Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.

लेखांक ५९.

59 1

१६३० आषाढ वद्य ५.

स्वस्तिश्री राज्याभिषेक-शके ३५ सर्वधारी संवत्सरे आषाढ बहुल पंचमी, रविवासरे क्षत्रिय कुळावतंस श्रीराजा शाहूछत्रपती स्वामी याणीं रा। बापूजी सोनाजी परभूउपनाम दिघे (शिक्का पेशवे) देशकुलकर्णी व गांवकुलकर्णी तो मुठेंखोरें, सुभाप्रांत मावळ, यांनी इनामपत्र दिल्हें ऐसें जे :-  स्वामी परराष्ट्रांतून स्वराज्यांत आले त्या प्रसंगी तुह्मी राजश्री परसोजी भोसलें याची जमी-निसी करून असतां त्याचे तर्फेने स्वामीचे दर्शनास येऊन लांबकानीचे मुकामीं दर्शन घेतले. स्वामीचे आज्ञेवरून राजश्री परसोजी भोसले यांस फौजेनिसी स्वामीचे दर्शनास आणिलें. ते प्रसंगी तुह्मीं सेवा बहुत एकनिष्ठेनें केली व पुढेंही निष्ठेने वर्तणूक करतां. तुमचें ऊर्जित करून वंशपरंपरे चालवणें, हें स्वामीस अवश्यक. याजकरितां तुह्मी विनंति केली की, आपण स्वामीच्या राज्यांतील वतनदार सेवक आहों, जें ऊर्जित कर्णे तें वतनसमंधावरी केलियानें परंपरागत चालेल. त्यावरून स्वामी तुह्मांवरी कृपाळू होऊन नूतन इनाम देहे तो मुठेंखोरं पों। २.

मौजे भवळी १ मौजे टेमघर १ ऐसी, दोनीं गावें इनाम कुलबाब, कुलकानू, खेरीज हक्कदार व इनामदार करून, चतु:सीमा भूमि पूर्व-मर्यादेप्रमाणें देखील जल, तुरू, पाषाण, झाड-झाडोरा, निधि-नि. क्षेपासहित, इनाम आजरामरामत करून दिल्हा असे. तरी सदरहू दोहीं गांवचा इनाम. उपभोग तुह्मीं व तुमचे बापभाऊ जनाजी. राम देशकुलकर्णी खोत पुत्रपौत्रादि-वंशपरंपरेने अनभऊन सुखरूप असणें. स्वामी व स्वामीचे वंशपरंपरेने तुह्मांस दोनी गांव चालवितील. जाणिजे. निदेश समक्ष.

59 2      बार. सुरुसूद बार.

अस्सलपत्र जोडबंद आहेत. मोर्तब सुमार २ तेरीख छ १९ रबिलाखर, सु॥ तिसा मया.

लेखांक ५८.

श्रीगणराज.

सेवेसी विनंति. चिरंजीव गोविंदराव पुरुषोत्तम याचे लग्नाचे निश्चयांत आणिलें. प्रसंग महर्गता व वोढीचा प्रकार, याची सीमाच जाली. आजपर्यंत सर्व आबरू स्वामीकृपेनें राहिली. पुढेंही स्वामीचा वरदहस्त मस्तकी आहे. तेणेंकडून सर्व पार पाडणार स्वामी समर्थ. दो चौ रोजां आज्ञा घेऊन जावें. सोबत व पहिले देणें येथें थोडेबहुत त्यांनी या दिवसांत उचल बहुतच आरंभिली आहे. त्यास कांहीं ताकीद होऊन आहेत. साह्यता घडावी व मर्जीस आल्यास सरकारांतून लग्नासंबंधी कांही कुमक बक्षीस अथवा फाजील पैकी जाल्यास सर्वांत भूषण व समई योग आहे. मर्जीहून प्रसंग असल्यास स्वामी कृपा करतील, ही खातरजमा आहे. सेवकास अन्य उपार्जना नाहीं. स्वामी कृपेनें सर्व प्रकारें संरक्षण जालें व आबरू राहिली. यत्किंचित आयुष्य तेंही पार पाडणार स्वामीच आहेत. श्रुत होय, हे विनंति. उत्तरी आज्ञा व्हावी, हे विनंति

लेखांक ५७.

कीं राहिले ते कीं तुह्मास द्यावे, आह्मांस दुसरे गाव द्यावयासी व ऐवजही देणें बनत नाहीं. आपले गांव सरकारांतून करार करून घेणे याप्रोही स्पष्ट उत्तर दिल्हें तेव्हां आमचे वरातीस कोठेंही ठिकाण नाहीं. याजकरितां हुजूर विनंती लि।। आहे, कीं पाटीलबावाचे सनदेंत गांव वजा करून हुजूरची सनद आमचे नांवे पाठवून द्यावी. गांवाची जमा बीा 

३१५० तालुके द्यावल जमा गांव दोन.
         ३००० मौजे आष्टेट जमा.
            १५० मौजे निचरोळी.
         ----------
         ३१५०

२५० पोा गाव दोन जमा
       २०० मौजे नारोळी जमा गुजराचे आमलांत
        ५० मौजे खरे झासी जमा रुाा
      ------
      २५०

लेखांक ५६.

