Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.

लेखांक ६९.

१६८७ वैशाख वद्य ५.

राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि :-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. पुरंधरचे जुने लोकांनीं आमचें नांव करून दग्यानें किल्ला घेतला ह्मणोन परस्परें वर्तमान विदित जालें. त्यास, हे गोष्ट आह्मांस किमपि ठाऊक नसतां, मधीं लबाडी करून कर्म केलें त्याचें पारपत्याविसी तीर्थस्वरूपात लिहिलें आहे. तुह्मीं हि विनंति करून लबाडी केली त्यांचें पारपत्यें. वडिलाच्या चित्तांत संशय न ये तें करणें जाणिजे. छ १८ जिल्काद. बहुत काय लिहिणे ?

(लेखनसीमा.)

श्रीमोरया.

लेखांक ६८.

१६८७ चैत्र शुद्ध ९.

श्रीमंत राजश्री नारोपंत नाना स्वामीचे सेवेसी :-
पो। गंगाधर यशवंत साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता॥ चैत्र शुध्द नवमी मु॥ इटावें जाणून स्वकीय लेखन करीत असिलें पाहिजे. आपलेकडून दोन तीन पत्रें राजश्री सुभेदारांस आलीं. परंतु आमचे स्मरण येकही पत्रीं न जालें. ऐसें नसावें. इकडील वर्तमान तरी :- नजीबखानांनीं सलूख जालियावरी अंतर्वेदच्या मुलखांतील बंदोबस्ताकरितां अनुपशहरीं आलों. तेथें नवाब सुज्यातदवले येऊन भेटले. कितेक प्रकारें निखालस भाव बोलून साहाय्य व्हावयाचा करार करून गेले. त्याउपर राजश्री सुभेदार साहेब इटावियासी आले. येथील काम उरकोन गंगातीरीं मेहंदीघाटांस जाणार. सविस्तरें राजश्री सुभेदारसाहेबीं लिहिलें आहे, त्यावरून कळेल. सर्वदां पत्रीं संतोषास पाववावें कृपा केली पाहिजे. कोणेविशीं आमचें विस्मरण पडों न द्यावें. उभयताहि वृद्धावस्था आहे. स्नेहाची वृद्धीच असावी. लोभ असो दीजे हे विनंति. चिरंजीव राजश्री विस्वासराव याच्या साहित्यांस अंतर होणार नाहीं. या प्रांतीं स्वारी गेलियावर रजवडियांची पारपत्यें होतील. चिंता न करावी. राजश्री महादाजी सिंदे मैत्र व राजश्री अवचितराव गणेश झासीं प्रांतीं आले होते त्यांनीं उत्तम प्रकारें बंदोबस्त केला, हें चिरंजिवांनीं सविस्तर लि॥ असेल, त्याजवरून कळों येईल. लोभाची वृद्धि करावी, हे विनंति.

श्री.

लेखांक ६७.

१६८६ .

राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि :-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मांकडून अलीकडे पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी प्रस्तुत तीर्थस्वरूप राजश्री दादासाहेबांची मर्जी कसी आहे, शरीरप्रकृत कसी अवषध कोणाचें घेतात, हे लिहिणें. मोगलाकडून हिम्मतखान आले होते, त्यासी सलूखाचें बोलणें कसें जाहालें, हिम्मतखानाचा भाव कसा आहे, सलूख जाहाला हा किती दिवस चालेल, हा प्रकार व त्याचा बोलण्याचा आशय कांहीच कळला नाहीं. जी दिल्ही जागीर ती घ्यावी आणि पुढें नीट चालावें, हा आशय नवाबाचा व त्याचे कारभाऱ्याचा कसा आहे, हें लिहिणें. वरकड वर्तमान मल्हारबाकडील व शिंद्याकडील लिहून हमेशा पा। जाणें. वरकड वर्तमान बारीक- मोठें हमेशा लिहिणें. इकडील वर्तमान तर तीर्थस्वरूपाचें पत्री पूर्वी लिहून पा। आहे, त्यावरून कळेल. प्रस्तुत हैदरनाईक मायनहळळीस गेला आहे. तेथे एक दोन मुकाम होईलसें दिसतें. त्याचें मनास हेंच की, च्यार दिवस चालवावे. हे छावणीस राहत नाहीत, हे तयाचे मत आहे. झाडी सोडून झुजायास यावयाचा प्रकार दिसत नाहीं. रात्रीस छापा घालावा, हे इच्छा धरीत आहे. दुसरा प्रकार तर किमपि दिसत नाहीं. नवाबाकडेही पत्रें पाठवीत आहे कीं, तुह्मी यावें. हाहि प्रकार करीतच आहे. नवाबहि काडळर-संगमावर येणार आहे. पुढें पहावे, याचें त्याचें कसे आहे हें न कळे. यांचे पारपत्याचा मजकूर तर: प्रस्तुत तो झाडींत आहे. पर्जन्य बहुत. महगता विशेष. असा प्रकार आहे. च्यार रुपये मिळवावे ते दिवस मागेंच गेले. प्रस्तुत ऐवजाचा प्रकार कोठेंही दिसत नाही. असा प्रकार आहे. याचें पारपत्य जाहाल्याखेरीज यावयाचें कसे ठीक पडतें? तोहि आपले छावणीची वाट पाहात आहे. त्याचेही लोक फुटतात व राजकारणें येतात. परंतु आपले फौजेस रोजमऱ्यास ठिकाण नाहीं. तेव्हां ते कसे येतात ? हे सर्व अर्थ वडिलात विदित करणें. आपले अपूर्ण.

श्री.

लेखांक ६६.

१६८५ कार्तिक.

केंदूर दमाजी गायकवाड यांजकडे दरोबस्त द्यावें. त्याचे ऐवजी मौजे मजकूरचा आकार अजमासें सात हजार व कित्ता दरसाल रुपये दाहा हजार एकूण सतरा हजार रुपये. याचा सरंजाम श्रीमंतांकडे रेवातीरी द्यावा. विद्यमान खांसा मारनिले. हस्ताक्षर रामचंद्र केशवदास सन अर्बा सितैन, कार्तिक वद्य.

श्री.

लेखांक ६५.

१६८५ श्रावण शुद्ध ९.

राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि:-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. पत्रीं लिहिलें कीं, अप्पाजी गणेशास ताकीद होऊन गोपाळरावाचे हवाली ठाणें हो तें करावें, ह्मणून संशय धरून लिहिलेंत व तीर्थस्वरूप राजश्री दादासाहेबांचे मनांत संशय आला आहे ह्मणून लिहिलें, तें कळलें. त्यास, तुह्मी वडिलास विनंति करून अप्पाजी गणेशास ठाणें न द्यावयाविसी आह्मीं पत्रें लिहिलीं असतील तीं पत्रें खामखा आणवणें. वडिलांचें चित्तांत संशय आणणारे आणतात. येथें तर वडिलाचे मर्जीसिवाय दुसरा अर्थच नाहीं. असें असतां, लहान माणूस वडिलाचें चित्तांत विपर्यास आणून देतात हें काय ? तरी हें पत्र वडिलास विदित करणें. या मजकुराविसी वडिलाची खातरजमा केलीच असेल. आह्मींच ल्याहावेसें काय आहे ? परंतु हें पत्र ल्याहावयाचें कारण हेंच कीं, इकडील मजकूर सविस्तर तुम्हांस ठाऊत असतां, चित्तांत संदेह आणून या गोष्टीचा अंदेसा न करतां पत्र लिहिलें याचें कारण कळलें नाहीं. परंतु असेंहि वाटतें कीं, वडिलांचे मर्जीचा भाव पाहून पत्र लिहिलें याचें कारण मात्र लिहून पाठवणें. जाणिजे. छ ७ सफर बहुत काय लिहिणें ? तेथील वृत्त कळावें म्हणून लिहिलें तें कळलें. तुम्हाविसी संदेह नाहीं. छ मजकूर.

(लेखनसीमा.)

श्री.

लेखांक ६४.

१६८५ वैशाख शुद्ध ११.

