Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्रीवरद.

लेखांक २९.

१७०३ श्रावण वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे. येथून कासीद पत्रें देऊन रवाना करितो. त्यास तीन महिने होतात. परंतु अजुरा मिळऊन पत्राचे जाब सत्वर येत नाहींत. याजकरितां सेवकाचें चित्त बहुत साशंकित असतें. तरी कृपा करून अजुरा सत्वर कासिदास द्यावा. व उत्तर समर्थ करणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. हे विनंति.

श्रीवरद.

लेखांक २८.

१७०३ श्रावण वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे: पूर्वी याजपासून कौलनामा लिहून घेतला आहे त्याची नक्कल व हालीं याणीं याद लिहून काढली आहे त्याची नकल, ऐशा दोनी नकला हिंदवी करून पो। आहेत, त्याजवरून ध्यानांत येईल. तात्पर्य, पहिले याजपासून लिहून घेतलें. आहे त्या कौलनाम्यावरून अंतर्वेद सरकारचे पदरीं पूर्ववतप्रमाणें पडती. याजकरितां यांचा जीव इच्छित नाहीं कीं, याप्रोंच दुसरा कौलनामा राजश्री महादजी शिंदे यांचे नांवें लिहून घ्यावा. प्रथम कौलनामा लिहून दिल्हा आहे, त्यांत शफत लिहून दिली आहे, तीस अंतर पडोन बेइमानी पदरीं पडते. याजकरितां इंग्रजांसी मिळूं सकत नाहीं. आणि आम्ही नित्यानीं तगादा करितों कीं, पाटीलबावा समीप आले होते, तुह्मींच चालून सामील व्हावें किंवा आपली फौज त्यांचे सामील पा।. त्यास, ह्या गोष्टी ऐकोन टाळाटाळ करितात. त्याचें कारण हेंच कीं इंग्रेजांसी भितात. खोळून त्यासी बिघाड करूं सकत नाहींत. अंतस्थ आह्मासी बोलणीं मात्र बोलून आजपावेतों बोलत गेले. व सरकारातही लिहीत गेले. त्याप्रोंच आतां इकडून ठेविलें आहे. याचें मानस कीं, इंग्रजांचीं पलटणें पाटीलबावांनीं मारून अंतर्वेदीत उतरलेस व सरकाराची फौज व सरदार जबरदस्त पडलेस जाणतील तेव्हां सामील होतील आणि पेशजी कौलनामा लिहून दिला आहे त्याजवरच कायम रहातील. जोंपावेतों ग्वालेरप्रांतीं इंग्रेज आहेत त्याचें पारपत्य जहालियाखेरीज हे दिल्लीबाहेर निघत नाहींसें दिसतें. पहिलें वचन गुंतलें आहे, याजकरितां इंग्रजांसही सामील होत नाहींत, दोहींकडे स्नेह ठेवितात. परंतु अंत:करणपूर्वक इंग्रेजांचे पारपत्य व्हावें, म्हणोन कायावाच्यामनेंकरून याचें बोलणें शफतपूर्वक आहे. व पूर्वी कौलनाम्याप्रमाणें अंतर्वेदींतील माहाल मुलूक दिल्लीसमीप आहे तो जातो ह्मणून आतां आशा उत्पन्न जाली आहे. व तूर्त यांची फौज शिखाकडेही अटकली आहे. याजकरितां दुसरेकडे खास करूं सकत नाहींत. श्रुत होय. कृपा केली पाहिजे. हे विनंति.

श्रीवरद.

लेखांक २७.

