Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

१४. लोकभ्रम शैशवावस्थादर्शक

ह्या सर्व देखाव्याचा अर्थ काय ? गेल्या तीन हजार वर्षांतील महाराष्ट्रांतल्या लोकांच्या शबल, काल्पनिक, व अस्ताव्यस्त साधनांचे, कलांचे व मतांचे हे मूर्त प्रदर्शन आहे. ह्याचा अर्थ तीन त-हांनी करता येतो. केवल श्रद्धालू जे आहेत त्यांना स्वर्गनरक ऊर्फ परलोक यातील देवादींच्या कृती या देखाव्यात दिसतात व त्या ख-याहून ख-या ते मानतात. केवळ कलेचे व शिल्पाचे जे चुंचू आहेत ते मूर्तीचे डौल, इमारतीचा घाट, चित्रांचा उठाव, रंगाची भरदारी व कल्पनेची भरारी वर्णन करण्यात दंग होतात आणि असले शिल्प आता लोपले म्हणून शोक करतात. इतिहासाचे जे अभ्यासी आहेत त्यांना ह्या देखाव्यात वरील दोघांच्याहून निराळा अर्थ दिसतो. सोंडेचा गणपती, पंखाचे देवदूत, चोचीचा गरूड, शेषशायी नारायण, चतुर्मुख ब्रह्मदेव, दशमुख रावण, घोडमुखे किन्नर, उर्ध्वशिख नारद, डोक्याच्यावर असलेला स्वर्ग व पायाच्या खाली असलेले पाताळ, हे सर्व भ्रांत कल्पनेचे खेळ आहेत, हे सर्वथैव खोटे आहेत, आणि शुद्ध शास्त्रज्ञान जसजसे वाढत जाईल तसतसा ह्याचा लोप कालान्तराने झालाच पाहिजे हे इतिहासज्ञ जाणतो आणि लोपत जाणा-या भ्रांत शिल्पाबद्दल हळहळत बसत नाही. उलटे, लोप अत्यंत मंदतम गतीने होत आहे ह्याचे त्याला दुःख होते. स्थूल मूर्तीवरचा, चित्रावरचा व वृक्षपशुपक्ष्यादींच्या प्रतिमांवरचा तरी भ्रांत विश्वास अद्याप लुप्त कोठे झालेला आहे ? आणि यद्यपि कोठे कोठे क्वचित् क्वचित् झाला, तत्रापि स्वर्ग, नरक, देव, देवदूत, जिहोव्वा, God, अल्ला, ह्या अमूर्त भ्रांत कल्पना अद्याप सर्वत्र विराजमान आहेतच. फक्त अद्वैत वेदान्ती म्हणून ज्यांना म्हणतात त्यांच्यातून व भौतिकशास्त्रज्ञ म्हणून ज्यांना म्हणतात त्यांच्यातून काहीच्या ठाई ह्या कल्पना नष्ट झालेल्या आहेत. परंतु ह्या थोड्या काहींची संख्या पृथ्वीवरील एकंदर लोकसंख्येचा कितवा लक्षांश आहे ? अद्याप जग, बाल्यावस्थेत कसले, शैशवावस्थेतच आहे.