Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

मग किल्लेदारानें येऊन विनंति केली की, जंजीरकराप्रें॥ करार कराल तर किल्ला देतों असें बोलूं लागला; परंतु तें चिमाजी अप्पानी मान्य केलें नाहीं. नंतर जागजागी मोर्चे बांधून तोफेचा मारा चुकवून जावयाकरितां जमिनीतून चर खणून मोठमोठ्या वाटा केल्या आणि किल्ल्याचे तटास भोंक पाडलें. त्यांतून जावयाजोगा रस्ता नव्हता, सबब कोटाखाली सुरुंग पाडू लागले, तेव्हां किल्लेकरीही त्याच सुरुंगाचे सुमारें आंतून सुरुंग पाडूं लागले, यामुळें मराठ्यांचा यत्न व्यर्थ गेला. मग विचार ठरला की पांच सुरुंग लावून तटास मोठें खिंडार पाडावें. त्याप्रें॥ पाच सुरुंग तयार केले. पो॥ प्रथम तीन सुरुंगास आग घातली. पो॥ दोन उडाले. खिंडार मोठे पडलें. त्यांत मराठे लोक जाण्यास निघाले, तों तिसरा सुरुंग उडाला, त्याने मराठे लोक फार गेले. तेव्हां किल्लेकरांनीही लागलीच तो रस्ता बंद केला. आतां जावयास उपाय राहिला नाहीं. एक सुरुंग पहिलाच उडविला होता, परंतु त्यानें कांहीच कार्य झालें नव्हतें. पांचवा सुरुंग तयार करण्याचे काम मल्हारजी होळकर यांजकडे होतें. त्याणी तें काम पक्कें केलें होते. तो सुरुंग उडविल्याबरोबर मोठा बुरुज ढासळून मोठा रस्ता झाला, व आंतील लोकांस खाण्यापिण्याची वगैरे सामग्रीही राहिली नव्हती. सबब त्यांणी शेवटी सल्ला केला कीं आठ दिवसांत किल्ला खाली करून देतों. असा सल्ला होऊन लढाई महकूब झाली. वसईवर हल्ला छ ४ सफर (२ मे १७३९) रोजी होऊन छ ६ सफरी (४ मे १७३९) फत्ते झाली; व निशाण वैशाख व॥ ४ मंगळवार (१५ मे १७३९) दोनप्रहरीं पेशवे यांचे किल्ल्यावर लागले. श्रीमंत बाजीराव यास किल्ला सर झाल्याविषयी छ १८ सफरी (१६ मे १७३९) पत्रें कसबे रानाळी पे॥ जेनाबाद येथें आली. हा किल्ला घेण्याचे कामी खंडोजी माणकर व परशराम नाईक आंतुरकर व तुलबाजी मोरे यांणी अन्य वेषें कोणी गुराखी, कोणी कासार बांगड्या भरणार व कोणी सुतार असे वेष घेऊन किल्ल्यांतील भेद आणविल्यावर किल्ला सर झाला. या किल्ल्याचे मोहिमेंत एकंदर पेशवे याजकडील मनुष्यें बाराचौदा हजार सुमारें मेली व फिरंगी याजकडील मेले जखमी झाले, मिळून आठशें याप्रें॥ जालें. इराणचा बादशहा दिल्लीस येण्याचें कारण वजीर व उमराव यांणी विचार केला की, मराठ्यांचें प्राबल्य फार झालें. बादशहा वेडा. दिल्लीपर्यंत बाजीराव स्वा-या करितात व बंगाला अयोध्येपर्यंत भोसल्यांनी मुलूख घेतला. सबब इराणी बादशहाशी राज्यकारण करून दुसरा बादशहा स्थापावा असें करून महंदकुलीखान ऐशी हजार घोडा व पंचवीस हजार गाडद तोफखानासुध्दा आला. तेव्हा बादशहानें विचार केला की, आपलेच पदरचे लोक फितले. ह्मणून देवराव हिंगणे याचे विचारें बाजीराव पेशवे यांस दोन लाख फौज मागितली. निम्मे अंमल हिंदुस्थान सुभा घ्यावा असा करार ठरून पत्रें आली. तेव्हा वसईस राज्यकारण लागलें होतें, तें आटपून बाजीराव दस-यास हिंदुस्थानात निघाले. ही खबर लागतांच इराणी फौज मोठ्या मजला करीत दिल्लीत येऊन बादशहास कैद केलें. दौलत जप्त केली. बादशहाबेट्या बहिणीशी निक्के लावून नेल्या. दिल्लीत मोठी लूट झाली. लक्षावधी मनुष्यें मेलें. तेव्हां शहरचे लोकांनी इराणी लोकांवर हल्ला केला. इतक्यांत मराठ्यांची फौज जवळ आलीं, असें ऐकून अजीमशहास कैदेंतून मुक्त करून गादीवर बसविलें. तेव्हां दौलत व किल्ले गेले. आपण येथे राहून काय करावें ह्मणून अजमीर येथेंच राहिले. तामसखा दौलत घेऊन इराणास चालल्याची खबर समजतांच बाजीरावसाहेब स्वारीस निघून येणार तो नर्मदातीरी वैशाख व॥ १६६२ साली वारले.