१७०३ श्रावण वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्रीं आज्ञा कीं : रा। बाळाजी गोविंद यांस सरकारचीं ताकीदपत्रें परभारां पाठविलीं आहेत. त्यास, मारनिल्हे तुह्मांस ऐवज सत्वर क्षेप-निक्षेप देतील. म्हणून पत्रीं आज्ञा. त्यास, पेशजी ताकीदपत्र सरकारचे मारनिल्हेचे नांवें आलें कीं, दाहजार रु।। जागिरीचे कमतीचे ऐवजीं देणें. त्यास ताकीदपत्र व दोन कारकून व माणसें पाठविलीं. त्यास च्यार महिने पदरचे खाऊन त्याजपाशीं राहिले. पत्राचें उत्तर मिळणें दूर. संभूत जाबदेखील न देत. निदानीं उत्तर दिल्हें कीं, आह्मापासीं खर्च भारी, मुलुकांत गढेमंडळेकराचा दंगा, याजकरितां पैका नाहीं. म्हणून उत्तर देऊन मार्गस्थ कारकून व माणसें रिकामीं आह्मांकडे पाठविलीं. त्यास फौजेंचा खर्च म्हणावा तर रा। बाळाजीपंत श्रीनगरी तीनसें पागेचे रावतानिसीं आहेत व गंगाधरपंत दोनशें स्वार पागेचे व दोनशें शिलेदार मिळून चौशा रावतांनिसीं कोचकनारप्रांतीं आहेत. आपले आपले ठिकाणीं स्वस्थ आहेत. या दिवसांत आपले ठिकाणीं हे आपल्यास चवघ्या राज्यारजवाडयाप्रमाणें जाणतात. सरकारची आज्ञा यांचे ध्यानांत नाहीं. कोण्ही सरकारचे तर्फेने जबरदस्त होवून येईल त्यासी बनेल त्या रीतीनें रजाबंदी पैका देऊन करूं, ह्मणून विलग बोलणीं नानाप्रकारें बोलून झांसीकर व हे एक विच्यारें आहेत. या उभययतांपासीं फौज नाहीं. उगेच कमाविसदारी बहाणे मात्र करून आपले ठिकाणीं आहेत. रा। महादजी शिंदे यांचे भेटीस देखील न गेले. पुढें जाणार आहेत. स्वामींनीं कृपा करून विसा हजारांची जागीर बुंदेलखंडांत देविली, ते मारनिल्हेना कमाल निम्मेची लावून दिधली. त्याप्रों आतां पांच हजार रुपये दिल्लीचे पदरीं पडतात. आणि येथें परदरबारीं राहणें खर्च भारी. रुपया खर्चास पुरत नाहीं. याजकरितां येथें पंधरावीस हजार कर्ज लोकांचें देणें जाहलें आहे. नित्यानीं पोटाचें संकट येऊन पडतें. कर्जदाराचे तगादे. या गोष्टीचा तपशील पत्रीं कोठवर लिहावा ? स्वामीचे प्रतापें व पुण्येंकरून आबरु व प्राण वांचले. नाहीं तर, ईश्वरें नेमिलें असेल तें घडेल. या समयांत सांभाळ करणार स्वामी समर्थ आहेत. पूर्वी सेवेसी विनंति पैदरपे लिहिली कीं, बाळाजी गोविंद रु।। आह्मांस देत नाहीं, हुजूर घेऊन सेवकांस पाठवाल तर जीव आबरु राहील, स्वामींनी त्यास ताकीद केली ते न मानीत, यास उपाय तेवेंत विनंति लिहितो. इतके आयास येऊन लिहावयास कारण, अवस्था परम कठिण जाली आहे. बाह्य आजपावेतों आपले कृपेनें जतन केला. पुढें कृपा करून संरक्षण करणार श्रीकृपेनें स्वामी समर्थ आहेत. नाइलाजास्तव विनंति लिहिली मान्य केली पाहिजे. येथून राजश्री महादजी शिंदे यांजपावेतोंही जावयास कर्जदाराचे ताडातोडीमुळें न बने. नित्याची संभूत चालवणें व ठरणें. उत्तरीं सनाथ कराल तोंवर ईश्वरें काय नेमिलें असेल ते होईल. श्रुत होय. स्वामीसेवेंत जीव शरीर अर्पिलें. अबरु रक्षणार मायबाप आपण दया केली पाहिजे. दर्शनलाभ घडेल तो सुदिन. हे विनंति. वरकड वृत्त वेदमूर्ति राजश्री गोविंद भटजीचे पत्रावरून श्रुत होईल. कृपा केली पाहिजे. हे विनंति.

श्रीवरद.

लेखांक २६.

