Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
१६. विकार-विचार प्रदर्शक ४० साधने व इतिहास
असो. वीस शुद्ध व वीस शबल मिळून चाळीस साधने विकारविचारप्रदर्शनाची वर्णिली. ह्या चाळीस साधनांच्या साहाय्याने कोणत्याही देशाचा व तेथील भूत व वर्तमान लोकांचा इतिहास जाणावयाचा असतो. आपल्या महाराष्ट्राचा व ह्या भूमीतील भूत व वर्तमान लोकांचा इतिहास याच साधनांच्या साहाय्याने लिहिला जावयाचा आहे. अलीकडील पन्नास वर्षांत या चाळीस साधनातून फक्त अक्षरसाधने जी कागदपत्रे व ग्रंथ त्याकडे आपले विशेष लक्ष्य वेधून गेले. अल्पद्रव्यात अल्पश्रमाने याच साधनांची सहजोपलब्धी प्रथम होणे शक्य होते. तेव्हा झाले ते ठीकच झाले. परंतु या एका अक्षरसाधनाच्या उपलब्धीने सर्वच कार्यभाग आटपत नाही. अक्षर हे विचाराचे एक साधन आहे. अक्षराव्यतिरिक्त, आणीक एकोणचाळीस साधने राहिली त्यांची वाट काय ? अक्षराने सर्वच विचार प्रगट होतात असे नाही. अक्षराला साध्य नाहीत असे शुद्ध व शबल विचार, गान, चित्र, मूर्ती, स्थापत्य साधतात. तेव्हा ह्याही साधनांचा यथायोग्य समाचार आपण घेतला पाहिजे. अक्षरसाधनसंशोधनाहून हे संशोधन द्रव्यदृष्ट्या सापेक्षतः किंचित् जड आहे. तत्रापि जड असो वा हलके असो, या संशोधनाविना महाराष्ट्रेतिहासाचे चित्र फारच फार कोते राहील हे काही नाकबूल करता येत नाही. शिवाय अक्षरसाधन सर्व काळी सारखेच उपलब्ध असते असे नाही, पाच चारशे वर्षे सोडली म्हणजे कागदपत्रांचे सहाय्य बंद होते. फक्त ग्रंथ राहतात. त्यांना पुष्टी मूर्ती, चित्रे, स्थापत्य यांची द्यावी लागते. कित्येक कालाचा इतिहास तर अल्पस्वल्प अवशेषांवरून तर्काने अनुमानावयाचा असतो. अशा अडचणी आहेत. त्या टाळण्यास उपरिनिर्दिष्ट चाळीसही साधनांचे सहाय्य आवश्यक असल्यामुळे त्यांच्यासंबंधाने वरील सोळा कलमात किंचित् प्रपंच करणे अगत्याचे भासले.