर पिलाजी जाधवराव, महादजी अंबाजी पुरंदरे, बाजी भिवराव चावेरीकर व रघोजी भोसले होते. छ १४ सफर रोजीं (३० मार्च १७४३) मुस्ताफाखान याची भेट झाली व छ १५ सफरी (३१ मार्च १७४३) सौराज्य प्रांतांत मक्षुकाबादेस मुक्काम झाला तेथें अलाबकस याची भेट झाली. छ २३ सफर (८ एप्रिल १७४३) मौजे पलटी यापैकी मनोर येथें अलीवर्द्दीखान भेटीस आले होते. छ २९ रबिलावल (१३ मे १७४३) अखेरसाल साता-यास जाऊन छ १८ जमादिलावल (३० जून १७४३) अर्बा अर्बैन सालीं परत आले. महाराजांची प्रकृति बिघडली होती, सबब खुद्द पेशवे यावेळेस पुण्यास नव्हते. भाऊसाहेब गेले असावे. संभाजी आंग्रे मयत झाले.