१७०३ श्रावण वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्रीं आज्ञा कीं :- इंग्रेजांचा कदम पातशाही मुलुकांत बहुत नादुरुस्त व त्यांची तंबी होऊन खारीज करावें यांतच खैरीयत. सबब त्याचे तंबीचा नक्षा सरकारांतून ठरवात आला. व चहूंकडून इंग्रजांस तान बेवजे बसेल, तेव्हां हे शकल सलतनीचे बेहबुदीची व पातशाहीचे दाब- रोबाची सरकारांतून अमलांत आली. त्याचा संतोष पातशहास व नवाब मौसूफ यांस चित्तापासून आहे. त्यापक्षीं सरकारची खातरजमा होय ऐसे आहदपैमान द्यावयास पशोपेश करणार नाहींत. या मसलतीविसीची खातरजमेचीं पत्रें इकडून पेशजी पाठविलींच आहेत. त्या बमोजी तुम्ही त्यांची खातरजमा केलीच असेल. त्याजकडूनही पोख्तगीचे आहदपैमान घेऊन सरकारांत पाठवावें ह्मणून पत्रीं आज्ञा. त्यास, आज्ञेपों या पत्राचा मजकूर नवाब नजबखानासी बोलिलों. त्यांनीं उत्तर दिधलें कीं, याद कौलनाम्याची ठरवून दिधली आहे, ते तुम्हीं श्रीमंताकडे पाठवून त्याप्रों कौलनामा लिहून आणवणें, म्हणजे आम्हीही लिहून देऊं. त्यांजवरून आह्मी उत्तर केलें कीं, पेशजी कौलनामा आपले मोहरेनसी लिहून दिधला आहे, तो असतां आतां दुसरी याद कौलनाम्याची लिहून दिधली त्याप्रों कैसा कौलनामा आपले मोहरेनसी लिहून दिधला आहे, तो असतां आतां दुसरी याद कौलनाम्याची लिहून दिधली त्याप्रों कैसा कौलनामा होतो, कदाचित् आह्मीं ती याद श्रीमंताकडे पाठविली तर श्रीमंत म्हणतील कीं तेव्हां नबाब दुसरे होते आणि आतां आणिक कोन्ही आहेत कीं काय, थोराची बोलणीं कांहीं दोन नसतात, जें जालें तें जालें, आतां आपण दुहराऊन गोष्ट बोलतां याजवरून श्रीमंताचे ध्यानांत आपलें काबुचीपण येईल, याजकरितां आह्मीं ती याद श्रीमंताकडे पाठविली नाहीं, त्यास ज्याप्रों पेशजीचा कौलनामा श्रीमंताचे नांवें दिल्हा आहे त्याप्रों हल्लीं राजश्री पाटीलबावाचे नांवें लिहून द्यावा. म्हणून यांसी यथामतीनें बोलून लाजवाब केलें. मग उत्तर केलें कीं, दुसरी याद लिहून देतों. त्याप्रों लिहून आणवणें, तोंवर आम्ही आपली फौज लौकरच शिखाकडील मसलत आटोपून रिकामी करितों व तुम्हांस कौलनामा लिहून देतों, आणि पाटीलबावाचे शामील फौज व आह्मी लौकरच होतों. ह्मणून धातुपोषणाच्या गोष्टी बोलून आम्हांस धंदरीं लाविलें आहे. परंतु यांचा भाव हाच आहे कीं, रा। पाटीलबावा यांनीं इंग्रेजांचें पारपत्य करून अंतर्वेदींत उतरले म्हणजे कौलनामाही लिहून द्यावा आणि आपण व फौजही शामील व्हावें. ऐसा याचा मनोदय दिसतो. जोंपावेतों इंग्रेजांचें पारपत्य होत नाहीं, तोंपावेतों इंग्रेजांसी सिखुली दुशमनी करावयास भितात. पुढें अंमलांत येईल ते मागाहून विनंति लिहूं. श्रुत होय. कृपा केली पाहिजे. हे विनंति.

श्रीवरद.

लेखांक २५.

१७०२ श्रावण वद्य ११.