पु।। राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि :-
उपरी. राजश्री मल्हारजी होळकर यांनी चौथाई सरंजाम सरकारांत द्यावा असा करारवचन तीर्थरूपांजवळ केले असतां, आता वैजापूर रांवेर मात्र देऊं ह्मणतात ही गोष्ट अपूर्व आहे ! सर्वांनी केल्या कराराप्रों द्यावें आणि यानीं कां न द्यावे ? तुह्मी करार केला असतां कां देत नाहीं, वचन तुह्मी केलें तें कोठें राहिलें ? असें त्यांचें आंगी लाऊन बोलल्यास कार्य होईलसें आहे. तर तुह्मी तीर्थरूपास विनंति करून, त्यास कायल करून, चौथाई सरंजाम कराराप्रों सरकारांत येई ती गोष्ट करणें. यावेसी तीर्थरूपास विनंति लिहिली आहे. तुह्मी वरचेवर स्मरण देऊन कार्य करून घेणें. जाणिजे. छ १० सवाल. सुहूरसन अर्बा सितैन मया व अलफ. मल्हारबाचा प्रकार प्रत्ययास आलाच आहे; परंतु जेथवर निकड होईल तितके करणें. छ मार.

(लेखनसीमा.)

श्री.

लेखांक ६३.

१६८२ पौष वद्य १३.

राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान भावी पा। गांडापूर गोसावी यांसी :-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार व आशीर्वाद. सु।। इहिदे सितैन मया अलफ. कृष्णराव बापूजी व भिवराव बापूजी, उपनाम रामडोहकर, गोत्र विश्वामित्र, सूत्र आश्वलायन, कुळकर्णी कसबे मजकूर, याणी हुजूर कसबे पुणें येथील मुक्कामीं विनंति केली कीं, आपणांस मोगलोईतून बादशाहा आलमगीर सानी यांणी कसबे मजकूर हा गांव दरोबस्त इनाम करार करून देऊन फर्मान करून दिल्हा. त्याप्रमाणें आपणाकडे भोगवटा चालत आला. व सरकारतर्फेने सरदेशमुखी व बाबती ही पेशजी इनाम दिल्ह्याप्रमाणे चालतात. त्यास, आपण स्वामीच्या राज्यांतील पुरातन एकनिष्ठ सेवक, यास्तव स्वामींनी कृपाळू होऊन कसबे मजकूरचा मोगलाई अंमल सरकारांत आला, याजकरितां बादशाही फर्मान आपणाजवळ आहे तो पाहून मोगलाई अंमल व सरदेशमुखी व बाबती पेशजी आपणाकडे चालत आहे त्याप्रमाणे दरोबस्त इनाम करून देऊन भोगवटियास सनद करून दिल्ही पाहिजे. म्हणून, त्याजवरून मनास आणितां हे राज्यांतील पुरातन एकनिष्ठ सेवक, यांचे चालवणे आवश्यक, यांजवर कृपाळू होऊन कसबेमजकूर हा गांव हा त्यांस, हक्कदार व इनामदार व मोकासा खेरीजकरून, बाकी मोगलाई अंमल व सरदेशमुखी व बाबती पेशजी चालत आहे त्याप्रमाणें, देखील जल, तरू, पाषाण, निधिनिक्षेपादि, दरोबस्त इनामकरार करून देऊन हें पत्र सादर केले असे. तरी सदरहूप्रमाणें कसबेमजकूरचा दरोबस्त अंमल मशारनिलेच्या दुमाला करून यांस व यांचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने इनाम चालवणें. प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची प्रत लहून घेऊन अस्सल पत्र मारनिलेजवळ भोगवटियास परतोन देणे. जाणिजे. छ २५ जमादिलाखर.

आज्ञाप्रमाण. मोर्तब असे.

श्री.

लेखांक ६२.

१६८२ पौष वद्य १३.

