Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
भगवा झेंडाही इंद्रध्वजच आहे. ध्वजदंड या शब्दाचा मराठी अपभ्रंश ध्वजदंडः = झअअंडा= झेंडा. आणि भगवान् जो इंद्र त्याचा अपभ्रंश भगवा. भगवदध्वजदंडः = भगवा झेंडा. पाचवी काठी पेशव्यांच्या जरीपटक्याची आहे. जरीपटका म्हणजे पुनः इंद्रध्वजच. इंद्राच्या ध्वजाला जर्झरं म्हणून संस्कृत नाव असे. पटक म्हणजे कापडाचा तुकडा. जर्झरीकपटकः= जरीपटका. जरीपटका म्हणजे इंद्राचे निशाण. पेशव्यांनी ते नवीन शोधून काढलेले नाही. वैदिक कालापासूनचे ते जुनेच आहे. मध्ये मुसलमानी धाडीत देवळातून लपून राहिले होते ते छत्रपतीनी व पेशव्यांनी सैन्यात पुनः प्रचलित केले इतकेच. ह्या ऐतिहासिक काठ्यांच्या शेजारी अत्यंत जीर्ण झालेले व पावसापाण्याने झडलेले दहा पाच दगड तुमच्या सूक्ष्म नजरेखाली येतील. दगड पुरुषपुरुष किंवा अर्धा पुरुष उंच व हात पाऊण हात रुंद आहेत व त्यावर तीन चार मजली अर्धमूर्ती कोरलेल्या आहेत. कोरकाम ओबडधोबडच आहे, परंतु म्हसोबा, विरोबांच्याहून जास्त कुसरीचे आहे. एका मजल्यात शिवलिंग व स्त्रीपुरुष उपासक कोरलेले आहेत. दुस-या मजल्यात भालेवाले घोडेस्वार कोरलेले आहेत. तिस-या मजल्यात मोठमोठ्या ढुंगणाच्या नितंबिनी व कुंभस्तनी महाराष्ट्रवधूटिका कोरलेल्या आहेत. ह्या अर्धमूर्ती दगडांना कांदळ किंवा कांदळाचे दगड म्हणतात. महाराष्ट्रात असे एक गाव नाही की जेथील देवळाबाहेर, शेजारी किंवा आत हे कांदळ सापडणार नाहीत. हे कांदळ केव्हाचे ? ज्या काली पर्वतात व गुहांत व द-यात लेणी कोरण्याचे वारे महाराष्ट्रात शिरले तेव्हाचे. कांदळ हा शब्द कांदर या शब्दाचा अपभ्रंश. ' कंदरस्य इदं कांदरं.' कंदर म्हणजे पर्वतातील कोरीव लेणे. हा कंदर शब्द वाल्मीकि- रामायणात येतो. कंदरपूजा ऊर्फ लिंगपूजा महाराष्ट्रात फार जुनी आहे. बौद्धांपासून लिंगपूजकाचे संरक्षण करणारे भालेवाले कंदरांवर कोरलेले आहेत, बहुशः बौद्धांचा पराजय व लिंगपूजकांचा जय सुचवलेला असावा. ज्या अर्थी प्रत्येक खेड्यात कंदर सापडतात त्या अर्थी एका काली बौद्धांची व शैवांची मोठी दंगल महाराष्ट्रात होऊन गेली असावी असा तर्क होतो. कांदळांपैकी काही दगड अती जुने व काही अनुकरणाने केलेले बरेच म्हणजे फक्त पाच-सातशे वर्षांपलीकडील अर्वाचीन असे दोन प्रकारचे असतात. ह्या कांदळाशेजारी किंचित् अंतरावर वीर असतात. असुर, राक्षस, शक, यवन व मुसलमान यांच्यापासून शौर्याने गावाचे संरक्षण करण्यात देह ज्यांनी खर्चिला त्यांचे पुतळे देवळाच्या आवारात बहुमानाने मांडून ठेवण्याची चाल महाराष्ट्रात असे. मूर्ती ग्राम्य कारागिरीच्या असतात व काहीच्या खाली लेखही कोरलेला असतो.