पु।। श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्रीं आज्ञा कीं : पेशजी कर्णल गाडर कलकत्त्याहून आला तो सुरतेस होता. तेथून पाण्याचे मार्गे अडचणींतून आपले जमावानिसीं ममईस आला. ममईकरासी व त्यासी कोशल जालें. तेव्हां कोकणांत वसईवर हंगामा शुरू करितील असें समजून, वसईत सरंजाम पाहिला होताच, आणखीही सरंजाम पोख्त करून मजबुदी केली होती. त्यास, इंग्रेज येऊन वसईस नमूद जाले. त्याजवरून सरकारांतून रामचंद्र गणेश बेहेरे फौज व सरंजाम किल्ल्याचे कुमकेस पाठविले कीं, एकीकडून किल्ल्याचा मार व दुसरीकडून फौजेचा महासरा, येणेंकडून मुखालिफ याणें आयास येऊन अंदेशांत यावें. त्याप्रों मारनिल्हे फौजसुध्दां जाऊन पोहोंचले. इतकियांत हरामखोरांनीं वसईचा किल्ला इंग्रेजांचे हवालीं केला. या उपरांत रामचंद्र गणेश यांची व इंग्रजांची लढाई चांगली जाली. ते लढाईंत खासा रामचंद्र गणेश कांहीं लोक कामास आले व इंग्रजांकडील कांहीं लोक व सरदार ठार व जायां जाले. त्यानंतर सरकारचे फौजेंत त्यांचे पुत्र माधवराव रामचंद्र होते ते फौजसुद्धां इंग्रेजांस महासरा देऊन राहिले होते. मागाहून राजश्री हरिपंत यांस बमय फौज हुजुरांत व तोफखाना व पायदळ बोरघाटाचे खालीं गाडराचे मुकाबिल्यास पाठविले. राजश्री तुकोजी होळकर इंदुरास होते त्यांस पत्रें सरकारांतून पाठविलीं होतीं कीं, तुह्मी आपले फौज- सरंजामसुद्धां निघोन, खानदेशांतील सुलतानपूर, नंदुरबार येथें केशवपंत दातार व रामचंद्रराव पवार दोन चार हजार फौज व दोन पलटणें इंग्रजी व तोफा असा जमाव करून हंगामा केला आहे. त्यांना गणेशपंत बेहेरे सरकारांतून फौजसुध्दां आहेत. तेथें तुह्मींही येऊन, केशवपंतास तंबी पोंचून, दरमजल हुजूर यावें. त्यावरून होळकर बमय फौज व सरंजाम निघोन, नंदुरबारेस येऊन गणेशपंत बेहेरे व आपण मिळोन, केशवपंत याची तंबी करोन, दोन पलटणें गारद केलीं. च्यार तोफा व दोन हत्ती व दोन हजार बंदुका, घोडी वगैरे सरंजाम पाडाव आला व चंद्रराव पवार ठार जाले. केशवपंत एकलाच पळून झाडींत गेला. उपरांत गणेशपंत यासी सुरत-प्रांतांत ताख्तोताराजी करावयास रवाना केलें. तुकोजी होळकर दरमजल हुजूर आले. श्रीमंतांची भेटी जालियावर राजश्री हरिपंत यांजकडे रा। केलें. ते बोरघाटावर जाऊन पोहोंचले. इतकियांत गाडर वसईहून निघोन बोरघाटाचे रोखें अडचणींतून येऊं लागला. तेव्हां राजश्री हरिपंत व पुढील फौज मिळोन, दोन टोळया करून, उर्फास महासरा देऊन तोफाचा मारा होत होता. परंतु तेथें मैदान नाहीं, अडचणीची जागा, फौजेनें निकड केल्यानें काम होणार नाहीं, सबब मैदानांत आणावयाचे तजविजींत होते. इतकियांत इंग्रेज मगरूरीनें बोरघाट चढून घाटमाथा आला. त्यानंतर राजश्री परशरामपंत मिरजकर याणीं, दहा हजार फौजेनिसी कोंकणांत इंग्रेजांचे पिछाडीस रसद बंद करून पायबंद द्यावयाकरितां पाठविले आहेत, त्यांनीं दोन हजार बैल गल्ल्याचे व किराण-बाबेचे छकडे वगैरे रसद जात होती ते मारून आणिली. घाटावरते इंग्रेजांचे मुकाबल्यास राजश्री हरिपंत व होळकर तीस हजार फौज व तोफखाना व पंधरा हजार पायदळ समेत आहेत. रोज लढाई सुरू आहेत. इंग्रजांकडील दोन तीन सरदार व कांहीं लोक गोळ्यानीं व बाणांनीं ठार जाले. त्यांचे लष्करांत रसद पोंहचत नाहीं. याजमुळें महागाई फार आहे. दहा अकरा पलटणें व तीस पस्तीस तोफा व एक हजार तुरुकस्वार याप्रमाणें त्यांचा सरंजाम आहे. घाटाखालीं व घाटावर सरकारी फौजा आहेत. सबब इंग्रेज बहुत फिकिरींत व अंदेशांत आहे. घाटावर ज्या अडचणींत राहिला आहे तेथेंच आहे. कुच करून पुढें येत नाहीं. राजश्री हरिपंताचे पुस्तगर्मीवर आह्मीही दहा हजार फौजेनिसी आठा दहा कोसांचे फासल्यानें आहों. ह्मणून लिहिलें तें सविस्तर अक्षरशहा फारसी करून पातशहास व नबाब नजबखानास येथें वर्तमान आगाऊ आलें नवतें तें समजाविलें. त्यास, हें वर्तमान ऐकोन आपली स्तुत तर्तुदीची बहुत केली कीं, आज आठ वर्षें जालीं. घरच्या धण्याचा फितूर व मुख्य धनी तो लहान नादान असें असोन, इंग्रजांचें जुंज आजपावेतों मोडिलें व पुढें लढाईस मुस्तेद आहेत, हें काम दक्षणचे सरदारांचें कीं इतके दिवस ठरून राहिलें, ईश्वर कारभारी व सरदार मुत्सद्दी प्रौलतीस द्यावें तर याप्रों द्यावें ! ह्मणून बहुताप्रकारें स्तव करून बोलिले कीं, श्रीमंत माधवराव यांचे ताले सिकंदर कीं, हैदरनाईक जुंजास षरीक जाला, राजश्री नानानीं इतकी मेहनत करून दौलत राखली आहे त्याप्रों पुढेंही मजबूद असावें, व इंग्रजांचे फंद फरेबांद येऊन त्यांसी सलूख किमपि न करावा, कदाचित् इंग्रेजांनी बदलून सलूक केला तरी पुढें सरंजाम करून प्रांत घ्यावयासी चुकणार नाहीं, याजकरितां सलाहच आहे कीं, इंग्रेजांस मारून त्यास नेस्त-नाबूद करावें, यांतच सर्वांचे रूप आबरू आहे, नाहीं तर जळचर पृथ्वीचे धणी जाले तर घोडयास पागोटयाची आबरू रहात नाहीं ! याप्रमाणें बोलून आपले ईश्वराचें नांव घेऊन श्रीमंतास आशीर्वाद दिधला कीं ईश्वर त्यांस यश दे आणि इंग्रज नेस्तनाबूद होत, यांतच सर्वांचे कल्याण आहे ! याप्रमाणें भाषणें जालीं. व हेही बोलिले कीं, माधवराव जाधवराई कोण आहे त्यास इंग्रजांचे बोलाविल्याप्रमाणें सलुकास पा।, त्यास काय ठरलें ? तेव्हां आह्मीं उत्तर दिल्हें कीं, सलुकास पाठविलें नसेल, यांनीं बोलाविलें असेल; तर त्याचा मनोदय व लांबीरूंदी पहावयासी पाठविलें असेल. हें वृत्त आह्मास आलें नाहीं, लिहून उत्तर येईल ते अर्ज करूं ह्मणून बोलून सेवेसी श्रुत व्हावयाची विनंति लि॥ आहे. तरी कृपा करून जाबसाल काय लागला आहे ते लिहावयासी आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. दर्शनलाभ होय तो सुदिन. हे विनंति.

