Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

मुफस्सल मधील जुना विदीर्ण झालेला एखादा देऊळवाडा घ्या आणि ज्या भागात तो कालाने किंवा देऊळफोड्यांच्या हाताने छिन्नभिन्न झाला असेल ते भाग कल्पनेने एकत्र जुळवा. प्रथम जुनाट पिंपळ व वड यांचे पार लागतील. हे वृक्ष ब्राह्मण आहेत व ह्यांच्यावर ब्रह्मराक्षस रहातात. भ्रांतदृष्ट्या ब्रह्मराक्षस म्हणजे एक व्यंतरयोनी समजतात. ऐतिहासिक दृष्ट्या ब्रह्मराक्षस म्हणजे ब्राह्मण व राक्षस यांच्यापासून झालेली एक पुरातन संकर जात समजली तर फारसे चुकणार नाही. ज्या काली देशात राक्षसांची वस्ती होती त्या कालचा हा संकर असेल. ह्या वृक्षांच्या पुढे एखादा म्हसोबा किंवा विरोबा किंवा पोटोबा लागेल. एक साधा ओबडधोबड दगड व त्याला शेंदूर फासलेला चांगली नक्षीदार मूर्त करता आली नसती असे नाही. परंतु हे म्हसोबा वगैरे देव फार साधे व ओबडधोबडच असतात. त्यांच्या ओबडधोबडपणात इतिहास आहे. पुरातनकाली हे देव ज्या लोकात अस्तित्वात आले त्यांना ह्याहून जास्त कौशल्याची मूर्तिकला माहीत नव्हती, आणि माहीत असली तत्रापि स्वयंभू ओबडधोबड मूर्तीपुढे कृत्रिम सुंदर मूर्तीची किंमत त्यांना वाटत नव्हती. थोडे पुढे गेलात म्हणजे एका बाजूला वेताळसभा लागेल. हा वैशिष्ट्याने महारलोकांचा म्हणजे नागलोकातील एका कनिष्ठ जातीचा देव आहे. दुस-या बाजूला दगडाच्या एका देवळीत एक दगडी दिवा जळताना आढळेल. ही दगडी देवळी पितरांची आहे आणि दिवा रात्रंदिवस त्यांना उजेड दाखविण्याकरिता पाजळत आहे. दहा पाच हातांवर गावातील दोन चार सतींची देवळे लागतील. त्यावर दांपत्य कोरलेले असते. नंतर मारुतीच्या देवळापाशी याल. वैदिककालीन मरुत् म्हणजेच पौराणिकालीन मारुती, मरुत्, मारुतः, मारुतिः अशी तिसरी पिढी आहे. मारुती हा पांथस्थांचा संरक्षक. ह्यांच्यापुढे देवडी व त्यावरील गोपूर भेटेल. गोपुरात पूर्वी देऊळवाड्याच्या गाई बांधीत असत. सध्या तेथे वाजंत्र्यांचा ताफा रहातो. गोपुर पूर्वाभिमुख असून त्यातून प्राकारान्तः प्रदेशात जाण्याचा रस्ता आहे. प्राकार दोन अडीच पुरुष उंच असून त्यांच्या विटा हातहात लांब आहेत. प्राकार दुमजली आहे. खालच्या मजल्यात चौफेर वोव-या केल्या आहेत व वरच्या उघड्या मजल्यावरून शत्रूवर तिरंदाजी किंवा गोळीबार करण्याकरिता तटात छिद्रे ठेविली आहेत. देऊळ एकप्रकारचा किल्लाचे आहे. प्राकार दोन हजार वर्षांपूर्वीच्या शकयवनांच्या धाडी परतविण्याकरिता तटांच्या धर्तीवर बांधलेला आहे. आत गेलात म्हणजे मध्ये एक दोन मुख्य देवळे व भोवताली उपदेवालये दिसतील आणि त्यांच्यापुढे दहा पाच उभ्या काठ्या आढळतील. एक काठी इंद्रध्वज आहे, दुसरी गरुडध्वज आहे, तिसरी सिंहध्वज आहे आणि चवथी रामदासी भगवा झेंडा आहे. सा-या ध्वजा ऐतिहासिक आहेत. इंद्रापासून समर्थांपर्यंत सा-यांचे ते ध्वज आहेत.