खान याजसामगमें गेले आहेत. तिकडून सीखही भारी जमावानीसीं मुकाबल्यास आले आहेत. नित्यानीं गोळा-गोळीचें जुंज होतें. परंतु सीखाचा गलबा भारी जाणोन, याजपासीं दिल्लींत फौज व पलटणें व तोफखाना आहे त्यांतून आणिक सरंजाम त्याकडे स्वार व पलटणें रा। करितात. आह्मी नित्यानी इंग्रजाचे बाहेर निघण्याविसी तगादा करितों. त्यास उत्तर देतात की, सीखासी जुंज लागलें, आतां त्यांसी दबून सलूक करावा तर सलतनतेची आबरू रहात नाहीं, जर त्यासी सलूक न करावा तर तुह्मासी बोलत गेलों व श्रीमंतांस लिहीत गेलों या गोष्टींत अप्रामाणिकता येते, या अर्थी राहिली साहिली हुजूरची फौज तेही सिखावर पाठवून सदहदपर्यंत मुलूख हस्तगत करून तिकडील खात्रजमा जाली ह्मणजे पातशाहासहीत अंतरवेदींत उतरतो. ह्मणून धातुपोषणाच्या गोष्टी मात्र बोलून आमचें समाधान करितात. परंतु अमलांत येईल तेव्हां खरे. वरकड मार पुरवणीपत्रावरून श्रुत होईल. कृपा केली पाहिजे. हे विनंति.

लेखांक ५५.

दिवसांत आसफद्दौला वजीर यांस इंग्रजांनी उत्तर दिधले कीं, आमच्यानें तुमचा मुलूक राखवत नाहीं, तुह्मीं आपली खबरदारी करून घेणें. त्यावरून वजिरांचे येथे फौजेची निगादास्त हिंदुस्थानी लोकांची कमपेश आहे. श्रीकृपेनें राजश्री माहादाजी सिंदे यांनी ग्वालेरचें इंग्रेजांचे पारपत्य करून इटाव्याकडे किंवा कालपीकडे अंतरवेदीत उतरले तर समाम अंतरवेद सगळी आहे. नजबखानाचे काबूत पातशाहा. व नजबखान आजपावेतों शपथपूर्वक ह्मणतो कीं सीखाचे जुंजाचा फैसला जाला ह्मणजे आह्मी राजश्री महादज सिंदे यांचे सामील होतों. इंग्रजासी जुंजास नमूद होत नाहींत. सरकारची जरब भारी जालियावर ताबेदारी करितील. इंग्रजांस अतिशय भितात. व पूर्वी स्वामीस पत्रें लिहिली व सेवकाकडून सेवेसीं लिहविलें तैसीच बोलणी आहेत. अंमलात येत नाहीं. पुढें होईल ते लिहूं. कृपा केली पाहिजे. हे विनंति.

श्री.

लेखांक ५४.

१७०७ आषाढ वद्य ११.

विज्ञापना ऐसीजे. राजश्री पाटीलबावा यांचे मोठे मोहरेची अलकाब, वकील मुतलखुमददूल-उमराव व मुतगरूल- मुमालिक फरजंद अलीज्याहा महाराज्याधिराज माधवराव सिंदे श्रीनाथ बाहादूर मनसुर जमाफीदवीशहा अलम पातशाहा गाजी, येणेंप्रमाणें मोठी मोहर आहे. दस्ती मोहर लाहान, वकील मुतालख आलिज्याहा श्रीनाथ महाराज माधवराव सिंदे बाहादूर येणेप्रमाणें आहे.

श्री.

लेखांक ५३.

१७०७ आषाढ वद्य ९.

श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक गोविंदराव पुरुषोत्तम कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल तागाईत छ २३ माहे रमजान मुकाम श्रीमथुरा जाणून स्वानंदलेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष. इकडील वर्तमान पेशजी छ २३ माहे साबानीं विनंतिपत्रें पाठविली होतीं ते पावून सविस्तर वृत्त श्रुत जालेंच असेल. हालीं इकडील बारीकमोठें वर्तमान राजश्री नानांचे पत्रीं विनंति लिहिली आहे त्यावरून ध्यानारूढ होईल. कृपा करणार धनी समर्थ. बहुत काय लिहिणे ?कृपा केली पाहिजे. हे विज्ञप्ति.
पौ छ २ जिल्हेज सन सीत आश्विन मास.

श्री.

लेखांक ५२.