श्रीवरद.

लेखांक २४.

१७०३ श्रावण वद्य ११.

पु.। श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्रीं आज्ञा कीं, नबाब नजबखान बहादूर याचा खलिता व पातशाही शुके नबाब निजामअल्लीखान- बहादुर व खंडोजी भोंसले यांचें नांवें पाठविले ते पावले. नबाब मौसूफ याचे खलित्याचा जबाब व सरकारांतून खात्रजमेची अर्जी पातशहाचे हुजुरांत व नबाब नजबखान बहादूर यांसी वजिराप्रों अलकाब तुमचे लिहिल्यावरून वाढवून खातरजमेचीं पत्रें मुजरद कासीद जोडीबरोबर तुह्मांकडे रवाना केलीं ते पावलींच असतील. त्याचीं उत्तरें पातशहाकडोन व नबाब मौसूफ याजकडोन सरकारची खातरजमा होयसी येऊन पाठवावीं, ह्मणोन पत्रीं आज्ञा. त्यास आज्ञेप्रों पेशजीच पत्रांचीं उत्तरें खलिता व शुका पातशाही घेऊन पाठविलीं आहेत. ते हुजुरांत पावून वृत्त श्रुत झालें असेल. व रा। खंडोजी भों व निजामअल्लीखान यास शुके पातशहाचे पाठविले. त्यांचीं उत्तरें पातशहास न पाठविलीं ह्मणोन पातशहा व नबाब नजबखान विस्मय करीत होते. त्यास, कृपा करून उत्तरें आणवून पाठवावयास आज्ञा करावी. प्रश्नोत्तरीं आज्ञा कीं, वरचेवर शुके व फर्मान भोंसले व निजामअल्ली यांस परभाराही पाठवणें. ह्मणोन आज्ञा. त्यास उभयतांपासीं आपले सरकारचे मातबर कोण कोण आहेत त्यास पत्रें लिहूं. येथून शुके पत्रें फर्मान जें हस्तगत होईल तें पाठवूं. राजश्री देवाजीपंत भोंसल्याकडील दिवाण राजश्री खंडोजी भों याजपासीं असेल तर त्याजपासीं पत्रें फर्मान पाठवूं. पूर्वी शुके पाठविले त्याचीं उत्तरे आणवून पाठविणार व सनाथ करणार स्वामी समर्थ आहेत. तात्पर्य, पातशहास व नजबखानास इंग्रजांशीं मिळूं देत नाहीं. त्याजकडील पैगम लालूच दाखवून वरचेवर लिहितात. माणसें येतात. श्रुत होय. हे विज्ञापना.

