Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
घराला विद्युद्वाहक तार योग्य रीतीने लाविली म्हणजे विजेचे भय फारसे राहत नाही हे शास्त्रीय ज्ञान झाल्यावर, इंद्र व त्याचे वज्र ही दोन्ही भ्रांतिजन्य व काल्पनिक ठरतात व मनुष्याच्या मनातून दोघांची हकालपट्टी होते. तसेच शुद्ध हवापाणी असले म्हणजे मरीदेवीची गुमान भासत नाही. देवाची आणि देवीची जरूर कोठपर्यंत, तर संकटनिवारणाचे उपाय सुचले नाहीत तोपर्यंत. संकट निवारणाचे जसजसे जास्त उपाय मनुष्याला सुचतात तसतसा तेवढ्यापुरता देवाला कमीकमी त्रास द्यावयाचा, किंवा तो तो देव काढून टाकून पदभ्रष्ट करावयाचा परिपाठ मनुष्याचा आहे. अशा रीतीने अनेक देव खोटे ठरल्यावर एकच एक देव मनुष्य प्रौढीने कल्पितो व आपणास शहाण्यांचा शिरोमणी समजतो. पण हा एकमेव अद्वितीय देवहि हजारो प्रसंगी उपयोगी पडत नाही. शेवटी त्या अद्वितीयालाही भिरकाटून देऊन मनुष्य एक अद्वैतवेदान्ती तरी बनतो व ईश्वराला मायेच्या म्हणजे भ्रांतीच्या सदरात काढतो किंवा भौतिकशास्त्रज्ञ बनून कल्पित ईश्वराच्या ताब्यातून संकटे निवारण्याचे काम आस्ते आस्ते बळकावीत जातो. तात्पर्य, कार्याचे खरे कारण जेथे जेथे सापडले नाही तेथे तेथे भूत किंवा देव हे कारण अज्ञ मनुष्य कल्पीत आलेला आहे व खरे कारण रखडले म्हणजे भूतकारणाला किंवा देवकारणाला रजा देण्याची त्याची वहिवाट आहे. तात्पर्य, देव ही कल्पना कृत्रिम आहे, स्वयंभू नाही.