१७०७ आषाढ वद्य ९.

विज्ञापना. कुवरसेनाचीं पत्रें येथें नजबखानाकडे बातमीचीं पाठविली होती ते बजिनस सेवेसी पाठविली आहेत. पाहून मर्जीस येईल त्याप्रमाणें बंदोबस्त करावा. हे विज्ञापना.

श्री.

लेखांक ५१.

१७०७ आषाढें वद्य ९.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्र आज्ञा की :- तयमूरशाहा अबदालीकडील राजकारण मोठें आहे. याजकरितां तुह्मी सिलसिला लावून ठेवणें. उपयोगी पडेल. ह्मणून आज्ञा. त्यास, श्रीमंत स्वामीचे अर्जी आली ते स्वामीनीं आपले पत्र व सरकारचे पत्र खलिते गुलाम महमदखान यास जाब पाठविले होते ते त्यांस दिल्हे. व आह्मीही आपली अर्जी त्याकडून पहिले तीर्थरूपाचे नांवे पत्रें आलीं होती दोन, त्यांचे जाब लिहून देऊन रवाना केली आहेत. उत्तरें आलियावर सेवेसी पाठवून देऊं. या दिवसांत तयमूरशाहाकडील वकील पातशाहापासी स्नेह शिष्टाचार करावयास व येथील यांचे दौलतीचा रंग पहावयास तेथून रवाना केला आहे. तो अद्यापि दिल्लीस आला नाहीं. पुढल्यासालीं त्यांचे मानस दिल्लीकडे स्वारी करावयाचें आहे, ह्मणून श्रवणांत आलें. ते विनंति लिहिली आहे. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.

श्री.

लेखांक ५०.

१७०७ अधिक चैत्र वद्य ५.

श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
पो गोविंदराव पुरुषोत्तम कृतानेक सा। नमस्कार विनंति येथील कुशल ता। छ १९ राबल जाणून स्वानंदलेखन-आज्ञा करीत गेले पो. विशेष. इकडील वर्तमान पेशजी छ १७ राखरीं विनंतिपत्रें पाठविलीं तीं पाऊन विस्तारवृत्त कळलेंच असेल. हाली वर्तमान तरी, एकमास जाला, राजश्री पाटीलबावांनी रायाजी पायास आग्रियाचा किल्ला घ्यावा, ह्मणून डिगेचे मुकामीहून रवाना केलें होतें. त्यास, हे आग्रियास जाऊन, अंमल करून, किल्यास, मोर्चे लाविले होते. त्यास, छ ११ मिनहपावेतों किल्ला जुंजला. निदान भवानसिंग वगैरे पलटणवाले व गोलंदाज किल्ल्यांत होते ते फोडून छ १२ मिनहूस येऊन रायाजी पाटील यांस भेटून मागील तलब द्यावी आणि पुढें आमचे भायबंदीचा बंदोबस्त करून द्यावा ह्मणोन बोलोन, परस्पर वचन प्रमाण होऊन, छ १५ मेनहूस आग्रियाचे किल्यांत राजश्री पाटीलबावाकडून रा। धलपतराव ग्रामें गृहस्थ दाखल जाला. सुज्यादीनखान याजकडील आपला लोक सर्व किल्याबाहेर निघोन जुमामहजदीपासी येऊन डेरा केला आहे. किल्यांत राजश्री पाटीलबावाकडील बंदोबस्त जाला. व सुज्यादीनखानाच्याही भेटीचा ठराव राणेखानभाई व रायाजी पा। यांचे वि।। ठरले आहे कीं, मारनिल्हेसही भयदाब लावून देऊन त्याचेही चालवावें, ह्मणोन ठरले आहे. पुढे एक विच्यार आहे कीं, श्रीयमुना उतरून प्रात:काळीं समीप रामगड, अलीकडे नजबखानानें अलिगड ह्मणोन नांव ठेविलेंआहे, तेथे जाऊन, तोही किल्ला खाली करून, आपला अंमल करून, पातशाहासुद्धां दिल्लीस जावें. हा येक विच्यार आहे. परंतु पातशाहा दिल्ली जावयाची जलदी बहुत करितात. याजकरितां दुसरा विच्यार आहे कीं, अलिगडाकडे येक सरदार मातबर व फौज पलटण समागमें देऊन त्यास तिकडे रवाना करावें व पातशाहासहित आपण दिल्लीस जावें. असे दोन विच्यार ठरले आहेत. पुढे प्रत्ययास येईल तो विच्यार लिहूं. वरकड बारीक-मोठें वर्तमान राज्याच्या वाक्याच्या फर्दापातशहाच्या दरबारच्या व राजश्री पाटीलबावाच्या व वजिराचे दरबारच्या व कलकत्त्याकडील वर्तमान सविस्तर फारसी फर्दावरून कळेल. बहुत काय लिहिणे ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.