श्रीवरद.

लेखांक २३.

१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति कीं : इंग्रजांकडील वकील पेशजी आला होता व हालीं इंग्रज एक आला होता व हमेशा पत्रें चकत्या त्याजकडील येत्यात. त्याचें परिमार्जन करून आपले सरकारचा स्नेह व ममता पातशहासी व नबाब नजबखानासी धरितां आजपावेतों ठेविली व पुढेंही स्नेहवृद्धीची पैबंदी करीतच आहों. हें वृत्त इंग्रजांनीं लखनऊस श्रवण करून, लताफतअल्लीखान खोजा जो पलटणानसी पातशहाचे तैनातीस वजिराकडून येथें आहे त्यास सांगून पाठविलें कीं, फलाणे वकील दिल्लींत श्रीमंतांकडून आहेत ते पातशहाची व नबाब नजबखानाची मर्जी इंग्रजांकडे ठक्षक राहूय देत नाहींत, त्या अर्थीं हरयेक बहाणा करून त्याचें पारपत्य करणें, ह्मणून खोज्यास पत्र आलें. त्यावरून माणसा माणशीं ज्येष्ठमासीं खटपट करून आह्मांवर हात घातला. हें वृत्त लखनऊस आपले सरकारचे परम स्नेही व त्याचे मु-साहेब आहेत यांनीं लिहिलें त्यावरून श्रुत व्हावयास लिहिलें असे. त्याचा तपसील पुरवणीपत्रावरून श्रुत होईल. तात्पर्य, इंग्रेज ऐसे मात्रागमनी कीं, जीव घ्वावयास देखील चुकले नाहींत. परंतु आयुष्य होतें व स्वामींचे प्रतापेच वांचलों व पुढेंही रक्षणार स्वामीचें पुण्य समर्थ आहे ! कृपा केली पाहिजे. दर्शनलाभ होय तो सुदिन. हे विनंति.

श्रीवरद.

लेखांक २२.

१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.

पुरुषोत्तम महादेव यांचें पत्र नानांस :-
विनंति कीं, महबुबअल्लीखान नामें खोजा याजला जैपूर-प्रांतीं नजबखानांनीं पाठविलें. प्रांत हस्तगत केलियावर यांची सरदारी मोडून अनुपगीर गोसावी यास ते प्रांतीं पाठविलें. यास्तव ते अजुर्दा होऊन मकाणास गेले. ५-७ लाख रुपये आपले पदरीचें खर्चून फौज जमा केली. प्रांत हस्तगत केलेला गेला. पुढें याजपासून नाउमेद होऊन ते प्रांतीं आले आहेत. नजबखानांनीं बहुत मित्रता केली; परंतु न मानिलें. येथून चलते समईं स्वामीस विनंति लिहावयास सांगून पत्रें दिधलीं ते पाठविलीं आहेत. मर्जीस आल्यास उत्तरीं सनाथ करावें. वजिराकडील प्रांतास वाकीफकार, व सिपाई, व सरदारीचा ठसा त्याच्याकडे कुरेप्रांतीं चाललाच आहे. यास्तव ममतेंत घेऊन स्वामीचे कृपेचे उमेदवार केले. त्यासी करार केला आहे कीं, मला पाहून स्वामीपासीं जाणें, तु चे योग्यतेप्रमाणें मातबर सरदारी तुम्हांस पुढें पाठवून घेऊन जातील, व कांहीं फौजेची सरदारी देऊन अंतर्वेदीचे अथवा हरयेक जुजाचे कामास तुह्मांस पुढें करितील. याप्रों बोलून रवाना केलें. ते कदाचित् आपलेपासीं आले तर ममतापूर्वक आदरसत्कार करून संग्रहीं ठेवावें. या प्रांतीं त्याचे सलुकानें शत्रूचें मातबर फुटून सरकारचे अंकित होतील. पत्रोत्तरें पाठवावी. त्याचे बंधू येथें आहेत. त्याचे पासीं पावते करतील. म्हणजे खातजमेनें सेवेसी येतील. श्रुत होय. या दिवसांत यशवंतराव वाबळे यांनींजैपूर प्रातीं येऊन प्रांतांत दंगा केला. तेव्हां महाराज जैपूरकरांनी फौज पाठवून जुंजांत धरून घेतले. त्यांचा पुत्र ठार जाला. दोनतीनशें घोडीं लूटराजे याचे घरीं पावली व अंबरेचे किल्ल्यावर राजे खुशाली-राम कैद आहे तेथेंच त्यासही ठेविलें आहे. छ २ साबानीं कुवरसेत नामें खर्ची पूर्वीपासून पुणियांत आहे. त्याची पत्रें नजबखान वगैरेस आलीं ते बजिनस धरून पाठविलीं आहेत. तेथें शहरांत असतां इंग्रजांची वरिष्ठता लिहितो. याकरितां पूर्वीही पत्रें धरून घेऊन सेवेशीं पाठविलीं व हालीं पाठविलीं आहेत. नजबखानास अर्जी लिहिली आहेत. त्यावरून वृत्तव्यंग लिहिलें तें श्रुत होईल. वरकडाची पत्रें आहेत त्यांचा विस्तार त्यांचेच पत्रांवरून विदित होईल. गरीब पोटार्थी आहे. यास्तव हरकोठें पांच सात रु।। दरमा करून तेथून दूर ठेवावें. तेथें राहिल्यास स्वामींचे राज्य श्रीमहादेवाचें आहे, उत्कर्ष अधिक, गुह्य गोष्टही प्रकट होते, यास्तव लिहिलें असे. श्रुत होय. कृपा केली पाहिजे. दर्शन-लाभ होय तो सुदिन. छ ११ साबानीं वर्तमान आलें कीं, राजश्री महादजी शिंदे यांनीं इंग्रजांची फौज मारून ताराज केलीं, हजार बारासे माणूस राहिलें तें दो ठिकाणीं कोंडिलें आहे. वरकड गोहदकर व भदावरकर वगैरे व त्यांचे लोक गछ करून गेले तें वृत्त शेवेसी पावलेंच असेल. ईश्वर स्वामीचा प्रताप अधिकोत्तर करो. दर्शन-लाभ होय तो सुदिन. हे विनंति.