राजश्री कृष्णराव बापूजी व भिंवराव बापूजी उपनाम रामडोहकर गोत्र विश्वामित्र सूत्र आश्वलायन कुळकर्णी कसबे मजकूर गोसावी यांसि :-
सेवक बाळाजी बाजीराऊ प्रधान नमस्कार. सुहूर सन इहिदे सितैन मया अलफ. तुह्मी हुजूर कसबे पुणें येथील मुकामीं विनंति केली कीं, आपणास मोगलाईतून अलमगीरसानी बादशाहा यांणी कसबें रामडोहो, पा। गांडापूर, सरकार दौलताबाद, सुभे खुजस्तेबुनियाद, हा गांव दरोबस्त इनाम करार करून देऊन बादशाही फर्मान करून दिल्हा. त्याप्रमाणें आपणांकडे भोगवटा चालत आला. व सरकारतर्फेने सरदेशमुखी व बाबतीही आपणांकडे चालतात. त्यास, आपण स्वामींच्या राज्यातील पुरातन एकनिष्ठ सेवक यास्तव स्वामींनी कृपाळू होऊन कसबे मजकूरचा मोगलाई अंमल सरकारांत आला; याजकरितां पेशजाची बादशाही फर्मान आपणाजवळ आहे तो पाहून मोगलाई अंमल व सरदेशमुखी व बाबती पेशजी आपणाकडे चालत आहेत त्याप्रों दरोबस्त इनाम करार करून देऊन भोगवटियासी सनद करून दिल्ही पाहिजे, ह्मणून, त्याजवरून मनास आणितां, तुह्मी राज्यांतील पुरातन एकनिष्ठ सेवक, तुमचें चालवणें अवश्य जाणून, तुह्मांवर कृपाळू होऊन, तुह्मी बादशाही फर्मान आणून दाखविला तो पाहून, को मजकूर हा गांव, हक्कदार व इनामदार व मुकासाखेरीजकरून, बाकी मोगलाई अंमल व सरदेशमुखी व बाबती पेशजी चालत आहेत त्याप्रमाणें, देखील जल, तरू, पाषाण, निधिनिक्षेपादि, देराबस्त इनाम करून देऊन हे सनद करून दिल्ही असे. तरी सदरहूप्रमाणे कसबे जकूरचा दरोबस्त अंमल तुह्मीं आपले दुमाला करून घेऊन तुम्ही व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने इनाम अनभऊन सुखरूप राहणें. जाणिजे. छ २५ जमादिलाखर, आज्ञाप्रमाण. मोर्तब.

श्री.

लेखांक ६१.

१६८२ मार्गशीर्ष शुद्ध १४.

61 1

दस्तक सरकार राजश्री पंतप्रधान त॥
कमाविसदार व जकाती माहाय. सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. राजश्री गणेश हरि कारकून नि।। जवाहिरखाना याचे तांदूळ खंडी ७ सात खो फिरगाण कोकणांतून आणितील, त्यास आणूं देणें. जकातीचा तगादा न लावणें. जाणिजे.

छ १२ जमादिलावल. आज्ञा प्रमाण.

61 2 बार.

श्री.

लेखांक ६०.

१६४१ आषाढ शुद्ध ५.

स्वस्तिश्री राज्याभिषेक - शके ४६ विकारी संवत्सरे आषाढ शुद्ध ५ पंचमी गुरुवासर. क्षत्रियकुळावतंस श्रीराजा शाहू छत्रपति स्वामी याणीं तपोनिधी वल्लभगीर गोसावी यांसि :- दिल्हे इनामपत्र ऐसी जे 60
तुह्मी हरिभक्तपरायण तपोनिधि तुमचे मठीं अतीतअभ्यागत येत असतात. त्यास अन्नपाणी पावल्याने स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण, ऐसे जाणोन, स्वामी तुह्मांवर कृपाळू होऊन मौजे आंबवली तो मुठेंखोर प्रां। मावळ, हा गांव पेशजीच्या मोकासियाकडून दूर करून, हाली कुलबाब कुलकानू खेरीज इनामदार व हक्कदार, चतु:सीमापूर्वक करून दिल्हा असे. तरी मौजे मार आपले दुमाला करून घेऊन तुह्मीं व तुमचे शिष्यपरंपरेनें इनाम अनभऊन सुखरूप राहणें. जाणिजे.
लेखनालंकार मोर्तब.

बार सूद. बारसुरुसूद. बार सुमंत. बार मंत्री.