Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
मध्यवर्ती देवालय प्रायः शिवाचे किंवा विष्णूचे व कधी कधी दोहोंची दोन देवळे असतात. कित्येक देवळे चालुक्यकालीन, कित्येक राष्ट्रकूटकालीन, कित्येक यादवकालीन व क्वचित् एखादे मुसलमानकालीन असते. यादवकालीन व मुसलमानकालीन देवळे साध्या हेमाडपंती घाटाची प्रसिद्ध आहेत. चालुक्यकालीन देवळे फार कलाकुसरीची व कारागिरीची असतात. प्रथम गरूड किंवा नंदी लागतो. नंतर सभामंडप सुरू होतो अणि गाभा-याच्या प्रारंभाला जयविजयांची परवानगी मागावी लागते. ती मागताना गणराजांची व त्यांचे बंधू स्कंदराज यांची प्रार्थना केल्यावर उंबरठ्याखालील कीर्तिमुखाला पायाखाली चिरडून आत प्रवेश जो करावा तो गर्भागाराची अपूर्व शोभा डोळ्यांत भरते. इथे प्रेक्षकांचे चिमुकले मन भांबावून जाते. पहावे तरी काय काय ? आधी कोणते पहावे आणि मागून कोणते पहावे ? प्रथम गर्भागार पहावा की सभामंडप पहावा की प्राकारचित्रे पहावी याचा निश्चय होत नाही. कोठे इंद्रसभा व दशावतार यांची रंगीत चित्रे काढिलेली आहेत, कोठे देवयोनी व गणदेवता यांच्या अर्धमूर्ती कोरल्या आहेत, कोठे यक्षकिन्नरराक्षस यांच्या प्रतिमा घडलेल्या आहेत, कोठे तत्कालीन राजांच्या सभा चितारल्या आहेत. हे सर्व नीट व साद्यंत व सार्थ पहावयाला महिना पुरणार नाही. नुसती उपकरणीच घेतली तर तो अटनीवरचा शंख, सर्पाकृति पळी, कमलाकृती अभिषेकपात्र, मच्छाकृती धुपाटणे वगैरे वस्तूंतही इतिहास भरलेला सापडतो. देवळांतून प्राकारांगणात येऊन खुद्द देवालयाचा पायापासून शिखरापर्यंतचा घाट पहावा तर तोही किती आश्चर्यकारक ! त्या मेहरपा, त्या जाळ्या, त्या मूर्ती, ते कोण, तो आकाशदिवा, सर्वच कांही विचित्र ! अंगणात नागशिला पडली आहे ती नागलोकांची स्मृती करून देते. पश्चिम देहलीने प्राकाराच्या बाहेर पडले म्हणजे अगदी नदीच्या पाण्यापर्यंत उतरलेला अर्धचंद्राकृती घाट लागतो. तेथे जलदेवतेचे देवालय आहे, संन्याशांच्या समाधी आहेत, चबुत्रे आहेत, सोडूनच शंभर हातांवर एक मशीद आहे, दुस-या बाजूस मातीचा एक ढिगारा दिसतो तो कदाचित् बौद्ध स्तूप असेल, पांच-चार मैलांवर डोंगरांची रांग दिसते तीत पांडवलेणी आहेत, दरम्यानच्या अंतरात ख्रिस्त्यांनी अलीकडे तीन-चारशे वर्षांत नवीनच उभारलेले एक क्याथोलिक चर्च आहे, आणि त्याच्याच जोडीला समाजिस्टांचे दहावीस वर्षांतले एक लहानसे साधे प्रार्थनामंदिर आहे.