श्रीवरद.

लेखांक २१.

१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामींचे सेवेसी : -
विनंतिपत्रीं आज्ञा कीं, हैदर-अल्ली- खान-बहादूर याजकडील मार पेशजी लिहिण्यांत आलाच आहे. इंग्रजांस जरब त्यांनीं फार दिली. हालीं गंटूर देवाणापाटण ह्मणोन बंदर-किनारा जागा अडचणीची आहे, तेथें जमीयतसुद्धां करनेल कोट आहे. हैदरखान यांनीं सभोंवता माहसरा दिल्हा आहे. बंदी केली फरासीसही. सरंजाम पोख्त जलद येणार. फरासिसाचें राजकारण खानाशीं पक्कें जालें आहे. सरकारांतही फरासिसांचा शिलशिला अव्वलीपासून आहे. याप्रों तिकडील वर्तमान आहे. तुह्मीं हुजुरांत अर्ज करावा व नजबखान यांसही सांगावें. त्याचेही परभारें अखबारेवरून वर्तमान येतच असेल, ह्मणून लिहिलें. त्यास आज्ञेप्रों पातशहास व नजबखानास हें वृत्त श्रवण केलें. ऐकून बोलिले कीं, या दिवसांत हैदरअल्लीखानें याजपाशीं फौजेचा व पैक्याचा सरंजाम पोख्त आहे, त्यावरून सर्व गोष्टी अमलांत येत्यात. आह्मी बोलिलों कीं, सर्व गोष्टी मेहनतीच्या व जुरतीच्या आहेत, पूर्वीपासून जो कोण्ही जुरत मेहनत करीत आला आहे त्यास मुलुकास व खजान्यास व फौजेस कमी नाहीं. म्हणून बोलिलो. त्याचे उत्तर हेंच केलें कीं, सत्य आहे. याप्रों हरयेक समई उत्तेजन देतों. आतां बादबरसात पातशहासुद्धां बाहेर निघतो, ह्मणून आम्हासी करार करितात, तोफखाना वगैरे सरंजामही तयार करितात व कुंजपुरियाकडील फौजही रिकामी करावया तरतूद केली आहे. परंतु अंमलात येऊन सरकारचे मसलतीस उपयोगी पडत, याच विचारांत रात्रंदिवस आहेत अनुभवास येईल ते मागावून विनंति लि।।. कृपा केली पाहिजे. दर्शन होय तो सुदिन. हे विनंति.

श्रीवरद.

लेखांक २०.

१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.

