Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ सबा सलासीन मयाव अलफ, सन ११४६
फसली, अवल साल छ २४ मोहरम, २५ मे
१७३६, ज्येष्ठ शुध्द ११ शके १६५८.

अवल साल मोहरम महिन्यांत [२५ मे १७३६] चिमाजी अप्पा जुन्नरापर्यंत जाऊन 
केंदूरपाबळ मुक्कामाहून छ १ सफर रोजीं ३१ मे १७३६ पुण्यास आले. बाजीरावसाहेब सालगु॥ हिंदुस्थाने स्वारीस गेले होते ते या अवलसालीं छ २५ सफर रोजीं [२४ जून १७३६] पुण्यास आले. मोहरम महिन्यांत बाई महायात्रेस गेली, ती परत येऊन मावंदें झालें. छ ५ जमादिलावल त॥ छ १४ जमादिलाखर [३१ आगस्ट ९ आक्टोबर १७३६] स्वारी रावसे॥ यांची साता-यास ग्रहणाकरितां गेली. ग्रहण करून राणोजी शिंदे व मल्हारराव होळकर महाराजास भेटविलें. छ १९ रजब रोजीं [१२ नोव्हेंबर १७३६] बाजीरावसाहेब हिंदुस्थानचे स्वारीस निघाले. आग्राप्रांतीं गेले, त्यावेळीं बाजीराव याणें फौज बहुत ठेविली. या कारणानें तो बहुत लोकांचा देणेदार झाला. व फौजेस पैसाही वक्तशीर न मिळाल्यामुळें आज्ञेंत अंतर पडूं लागलें. त्यावेळीं धावडशीकर स्वामी यांस बाजीरावानें विनंतिपत्र पाठविलें होतें. त्यांत हांशील:- मी बहुत लोकांचा देणेदार होऊन माझी कुतरओढ झाली, हेंच मला नरकयातना वाटतें. आणि सावकार व शिलेदार यांच्या पाया पडतां पडतां माझे कपाळाचें कातडें गेलें, असा हांशीलम॥ होता. बाजीरावसे॥ हिंदुस्थानांत गेल्यावर माळवे प्रांतांतील चौथ व सरदेशमुखीचा ऐवज वसूल करून जयसिंगाचे योगें बादशहापासून माळवा मुलूख आपणास मागितला. याशिवाय गुजराथ प्रांतांतील चौथाई व सरदेशमुखी सरबुलंदखानानें देऊं केली होती, त्याचीही आज्ञा व्हावी असें मागणें केलें. या मागण्याप्र॥ बादशहा व वजीर यांणीं देण्याचें कबूल केले. परंतु त्याचे पदरचा दुराणी सरदार याणें तें न देण्याविषयीं हरकत घातली. तेव्हां खानडौरान याणें आपला वकील याकूबखान यास बोलण्यास बाजीरावसे॥ याजकडे पाठविला. व त्याच्या हातीं चौथ व सरदेशमुखीच्या सनदा गुप्त देऊन सांगितलें कीं समय पाहून नंतर सनद घ्यावी. हें वर्तमान खानडौरान याजपाशीं बाजीरावसे॥ याचा वकील धोंडोपंत पुरंदरे होते यांणीं श्रीमंतास खबर ही कळविली. याकूबखान वकील बाजीरावसे॥ याजकडे आल्यावर बाजीरावसे॥ यांणीं एकंदर मागणें केलें, तें येणेंप्रमाणें- 'संपूर्ण माळवा मुलूख द्यावा, चंबळा नदीचे दक्षिणेकडील मुलूख द्यावा, किल्ला मांडू, किल्ला धार, व किल्ला रेमीन हे तीन किल्ले व पन्नास लक्ष रुपये रोख, शिवाय सरदेशपांडेपण साहा सुभ्यांचे द्यावें, याप्रमाणें मागितलें. यानंतर या मागण्यांपैकीं सरदेशपांडेपणाची सनद मात्र दिली. खानडौरान याचें व निजामाचें वांकडें होतें, याकारणानें खानडौरानें सनद देवविली.