Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
१५ देवकल्पनेचे मूळ भ्रम
मनुष्यमात्राच्या ह्या दीर्घकालीन म्हणजे लाखो वर्षांच्या शैशवावस्थेचा मंद इतिहास विचारविकारप्रदर्शनाच्या वरील शुद्ध व शबल चाळीस साधनांच्या स्थितीवरून अल्पस्वल्प अनुमानता येतो ह्या इतिहासावरून असे दिसते की ईश्वर, आत्मा, परमात्मा, काल, दिक्, कारण इत्यादी शुद्ध किंवा शबल कल्पना स्वयंभू नसून मनुष्याने शुद्ध भ्रांत अनुमानाने बनविलेल्या आहेत. अनुभवाच्या अन्वयव्यतिरेकाने शुद्धाचे काही कण मनुष्याला गावले आहेत, बाकी सर्व साम्राज्य येथून तेथून शबलाचे आहे. शबलातून शुद्वाकडे गती होत आहे. त्यातल्यात्यात समाधान. चमत्कार असा की उत्क्रांतीकडे म्हणजे इतिहासाकडे अवर्णनीय दुर्लक्ष्य असलेले दिसते. नीतिकल्पना, ईश्वरकल्पना, कार्यकारणभावकल्पना, दिक्कल्पना, कालकल्पना ह्या सर्व कल्पना लाखो वर्षांच्या उत्क्रांतीने बनत आलेल्या आहेत हे बहुतेक कोणताच तत्त्वज्ञ लक्षात घेत नाही. जो उठतो तो स्वयंभूत्वाकडे म्हणजे ईश्वरदत्तत्वाकडे ऊर्फ उपजतस्वभावाकडे धाव घेतो. जणू काय आज ह्या घटकेला माणूस आकाशातून अचानक भूमितलावर पडला ! जणू काय त्याच्या पाठीमागे लाखो वर्षांचा इतिहास नाहीच ! लाखो वर्षांच्या उत्क्रांतीने बनलेल्या एका कल्पनेची त्रोटक परंपरा देतो त्यावरून वरील कल्पना व त्यांचे स्वयंभूव ही दोन्ही किती भ्रांत्युद्भूत आहेत ते स्पष्ट होईल. अज्ञात प्रदेशातून ध्वनी ऐकू आला, माणूस दचकला, आजारी पडला, आजाराचे स्पष्ट कारण कळेना, सबब भूताची कल्पना केली. निरनिराळ्या अज्ञातोद्गम ध्वनींना, हावभावांना, आकाशचित्रांना, रोगांना, दुःखांना, सुखांना, जन्माला व मरणाला एक एक भूत कल्पिले. सुष्ट भुते व दुष्ट भुते निर्माण झाली. त्यांची उपासना सुरू झाली. नंतर रोगांची, सुखांची व दुःखाची खरी कारणे व तन्निवारक उपाय जसजसे कळू लागले, तसतशी सुष्ट भुतांची म्हणजे देवांची व दुष्ट भुतांची म्हणजे सैतानाची टर उडून जरूरी भासतनाशी झाली. विद्युत्पाताने मनुष्य मेला म्हणजे इंद्राने आपल्या वज्राने तो मारिला अशी भ्रांत समज असे व पटकीने माणूस मेला म्हणजे मरीदेवीने त्याला मारिले अशी भ्रांत कल्पना असे.