पुरवणी श्रीमंत राजश्री नाना स्वामींचे सेवेसी :-
विनंतिपत्रीं आज्ञा कीं : राजश्री बाळाजी गोविंद झांसीकर याणीं तु चे गांवाविशई ऐवजाविसीं जाबसाल केले त्याचा तपसील लिहिला तो सविस्तर समजला. ऐसियासी, येविसी, त्यांचे कारकुनास येथून निक्षून ताकीद केली, ह्मणोन पत्रीं लिहिलें. त्यास, सरकारांत हमेशा विनंतिपत्रें लिहितों. त्यांत एक पुरवणी नाइलाजास्तव आपले नादारीची लिहितच आहे, त्याची उत्तरें याप्रों त्यास ताकीद केल्याचीं येतात. परंतु कांहींही कमाविसदारांस ताकीद प्रत्ययास येत नाहीं. आणि आह्मीं येथें परदरबारीं पूर्वींपासून सरकारचा नांव-लौकिकनक्ष त्याप्रमाणें राहिलें पाहिजे. खांद्यावर धोत्र घालून राहिल्यास रूप नाहीं व वावगा खर्चही नाहीं. परंतु बाह्य मात्र नीट राखणें प्राप्त, नेमणुकीप्रों खर्च ठेविला यास्तव कर्जदारी जाली. स्वामींनी जहागीर बुंदेलखंडांत लावून दिधली. ते बाळाजी गोविंद याणीं उरई परगणा कालपीसमीप दहा कोस आहे तेथें विसा हजारांची कमाल-जमेची चाळीस वर्षें जाली. जे गांव उज्याड पडले होते ते लावून दिल्हे. त्याची, आज पांच वर्षें जालीं, लावणी-जुपणीकरितां पांच सात हजार काचे बनारसचे जमेवर आले ते रु।। दिल्लीचे बारा आणे होतात. या प्रकारें वसूल होत होता. त्यास, हालीं कालपींत इंग्रजांचा अंमल जाला. त्याजमुळें आमचेही गांवची बद-अमली होवून कपर्दिक यंदां पदरीं पडली नाहीं. व झांसीकरांनीं नगदी पांच हजार दो वर्षांपासून बंद करून गांव लावून दिल्हे होते तेही त्याणीं जप्त केले. स्वामींनी फाजलापों उभयतां सरदारांवर निमे वरात दिल्ही कीं हरएक ऐवजीं रुपये देणें. त्यास, सरदारांनीं जेपुरावर पुढें वरात दिल्ही व निमे सरकारांतून जाटावर वरात दिल्ही व निमे सरकारांतून जाटावर वरात दिल्ही. दोन जागा कमपेश तीस तीस हजारांच्या वराता फाजलापों व तलबाप्रों वीस हजार रुपये जाटावर वरात दिल्ही. येकूण कमपेश ऐशीं हजार रुपये वराता. ते दोनीं स्थलें नजबखानाकडे गेलीं. याप्रों अमदानीचा प्रकार आहे. तेव्हां आम्हीं काय करावें ? कर्ज कोठपावेतों घ्यावें? कर्जही कोणी देत नाहीं. बाळाजी गोविंद याजकडोन, झांसीकरांकडशेन बुंदेलखंडचे जहागिरीकडोन व फाजलाचे वरातीप्रों कोठूनही रुपये आल्यास येथें मागील देणें लोकांचें भारी जालें त्याप्रों वीस हजार तूर्त देणें जरूर आहे तें वारून सेवेसी येऊं. पुढें नित्यानीं पोटास पाहिजे व कर्जदाराचें तगादे सरवत याचा तपसील पत्रीं कोठवर लिहावा ? स्वामी धणी जर या समयासी आपण खबर घेत नाहीं, तर प्राणासी गांठ पडली. येथून निघोन स्वामीपासीं येणें व येथेंही रहाणे कठिण जालें. या प्रकारची अवस्था येऊन लागली. तारणार स्वामीच आहेत. दुसरा आश्रय परमेश्वराचा किंवा स्वामीचा आहे. यास्तव निखालस फडणिसी दप्तरची वसुली जमेचे गांव देणें ह्मणून सनद पा। किंवा गांववसुली जमेचे हातास आले तर कर्ज तऱ्ही मिळेल व स्वामीस लिहिणें न पडे. सरकारांतून ऐवज बाकीचा येणें. त्याची वरात हरकसी जागा करून द्यावी कीं, रु।। हातास येऊन कर्जदारापासून सुटका होय ते करणार स्वामी समर्थ आहेत. याद अलाहिदा पा। आहे. त्याजवरून श्रुत होईल. कृपा केली पाहिजे. दर्शनलाभ होई तो सुदिन. हे विनंति.